64. अत् तगाबून - ٱلتَّغَابُن
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- अल्लाहचे पावित्र्यगान करीत आहे ती प्रत्येक वस्तू जी आकाशांत आहे आणि ती प्रत्येक वस्तू जी पृथ्वीत आहे. त्याचेच राज्य आहे आणि त्याच्यासाठीच प्रशंसा आहे व तो प्रत्येक वस्तूला समर्थ आहे.
- तोच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले मग तुमच्यापैकी कोणी सत्याचा इन्कार करणारा आहे तर कोणी श्रद्धावंत, आणि अल्लाह ते सर्वकाही पाहत आहे जे तुम्ही करता.
- त्याने पृथ्वी आणि आकाशांना सत्याधिष्ठित निर्माण केले आहे, आणि तुमचे स्वरूप बनविले आणि फारच छान छान बनविले आहे. आणि त्याकडेच सरतेशेवटी तुम्हाला परतावयाचे आहे.
- पृथ्वी आणि आकाशांच्या प्रत्येक गोष्टीचे त्याला ज्ञान आहे. जे काही तुम्ही लपविता आणि जे काही तुम्ही उघड करता, सर्व त्याला माहीत आहे आणि तो अंतःकरणाची स्थितीदेखील जाणतो.
- काय तुम्हाला त्या लोकांची काही हकीगत पोहचली नाही ज्यांनी यापूर्वी द्रोह केला आणि मग आपल्या कर्माची कटू फळे चाखली? आणि पुढे त्यांच्यासाठी एक दुःखदायक प्रकोप आहे
- या परिणामाला ते पात्र यासाठी झाले की त्यांच्याजवळ त्यांचे प्रेषित उघडउघड प्रमाण आणि संकेत घेऊन येत राहिले, परंतु त्यांनी सांगितले, ’’काय माणसे आम्हाला मार्गदर्शन करतील?’’ अशाप्रकारे त्यांनी मान्य करण्यापासून इन्कार केला आणि तोंड फिरविले, तेव्हा अल्लाहसुद्धा त्यांच्याकडून बेपर्वा झाला व अल्लाह तर आहेच निरपेक्ष आणि आपल्याठायी स्वयंस्तुत्य.
- इन्कार करणार्यांनी मोठ्या दाव्यानिशी म्हटले आहे की ते मृत्यूनंतर कदापि पुन्हा उठविले जाणार नाहीत, त्यांना सांगा, ’’नव्हे, माझ्या पालनकर्त्याची शपथ, तुम्ही अवश्य उठविले जाल, मग जरूर तुम्हाला दाखविले जाईल की तुम्ही (जगात) काय काय केले आहे, आणि असे करणे अल्लाहसाठी फार सोपे आहे.’’
- तर श्रद्धा ठेवा अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर आणि त्या प्रकाशावर जो आम्ही अवतरला आहे. जे काही तुम्ही करता अल्लाह त्याची खबर राखणारा आहे.
- (याचा समाचार तुम्हाला त्या दिवशी कळेल) जेव्हा जमवाजमवीच्या दिवशी तो तुम्हा सर्वांना एकत्र करील. तो दिवस असेल एक दुसर्याच्या मुकाबल्यात लोकांच्या जय-पराजयाचा. ज्याने अल्लाहवर श्रद्धा ठेवली आहे व जो सत्कृत्ये करतो, अल्लाह त्याचे अपराध झाडून टाकील आणि त्याला अशा स्वर्गात दाखल करील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. हे लोक सदासर्वदा त्यात राहतील. हेच मोठे यश होय.
- आणि ज्या लोकांनी द्रोह केला आहे आणि आमच्या संकेतवचनांना खोटे ठरविले आहे, ते नरकवासी असतील ज्यात ते सदैव राहतील, आणि ते अत्यंत वाईट ठिकाण आहे.
- कोणतेही संकट कधीही येत नसते पण अल्लाहच्या आज्ञेनेच येते. जो मनुष्य अल्लाहवर श्रद्धा ठेवत असेल, अल्लाह त्याच्या हृदयाला मार्गदर्शन करतो. अल्लाहला प्रत्येक वस्तूचे ज्ञान आहे.
- अल्लाहची आज्ञा पाळा आणि पैगंबर (स.) ची आज्ञा पाळा. परंतु जर तुम्ही आज्ञापालनापासून तोंड फिरवीत असाल तर आमच्या पैगंबरावर स्पष्टपणे सत्य पोहचविण्याशिवाय कोणतीही जबाबदारी नाही.
- अल्लाह तो आहे ज्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही, म्हणून श्रद्धावंतानी अल्लाहवरच भिस्त ठेवली पाहिजे.
- हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, तुमच्या पत्नीं आणि तुमच्या संततीपैकी काही तुमचे शत्रू आहेत, त्यांच्यापासून सावध रहा. आणि जर तुम्ही क्षमा आणि दुर्लक्ष करण्याच्या व्यवहाराने त्यांना माफ केले तर अल्लाह क्षमाशील व परमकृपाळू आहे.
- तुमची मालमत्ता आणि तुमची संतती तर एक कसोटी आहे. आणि अल्लाहच तर आहे ज्याच्याजवळ महान मोबदला आहे.
- म्हणून जितके तुमच्या आवाक्यात आहे तितके अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगत रहा आणि ऐका व आज्ञा पाळा, आणि आपली मालमत्ता खर्च करा, हे तुमच्यासाठी उत्तम आहे. जे आपल्या मनातील संकुचितपणापासून सुरक्षित राहिले केवळ तेच सफलता प्राप्त करणारे आहेत.
- जर तुम्ही अल्लाहला उत्तम कर्ज दिले तर तो तुम्हाला कित्येक पटीने वाढवून देईल आणि तुमच्या चुकांना माफ करील अल्लाह मोठा कदर करणारा व सहनशील आहे,
- हजर आणि परोक्ष प्रत्येक गोष्ट जाणतो, जबरदस्त आणि बुद्धिमान आहे.