81. अत् तक्वीर - ٱلتَّكْوِير
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- जेव्हा सूर्य गुंडाळून टाकला जाईल
- आणि जेव्हा तारे निखळून पडलीत,
- आणि जेव्हा पर्वत चालविले जातील
- आणि जेव्हा दहा महिन्यांच्या गाभण उंटिणी आपल्या दशेत सोडून दिल्या जातील.
- आणि जेव्हा वन्य पशू समेटून एकत्र केले जातील
- आणि जेव्हा समुद्र भडकविले जातील
- आणि जेव्हा प्राण (शरीरांशी) जोडले जातील.
- आणि जेव्हा जिवंत गाडलेल्या मुलीला विचारले जाईल
- की ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली?
- आणि जेव्हा कर्मनोंदी उघडल्या जातील
- आणि जेव्हा आकाशाचा पडदा दूर केला जाईल
- आणि जेव्हा नरक भडकविले जाईल
- आणि जेव्हा स्वर्ग जवळ आणला जाईल
- त्यावेळी प्रत्येक माणसाला कळेल की तो काय घेऊन आला आहे.
- नव्हे, मी शपथ घेतो परतणार्या
- व लपणार्या तार्याची
- आणि रात्रीची जेव्हा ती निरोप घेते
- आणि सकाळची जेव्हा ती श्वास घेते,
- हे प्रत्यक्षात एका प्रतिष्ठित संदेशवाहकाचे कथन आहे
- जो मोठी शक्ती बाळगतो, राजसिंहासनवाल्यापाशी उच्चपदस्थ आहे.
- तेथे त्याची आज्ञा मानली जाते. तो विश्वसनीय आहे.
- आणि (हे मक्कावासियांनो) तुमचा मित्र वेडा नाही.
- त्याने त्या संदेशवाहकाला उजळ क्षितिजावर पाहिले आहे
- आणि तो परोक्ष (च्या या ज्ञानाला लोकांपर्यंत पोहचविण्याच्या) बाबतीत कंजुष नाही.
- आणि हे कोणा धिक्कारलेल्या शैतानाचे कथन नाही.
- मग तुम्ही लोक कुणीकडे भरकटत आहात?
- हा तर सकल जगवासियांसाठी एक उपदेश आहे.
- तुमच्यापैकी त्या प्रत्येक माणसासाठी जो सरळ मार्गावर चालू इच्छित असेल.
- आणि तुमच्या इच्छिण्याने काहीही होत नाही जोपर्यंत सर्व जगांचा पालनकर्ता अल्लाह इच्छित नाही.