Surah Al-Insan With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

  76. अद् दहर - الدهر


अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

  1. काय मानवावर अनंत काळाची एक वेळ अशीही येऊन गेली आहे जेव्हा तो काही उल्लेखनीय वस्तू नव्हता?
  2. आम्ही मानवाला एका मिश्र वीर्यापासून निर्माण केले, जेणेकरून त्याची परीक्षा घ्यावी आणि यासाठी आम्ही त्याला ऐकणारा व पाहणारा बनविला.
  3. आम्ही त्याला मार्ग दाखविला, मग त्याने कृतज्ञ बनावे अथवा द्रोह करणारा.
  4. द्रोह करणार्‍यांसाठी आम्ही साखळदंड आणि जोखड व भडकणारा अग्नी तयार ठेवला आहे.
  5. पुण्यशील लोक (स्वर्गामध्ये) पेयाचे असे पेले पितील ज्यात कापूराचे मिश्रण असेल,
  6. हा एक प्रवाहित झरा असेल ज्याच्या पाण्यासमवेत अल्लाहचे दास पेयपान करतील आणि जेथे इच्छितील तिकडे प्रवाहित करतील.
  7. हे ते लोक असतील जे (जगात) नवस फेडतील आणि त्या दिवसाला घाबरतील ज्याची आपत्ती सर्वत्र पसरलेली असेल.
  8. आणि अल्लाहच्या प्रेमात गरीब आणि अनाथ व कैद्यांना जेवू घालतील
  9. (आणि त्यांना म्हणतील), ’’आम्ही तुम्हाला केवळ अल्लाहसाठी जेवू घालीत आहोत, आम्ही तुमच्याकडून कोणताही मोबदला इच्छित नाही की आभारप्रदर्शन.
  10. आम्हाला तर आमच्या पालनकर्त्याकडून त्या दिवसाच्या प्रकोपाची भीती लागलेली आहे जो भयंकर संकटाचा अत्यंत प्रदीर्घ दिवस असेल.’’
  11. म्हणून महान अल्लाह त्यांना त्या दिवसाच्या संकटापासून वाचवील आणि त्यांना टवटवीतपणा व उल्हास प्रदान करील
  12. आणि त्यांच्या संयमाबद्दल त्यांना स्वर्ग व रेशमी पोशाख प्रदान करील.
  13. तेथे ते उच्च आसनावर तक्के लावून बसले असतील. त्यांना ना उन्हाची उष्णता त्रास देणार ना हिवाळ्याचा गारवा.
  14. स्वर्गाची छाया त्यांच्यावर झुकून सावली करीत असेल आणि त्याची फळे सदैव त्यांच्या आवाक्यात असतील (ती हवे तशी तोडून घ्यावीत)
  15. त्यांच्यापुढे चांदीची भांडी आणि काचेचे पेले फिरविले जात असतील.
  16. पेलेही ते जे चांदीचे असतील आणि ते (स्वर्गाच्या व्यवस्थापकांनी) योजनाबद्ध भरले असतील.
  17. त्यांना तेथे अशा पेयाची पेये पाजली जातील ज्यात सुंटीचे मिश्रण असेल.
  18. हा स्वर्गाचा एक झरा असेल ज्याला ’सलसबील’ म्हटले जाते.
  19. त्याच्या सेवेसाठी अशी मुले धावत फिरत असतील जी सदैव मुलेच राहतील. तुम्ही त्यांना पाहिले तर असे वाटेल की मोती आहेत जे विखुरले गेले आहेत.
  20. तेथे जिकडे कुणीकडे तुम्ही दृष्टी टाकाल तिकडे देणग्याच देणग्या आणि एका मोठ्या राज्याचा सरंजाम तुम्हाला दिसेल.
  21. त्यांच्यावर तलम रेशमाचा हिरवा पोशाख व ’अतलस’ आणि ’दिबा’ची वस्त्रे असतील, त्यांना चांदीचे कडे घातले जातील, आणि त्यांचा पालनकर्ता त्यांना अत्यंत पवित्र पेय पाजील.
  22. हा आहे तुमचा मोबदला आणि तुमची कामगिरी कदर करण्यालायक ठरलेली आहे.
  23. हे पैगंबर (स.), आम्हीच तुमच्यावर हा कुरआन थोडे थोडे करून अवतरला आहे
  24. म्हणून तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेवर धैर्य राखा आणि यांच्यापैकी एखाद्या दुराचारी अथवा सत्य नाकारणार्‍याचे म्हणणे ऐकू नका.
  25. आपल्या पालनकर्त्याच्या नावाचे सकाळ-संध्याकाळ स्मरण करा.
  26. रात्रीसुद्धा त्याच्यापुढे नतमस्तक होत रहा. आणि रात्रीच्या प्रदीर्घ वेळेत त्याचे पावित्र्यागान करीत रहा.
  27. हे लोक तर त्वरित प्राप्त होणार्‍या वस्तूंशी (जग) प्रेम ठेवतात आणि पुढे जो कठोर दिवस येणार आहे त्याला दुर्लक्षितात.
  28. आम्हीच त्यांना निर्माण केले आहे आणि यांची शरीरसंपदा सुदृढ केली आहे. आणि आम्ही जेव्हा इच्छा करू यांचे रूप बदलून टाकू
  29. हा एक उपदेश आहे, आता ज्याची इच्छा असेल त्याने आपल्या पालनकर्त्याकडे जाणारा मार्ग स्वीकारावा.
  30. आणि तुम्ही इच्छा केल्याने काही होणार नाही जोपर्यंत अल्लाह इच्छित नाही. अल्लाह निश्चितच मोठा ज्ञानी आणि बुद्धिमान आहे.
  31. आपल्या कृपाछत्रात ज्याला इच्छितो दाखल करतो आणि अत्याचाऱ्यांसाठी त्याने यातनामय प्रकोप तयार ठेवला आहे.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post