90. अल् बलद - ٱلْبَلَد
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- नव्हे, मी शपथ घेतो या (मक्का) शहराची
- आणि स्थिती अशी आहे की (हे पैगंबर (स.)) या शहरात तुम्हाला वैध करून घेतले गेले आहे.
- आणि शपथ घेतो बाप (म्हणजे आदम (अ.)) आणि त्या संततीची जी त्याच्यापासून जन्मली.
- वस्तुतः आम्ही मानवाला परिश्रमी (वातावरणात) निर्माण केले आहे.
- काय त्याने असा समज करून घेतला आहे की कोणीही त्याच्यावर वर्चस्व मिळवू शकणार नाही?
- म्हणतो, की मी ढिगाने माल उधळले
- काय तो समजतो की कुणी त्याला पाहिले नाही?
- काय आम्ही त्याला दोन डोळे
- आणि एक जीभ व दोन ओठ दिले नाहीत?
- आणि (पुण्य व पापाचे) दोन्ही स्पष्ट मार्ग त्याला (नाही का) दाखविले?
- परंतु त्याने दुर्गम घाटातून जाण्याचे साहस केले नाही.
- आणि तुम्हाला काय कल्पना की काय आहे तो दुर्गम घाट?
- एखाद्या मानेला गुलामीतून मुक्त करणे,
- अथवा उपासमारीच्या दिवशी
- एखाद्या निकटच्या अनाथाला
- अथवा मातीत पडलेल्या गरिबाला जेवू घालणे.
- मग (याबरोबर असे की) माणसाने त्या लोकांत सामील व्हावे ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि ज्यांनी एकमेकाला संयम आणि दयेचा उपदेश दिला
- हे लोक आहेत उजव्या बाजूवाले
- आणि ज्यांनी आमच्या वचनांना मानण्यास नकार दिला ते डाव्या बाजूवाले आहेत.
- त्यांच्यावर अग्नी पसरला असेल.