84. अल् इन्शिकाक - ٱلْإِنْشِقَاق
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- जेव्हा आकाश फाटून जाईल
- आणि आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेची अंमलबजावणी करील व त्याच्यासाठी सत्य हेच आहे (की आपल्या पालनकर्त्याची आज्ञा पाळावी)
- आणि जेव्हा पृथ्वी पसरविली जाईल
- आणि जे काही तिच्यात आहे त्याला बाहेर फेकून रिकामी होईल.
- आणि आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेची अंमलबजावणी करील व तिच्यासाठी सत्य हेच आहे की (त्याची अंमलबजावणी करावी)
- हे मानवा, तू खेचला जाऊन आपल्या पालनकर्त्याकडे वाटचाल करीत आहेस आणि त्याला भेटणार आहेस.
- मग ज्याची कर्मनोंद त्याच्या उजव्या हातात दिली जाईल.
- त्याच्याकडून सौम्य हिशोब घेतला जाईल.
- आणि तो आपल्या माणसांकडे आनंदाने परतेल.
- आता उरला तो इसम ज्याची कर्मनोंद त्याच्या पाठीमागून दिली जाईल.
- तर तो आपल्या मृत्यूला हांक देईल
- आणि भडकणार्या आगीत जाऊन पडेल.
- तो आपल्या कुटुंबियांत मग्न होता
- त्याची समजूत होती की त्याला कधी परतावयाचे नाही.
- परतणे कसे नव्हते, त्याचा पालनकर्ता त्याची दुष्कृत्य पहात होता.
- तर नव्हे मी शपथ घेतो संध्या-लालीमाची,
- आणि रात्रीची व जे काही ती समेटून घेते
- आणि चंद्राची जेव्हा तो पूर्णचंद्र बनतो,
- तुम्हाला जरूर क्रमाक्रमाने एका अवस्थेतून दुसर्या अवस्थेकडे वाटचाल करीत रहावयाचे आहे.
- मग लोकांना काय झाले आहे की हे श्रद्धा ठेवीत नाहीत.
- आणि जेव्हा कुरआनचे त्यांच्या समोर पठण केले जाते तेव्हा नतमस्तक होत नाहीत?
- किंबहुना हे इन्कार करणारे तर उलट खोटे ठरवितात.
- वस्तुतः जे काही हे (आपल्या कर्मनोंदीत) जमा करीत आहेत, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.
- म्हणून यांना यातनादायक प्रकोपाची खुशखबरी द्या.
- तथापि ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आहे आणि ज्यांनी सत्कृत्ये केली आहेत त्यांच्यासाठी कधी न संपणारा मोबदला आहे.