74. अल् मुद्दस्सिर - ٱلْمُدَّثِّر
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- हे पांघरूण ओढून पहुडणार्या,
- उठा आणि खबरदार करा.
- आणि आपल्या पालनकर्त्याच्या महानतेची घोषणा करा.
- आणि आपले कपडे शुचिर्भूत ठेवा
- आणि अपवित्रतेपासून दूर रहा.
- आणि उपकार करू नका अधिक प्राप्त करण्यासाठी
- आणि आपल्या पालनकर्त्यासाठी धैर्य राखा.
- जेव्हा नरसिंगात फुंक मारली जाईल
- तो दिवस फारच कठीण दिवस असेल,
- अश्रद्धावंतांसाठी सोपा असणार नाही.
- सोडा मला आणि त्या माणसाला ज्याला मी एकटे निर्माण केले,
- पुष्कळशी मालमत्ता त्याला दिली.
- त्याच्याबरोबर हजर राहणारे पुत्र दिले,
- आणि त्याच्यासाठी सत्तेचा मार्ग प्रशस्त केला,
- मग तो लालसा बाळगतो की मी त्याला आणखी अधिक द्यावे,
- कदापि नाही, तो आमच्या संकेतवचनांशी वैर करतो,
- मी तर लवकरच एक कठीण चढण चढवीन.
- त्याने विचार केला आणि काहीतरी गोष्ट बनविण्याचा प्रयत्न केला
- तर ईश्वराचा कोप त्याच्यावर, कशी गोष्ट बनविण्याचा प्रयत्न केला,
- होय, ईश्वराचा कोप त्याच्यावर, कशी गोष्ट बनविण्याचा प्रयत्न केला,
- मग (लोकांच्याकडे) पाहिले,
- मग कपाळ आखडले आणि तोंड वेडावले,
- मग फिरला आणि अहंकारात आला.
- सरतेशेवटी म्हणाला, हे काहीच नसून एक जादू जी पूर्वीपासून चालत आली आहे,
- ती तर एक मानवी वाणी आहे,
- लवकरच मी त्याला नरकामध्ये झोकून देईन.
- आणि तुम्हाला काय कल्पना की काय आहे तो नरक?
- ना बाकी ठेवणार ना सोडणार.
- कातडी होरपळून टाकणारा.
- एकोणीस कर्मचारी त्याच्यावर नियुक्त आहेत.
- आम्ही नरकाग्नीचे कर्मचारी या दूतांना बनविले आहे आणि त्यांच्या संख्येला अश्रद्धावंतांसाठी उपद्रव बनविले आहे जेणेकरून ग्रंथधारकांचा विश्वास बसावा आणि श्रद्धावंतांच्या श्रद्धेमध्ये वाढ व्हावी. आणि ग्रंथधारक व श्रद्धावंतांना कोणतीही शंका राहू नये, व मनोरुग्ण आणि अश्रद्धावंतांनी असे म्हणावे की अल्लाहचा या अजब गोष्टीपासून काय अर्थ असू शकतो. अशा प्रकारे अल्लाह ज्याला इच्छितो त्याला पथभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो मार्गदर्शन प्रदान करतो. आणि तुझ्या पालनकर्त्याच्या लष्कराला स्वतः त्याच्याशिवाय अन्य कोणी जाणत नाही. आणि या नरकाग्नीचा उल्लेख याशिवाय अन्य कोणत्याही हेतूने केला गेला नाही की लोकांना यापासून उपदेश मिळावा.
- कदापि नाही. शपथ आहे चंद्राची
- आणि रात्रीची जेव्हा ती पालटते,
- आणि सकाळची जेव्हा ती उजळते,
- हा नरकाग्नीसुद्धा मोठ्या गोष्टींपैकी एक आहे,
- माणसासाठी भय दाखविणारी,
- तुमच्यापैकी त्या प्रत्येक माणसासाठी भय दाखविणारी, जो पुढे जाऊ इच्छित असेल अथवा मागे राहू इच्छित असेल.
- प्रत्येक मनुष्य आपल्या कमाईच्या बदल्यात गहाण आहे.
- उजव्या बाजूवाल्यांखेरीज,
- ते स्वर्गामध्ये असतील,
- ते गुन्हेगारांना विचारतील,
- ’’तुम्हाला कोणत्या गोष्टीने नरकात नेले?’’
- ते म्हणतील ’’आम्ही नमाज अदा करणार्यांपैकी नव्हतो
- आणि गरिबांना जेवू घालत नव्हतो,
- आणि सत्याविरूद्ध गोष्टी रचणार्यांविरूद्ध आम्हीही गोष्टी बनविण्यात लागत होतो.
- आणि मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरवीत होतो,
- येथपावेतो की त्या निश्चित गोष्टीशी आमचा प्रसंग घडला.’’
- त्यावेळी शिफारस करणार्यांची कोणतीही शिफारस त्यांच्या काहीच उपयोगी पडणार नाही.
- शेवटी या लोकांना झाले तरी काय आहे की हे या उपदेशापासून तोंड फिरवीत आहेत,
- जणू हे रानटी गाढवे होत.
- जे सिंहाला भिऊन पळत सुटले आहेत.
- किंबहुना यांच्यापैकी तर प्रत्येकजण असे इच्छितो की त्याच्या नावे खुली पत्रे पाठविली जावीत.
- कदापि नाही खरी गोष्ट अशी आहे की हे परलोकाची भीती बाळगत नाही.
- हा तर एक उपदेश आहे,
- आता ज्याची इच्छा असेल त्याने यापासून धडा घ्यावा.
- आणि हे कोणताही धडा घेणार नाहीत. याखेरीज की अल्लाह तशी इच्छा करील. तो याचा हक्क राखतो की त्याला भिऊन वागावे. आणि तो या गोष्टीला पात्र आहे की (भय बाळगणार्यांना) त्याने क्षमा प्रदान करावी.