82. अल् इन्फितार - ٱلْإِنْفِطَار
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- जेव्हा आकाश फाटेल
- आणि जेव्हा तारे विस्कळून पडतील
- आणि समुद्र फाडून टाकले जातील
- आणि कबरी उघडल्या जातील
- त्यावेळी प्रत्येक माणसाला त्याने पुढचे मागचे केले सवरलेले सर्व कळेल.
- हे मानवा, कोणत्या गोष्टीने तुला आपल्या उदार पालनकर्त्याच्या बाबतीत संभ्रमात टाकले
- ज्याने तुला निर्माण केले, तुला नखशिखांत व्यवस्थित केले,
- तुला प्रमाणबद्ध बनविले, आणि ज्या रूपात इच्छिले तुला जोडून तयार केले?
- कदापि नाही, तर (खरी गोष्ट अशी आहे की) तुम्ही लोक मोबदला व शिक्षेला खोटे ठरविता
- वस्तुतः तुमच्यावर निरीक्षक नेमले आहे,
- असे सन्माननीय लिहिणारे
- जे तुमच्या प्रत्येक कृत्याला जाणतात.
- खचितच सदाचारी लोक मजेत असतील
- आणि दुराचारी लोक नरकात जातील.
- बदल्याच्या दिवशी ते तिच्यात दाखल होतील
- आणि तिच्यातून मुळीच बाहेर पडू शकणार नाहीत.
- आणि तुम्ही काय जाणता की तो बदल्याचा दिवस काय आहे?
- होय, तुम्हाला काय कल्पना की बदल्याचा तो दिवस काय आहे?
- हा तो दिवस आहे जेव्हा कोणत्याही माणसासाठी काही करणे कुणाच्याही आवाक्यात नसेल. निर्णय त्या दिवशी अल्लाहच्याच अखत्यारीत असेल.