85. अल् बुरुज - ٱلْبُرُوج
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- शपथ आहे मजबूत किल्लेधारी आकाशाची
- आणि त्या दिवसाची ज्याचे वचन दिले गेले आहे (अर्थात पुनरुत्थान)
- आणि पाहणार्याची व पाहिली जाणार्या गोष्टीची
- की मारले गेले खाईवाले (त्या खाईत)
- जिच्यात खूप भडकणार्या इंधनाचा अग्नी होता
- जेव्हा की ते त्या खाईच्या काठावर बसलेले होते
- आणि जे काही ते श्रद्धावंतांशी करीत होते ते पहात होते.
- आणि त्या श्रद्धावंतांशी त्यांचे शत्रुत्व याशिवाय अन्य कोणत्याही कारणास्तव नव्हते की त्यांनी त्या अल्लाहवर श्रद्धा ठेवली होती जो जबरदस्त आणि आपल्या ठायी स्वयंस्तुत्य आहे,
- जो आकाशांच्या व पृथ्वीच्या राज्याचा स्वामी आहे, आणि तो अल्लाह सर्वकाही पहात आहे.
- ज्या लोकांनी श्रद्धावंत पुरुषांवर आणि स्त्रियांवर अत्याचार केले आणि मग त्यावर पश्चात्ताप केला नाही खचितच त्यांच्यासाठी नरकाचा प्रकोप आहे आणि त्यांच्यासाठी जाळले जाण्याची शिक्षा आहे.
- ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आणि ज्यांनी सत्कृत्ये केली खचितच त्यांच्यासाठी स्वर्गाची उद्याने आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील, हे आहे मोठे यश.
- वस्तुतः तुमच्या पालनकर्त्याची पकड फार कठोर आहे,
- तोच पहिल्यांदा निर्माण करतो व तोच दुसर्यांदा निर्माण करील.
- आणि तो क्षमा करणारा आहे. प्रेम करणारा आहे.
- राजसिंहासनाचा स्वामी आहे. गौरवशाली आहे
- आणि जे काही इच्छिल, करून टाकणारा आहे.
- काय तुम्हाला लष्कराची खबर पोहोचली आहे?
- फिरऔन आणि समूदच्या (लष्करांची)?
- परंतु ज्यांनी द्रोह केला आहे ते खोटे ठरविण्यास लागले आहेत.
- वस्तुतः अल्लाहने त्यांना वेढ्यात घेतलेले आहे.
- (त्यांच्या खोटे ठरविण्याने या कुरआनचे काही बिघडत नाही.) तर हा कुरआन उच्चकोटीचा आहे.
- त्या लौहमध्ये (पाटीत कोरलेले आहे) जी सुरक्षित आहे.