92. अल् लैल - ٱللَّيْل
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- शपथ आहे रात्रीची जेव्हा ती पसरते
- आणि दिवसाची जेव्हा तो प्रकाशमान होतो,
- आणि त्या अस्तित्वाची ज्याने नर आणि मादी निर्माण केली,
- वस्तुतः तुम्हा लोकांचे प्रयत्न विभिन्न प्रकारचे आहेत.
- तर ज्याने (ईश्वराच्या मार्गात) धन दिले आणि (ईश्वराच्या अवज्ञेपासून) दूर राहिला
- आणि भल्या गोष्टींना खरे मानले,
- त्याला आम्ही सोप्या मार्गासाठी सवलत देऊ.
- आणि ज्याने कंजुषपणा केला आणि (आपल्या ईश्वराशी) बेपर्वाई दाखविली
- आणि भल्या गोष्टींना खोटे ठरविले,
- त्याला आम्ही कठीण मार्गासाठी सवलत देऊ.
- आणि त्याची मालमत्ता शेवटी त्याच्या काय उपयोगी पडेल जेव्हा की तो नाश पावेल?
- निःसंदेह मार्ग दाखविणे आमच्यावर आहे,
- आणि खरे पाहता परलोक आणि इहलोक, दोन्हींचे स्वामी आम्हीच आहोत.
- तर मी तुम्हाला खबरदार केले आहे भडकत्या अग्नीपासून.
- त्यात होरपळणार नाही परंतु तो अत्यंत दुर्दैवी
- ज्याने खोटे ठरविले आणि तोंड फिरविले,
- आणि त्यापासून दूर ठेवला जाईल तो अत्यंत पापभिरू,
- जो निर्मल होण्यासाठी आपले धन देतो,
- त्याच्यावर कुणाचेही काही उपकार नाहीत. ज्याचा बदला त्याने द्यायला हवा.
- तो तर केवळ आपल्या उच्चतर पालनकर्त्याच्या प्रसन्नतेच्या प्राप्तीसाठी हे कार्य करतो.
- आणि जरूर तो (त्यावर) प्रसन्न होईल.