88. अल् गाशिया - ٱلْغَاشِيَة
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- काय तुम्हाला त्या व्यापून टाकणार्या आपत्ती (म्हणजे पुनरुत्थानाची) खबर पोहचली आहे?
- काही चेहरे त्या दिवशी भयभीत असतील,
- कठोर परिश्रम करीत असतील. थकून जात असतील.
- तीप आगीत होरपळून निघत असतील.
- उकळत्या झर्याचे पाणी त्यांना पिण्यास दिले जाईल.
- काटेरी वाळलेल्या गवताशिवाय कोणतेही भोजन त्यांच्यासाठी असणार नाही
- जे ना पुष्ट करील, जे ना भूक शमवील.
- काही चेहरे त्या दिवशी प्रफुल्लीत असतील.
- आपल्या कामगिरीवर आनंदीत असतील,
- उच्चकोटीच्या स्वर्गामध्ये असतील.
- कोणतीही वाह्यात गोष्ट ते तेथे ऐकणार नाहीत
- त्यात झरे प्रवाहित असतील,
- त्याच्यात उच्च आसने असतील,
- पेले ठेवलेले असतील,
- लोडांच्या रांगा लावलेल्या असतील,
- आणि उत्कृष्ट बिछाने अंथरलेले असतील.
- (हे लोक मानीत नाहीत) तर काय हे उंटांना पाहात नाहीत की कसे बनविले गेलेत?
- आकाशाला पहात नाहीत की कसे उभारले गेले?
- पर्वतांना पहात नाहीत की कसे दृढ केले गेलेत?
- आणि पृथ्वीला पहात नाहीत की कशी अंथरली गेली?
- बरे तर (हे पैगंबर (स.)), उपदेश करीत रहा, तुम्ही केवळ उपदेशच करणारे आहात,
- यांच्यावर जबरदस्ती करणारे नाहीत.
- तथापि जो इसम विमुख होईल आणि इन्कार करील
- तर अल्लाह त्याला भारी शिक्षा देईल.
- या लोकांना परतावयाचे आमच्याकडे आहे,
- मग त्यांचा हिशोब घेणे आमच्याकडेच आहे.