89. अल् फज्र - ٱلْفَجْر
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- शपथ आहे उषःकाळची
- आणि दहा रात्रींची
- आणि सम व विषमाची
- आणि रात्रीची जेव्हा ती निरोप घेत असेल,
- काय यात बुद्धी असलेल्यांसाठी एखादी शपथ आहे?
- तुम्ही पाहिले नाही की तुमच्या पालनकर्त्याने काय व्यवहार केला,
- उंच स्तंभवाल्या आदेइरमशी
- ज्यांच्या समान कोणतेही राष्ट्र जगाच्या मुलुखात निर्माण केले गेले नव्हते?
- आणि समूदशी ज्यांनी खोर्यात खडक कोरले होते?
- आणि मेखावाल्या फिरऔनशी,
- हे ते लोक होते ज्यांनी जगाच्या मुलुखात मोठा दुराचार केला होता
- आणि त्यांच्यात खूप उपद्रव माजविला होता.
- सरतेशेवटी तुमच्या पालनकर्त्याने त्यांच्यावर प्रकोपाचा कोरडा ओढला.
- वस्तुस्थिती अशी आहे की तुमचा पालनकर्ता दबा धरून बसला आहे.
- परंतु माणसाची स्थिती अशी आहे की त्याचा पालनकर्ता त्याची परीक्षा घेतो आणि त्याला प्रतिष्ठा आणि देणगी देतो, तेव्हा तो म्हणतो की, माझ्या पालनकर्त्याने मला प्रतिष्ठित बनविले.
- आणि तो जेव्हा त्याला कसोटीत घालतो आणि त्याची उपजीविका त्याच्यासाठी तंग करतो तर तो म्हणतो माझ्या पालनकर्त्याने मला अपमानित केले,
- कदापि नाही, किंबहुना तुम्ही अनाथांशी मानाचा व्यवहार करीत नाही.
- आणि गरिबाला जेवू घालण्यासाठी एकदुसर्याला उत्तेजन देत नाही,
- आणि वारसाची सर्व मालमत्ता गिळंकृत करता,
- आणि संपत्तीच्या प्रेमात वाईटरित्या गुरफटला आहात.
- कदापि नाही. जेव्हा पृथ्वी निरंतर वाळवंट करून टाकली जाईल
- आणि तुमचा पालनकर्ता प्रकट होईल, अशा स्थितीत की दूत रांगारांगानी उभे राहतील.
- आणि नरक त्या दिवशी समोर आणले जाईल, त्या दिवशी मानवाला समज येईल आणि त्यावेळी त्याला समज येण्याने काय हशील?
- तो म्हणेल की, मी आपल्या ह्या जीवनासाठी पूर्वतयारी केली असती!
- मग त्या दिवशी अल्लाह जी यातना देईल तशी यातना देणारा कुणी नाही,
- आणि अल्लाह ज्या प्रकारे बांधील तसा बांधणारा कुणी नाही.
- (दुसरीकडे फर्माविले जाईल) हे संतुष्ट जीवा!
- चला आपल्या पालनकर्त्याकडे अशा स्थितीत की तू (आपल्या चांगल्या शेवटाने) आनंदीत (आणि आपल्या पालनकर्त्यापाशी) आवडता आहेस.
- सामील हो माझ्या (सदाचारी दासांत)
- आणि दाखल हो माझ्या स्वर्गामध्ये.