70. अल् मआरीज - ٱلْمَعَارِج
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- मागणार्याने प्रकोप मागितला आहे, (तो प्रकोप) जो निश्चितपणे उद्भवणार आहे.
- अश्रद्धावंतांसाठी आहे, तो टाळणारा कुणीही नाही.
- त्या अल्लाहकडून आहे जो उंच स्थानाचा मालक आहे.
- दूत आणि आत्मा चढून त्याच्या पुढे जातात. एका अशा दिवशी ज्याचे प्रमाण पन्नास हजार वर्षे आहे.
- म्हणून हे पैगंबर (स.), धैर्य राखा, शांततापूर्ण धैर्य
- हे लोक त्याला दूर समजतात
- आणि आम्ही त्याला जवळ पाहत आहोत,
- (तो प्रकोप त्या दिवशी कोसळेल) ज्या दिवशी आकाश वितळलेल्या चांदीसमान होईल
- आणि पर्वत रंगीबेरंगी पिंजलेल्या लोकरीसमान होतील.
- आणि कोणी जिवलग दोस्त आपल्या जिवलग दोस्ताला विचारणार नाही,
- वस्तुतः ते एकमेकाला दाखविले जातील. अपराधी इच्छिल की त्या दिवसाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आपल्या संततीला,
- आपल्या पत्नीला, आपल्या भावाला
- आणि आपल्या निकटतम कुटुंबाला जे त्याला आश्रय देणारे होते,
- आणि पृथ्वीतलावरील सर्व लोकांना, मोबदला म्हणून तो देईल आणि या युक्तीमुळे त्याला मुक्ती मिळेल.
- कदापि नाही, ती तर भडकत्या अग्नीची ज्वाला असेल
- जी मांस व कातडीला चाटून टाकील.
- हांका मारूनमारून आपल्याकडे बोलाविल त्या प्रत्येक माणसाला जो सत्यापासून विमुख झाला आणि ज्याने पाठ फिरविली,
- आणि संपत्ती संचित केली आणि जपूनजपून ठेवली.
- मनुष्य चंचल हृदयी निर्माण केला गेला आहे,
- जेव्हा त्याच्यावर संकट येते तेव्हा तो घाबरून जातो
- आणि जेव्हा त्याला सुस्थिती लाभते तेव्हा कंजुषपणा करू लागतो.
- परंतु ते लोक (या दोघांपासून अलिप्त आहेत) जे नमाज अदा करणारे आहेत,
- जे आपल्या नमाजात नेहमी नियमितपणा ठेवतात,
- ज्यांच्या मालमत्तेत याचक
- व वंचित असलेल्यांचा एक ठराविक हक्क आहे,
- जे मोबदल्याच्या दिवसाला सत्याधिष्ठित मानतात,
- जे आपल्या पालनकर्त्याच्या प्रकोपाचे भय बाळगतात
- कारण त्यांच्या पालनकर्त्याचा प्रकोप अशी गोष्ट नाही ज्यापासून एखाद्याने निर्भय रहावे,
- जे आपल्या गुप्तांगाचे रक्षण करतात,
- आपल्या पत्नी आणि आपल्या मालकीच्या स्त्रियांना वगळून की ज्यांच्यापासून सुरक्षित न ठेवण्यावर त्यांची कोणतीही निर्भर्त्सना नाही.
- तथापि जे याखेरीज अन्य काही इच्छितील तेच मर्यादेचे उल्लंघन करणारे होत.
- जे आपल्या अमानतीचे रक्षण आणि आपल्या वचनांचा आदर करतात,
- जे आपल्या साक्षीत सचोटीवर दृढ राहतात,
- आणि जे आपल्या नमाजचे रक्षण करतात,
- हे लोक प्रतिष्ठापूर्वक स्वर्गाच्या उद्यानात राहतील.
- म्हणून हे पैगंबर (स.), काय कारण आहे की हे इन्कार करणारे
- उजव्या व डाव्या बाजूने तुमच्याकडे झुंडी, झुंडीने धावत येत आहेत?
- काय यांच्यापैकी प्रत्येकजण ही लालसा बाळगतो की तो ऐश्वर्यसंपन्न स्वर्गात दाखल केला जाईल?
- कदापि नाही, आम्ही ज्या वस्तूपासून यांना निर्माण केले आहे त्याला हे स्वतः जाणतात.
- तर नव्हे, मी शपथ घेतो पूर्वेंच्या व पश्चिमेंच्या स्वामीची, आम्ही याला समर्थ आहोत
- की यांच्या जागी यांच्यापेक्षा उत्तम लोक आणू आणि कोणीही आमच्यावर मात करणारा नाही.
- म्हणून यांना आपल्या वाह्यात गोष्टी आणि आपल्या खेळांत मग्न राहू द्या, येथपावेतो की हे आपल्या त्या दिवसाला पोहोचतील ज्याचे याना वचन दिले जात आहे
- जेव्हा हे आपल्या थडग्यातून निघून अशाप्रकारे पळत सुटले असतील जणू आपल्या मूर्तींच्या स्थानाकडे पळत असावेत,
- यांच्या नजरा झुकलेल्या असतील, फटफजिती यांच्यावर पसरली असेल, तो दिवस आहे ज्याचे यांना वचन दिले जात आहे.