86. अत् तारीक - ٱلطَّارِق
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- शपथ आहे आकाशाची आणि रात्री प्रकट होणार्याची.
- तुम्हाला काय माहीत की तो रात्री प्रकट होणारा काय आहे?
- चमकत असलेला तारा,
- कोणताही जीव असा नाही ज्याच्यावर कोणी निगाह राखणारा नाही,
- मग जरा मानवाने हेच पाहून घ्यावे की तो कोणत्या वस्तूने निर्माण केला गेला आहे.
- एका उसळणार्या पाण्यापासून निर्माण केला गेला आहे
- जे पाठीच्या आणि छातीच्या हाडांच्या मधून निघते.
- खचितच तो (निर्माणकर्ता) त्याला पुन्हा निर्माण करण्यास समर्थ आहे.
- ज्या दिवशी गुप्त रहस्यांची तपासणी होईल
- त्यावेळी मानवाजवळ न त्याच्या स्वत:चे बळ असेल आणि न कोणी त्याला सहाय्य करणारा असेल.
- शपथ आहे पाऊस वर्षविणार्या आकाशाची
- आणि (वनस्पती उगविताना) भग्न होणार्या जमिनीची,
- ही एक तोलामोलाची प्रमाणित गोष्ट आहे
- थट्टामस्करी नव्हे.
- हे लोक (अर्थात मक्कातील अश्रद्धावंत) काही चाली खेळत आहेत
- आणि मीसुद्धा एक चाल खेळत आहे.
- म्हणून सोडून द्या हे पैगंबर (स.), या अश्रद्धावंतांना, किंचित, जराशा यांच्या स्थितीत सोडा.