73. अल् मुज़् ज़म्मिल - ٱلْمُزَّمِّل
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- हे पांघरूण ओढून झोपणार्या,
- रात्री नमाजीसाठी उभे राहात जा, परंतु थोडे,
- अर्धी रात्र किंवा त्यापेक्षा कमी करा
- अथवा त्यापेक्षा काही अधिक वाढवा, आणि कुरआनचे खूप थांबून थांबून पठण करा,
- आम्ही तुमच्यावर एक भारदस्त वाणी अवतरणार आहोत.
- वस्तुतः रात्रीचे उठणे आत्मसंयम ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि कुरआन नीट पठण करण्यासाठी अधिक योग्य आहे.
- दिवसाचे वेळी तर तुमच्यासाठी खूप व्याप आहे.
- आपल्या पालनकर्त्याच्या नामाचे स्मरण करीत जा आणि सर्वांपासून तुटून त्याचेच बनून रहा.
- तो पूर्व व पश्चिमेचा स्वामी आहे, त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही. म्हणून त्यालाच आपला मुखत्यार बनवा.
- आणि ज्या गोष्टी लोक बनवीत आहेत त्यावर धैर्य राखा आणि सभ्यतेने त्यांच्यापासून वेगळे व्हा.
- या खोटे ठरविणार्या सुखवस्तू लोकांशी निपटण्याचे कार्य तुम्ही माझ्यावर सोडा, आणि त्यांना काही थोडा वेळ याच अवस्थेत राहू द्या.
- आमच्याजवळ (यांच्यासाठी) भारी बेड्या आहेत आणि भडकत असलेला अग्नी,
- आणि घशात अडकणारे जेवण व यातनामय प्रकोप
- हे त्या दिवशी घडेल जेव्हा पृथ्वी आणि पर्वत हादरून उठतील आणि पर्वतांची स्थिती अशी होईल जणू वाळूचे ढिगारे विखुरले जात आहेत.
- तुम्हा लोकांकडे आम्ही त्याच प्रकारे एक प्रेषित तुमच्यावर साक्षीदार बनवून पाठविला आहे जसे आम्ही फिरऔनकडे एक प्रेषित पाठविला होता.
- (मग पहा जेव्हा) फिरऔनने त्या प्रेषिताचे म्हणणे ऐकले नाही तेव्हा आम्ही त्याला फार कठोरतेने धरले.
- जर तुम्ही मानण्यास नकार दिला तर त्या दिवशी कसे वाचाल जो बालकांना वृद्ध बनवील
- आणि ज्याच्या कठोरतेने आकाश फाटले जात असेल? अल्लाहचे वचन तर पूर्ण होणारच आहे.
- हा एक उपदेश आहे आता ज्याची इच्छा असेल त्याने आपल्या पालनकर्त्याकडे जाण्याचा मार्ग स्वीकारावा.
- हे पैगंबर (स.) तुमचा पालनकर्ता जाणतो की तुम्ही कधी सुमारे दोन तृतियांश रात्र आणि कधी अर्धी रात्र आणि कधी एक तृतियांश रात्र उपासना करीत उभे राहता, आणि तुमच्या साथिदारांपैकी एक गट कृती करतो. अल्लाहच रात्र आणि दिवसाच्या वेळेचा हिशोब ठेवतो, त्याला माहित आहे की, तुम्ही लोक वेळेची ठीक गणना करू शकत नाही. म्हणून त्याने तुमच्यावर मेहेरबानी केली, आता सुलभतेने जितका कुरआन वाचू शकता वाचत जा. त्याला माहित आहे की तुमच्यात काही आजारी असतील, काही अन्य लोक अल्लाहच्या कृपाप्रसादाच्या शोधात प्रवास करतात आणि काही अन्य लोक अल्लाहच्या मार्गात युद्ध करतात, म्हणून जितका कुरआन सहजरित्या वाचता येणे शक्य आहे वाचत जा, नमाज कायम करा, जकात द्या आणि अल्लाहला चांगले कर्ज देत जा. जे काही पुण्य तुम्ही आपल्यासाठी पुढे पाठवाल ते तुम्हाला अल्लाहपाशी आढळेल, तेच जास्त उत्तम आहे आणि त्याचा मोबदला फार मोठा आहे. अल्लाहची क्षमायाचना करीत रहा, निःसंशय अल्लाह अत्यंत क्षमाशील व परमकृपाळू आहे.