80. अल् अबस - عَبَسَ
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- क्रोधिष्ट झाला आणि उपेक्षा केली,
- या गोष्टीवर की तो अंध त्याच्याजवळ आला.
- तुम्हाला काय कल्पना कदाचित तो सुधरेल
- अथवा उपदेशावर लक्ष देईल आणि उपदेश करणे त्याच्यासाठी लाभदायी ठरेल?
- जो इसम दुर्लक्ष करतो
- त्याच्याकडे तर तुम्ही लक्ष देता,
- वस्तुतः जर तो सुधारला नाही तर तुम्हावर त्याची काय जबाबदारी?
- आणि जो स्वतः तुमच्यापाशी धावत येतो
- आणि भीत असतो
- त्याची तुम्ही उपेक्षा करता!
- कदापि नाही, हा तर एक उपदेश आहे.
- ज्याची इच्छा असेल त्याने हा स्वीकारावा.
- हे अशा पत्रिकात नमूद आहेत ज्या प्रतिष्ठित आहे,
- उच्चकोटीच्या आहेत, पवित्र आहेत,
- लिहिणार्यांच्या हातात असतील.
- सन्माननीय आणि प्रामाणिकपणे
- धिक्कार असो माणसाचा, सत्याचा किती कट्टर इन्कार करणारा आहे हा,
- कोणत्या वस्तूने अल्लाहने त्यास निर्माण केले आहे?
- वीर्याच्या एका थेंबाने अल्लाहने त्याला निर्माण केले, मग त्याचे भाग्य ठरविले
- मग त्याच्यासाठी जीवनाचा मार्ग सोपा केला,
- मग त्याला मृत्यू दिला आणि कबरीत पोहचविले.
- मग हवे तेव्हा त्याने त्याला पुन्हा उठवून उभे करावे.
- कदापि नाही, याने ते कर्तव्य बजावले नाही ज्याची आज्ञा अल्लाहने त्याला दिली होती.
- मग जरा माणसाने आपल्या आहाराकडे पहावे.
- आम्ही खूप पाणी ओतले,
- मग जमिनीला अजब तर्हेने फाडले,
- मग तिच्यात उगविली धान्य
- आणि द्राक्षे व भाज्या
- आणि जैतुन व खजुरी
- आणि घनदाट बागा
- आणि विभिन्न प्रकारची फळे व चारा
- तुमच्यासाठी आणि तुमच्या जनावरांसाठी जीवनसामग्री म्हणून.
- सरतेशेवटी जेव्हा तो कान बधीर करणारा आवाज दुमदुमेल
- त्या दिवशी माणूस आपला भाऊ
- आणि आपली आई आणि आपले वडील
- आणि आपली पत्नी व आपल्या संततीपासून दूर पळेल
- त्यांच्यापैकी प्रत्येक माणसावर त्या दिवशी अशी वेळ येऊन ठेपेल की त्याला आपल्याखेरीज कुणाचेही भान राहणार नाही.
- काही चेहरे त्या दिवशी चमकत असतील,
- प्रफुल्लीत, प्रसन्न आणि आनंदित व हर्षभरीत असतील,
- आणि काही चेहर्यांवर त्या दिवशी धूळ उडत असेल
- आणि काळिमा पसरलेला असेल.
- हेच अश्रद्धावंत व दुराचारी लोक असतील.