68. अल् कलम - ٱلْقَلَم
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- नूऽऽन. शपथ आहे लेखणीची आणि त्याची ज्याला लिहिणारे लिहीत आहेत,
- तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने वेडे नाहीत.
- आणि खचितच तुमच्यासाठी असा मोबदला आहे जो कदापि संपणार नाही.
- आणि निःसंशय तुम्ही नीतिमत्तेच्या उच्च दर्जावर आहात.
- लवकरच तुम्हीही पाहाल आणि तेही पाहतील
- की तुमच्यापैकी कोण वेडेपणात गुरफटलेला आहे.
- तुमचा पालनकर्ता त्या लोकांनासुद्धा चांगलेच जाणतो जे त्याच्या मार्गापासून भटकलेले आहेत, आणि तोच त्यांनाही चांगल्या प्रकारे जाणतो जे सरळ मार्गावर आहेत.
- म्हणून तुम्ही या खोटे ठरविणार्यांच्या दबावात मुळीच येऊ नका.
- हे तर इच्छितात की थोडे तुम्ही नमते घेतले तर यांनीसुद्धा नमते घ्यावे.
- मुळीच दबू नका,
- एखाद्या अशा इसमाशी जो पुष्कळ शपथा घेणारा तुच्छ मनुष्य आहे, टोमणे मारतो, चहाड्या लावीत फिरतो,
- भल्या गोष्टीपासून रोखतो, अत्याचार आणि आगळिकीत मर्यादेपलीकडे जाणारा आहे,
- अत्यंत दुष्कर्मी आहे, छळवादी आहे आणि या सर्व दोषांसह कमअस्सल आहे,
- यामुळे की तो खूप संपत्ती व संतती बाळगतो.
- जेव्हा आमचे संकेत त्याला ऐकविले जातात तेव्हा तो म्हणतो, या तर पूर्वकालीन कथा आहेत.
- लवकरच आम्ही याच्या नाकावर डाग देऊ.
- आम्ही या (मक्कावासी) ना त्याचप्रकारे कसोटीत घातले आहे ज्याप्रकारे एका बागेच्या मालकांना कसोटीत घातले होते, जेव्हा त्यांनी शपथ घेतली की सकाळी सकाळी निश्चितच आपल्या बागेची फळे तोडू
- आणि ते कोणताही अपवाद ठेवीत नव्हते.
- रात्री ते निद्राधीन पडले होते की तुमच्या पालनकर्त्याकडून एक अरिष्ट त्या बागेवर फेकले गेले
- आणि त्याची दशा अशीझाली जणू कापलेले पीक असावे.
- सकाळी त्या लोकांनी एकमेकांना हाक दिली की
- जर फळे तोडावयाची असतील तर सकाळीसकाळीच आपल्याशेताकडे निघा.
- त्याप्रमाणे ते निघाले आणि आपापसात हळूहळू बोलत होते
- की आज कोणीही गरीब तुमच्याकडे बागेत येता कामा नये.
- ते काहीही न देण्याचा निर्णय घेऊन सकाळीसकाळी अशा प्रकारे तेथे गेले जणू ते (फळे तोडण्यास) समर्थ आहेत.
- परंतु जेव्हा बाग पाहिली तेव्हा सांगू लागले, ’’आम्ही वाट चुकलो आहोत,
- नव्हे, तर आम्ही पारखे झालो.’’
- त्यांच्यातील जो सर्वात चांगला मनुष्य होता, तो म्हणाला, ’’मी तुम्हाला सांगितले नव्हते की तुम्ही पावित्र्यगान का करीत नाही?’’
- ते उद्गारले, ’’पवित्र आहे आमचा पालनकर्ता, खरोखरच आम्ही अपराधी होतो.’’
- मग त्यांच्यापैकी प्रत्येकजण दुसर्याची निर्भर्त्सना करू लागला.
- शेवटी ते म्हणाले, ’’खेद वाटतो आमच्या दशेवर, निःसंशय आम्ही शिरजोर बनलो होतो.
- दूर नव्हे की आमच्या पालनकर्त्याने आम्हाला बदल्यात याच्यापेक्षा उत्तम बाग प्रदान करील. आम्ही आमच्या पालनकर्त्याकडे रुजू होतो.’’
- असा असतो प्रकोप आणि परलोकाचा प्रकोप यापेक्षाही मोठा आहे, या लोकांनी हे जाणले असते.
- निश्चितच ईशपरायण लोकांसाठी त्यांच्या पालनकर्त्यापाशी ऐश्वर्यसंपन्न स्वर्ग आहेत.
- काय आम्ही आज्ञाधारकांची दशा अपराध्यांसारखी करावी?
- तुम्हा लोकांना काय झाले आहे, तुम्ही कसे हुकूम लावता?
- काय तुमच्याजवळ एखादा ग्रंथ आहे ज्यात तुम्ही असे वाचता
- की तुमच्यासाठी निश्चितच तेथे तेच काही आहे जे तुम्ही आपल्यासाठी पसंत करता?
- अथवा मग काय तुमच्यासाठी पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत आमच्यावर करार-वचन सिद्ध आहे की तुम्हाला तेच काही मिळेल ज्याचा हुकूम तुम्ही लावला?
- यांना विचारा, तुमच्यापैकी कोण याबद्दल जामीन आहे?
- अथवा मग त्यांनी ठरविलेले काही भागीदार आहेत (ज्यांनी याची हमी घेतली असेल)? अशी गोष्ट असेल तर आणावे यांनी आपल्या त्या भागीदारांना जर हे खरे आहेत.
- ज्या दिवशी कठीण वेळ येऊन ठेपेल आणि लोकांना नतमस्तक होण्यास बोलविले जाईल तर हे लोक नतमस्तक होऊ शकणार नाहीत,
- यांच्या नजरा खाली असतील, मानहानी यांच्यावर पसरलेली असेल. हे जेव्हा सुदृढ अवस्थेत होते त्यावेळी यांना नतमस्तक होण्यास बोलविले जात असे (आणि हे इन्कार करीत असत.)
- म्हणून हे पैगंबर (स.), तुम्ही या वाणीला खोटे ठरविणार्यांचा मामला माझ्यावर सोडून द्या. आम्ही अशा पद्धतीने यांना क्रमाक्रमाने विनाशाकडे नेऊ की यांना कळणारसुद्धा नाही.
- मी यांची दोरी लांबवीत आहे. माझी चाल मोठी जबरदस्त आहे.
- काय तुम्ही यांच्याकडून काही मोबदला मागत आहात की हे या भूर्दंडाच्या ओझ्याखाली दबून जात आहेत?
- काय यांच्याजवळ परोक्षाचे ज्ञान आहे ज्याला हे लिहीत आहेत?
- बरे, आपल्या पालनकर्त्याचा निर्णय सादर होईपर्यंत धैर्य राखा आणि मासेवाल्या (यूनुस (अ.)) सारखे बनू नका. जेव्हा त्याने हाक दिली होती आणि तो दुःखाने भरलेला होता.
- जर त्याच्या पालनकर्त्याची मेहरबानी त्याला लाभली नसती तर तो वाळीतावस्थेत खडकाळ मैदानात टाकला गेला असता.
- सरतेशेवटी त्याच्या पालनकर्त्याने त्याला निवडून घेतले आणि त्याला सदाचारी दासांमध्ये सामील केले.
- जेव्हा हे अश्रद्धावंत लोक उपदेशवाणी (पवित्र कुरआन) ऐकतात तेव्हा तुम्हाला अशा दृष्टीने पाहतात जणू काय ते तुमचे पाय उखडून टाकतील. आणि म्हणतात की हा निश्चितच वेडा आहे,
- वास्तविकतः हा तर सर्व जगवासियांसाठी एक उपदेश आहे.