98. अल् बय्यिना: - ٱلْبَيِّنَة
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- ग्रंथधारक व अनेकेश्वरवाद्यांपैकी जे लोक अश्रद्धावंत होते, (ते आपल्या द्रोहापासून) परावृत्त होणारे नव्हते जोपर्यंत त्यांच्यापाशी उज्ज्वल प्रमाण येत नाही.
- (अर्थात) अल्लाहकडून एक प्रेषित ज्याने पवित्र पत्रिका वाचून दाखवाव्यात,
- ज्यांच्यात अगदी रास्त आणि यथायोग्य लिखाण लिहिलेले असेल.
- पूर्वी ज्या लोकांना ग्रंथ दिला गेला होता, त्यांच्यात फाटाफूट निर्माण झाली नाही, परंतु यानंतर की त्यांच्याजवळ (सरळमार्गाचा) स्पष्ट उल्लेख आलेला होता
- आणि त्यांना याशिवाय कोणताही आदेश दिला गेला नव्हता की अल्लाहची भक्ती करावी, आपल्या धर्माला शुद्ध त्याच्यासाठीच ठेवून, अगदी एकाग्र होऊन आणि नमाज कायम करावी आणि जकात द्यावी. हाच अगदी बरोबर आणि योग्य धर्म आहे.
- ग्रंथधारक आणि अनेकेश्वरवाद्यांपैकी ज्या लोकांनी द्रोह केला आहे ते निश्चितच नरकाग्नीत जातील आणि सदैव त्यात राहतील, हे लोक दुष्टतम निर्मिती आहेत.
- ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आणि ज्यांनी सत्कृत्ये केली ते निश्चितच उत्तम निर्मिती आहेत.
- त्यांचा बदला त्यांच्या पालनकर्त्यापाशी चिरंतन निवासाचे स्वर्ग आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील, ते त्यात सदासर्वदा राहतील. अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न झाला व ते अल्लाहशी राजी झालेत. हे असे आहे त्या माणसासाठी ज्याने आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगले.