62. अल् जुमुआ - ٱلْجُمُعَة
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- अल्लाहचे पावित्र्य गान करीत आहे ती प्रत्येक वस्तू, जी आकाशांत आहे आणि ती प्रत्येक वस्तू जी जमिनीत आहे - बादशाह आहे अत्यंत पवित्र, जबरदस्त आणि बुद्धिमान.
- तोच आहे ज्याने निरक्षर लोकांत एक प्रेषित खुद्द त्यांच्यापैकीच उभा केला जो त्यांना त्याची वचने ऐकवितो, त्यांचे जीवन सावरतो आणि त्यांना ग्रंथाची आणि बुद्धिमत्तेची शिकवण देतो, वास्तविक पाहता यापूर्वी ते उघड पथभ्रष्टतेत पडलेले होते.
- आणि (या प्रेषितांचे उभे केले जाणे) त्या दुसर्या लोकांसाठीदेखील आहे जे अद्याप त्यांना मिळालेले नाहीत. अल्लाह जबरदस्त आणि बुद्धिमान आहे.
- ही त्याची कृपा आहे, ज्याला इच्छितो देतो आणि तो मोठा कृपा करणारा आहे.
- ज्या लोकांना ’तौरात’ धारक बनविले गेले होते, त्यांनी त्याचा भार उचलला नाही, त्यांचे उदाहरण त्या गाढवाप्रमाणे आहे ज्याच्यावर पुस्तके लादलेली असावीत, याच्यापेक्षाही अधिक वाईट उदाहरण आहे त्या लोकांचे ज्यांनी अल्लाहच्या वचनांना खोटे ठरविले आहे. अशा अत्याचार्यांना अल्लाह मार्गदर्शन करीत नसतो.
- यांना सांगा, ’’हे लोकहो जे यहुदी बनलेले आहेत, जर तुम्हाला अशी घमेंड आहे की बाकीच्या सर्व लोकांना सोडून केवळ तुम्हीच अल्लाहचे आवडते आहात तर मृत्यूची अभिलाषा करा, जर तुम्ही आपल्या या दर्पात खरे असाल.’’
- परंतु हे कदापि त्याची अभिलाषा करणार नाहीत आपल्या त्या कृत्यामुळे जी यांनी केलेली आहेत, आणि अल्लाह या अत्याचार्यांना चांगलेच जाणतो.
- यांना सांगा, ’’ज्या मृत्यूपासून तुम्ही पळ काढता तो तर तुम्हाला येऊन राहील. मग तुम्ही त्याच्यासमोर हजर केले जाल, जो अप्रकट आणि प्रकटचा जाणणारा आहे आणि तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय काय करीत राहिला आहात.’’
- हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, जेव्हा पुकारले जाईल नमाजसाठी शुक्रवारच्या दिवशी तेव्हा अल्लाहच्या स्मरणाकडे धाव घ्या आणि खरेदी-विक्री सोडून द्या, हे तुमच्यासाठी अधिक उत्तम आहे जर तुम्ही जाणून घ्याल.
- मग जेव्हा नमाज पूर्ण होईल तेव्हा भूतलावर पसरले जा आणि अल्लाहच्या कृपाप्रसादाचा शोध घ्या. आणि अल्लाहचे मोठ्या प्रमाणात स्मरण करीत रहा कदाचित तुम्हाला सफलता प्राप्त होईल.
- आणि जेव्हा त्यांनी व्यापार आणि खेळ-तमाशे होताना पाहिले तेव्हा त्याकडे धाव घेतली आणि तुम्हाला दिले उभे सोडून, यांना सांगा, जे काही अल्लाहजवळ आहे ते खेळ-तमाशे आणि व्यापारापेक्षा उत्तम आहे. आणि अल्लाह सर्वांपेक्षा उत्तम उपजीविका देणारा आहे.