Surah Al-Mursalat With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

 77. अल् मुर्सलात - ٱلْمُرْسَلَات

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

  1. शपथ आहे त्या वार्‍यांची जे लागोपाठ पाठविले जातात,
  2. मग तुफान वेगाने वाहतात
  3. आणि (मेघांना) उचलून पसरवितात.
  4. मग (त्यांना) फाडून विभक्त करतात.
  5. मग (मनात ईश्वराची) आठवण निर्माण करतात,
  6. कारण म्हणून अथवा भीती म्हणून,
  7. ज्या गोष्टीचे तुम्हाला वचन दिले जात आहे ती जरूर घडणार आहे.
  8. मग जेव्हा नक्षत्रे निस्तेज बनतील
  9. आणि आकाश फाडून टाकले जाईल
  10. आणि पर्वत पिजून काढली जातील
  11. आणि प्रेषितांच्या हजेरीची वेळ येऊन ठेपेल.
  12. (त्या दिवशी ती गोष्ट घडेल.) कोणत्या दिवसासाठी हे काम तहकूब ठेवले गेले आहे?
  13. निर्णयाच्या दिवसासाठी.
  14. आणि तुम्हाला काय कल्पना की तो निर्णयाचा दिवस काय आहे?
  15. विनाश आहे त्या दिवशी खोटे ठरविणार्‍यांसाठी.
  16. काय आम्ही या आधीच्यांना नष्ट केले नाही.
  17. मग त्यांच्याच पाठीमागे नंतर त्यांना चालते करू.
  18. अपराध्यांशी आम्ही असेच काही करीत असतो.
  19. विनाश आहे त्या दिवशी खोटे ठरविणार्‍यांसाठी.
  20. काय आम्ही एका तुच्छ द्रवाने तुम्हाला निर्माण केले नाही?
  21. त्याला एका सुरक्षित जागी थांबवून ठेवले?
  22. आणि एका ठराविक कालावधीपर्यंत
  23. तर पहा आम्ही याला समर्थ होतो, अशाप्रकारे आम्ही फार चांगले सामर्थ्य बाळगणारे आहोत.
  24. विनाश आहे त्या दिवशी खोटे ठरविणार्‍यांसाठी.
  25. काय आम्ही पृथ्वीला आवरून धरणारी बनविली नाही,
  26. जीवितांसाठीही आणि मृतांसाठीदेखील,
  27. आणि तिच्यात उंचउंच पर्वते रोविली आणि तुम्हाला गोड पाणी पाजले?
  28. विनाश आहे त्या दिवशी खोटे ठरविणार्‍यांसाठी.
  29. चला आता या गोष्टीकडे जिला तुम्ही खोटे ठरवीत होतात.
  30. चला त्या सावलीकडे जिथे तीन भाग आहेत.
  31. न गारवा पोहचविणारी न अग्नीज्वालापासून वाचविणारी,
  32. तो अग्नी महालासमान मोठमोठाल्या ठिणग्या फेकील,
  33. (ज्या उसळताना अशा वाटतील) जणू त्या पिवळे उंट असावेत,
  34. विनाश आहे त्या दिवशी खोटे ठरविणार्‍यांसाठी.
  35. हा तो दिवस आहे ज्यात ते न काही बोलणार
  36. आणि न त्यांना संधी दिली जाणार की काही निमित्त पुढे करावे.
  37. विनाश आहे त्या दिवशी खोटे ठरविणार्‍यांसाठी.
  38. हा निर्णयाचा दिवस आहे. आम्ही तुम्हाला आणि तुमच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना एकत्र केलेले आहे.
  39. आता जर माझ्याविरूद्ध तुम्ही एखादे कारस्थान करू शकत असाल तर करून पहा.
  40. विनाश आहे त्या दिवशी. खोटे ठरविणार्‍यांसाठी.
  41. ईशपरायण लोक आज सावली आणि झर्‍याच्या सान्निध्यात आहेत.
  42. आणि जी फळे ते इच्छितील (त्यांच्यासाठी) हजर आहेत.
  43. खा आणि प्या मजेने आपल्या त्या कृत्यांच्या मोबदल्यात जी तुम्ही करीत राहिला आहात.
  44. आम्ही सदाचारी लोकांना असाच मोबदला देत असतो.
  45. विनाश आहे त्या दिवशी खोटे ठरविणार्‍यांसाठी.
  46. खाऊन घ्या आणि मौज करून घ्या थोडे दिवस. वस्तुतः तुम्ही लोक अपराधी आहात.
  47. विनाश आहे त्या दिवशी खोटे ठरविणार्‍यांसाठी.
  48. जेव्हा त्यांना सांगितले जाते की, अल्लाहपुढे झुका तर झुकत नाहीत.
  49. विनाश आहे त्या दिवशी खोटे ठरविणार्‍यांसाठी.
  50. आता या (कुरआन) नंतर इतर कोणती वाणी अशी असू शकते जिच्यावर हे श्रद्धा ठेवतील?

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post