83. अल् मुतफ् फिफीन - ٱلْمُطَفِّفِين
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- विनाश आहे दांडी मारणार्यांसाठी,
- ज्याची स्थिती अशी आहे की जेव्हा लोकांकडून घेतात तेव्हा पुरेपूर घेतात
- आणि जेव्हा त्याला मापून किंवा तोलून देतात तेव्हा त्यांना कमी देतात.
- काय या लोकांना समजत नाही की हे उठवून आणले जाणार आहेत?
- एका मोठ्या दिवशी
- त्या दिवशी जेव्हा सर्व लोक जगांच्या पालनकर्त्यासमोर उभे असतील.
- कदापि नाही, निश्चितच दुराचार्यांच्या कर्मांची नोंद तुरुंगाच्या दप्तरात आहे
- आणि तुम्हाला काय माहीत की काय आहे ते तुरुंगाचे दप्तर?
- ते एक पुस्तक आहे लिहिलेले.
- विनाश आहे त्या दिवशी खोटे ठरविणार्यांसाठी
- जे बदल्याच्या दिवसाला खोटे ठरवितात
- आणि त्याला तो खोटा ठरवितो जो मर्यादेचे उल्लंघन करणारा दुराचारी आहे.
- त्याला जेव्हा आमची वचने ऐकविली जातात तेव्हा म्हणतो, या तर पूर्वकालीन कथा आहेत.
- कदापि नाही, किंबहुना वस्तुतः या लोकांच्या हृदयांवर यांच्या वाईट कृत्यांचा गंज चढलेला आहे.
- कदापि नाही, खचितच त्या दिवशी हे आपल्या पालनकर्त्याच्या दर्शनाला पारखे ठरलेले असतील.
- मग हे नरकामध्ये जाऊन पडतील,
- मग त्यांना सांगितले जाईल ही तीच गोष्ट आहे जिला तुम्ही खोटे ठरवीत होता.
- कदापि नाही निःसंदेह सदाचारी माणसाची कर्मनोंद उच्च दर्जाच्या लोकांच्या दप्तरात आहे
- आणि तुम्हाला काय माहीत की काय आहे ते उच्च दर्जाच्या लोकांचे दप्तर?
- एक लिहिलेले पुस्तक,
- ज्याची देखरेख जवळीक असलेले दूत करतात.
- निःसंदेह सदाचारी लोक मोठ्या मजेत असतील.
- उच्च आसनांवर बसून पहात असतील.
- त्यांच्या चेहर्यावर तुम्हाला आनंदाचे तेज जाणवेल.
- त्यांना शुद्ध व उत्तम मोहोरबंद पेय पाजले जाईल
- ज्यावर कस्तुरीची मोहर लागली असेल. जे लोक दुसर्यावर मात करू इच्छितात त्यांनी ही वस्तू प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा.
- त्या पेयात तसनीम चे मिश्रण असेल.
- हा एक झरा आहे ज्याच्या पाण्याबरोबर जवळचे लोक पेय प्राशन करतील.
- अपराधी लोक जगात श्रद्धावंतांची टिंगल उडवीत असत.
- जेव्हा त्यांच्या जवळून जात असत तेव्हा तिरक्या नजरेने त्यांच्याकडे इशारे करीत असत
- आपल्या घरांकडे परततात तेव्हा मजा करीत परतत असत.
- आणि जेव्हा त्यांना पहात असत तेव्हा म्हणत असत की हे बहकलेले लोक आहेत.
- वस्तुतः ते त्यांच्यावर निरीक्षक म्हणून पाठविले गेले नव्हते.
- आज श्रद्धा ठेवणारे अश्रद्धावंतांवर हसत आहेत
- आसनांवर बसून त्यांची दशा पहात आहेत.
- मिळाला ना अश्रद्धावंतांना त्या कृत्यांचा बदला जी ते करीत होते?