75. अल् क़ियाम: - ٱلْقِيَامَة
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- नव्हे, मी शपथ घेतो पुनरुत्थानाच्या दिवसाची
- आणि नाही, मी शपथ घेतो निर्भत्सना करणार्या मनाची
- काय माणूस असे समजतो की आम्ही त्याच्या हाडांना गोळा करू शकणार नाही?
- का नाही? आम्ही तर त्याच्या बोटांची पेरे पेरे सुद्धा नीट बनविण्यास समर्थ आहोत,
- परंतु माणूस इच्छितो की पुढेसुद्धा दुष्कृत्ये करीत रहावीत.
- विचारतो, ’’शेवटी केव्हा येणार आहे बरे तो पुनरुत्थानाचा दिवस?’’
- मग जेव्हा डोळे थिजून जातील
- आणि चंद्र निस्तेज होऊन जाईल
- आणि चंद्र सूर्य मिळून एक केले जातील
- आणि त्यावेळी हाच माणूस म्हणेल, ’’कुठे पळून जाऊ?’’
- कदापि नाही, तेथे कोणतेही आश्रयस्थान असणार नाही.
- त्या दिवशी तुझ्या पालनकर्त्याच्या समोरच जाऊन थांबावे लागेल,
- त्या दिवशी मानवाला त्याचे सर्व पुढील व मागील केले व करविलेले दाखविले जाईल
- किंबहुना मानव स्वतःच स्वतःला चांगल्या प्रकारे जाणतो.
- मग तो कितीही निमित्ते पुढे का करेना,
- हे पैगंबर (स.) या दिव्यबोधाला घाईघाईने पाठ करण्यासाठी आपल्या जीभेला चालना देऊ नका.
- याला पाठ करविणे व पठण करविणे आमच्यावर आहे,
- म्हणून जेव्हा आम्ही त्याचे पठण करीत असू त्यावेळी तुम्ही हे पठण लक्षपूर्वक ऐकत जा.
- मग याचा अर्थ समजावून देणेसुद्धा आमच्यावरच आहे.
- कदापि नाही खरी गोष्ट अशी आहे की, तुम्ही लोक त्वरित प्राप्त होणार्या गोष्टीशी (अर्थात इहलोकाशी) प्रेम ठेवता,
- आणि परलोक सोडून देता.
- त्या दिवशी काही चेहरे टवटवीत असतील
- आपल्या पालनकर्त्याकडे पाहात असतील,
- आणि काही चेहरे उदास असतील
- आणि समजत असतील की त्यांच्याशी कंबर खचविणारा व्यवहार होणार आहे.
- कदापि नाही जेव्हा प्राण कंठापर्यंत पोहोचेल
- आणि म्हटले जाईल की आहे का कोणी मंत्र-तंत्र करणारा,
- आणि मनुष्य समजून घेईल की ही जगाशी ताटातूट होण्याची वेळ आहे,
- आणि पायात पाय अडकतील.
- तो दिवस असेल तुझ्या पालनकर्त्याकडे जाण्याचा.
- परंतु त्याने ना खरे मानले आहे आणि ना नमाज अदा केली,
- तर खोटे ठरविले आणि पालटला
- आणि मग दिमाखात आपल्या घरवाल्याकडे निघाला.
- ही चाल तुझ्याच लायकीची आहे आणि तुलाच शोभा देते.
- होय, ही चाल तुझ्याच लायकीची आहे आणि तुलाच शोभा देते.
- काय मानवाने असा समज करून घेतला आहे की तो असाच व्यर्थ सोडून दिला जाईल?
- काय तो तुच्छ वीर्याचा थेंब नव्हता जो (गर्भाशयात) टपकविण्यात आला.
- मग तो एक गोळा बनला. मग अल्लाहने त्याचे शरीर बनविले व त्याचे अवयव व्यवस्थित केले
- मग त्यापासून पुरुष आणि स्त्रीचे दोन प्रकार बनविले.
- काय तो यासाठी समर्थ नाही की तो मृतांना जीवित करील?