Surah An-Naba With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

 78. अन् नबा - ٱلنَّبَأ

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

  1. हे लोक कोणत्या गोष्टीविषयी विचारपूस करीत आहेत?
  2. काय त्या मोठ्या बातमीसंबंधी
  3. जिच्याविषयी हे उलटसुलट चर्चा करू लागले आहेत?
  4. कदापि नाही, लवकरच यांना कळेल.
  5. होय, कदापि नाही, लवकरच यांना कळेल.
  6. काय ही वस्तुस्थिती नाही की आम्ही पृथ्वीला बिछाना बनविले,
  7. आणि पर्वतांना मेखांसमान रोवले,
  8. आणि तुम्हाला (पुरुष आणि स्त्रियांच्या) युगल रुपात निर्माण केले,
  9. आणि तुमच्या निद्रेला विश्रांतीसाठी बनविले
  10. आणि रात्रीला पांघरूण
  11. आणि दिवसाला उपजीविकेची वेळ बनविली
  12. आणि तुमच्यावर सात मजबूत आकाश कायम केले
  13. आणि एक अत्यंत तेजस्वी व उष्ण दीप निर्माण केला.
  14. आणि ढगांतून निरंतर पाऊस वर्षविला
  15. जेणेकरून त्याद्वारे धान्य व भाजीपाला
  16. आणि घनदाट बागा उगविल्या.
  17. निःसंदेह निर्णयाचा दिवस एक निश्चित वेळ आहे.
  18. ज्या दिवशी नरसिंगात फुंक मारली जाईल, तुम्ही झुंडी झुंडीने निघून याल.
  19. आणि आकाश उघडले जाईल येथपावेतो की ते दारेच दारे बनून जाईल,
  20. आणि पर्वत चालविले जातील, येथपावेतो की ते मृगजळ बनतील.
  21. वस्तुतः नरक एक सापळा आहे,
  22. दुराचार्‍यांचे ठिकाण,
  23. ज्यात ते युगानुयुगे पडून राहतील.
  24. त्यात गारवा आणि पिण्यालायक कोणत्याही पदार्थाचा आस्वाद ते घेणार नाहीत
  25. काही मिळेल तर केवळ गरम पाणी आणि जखमांचा पू
  26. (त्यांच्या कृत्यांचा), भरपूर बदला.
  27. ते कोणत्याही हिशोबाची अपेक्षा बाळगीत नव्हते
  28. आणि आमच्या संकेतवचनांना त्यांनी पूर्णतः खोटे ठरविले होते.
  29. आणि स्थिती अशी होती की आम्ही प्रत्येक गोष्ट गणना करून नोंदवून ठेवली होती.
  30. आता चाखा चव, आम्ही तुमच्यासाठी प्रकोपाशिवाय कोणत्याही गोष्टीत कदापि वाढ करणार नाही.
  31. निश्चितच ईशपरायणांसाठी यशाचे एक स्थान आहे.
  32. उद्याने आणि द्राक्षे
  33. आणि समवयस्क नवयुवती
  34. आणि ओथंबणारे पेले.
  35. तेथे कोणतीही व्यर्थ आणि खोटी गोष्ट ते ऐकणार नाहीत.
  36. मोबदला आणि पुष्कळ इनाम. तुमच्या पालनकर्त्याकडून
  37. त्या अत्यंत मेहेरबान ईश्वराकडून जो पृथ्वी आणि आकाशांचा आणि त्यांच्यामधील प्रत्येक वस्तूचा स्वामी आहे, ज्याच्यासमोर कुणाची बोलण्याची हिंमत नसेल.
  38. ज्या दिवशी आत्मा आणि दूत रांगेत उभे राहतील, कुणीही बोलणार नाही याखेरीज की ज्यास कृपावंत परवानगी देईल आणि जो योग्य गोष्ट बोलेल.
  39. तो दिवस सत्याधिष्ठित आहे. आता ज्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या पालनकर्त्याकडे परतण्याचा मार्ग स्वीकारावा.
  40. आम्ही तुम्हा लोकांना त्या प्रकोपाचे भय दाखविले आहे जो जवळ येऊन ठेपला आहे. ज्या दिवशी मनुष्य ते सर्वकाही पाहील जे त्याच्या हातांनी पुढे पाठविले आहे. आणि अश्रद्धावंत ओरडेल की मी माती असतो.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post