91. अश् शम्स - ٱلشَّمْس
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- सूर्य आणि त्याच्या उन्हाची शपथ
- आणि चंद्राची शपथ जेव्हा तो त्याच्या पाठीमागे येतो.
- आणि दिवसाची शपथ जेव्हा तो (सूर्याला) स्पष्ट करतो
- आणि रात्रीची शपथ जेव्हा ती (सूर्याला) झाकून घेते,
- आणि आकाशाची व त्या अस्तित्वाची शपथ ज्याने त्याला उभारले,
- आणि पृथ्वीची व त्या अस्तित्वाची शपथ ज्याने तिला अंथरले
- आणि मानवी जीवाची व त्या अस्तित्वाची शपथ ज्याने त्याला नीटनेटके केले.
- मग त्याच्यातील दुष्टता व पापभिरूता त्यावर प्रकट केली.
- खचितच सफल झाला तो ज्याने अंतःकरणाची शुद्धी केली
- आणि विफल झाला तो ज्याने त्याला दाबून टाकले.
- समूदने आपल्या दुर्वर्तनाने खोटे ठरविले.
- जेव्हा त्या राष्ट्राचा सर्वात जास्त कठोर माणूस चवताळून उठला
- तेव्हा अल्लाहच्या प्रेषिताने त्या लोकांना सांगितले की खबरदार, अल्लाहच्या उंटिणीला (हात लावू नका) आणि तिच्या पाणी पिण्यात (अडथळा बनू नका).
- परंतु त्यांनी त्याचे म्हणणे खोटे ठरविले आणि उंटिणीला ठार केले. सरतेशेवटी त्यांच्या अपराधापायी त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्यावर अशी आपत्ती कोसळविली की एकाच वेळी सर्वांना जमीनदोस्त केले
- आणि आपल्या (या कृत्याच्या) कोणत्याही दुष्परिणामाची कोणतीही भीती नाही.