72. अल् जिन्न - ٱلْجِنّ
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- हे पैगंबर (स.), सांगा, माझ्याकडे दिव्यबोध (वही) पाठविले गेले आहे की जिन्नांच्या एका तुकडीने लक्षपूर्वक ऐकले, मग (जाऊन) आपल्या जातीच्या लोकांना सांगितले, ’’आम्ही एक मोठा आश्चर्यजनक कुरआन ऐकला आहे.
- जो सरळ मार्गाकडे मार्गदर्शन करतो, म्हणून आम्ही त्यावर श्रद्धा ठेवली आहे आणि आता आम्ही कदापि आपल्या पालनकर्त्याबरोबर कोणालाही भागीदार ठरविणार नाही.’’
- आणि असे की, ’’आमच्या पालनकर्त्याचे वैभव मोठे उच्च आणि श्रेष्ठ आहे, त्याने कुणाला पत्नी अथवा पुत्र बनविलेले नाही.’’
- आणि असे की, ’’आमचे नादान लोक अल्लाहसंबंधी खूप अवास्तव गोष्टी सांगत राहिले आहेत.’’
- आणि असे की, ’’आमचा असा समज होता की, मनुष्य आणि जिन्न अल्लाहसंबंधी कधी खोटे बोलू शकत नाहीत.’’
- आणि असे की, ’’मनुष्यांपैकी काही लोक जिन्नांपैकी कांही जणांचा आश्रय मागत असत. अशा प्रकारे, त्यांनी जीन्नचा अहंकार अधिकच वृद्धिंगत केला.’’
- आणि असे की, ’’माणसांनी सुद्धा तशीच कल्पना केली जशी तुमची कल्पना होती की, अल्लाह कुणाला प्रेषित बनवून पाठविणार नाही.’’
- आणि असे की, ’’आम्ही आकाशाला चाचपडले तर पाहिले की ते पहारेकर्यांनी भरून गेले आहे,
- आणि उल्कांचा वर्षाव होत आहे.’’ आणि असे की, ’’आम्ही पूर्वी कानोसा घेण्यासाठी आकाशात बसण्यासाठी जागा मिळवू शकत होतो, परंतु आता जो लपून छपून ऐकण्याचा प्रयत्न करतो त्याला आपल्यावर दबा धरून बसलेली एखादी उल्का आढळते.’’
- आणि असे की, ’’आमच्या लक्षात येत नव्हते की पृथ्वीवाल्यांशी एखादा वाईट मामला करण्याचा बेत केला गेला आहे की त्यांचा पालनकर्ता त्यांना सरळ मार्ग दाखवू इच्छितो.’’
- आणि असे की, ’’आमच्यापैकी काही लोक सदाचारी आहेत आणि काही याहून खालावलेले आहेत, आम्ही विभिन्न पद्धतीत विभाजित झालो आहोत.’’
- आणि असे की, ’’आम्हाला समजत होते की, आम्ही ना पृथ्वीवर अल्लाहला असफल करू शकतो ना कुठे पळून त्याला हरवू शकतो.’’
- आणि असे की, ’’आम्ही जेव्हा मार्गदर्शनपर शिकवण ऐकली तेव्हा आम्ही त्यावर श्रद्धा ठेवली. आता जो जो कोणी आपल्या पालनकर्त्यावर श्रद्धा ठेवील त्याला कोणताही हक्क मारला जाण्याची किंवा अन्यायाची भीती नसेल.’’
- आणि असे की, ’’आमच्यापैकी काही मुस्लिम (अल्लाहचे आज्ञाधारक) आहेत. आणि काही सत्याशी विमुख. तर ज्यांनी इस्लाम (आज्ञापालनाचा मार्ग) अंगिकारला त्यांनी मुक्तीचा मार्ग शोधून काढला,
- आणि जे सत्याशी विमुख आहेत; ते नरकाचे इंधन बनणारे आहेत.’’
- आणि (हे पैगंबर (स.)) सांगा, मला असे दिव्य बोधही केले गेले आहे की, लोक जर सरळ मार्गावर दृढतेने चालले असते तर आम्ही त्यांना खूप तृप्त केले असते,
- जेणेकरून या देणगीने त्यांची परीक्षा घ्यावी, आणि जो आपल्या पालनकर्त्याच्या स्मरणापासून पराङमुख होईल. त्याचा पालनकर्ता त्याला कठोर प्रकोपात टाकील
- आणि असे की, मस्जिदी अल्लाहसाठी आहेत म्हणून त्यात अल्लाहबरोबर इतर कोणाला पुकारू नका.
- आणि जेव्हा अल्लाहचा दास त्याला पुकारण्यासाठी उभा राहिला तेव्हा लोक त्याच्यावर तुटून पडण्यास तयार झाले.
- हे पैगंबर (स.), सांगा की, ’’मी तर आपल्या पालनकर्त्याला पुकारतो आणि त्याच्याबरोबर कुणाला भागिदार ठरवीत नाही.’’
- सांगा, ’’मी तुम्हा लोकांसाठी ना एखाद्या हानीचा अधिकार राखतो ना एखाद्या भल्याचा.’’
- सांगा, ’’मला अल्लाहच्या पकडीतून कुणी वाचवू शकत नाही आणि मी त्याच्या छत्राशिवाय कोठेही आश्रयस्थान प्राप्त करू शकत नाही.
- माझे काम या व्यतिरिक्त काहीच नाही की अल्लाहचे म्हणणे आणि त्याचे संदेश पोहोचवावे. आता जो जो कोणी अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) चे ऐकणार नाही त्याच्यासाठी नरकाग्नी आहे आणि असले लोक त्यात सदैव राहतील.’’
- (हे लोक आपल्या या कारवायांपासून परावृत्त होणार नाहीत) येथपावेतो की जेव्हा त्या गोष्टीला पाहतील ज्याचे वचन दिले जात आहे, तर त्यांना कळेल की कुणाचे सहाय्यक दुर्बल आहेत आणि कुणाचा दल संख्येत कमी आहे.
- सांगा, ’’मला माहीत नाही की, ज्या गोष्टीचे वचन तुम्हाला दिले जात आहे ती जवळ आहे अथवा माझा पालनकर्ता तिच्यासाठी एखादी दीर्घ मुदत निश्चित करील.
- तो परोक्षाचा ज्ञाता आहे, आपले परोक्ष कोणावरही उघड करीत नाही,
- त्या प्रेषिताखेरीज ज्याला त्याने (परोक्ष ज्ञान देण्यासाठी) पसंत केले असेल. तर त्यांच्या पुढे व मागे तो रक्षक ठेवतो
- जेणेकरून त्यांनी जाणावे की त्यांनी आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहचते केले, आणि तो त्यांच्या संपूर्ण परिसराला वेढून आहे, आणि एकेका वस्तूची त्याने गणना करून ठेवली आहे.