96. अल् अलक - ٱلْعَلَق
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- वाचा, (हे पैगंबर (स.)) आपल्या पालनकर्त्याच्या नामासहित ज्याने
- निर्माण केले, गोठलेल्या रक्ताच्या एका गुठळीपासून मानवाची निर्मिती केली.
- वाचा, आणि तुमचा पालनकर्ता मोठा उदार आहे,
- ज्याने लेखणीद्वारे ज्ञान शिकविले,
- मानवाला ते ज्ञान दिले जे तो जाणत नव्हता.
- कदापि नाही, मानव मर्यादाभंग करतो आहे,
- या कारणास्तव की तो आपल्या स्वतःला स्वयंपूर्ण पाहतो.
- (वस्तुतः) आपल्या पालनकर्त्याकडेच, त्याला परत जायचे आहे
- तुम्ही पाहिले त्या माणसाला जो एका दासाला मनाई करतो,
- जेव्हा तो नमाज पढत असतो?
- तुमचा काय विचार आहे जर तो सरळ मार्गावर असता
- किंवा ईशपरायणतेचा आदेश देत असता?
- तुमचा काय विचार आहे जर (हा मनाई करणारा माणूस सत्याला) खोटे ठरवीत आहे व विमुख होत आहे?
- काय त्याला माहीत नाही की अल्लाह पहात आहे?
- कदापि नाही, जर तो परावृत्त झाला नाही तर आम्ही त्याला, कपाळाचे केस धरून ओढू,
- त्या कपाळाचे जे खोटारडे व मोठे गुन्हेगार आहेत.
- त्याने बोलवावे आपल्या समर्थकांच्या टोळीला,
- आम्हीसुद्धा प्रकोपाच्या दूतांना बोलावून घेऊ.
- कदापि नाही, त्याचे म्हणणे ऐकू नका. आणि नतमस्तक व्हा. व (आपल्या पालनकर्त्याशी) जवळीक साधा.