65. अत् तलाक - ٱلطَّلَاق
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- हे नबी (स.), जेव्हा तुम्ही लोक स्त्रियांना ’तलाक’ (फारकत) द्याल तेव्हा त्यांना त्यांच्या ’इद्दत’ (प्रतिक्षाकाळा) साठी ’तलाक’ देत जा. आणि ’इद्दत’च्या कालावधीची योग्य प्रकारे गणना करा, आणि अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा जो तुमचा पालनकर्ता आहे, (’इद्दत’च्या कालावधीत) न तुम्ही त्यांना त्यांच्या घरातून काढा आणि न त्यांनी स्वतः निघावे. याव्यतिरिक्त की त्यांच्याकडून एखादा उघड व्यभिचार घडला असेल. या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत. आणि जो कोणी अल्लाहच्या मर्यादांचे उल्लंघन करील तो आपल्यावर स्वतः अत्याचार करील. तुम्ही जाणत नाही, कदाचित यानंतर अल्लाह (समेटाची) एखादी स्थिती निर्माण करील.
- मग जेव्हा त्या आपल्या (’इद्दत’च्या) मुदतीच्या समाप्तीला पोहचतील तेव्हा एक तर त्यांना चांगल्या रीतीने (आपल्या विवाहबंधनात) रोखून ठेवा अथवा चांगल्या रीतीने त्यांच्यापासून विभक्त व्हा आणि दोन अशा इसमांना साक्षीदार बनवा जे तुमच्यापैकी न्यायनिष्ठ असतील. आणि (हे साक्षीदार बनणार्यांनो) साक्ष ठीकठीक अल्लाहसाठी द्या. या गोष्टी आहेत ज्यांचा तुम्हा लोकांना उपदेश दिला जात आहे. त्या प्रत्येक इसमाला जो अल्लाह आणि मरणोत्तर जीवनाच्या दिवसावर श्रद्धा ठेवीत असेल. जो कोणी अल्लाहच्या प्रकोपाला भिऊन काम करील, अल्लाह त्याच्यासाठी अडचणीतून निघण्याचा एखादा मार्ग निर्माण करून देईल
- आणि त्याला अशा मार्गाने उपजीविका देईल जी त्याच्या कल्पनेतदेखील नसेल. जो अल्लाहवर भिस्त ठेवील त्याच्यासाठी तो पुरेसा आहे. अल्लाह आपले कार्य सिद्ध करूनच राहतो. अल्लाहने प्रत्येक वस्तूसाठी एक प्रमाण नियोजित करून ठेवले आहे.
- आणि तुमच्या स्त्रियांपैकी ज्या विटाळासंबंधी निराश झालेल्या असतील त्यांच्या बाबतीत जर तुम्हा लोकांना काही शंका असेल तर (तुम्हाला माहीत व्हावे की) त्यांची ’इद्दत’ तीन महिने आहे. आणि हीच आज्ञा त्यांच्यासंबंधी आहे ज्यांना अद्याप विटाळ आला नसेल. आणि गर्भवती स्त्रियांच्या ’इद्दत’ची सीमा हीआहे की जेव्हा त्या गर्भमुक्त होतील. जो इसम अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगील त्याच्याबाबतीत तो सवलत निर्माण करतो.
- ही अल्लाहची आज्ञा आहे जी त्याने तुमच्याकडे अवतरली आहे. जो अल्लाहच्या कोपाचे भय बाळगेल, अल्लाह त्याचे दोष दूर करील आणि त्याला मोठा मोबदला देईल.
- त्यांना (’इद्दत’च्या काळात) त्याच जागी ठेवा जेथे तुम्ही राहता, जशी जागा तुम्हाला उपलब्ध असेल. आणि त्यांना अडचणीत आणण्यासाठी त्रास देऊ नका. आणि जर त्या गर्भवती असतील तर त्यांच्यावर त्या वेळेपर्यंत खर्च करीत रहा जोपर्यंत त्या गर्भमुक्त होत नाहीत. मग जर त्या तुमच्यासाठी (बाळाला) दूध पाजतील तर त्याचा मोबदला त्यांना द्या, आणि भल्याप्रकारे (मोबदल्याचा मामला) परस्पर सल्लामसलतीने ठरवा. परंतु जर तुम्ही (मोबदला ठरविण्यात) एकमेकाला अडचणीत आणले तर बाळाला कोणी अन्य स्त्री दूध पाजील.
- सुखवस्तू माणसाने आपल्या सुखद परिस्थितीनुसार मोबदला (नफका) द्यावा आणि ज्याला उपजीविका कमी दिली गेली असेल त्याने त्याच मालातून खर्च करावा जो अल्लाहने त्याला दिला आहे. अल्लाहने ज्याला जितके दिलेले आहे त्यापेक्षा अधिक त्याला तो जबाबदार धरत नाही. हे दूर नव्हे की अल्लाह अडचणींच्या स्थितीनंतर सुबत्तादेखील प्रदान करील.
- कित्येक वस्त्या अशा आहेत ज्यांनी आपल्या पालनकर्ता आणि त्याच्या प्रेषितांच्या आज्ञेविरूद्ध दुर्लक्ष केले तर आम्ही त्यांचा सक्तीने हिशेब घेतला आणि त्यांना वाईट प्रकारे शिक्षा दिली.
- त्यांनी आपण केलेल्या कर्मांची फळे चाखली आणि त्यांची कार्यपरिणती तोटाच तोटा आहे,
- अल्लाहने (परलोकांत) त्यांच्यासाठी तीप प्रकोप उपलब्ध करून ठेवला आहे. म्हणून अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा, हे बुद्धिमान लोकहो, ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाहने तुमच्याकडे एक उपदेश अवतरला आहे
- एक असा पैगंबर जो तुम्हाला अल्लाहची स्पष्टपणे मार्गदर्शन करणारी वचने ऐकवितो जेणेकरून श्रद्धावंत व सत्कृत्ये करणार्यांना अंधारातून काढून प्रकाशात आणावे. जो कोणी अल्लाहवर श्रद्धा ठेवील आणि सत्कर्म करील, अल्लाह त्याला अशा स्वर्गात दाखल करील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील, हे लोक त्यांच्यात सदासर्वदा राहतील. अल्लाहने अशा इसमांसाठी उत्तम उपजीविका ठेवली आहे.
- अल्लाह तो आहे ज्याने सप्त आकाश बनविले आणि त्याच प्रमाणात पृथ्वी सुद्धा निर्माण केली. त्यांच्या दरम्यान आज्ञा उतरत असते (ही गोष्ट तुम्हाला अशासाठी सांगितली जात आहे) जेणेकरून तुम्ही जाणून घ्यावे की अल्लाह प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व राखतो, आणि असे की अल्लाहचे ज्ञान प्रत्येक वस्तुला व्यापून आहे.