69. अल् हाक्का - ٱلْحَاقَّة
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- घडून राहणारी!
- काय आहे ती घडून राहणारी?
- आणि तुम्हाला काय माहीत की काय आहे ती घडून राहणारी?
- समूद आणि आद लोकांनी त्या अकस्मात कोसळणार्या आपत्तीला खोटे ठरविले,
- तेव्हा समूद एका भयंकर दुर्बलतेने नष्ट केले गेले.
- आणि आद एका महाभयंकर वादळी झंझावाताने उद्ध्वस्त केले गेले.
- महान अल्लाहने त्यास निरंतर सात रात्री आणि आठ दिवसांपर्यंत त्यांच्यावर आरूढ ठेवले. (तुम्ही तेथे असता तर) पाहिले असते की ते तेथे अशा प्रकारे पछाडलेले पडले आहेत जणू ते खजूरीची कुजलेली खोडे असतील.
- आता त्यांच्यापैकी कोणी तुम्हाला बाकी राहिलेला दिसतो काय?
- आणि अशीच घोडचूक फिरऔन आणि त्याच्या पूर्वीच्या लोकांनी आणि उलथापालथ होणार्या वस्त्यांनी केली.
- या सर्वांनी आपल्या पालनकर्त्याच्या पैगंबराचे म्हणणे ऐकले नाही तेव्हा त्याने त्यांना मोठ्या कठोरतेने धरले.
- जेव्हा पाण्याचे वादळ मर्यादेपलीकडे गेले तेव्हा आम्ही तुम्हाला नावेत स्वार केले होते
- जेणेकरून या घटनेला तुमच्यासाठी एक बोधप्रद स्मृती बनवावी आणि स्मरणात ठेवणार्या कानांनी तिची आठवण सुरक्षित ठेवावी.
- मग जेव्हा एकदाची नरसिंगात फूंक मारली जाईल
- आणि पृथ्वी व पर्वतांना उचलून एकाच प्रहारांत चक्काचूर केले जाईल
- त्या दिवशी ती घडणारी घटना घडेल.
- त्या दिवशी आकाश फाटून जाईल आणि त्याची बांधणी ढिली पडेल.
- दूत त्याच्या सभोवती असतील आणि आठ दूतांनी त्या दिवशी तुझ्या पालनकर्त्याचे राजसिंहासन आपल्यावर उचलून धरलेले असेल.
- तो दिवस असेल जेव्हा तुम्ही हजर केले जाल, तुमचे कोणतेही रहस्य लपून राहणार नाही.
- त्यावेळी ज्याची कर्मांची नोंद त्याच्या उजव्या हातात दिली जाईल तो म्हणेल, ’’घ्या, पहा, वाचा माझी कर्मनोंद
- मला वाटत होते की जरूर माझा हिशेब मला मिळणार आहे.’’
- तर तो मनपसंत ऐश्वर्यात असेल,
- उच्च स्थानी स्वर्गात,
- ज्याच्या फळांचे घड झुकले जात असतील.
- (अशा लोकांना सांगितले जाईल) मजेत खा आणि प्या आपल्या त्या कृत्यांच्या मोबदल्यात जी तुम्ही गत दिवसांत केली आहेत.
- आणि ज्याची कर्मनोंद त्याच्या डाव्या हातात दिली जाईल तो म्हणेल, ’’हाय हाय माझी कर्मनोंद मला दिली गेली नसती
- आणि मी जाणले नसते की माझा हिशेब काय आहे.
- माझा तोच मृत्यू (जो जगात आला होता) निर्णायक ठरला असता.
- आज माझी संपत्ती माझ्या काहीच उपयोगी पडली नाही.
- माझी सर्व सत्ता संपुष्टात आली.’’
- (आज्ञा होईल) धरा याला आणि याच्या मानेत जोखड घाला,
- मग याला नरकामध्ये झोकून द्या,
- मग याला सत्तर हात लांब साखळीत जखडा.
- हा श्रेष्ठ व उच्चतर अल्लाहवर श्रद्धाही ठेवीत नव्हता
- व गरिबांना जेवण देण्यास लोकांना उद्युक्तही करीत नव्हता.
- म्हणून आज येथे याचा ना कोणी दुःखाचा वाटेकरी मित्र आहे
- आणि ना जखमांच्या पू शिवाय त्याच्यासाठी कोणते जेवण,
- ज्यास अपराध्याशिवाय कोणीही खात नाही.
- तर नव्हे, मी शपथ घेतो त्या वस्तूचीही ज्या तुम्ही पाहता
- आणि त्या वस्तूचीदेखील ज्या तुम्ही पाहत नाही.
- ही एका प्रतिष्ठित प्रेषिताची वाणी आहे,
- कुणा कवीची वाणी नव्हे, तुम्ही लोक क्वचित श्रद्धा ठेवता
- आणि ही कुणा ज्योतिषाचीही वाणी नव्हे, तुम्ही लोक कमीच विचार करता,
- ही सकल जगांच्या पालनकर्त्याकडून उतरली आहे.
- आणि जर या (पैगंबर (स.)) ने स्वतः रचून एखादी गोष्ट आमच्या नावाने जोडली असती
- तर आम्ही याचा उजवा हात धरला असता
- आणि याच्या मानेची शीर कापून टाकली असती,
- मग तुमच्यापैकी कोणी (आम्हाला) या कामापासून रोखणारा नसता.
- वस्तुतः हा अल्लाहच्या कोपाचे भय बाळगणार्या लोकांसाठी एक उपदेश आहे.
- आणि आम्ही जाणतो की तुमच्यापैकी काही लोक खोटे ठरविणारे आहेत.
- अशा अश्रद्धावंतांसाठी निश्चितच ही निराशाजनक आहे.
- आणि हे अगदी विश्वसनीय सत्य आहे.
- म्हणून हे पैगंबर (स.), आपल्या महान पालनकर्त्याच्या नावाचे पावित्र्यगान करा.