Surah Al-Munafiqun With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

  63. अल् मुनाफिकून - ٱلْمُنَافِقُون


अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

  1. हे पैगंबर (स.), जेव्हा हे दांभिक तुमच्यापाशी येतात तेव्हा म्हणतात, ’’आम्ही ग्वाही देतो की आपण खरोखर अल्लाहचे प्रेषित आहात.’’ होय, अल्लाह जाणतो की तुम्ही निश्चितच त्याचे प्रेषित आहात परंतु अल्लाह ग्वाही देतो की हे दांभिक पूर्णतः खोटे आहेत.
  2. यांनी आपल्या शपथांना ढाल बनवून घेतले आहे आणि अशा प्रकारे हे अल्लाहच्या मार्गापासून स्वतः दूर राहतात व दुनियेला रोखतात. कशी वाईट कृत्ये आहेत जी हे लोक करीत आहेत.
  3. हे सर्वकाही या कारणामुळे आहे की या लोकांनी श्रद्धा ठेवली आणि मग इन्कार केला, म्हणून यांच्या हृदयांवर मोहर लावली गेली, आता यांना काहीच समजत नाही.
  4. यांना पाहिले तर यांची शरीरयष्टी तुम्हाला फार शानदार दिसेल. यांनी बोलले तर यांच्या गोष्टी तुम्ही ऐकतच राहाल. परंतु खरे पाहता हे जणू लाकडाचे ओंडके आहेत जे भिंतीला जडवून ठेवले असावेत. प्रत्येक जोराच्या आवाजाला हे आपल्याविरूद्ध समजतात, हे पक्के शत्रू आहेत, यांच्यापासून जपून रहा, अल्लाहचा मार यांच्यावर, हे कोणीकडे उलटे फिरविले जात आहेत.
  5. आणि जेव्हा यांना सांगण्यात येते की, या, जेणेकरून अल्लाहच्या पैगंबरांनी तुमच्यासाठी क्षमेची प्रार्थना करावी तर ते मान झटकतात आणि तुम्ही पाहता की ते मोठ्या गर्वाने स्वतःला रोखतात
  6. हे पैगंबर (स.), तुम्ही मग यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करा अथवा करू नका यांच्यासाठी एकसारखेच आहे. अल्लाह यांना कदापि माफ करणार नाही, अल्लाह अवज्ञाकारी लोकांना कदापि मार्गदर्शन करीत नसतो.
  7. हे तेच लोक होत जे म्हणतात की पैगंबर (स.) च्या साथीदारांवर खर्च करावयाचे बंद करून टाका जेणेकरून हे विस्कळीत होतील, वास्तविकतः पृथ्वी व आकाशांच्या खजिन्यांचा स्वामी अल्लाह आहे परंतु हे दांभिक समजत नाहीत.
  8. ते म्हणतात की आम्ही परत मदीन्याला पोहचू तेव्हा जो प्रतिष्ठित आहे तो, जो अप्रतिष्ठित आहे त्याला घालवून लावील वस्तुतः प्रतिष्ठा तर अल्लाह आणि त्याचे पैगंबर (स.) व श्रद्धावंतांसाठी आहे, पण हे दांभिक जाणत नाहीत.
  9. हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, तुमची मालमत्ता आणि तुमची संतती तुम्हाला अल्लाहच्या स्मरणापासून गाफिल करून टाकू नये. जे लोक असे करतील तेच तोट्यात राहणारे आहेत.
  10. जी उपजीविका आम्ही तुम्हाला दिली आहे तिच्यातून खर्च करा यापूर्वी की तुमच्यापैकी एखाद्याची मृत्यूघटका (जवळ) येईल आणि त्यावेळी तो म्हणेल, ’’हे माझ्या पालनकर्त्या, का बरे तू मला थोडीशी आणखी सवड दिली नाही की मी सदका (दान) केला असता आणि सदाचारी लोकांत सामील झालो असतो.’’
  11. वास्तविक पाहता जेव्हा एखाद्याचा कार्यकालावधी पूर्ण होण्याची वेळ येते तेव्हा अल्लाह कोणत्याही व्यक्तीला अधिक सवड देत नसतो. आणि जे काही तुम्ही करता; अल्लाह त्याची खबर राखणारा आहे.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post