4.अन् निसा - ٱلنِّسَاء
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- लोकहो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी बनविली आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसर्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर रहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.
- अनाथांची संपत्ती त्यांना परत करा. चांगल्या मालाला वाईट मालाने बदलू नका, आणि त्यांचा माल आपल्या मालात मिसळून खाऊ नका, हा फार मोठा गुन्हा आहे.
- आणि जर तुम्हाला भय असेल की तुम्ही अनाथांशी न्याय करू शकणार नाही तर ज्या स्त्रिया तुम्हाला पसंत पडतील त्यांच्यापैकी दोन-दोन, तीन-तीन, चार-चारशी विवाह करा. परंतु जर तुम्हाला भय असेल की तुम्ही त्यांच्याशी न्याय करू शकणार नाही तर मग एकच पत्नी करा. किंवा त्या स्त्रियांना आपल्या दांपत्य जीवनात आणा ज्या तुमच्या ताब्यात आल्या आहेत, अन्यायापासून वाचण्यासाठी हे औचित्याच्या अधिक निकटचे आहे.
- आणि स्त्रियांचे महर (स्त्रीधन) आनंदाने (कर्तव्य समजून) अदा करा. परंतु जर त्यांनी स्वतः स्वखुषीने स्त्रीधनाचा काही अंश तुम्हाला माफ केला तर तुम्ही तो भाग आनंदाने खाऊ शकता.
- आणि आपली ती संपत्ती जिला अल्लाहने तुमच्यासाठी जीवनयापन करण्याचे साधन बनविले आहे, नादान लोकांच्या स्वाधीन करू नका परंतु त्यांना आहार व वस्त्रप्रावरण द्या आणि त्यांना सन्मार्गदर्शन करा.
- आणि अनाथांची काळजी घेत रहा इथपावेतो की ते विवाहयोग्य वयात येतील. मग जर तुम्हाला त्यांच्यात योग्यता आढळली तर त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करा. असे कधीही करू नका की न्यायाच्या मर्यादा ओलांडून या भीतीपोटी त्यांचा माल घाईघाईने गिळंकृत कराल की ते मोठे झाल्यावर आपल्या हक्कांची मागणी करू लागतील. अनाथांचा जो पालक धनवान असेल त्याने ईशपरायणतेने वागावे व जो गरीब असेल त्याने परिचित पद्धतीने खावे. नंतर जेव्हा त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करू लागाल तेव्हा लोकांना त्यावर साक्षीदार बनवा आणि हिशेब घेण्यास अल्लाह पुरेसा आहे.
- पुरुषांसाठी त्या संपत्तीत वाटा आहे जी आई-वडील आणि जवळच्या नातेवाईकांनी मागे ठेवली असेल आणि स्त्रियांसाठीही त्या संपत्तीत वाटा आहे जी आई-वडील आणि जवळच्या नातेवाईकांनी मागे ठेवली असेल, मग ती कमी असो अथवा जास्त, हा वाटा (अल्लाहकडून) ठरविलेला आहे.
- आणि जेव्हा वाटणीच्या वेळी कुटुंबातील लोक आणि अनाथ व गोर-गरीब आले तर त्या संपत्तीमधून त्यांनादेखील काही द्या आणि त्यांच्याशी भल्या माणसासारखे बोला.
- लोकांना या गोष्टीचा विचार करून भीती वाटली पाहिजे की जर त्यानी स्वतः आपल्या पाठीमागे असहाय संतती सोडली असती तर मृत्यूसमयी आपल्या संततीविषयी कसकशा प्रकारचे भय त्यांना वाटले असते, म्हणून त्या लोकांनी अल्लाहचे भय बाळगले पाहिजे आणि रास्त वचन बोलले पाहिजे.
- जे लोक अन्यायाने अनाथांची मालमत्ता गिळंकृत करतात खर्याअर्थी ते आपले पोट आगीने भरतात आणि निश्चितच ते नरकाच्या अग्नीत भडकत असलेल्या आगीत झोकून दिले जातील.
- तुमच्या संततीविषयी अल्लाह तुम्हाला आदेश देत आहे की पुरुषाचा वाटा दोन स्त्रियांच्या बरोबर आहे. जर (मृताचे वारस) दोनपेक्षा जास्त मुली असतील तर त्यांना वारसासंपत्तीपैकी दोन तृतीयांश दिला जावा आणि जर एकच मुलगी वारस असेल तर अर्धी वारसासंपत्ती तिची होय. जर मृतास संतती असेल तर त्याच्या आईवडिलांपैकी प्रत्येकाला वारसासंपत्तीचा सहावा वाटा मिळाला पाहिजे. आणि जर तो निःसंतान असेल आणि आई-वडीलच त्याचे वारस असतील तर आईला तिसरा वाटा दिला जावा. आणि जर मयताचे भाऊ बहिणीसुद्धा असतील तर आई सहाव्या हिश्याची वाटेकरी असेल. (या सर्व वाटण्या त्यावेळी काढल्या जातील) जेव्हा मृत माणसाने केलेले मृत्यूपत्र पूर्ण केले गेले असेल आणि त्याच्यावर असलेले कर्ज अदा केले गेले असेल. तुम्हाला माहीत नाही की तुमचे आई-वडील व तुमच्या संततीपैकी कोण लाभाच्या दृष्टीने तुमच्या अधिक जवळ आहे. हे हिस्से अल्लाहने ठरवून दिलेले आहेत, आणि अल्लाह निःसंशय सर्व हकीगती जाणणारा आणि सर्व गर्भित हेतू जाणणारा आहे.
- आणि तुमच्या पत्नीने जे काही ठेवले असेल त्याचा अर्धा वाटा तुम्हाला मिळेल, जर त्या निःसंतान असतील, परंतु संतती असल्यास वारसासंपत्तीमध्ये एक चतुर्थांश वाटा तुमचा आहे जेव्हा की त्यांनी जी वसीयत (मृत्यूपत्र) केली असेल ती पूर्ण करण्यात यावी, आणि कर्ज जे त्यांच्या अंगावर असेल ते अदा करण्यात यावे, व त्या तुम्ही पाठीमागे ठेवलेल्या संपत्तीच्या एक चतुर्थांशच्या वाटेकरी असतील जर तुम्ही निःसंतान असाल, परंतु संतान असल्यास त्यांचा वाटा एक अष्टमांश असेल, यानंतर जी वसीयत (मृत्यूपत्र) तुम्ही केली असेल ती पूर्ण केली जावी व जे कर्ज तुमच्यावर असेल ते अदा केले जावे. आणि तो पुरुष अथवा स्त्री (ज्याच्या वारसासंपत्तीची वाटणी करावयाची आहे) जर निःसंतानही असेल आणि त्या व्यक्तीचे आईवडीलदेखील हयात नसतील, पण त्याचा एक भाऊ अथवा एक बहीण असेल, तर भाऊ आणि बहीण प्रत्येकाला सहावा वाटा मिळेल व भाऊ-बहिण एकाहून अधिक असतील तर एकूण वारसासंपत्तीच्या एक तृतीयांश वाट्यात ते सर्वजण समाविष्ट होतील, जेव्हा की जे मृत्यूपत्र केले गेले असेल ते पूर्ण केले जावे, आणि मयत व्यक्तीने जे जे कर्ज करून ठेवले असेल ते अशा प्रकारे फेडण्यात यावे की ते नुकसानकारक ठरणार नाही- हा आदेश अल्लाहचा असून अल्लाह ज्ञाता, द्रष्टा व मृदुस्वभावी आहे.
- या अल्लाहने ठरवून दिलेल्या मर्यादा आहेत. जो अल्लाह व त्याच्या पैगंबराचे आज्ञापालन करील त्याला अल्लाह अशा उपवनांत दाखल करील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि त्या उद्यानात तो सदैव राहील व हे तर मोठे यश होय.
- आणि जो अल्लाह व त्याच्या पैगंबराची अवज्ञा करील आणि त्याने ठरविलेल्या मर्यादांचे उल्लंघन करील त्याला अल्लाह आगीत टाकील ज्याच्यात तो सदैव राहील आणि त्याच्यासाठी अपमानकारक शिक्षा आहे.
- तुमच्या स्त्रियांपैकी ज्यानी व्यभिचार केला असेल त्यांच्यासंबंधी आपल्यापैकी चार पुरुषांची साक्ष घ्या व जर चार पुरुषांनी साक्ष दिली तर त्यांना घरात बंद करून ठेवा येथपावेतो की त्यांना मृत्यू येईल अथवा अल्लाह त्यांच्यासाठी काही मार्ग काढील.
- आणि तुमच्यापैकी ज्यानी असे कृत्य केले असेल त्या दोघांना त्रास द्या मग जर त्यांनी पश्चात्ताप केला व आपली सुधारणा केली तर त्यांना सोडून द्या, अल्लाह फार पश्चात्ताप स्वीकारणारा आहे व दया करणारा आहे.
- परंतु हे समजून असा की अल्लाहकडे पश्चात्ताप स्वीकारण्याचा हक्क त्याच लोकांसाठी आहे जे नादानीमुळे एखादे वाईट कृत्य करून बसतात आणि त्यानंतर लगेच पश्चात्ताप करतात, अशा लोकांवर अल्लाह आपल्या कृपादृष्टीने पुन्हा लक्ष देतो आणि अल्लाह सर्वज्ञ, विवेकशील व बुद्धिमान आहे.
- परंतु पश्चात्ताप त्या लोकांकरिता नाही जे वाईट कृत्ये करतात येथपावेतो की जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याची मृत्यूची घटका येऊन ठेपते तेव्हा तो म्हणतो की आता मी पश्चात्ताप केला आणि याचप्रकारे पश्चात्ताप त्या लोकांकरितादेखील नाही जे मरेपर्यंत अश्रद्धावंत राहिलेत. अशा लोकांकरिता तर आम्ही दुःखदायक शिक्षा तयार करून ठेवली आहे.
- हे श्रद्धावंतांनो! तुमच्याकरिता हे वैध नाही की तुम्ही बळजबरीने स्त्रियांचे वारस बनावे. आणि हे देखील वैध नाही की त्यांना त्रस्त करून त्या स्त्रीधनाचा काही भाग तुम्ही हिरावून घेण्याचा प्रयत्न कराल जो तुम्ही त्यांना देऊन टाकला आहे, परंतु जर त्या उघडपणे अश्लील कृत्ये करतील तर (तुम्हाला जरूर त्यांना त्रास देण्याचा अधिकार आहे.) त्यांच्याशी चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करा. जर त्या तुम्हाला नापसंत असतील तर शक्य आहे की एखादी गोष्ट तुम्हाला पसंत नसेल परंतु अल्लाहने त्यांच्यातच बरेचसे भले ठेवले असेल.
- आणि जर तुम्ही एका पत्नीच्या जागी दुसरी पत्नी आणण्याचा इरादाच केला असेल तर तुम्ही जरी तिला ढीगभर संपत्ती दिली असली तरी त्यातील किचितही परत घेऊ नका मग काय तुम्ही तिच्यावर आळ घेऊन आणि उघड अन्याय करून तो माल परत घ्याल?
- तुम्ही ते कसे घ्याल जेव्हा तुम्ही एक दुसर्यापासून सुखोपभोग घेतला आहे आणि त्यांनी तुमच्याकडून दृढ वचन घेतले आहे?
- आणि ज्या स्त्रियांशी तुमच्या वडिलांनी विवाह केला असेल त्यांच्याशी कदापि विवाह करू नका, परंतु जे पूर्वी घडले ते घडले. खरे पाहता ही एक निर्लज्जपणाची कृती आहे, अप्रिय आहे व वाईट रूढी आहे.
- तुमच्यासाठी निषिद्ध केल्या गेल्या आहेत तुमच्या माता, कन्या, बहिणी, आत्या, मावश्या, पुतण्या, भाच्या आणि तुमच्या दूध बहिणी व तुमच्या पत्नीच्या माता, आणि तुमच्या पत्नींच्या मुली ज्यांचे पालनपोषण तुमच्या पालकत्वाखाली झाले आहे. - ज्या पत्नींशी तुमचे शरीर-संबंध झाले असेल त्यांच्या मुली, परंतु एरव्ही जर (केवळ विवाह झाला असेल आणि) त्या पत्नींशी समागम झाला नसेल तर (त्यांना घटस्फोट देऊन त्यांच्या मुलींशी विवाह करून घेण्यात) तुमच्यावर कोणताही गुन्हा नाही. आणि तुमच्या त्या मुलांच्या पत्नीदेखील (निषिद्ध आहेत) (जी मुले) तुमच्या वीर्यापासून जन्मली आहेत. आणि हे देखील तुमच्यासाठी निषिद्ध केले गेले आहे की तुम्ही दोन बहिणींना विवाह बंधनात एकत्र आणावे, परंतु पूर्वी जे काही घडले ते घडले, अल्लाह क्षमा करणारा आणि परम कृपाळू आहे.
- आणि त्या स्त्रियादेखील तुमच्याकरिता निषिद्ध आहेत ज्या इतर कोणाच्या विवाहबंधनांत असतील (मुहसनात) परंतु अशा स्त्रियांशी (विवाह करण्यामध्ये) त्या स्त्रिया अपवाद आहेत ज्या (युद्धामध्ये) तुमच्या हाती लागलेल्या असतील. हा अल्लाहचा कायदा आहे ज्याचे पालन तुमच्यावर बंधनकारक आहे. यांच्याखेरीज इतर ज्या स्त्रिया आहेत त्यांना आपल्या संपत्तीद्वारे प्राप्त करणे तुमच्यासाठी वैध करण्यात आले आहे, परंतु अट अशी की त्यांना विवाहाबंधनात सुरक्षित करा, असे नव्हे की तुम्ही स्वच्छंद कामतृप्ती करू लागाल. मग ज्या दांपत्यजीवनाचा आनंद तुम्ही त्यांच्यापासून घ्याल त्याच्या मोबदल्यात त्यांचे महर (स्त्रीधन) कर्तव्य समजून अदा करा. परंतु महरचा ठराव केल्यानंतर परस्परांच्या राजी-खुषीने तुमच्यामध्ये जर काही तडजोड निघाली तर त्याला काही हरकत नाही. अल्लाह सर्वज्ञ व बुद्धिमान आहे.
- आणि तुमच्यापैकी जर एखाद्याची इतकी ऐपत नसेल की त्यांचा सद्वर्तनी मुसलमान स्त्रियांशी विवाह होईल तर त्याने तुमच्या त्या दासींपैकी एखादीशी विवाह करावा ज्या युद्धामध्ये तुमच्या ताब्यात आल्या असतील व त्या श्रद्धावंत असतील. अल्लाह तुमच्या श्रद्धेची स्थिती चांगल्या प्रकारे जाणतो, तुम्ही सर्व एकाच जमातीचे लोक आहात, म्हणून त्यांच्या पालकांच्या अनुमतीने त्यांच्याशी विवाहबद्ध व्हा व परिचित पद्धतीनुसार त्यांचे महर (स्त्रीधन) अदा करा जेणेकरून त्या विवाहबंधनात सुरक्षित (मुहसनात) राहतील. त्यांनी स्वच्छंद कामतृप्ती करीत फिरू नये आणि त्यांनी गुप्तरीत्या प्रेमसंबंधही ठेऊ नये मग जेव्हा त्या विवाहबंधनात सुरक्षित होतील आणि त्या एखादे अश्लील कर्म करतील तर त्याना त्या शिक्षेच्या तुलनेत अर्धी शिक्षा आहे जी मर्यादाशील स्त्रियांकरिता (मुहसनात) ठेवलेली आहे. ही सवलत तुम्हांपैकी त्या लोकांकरिता आहे ज्यांना विवाह न केल्यामुळे संयममर्यादा भंग पावण्याचे भय वाटत असेल, परंतु जर तुम्ही संयम पाळाल तर हे तुमच्यासाठी उत्तम आहे, आणि अल्लाह क्षमा करणारा व परम कृपाळू आहे.
- अल्लाह इच्छितो की तुमच्यासाठी त्याने त्या पद्धती स्पष्ट कराव्यात आणि त्याच पद्धतीवर तुम्हास चालवावे ज्यांचे अनुसरण तुमच्यापूर्वी होऊन गेलेले सदाचारी लोक करीत होते. तो आपल्या कृपेसह तुमच्याकडे लक्ष देऊ इच्छितो आणि तो सर्वज्ञ व बुद्धिमानदेखील आहे.
- होय, अल्लाह तर तुमच्यावर कृपेसह लक्ष देऊ इच्छितो परंतु जे लोक स्वतः आपल्या मनोवासनांचे अनुसरण करीत आहेत ते इच्छितात की तुम्ही सरळ मार्गापासून भरकटून दूर जावे.
- अल्लाह तुमच्यावरील बंधने शिथिल करू इच्छितो कारण मनुष्य दुबळा प्राणी निर्माण केला गेला आहे.
- हे श्रद्धावंतांनो! आपसात एकमेकांची संपत्ती खोट्या पद्धतीने खाऊ नका. व्यवहार झाला पाहिजे परस्परांच्या राजीखुषीने आणि स्वतःचा आत्मघात करू नका. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर मेहरबान आहे,
- जो कोणी जुलूम व अत्याचाराने असे करील त्याला निःसंशय आम्ही आगीत लोटू आणि हे अल्लाहकरिता काही अवघड कार्य नाही.
- जर तुम्ही त्या मोठमोठाल्या पापापासून अलिप्त राहिला ज्यांची तुम्हाला मनाई करण्यात येत आहे, तर तुमच्या लहानसहान दुष्कृत्यांचे आम्ही पापक्षालन करू, आणि तुम्हाला सन्मानाच्या ठिकाणी दाखल करू.
- आणि जे काही अल्लाहने तुमच्यापैकी एखाद्याला दुसर्याच्या तुलनेत अधिक दिले आहे त्याची अभिलाषा धरू नका, जे काही पुरुषांनी कमाविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे आणि जे काही स्त्रियांनी कमाविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा होय, अल्लाहजवळ त्याच्या कृपेची प्रार्थना करीत राहा, निःसंशय अल्लाहला प्रत्येक वस्तूचे ज्ञान आहे.
- आणि आम्ही त्या प्रत्येक वारसासंपत्तीचे हक्कदार ठरवून दिले आहेत, जी आई, वडील व जवळचे नातलग पाठीमागे ठेवतील. आता उरले ते लोक ज्यांच्याशी तुमचा करार-मदार झाला असेल तर त्यांचा वाटा त्यांना द्या. निःसंशय अल्लाह प्रत्येक वस्तूवर निरीक्षक आहे.
- पुरुष स्त्रियांवर विश्वस्त आहेत. या आधारावर की अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसर्यावर श्रेष्ठत्व दिले आहे. आणि या आधारावर की पुरुष आपली संपत्ती खर्च करतात. मग ज्या प्रामाणिक स्त्रिया आहेत त्या आज्ञाधारक असतात आणि पुरुषांच्या गैरहजेरीत अल्लाहच्या देखरेखीत व संरक्षणात त्यांच्या हक्कांचे रक्षण करतात आणि ज्या स्त्रियांकडून तुम्हाला दुर्वर्तनाचे भय असेल त्यांची समजूत घाला, शयनगृहात त्यांच्यापासून अलिप्त रहा, आणि मार द्या, मग जर त्या तुमच्या आज्ञाधारक बनल्या तर विनाकारण त्यांच्यावर हात टाकण्यासाठी निमित्त शोधू नका. विश्वास ठेवा की अल्लाह हजर आहे जो उच्चतम व महान आहे
- आणि जर तुम्हाला पतिपत्नीचे संबंध बिघडण्याचे भय असेल तर एक पंच पुरुषाच्या नातेवाईकांपैकी आणि एक स्त्रीच्या नातेवाईकांपैकी नियुक्त करा, ते दोघे सुधारणा करू इच्छित असतील तर अल्लाह त्यांच्यामध्ये समेटाचा मार्ग काढील, अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.
- आणि तुम्ही सर्वजण अल्लाहची भक्ती करा, त्याच्यासमवेत कोणाला भागीदार बनवू नका, आई-वडिलांशी नेक वर्तणूक ठेवा, नातेवाईक आणि अनाथ व गोरगरीबांशी चांगला व्यवहार करा आणि आप्तशेजारी, अनोळखी शेजारी, तोंडओळख असणारा साथीदार व वाटसरू, आणि त्या दासी व दास जे तुमच्या ताब्यात असतील, त्यांच्याशी उपकाराचे व्यवहार करा, विश्वास ठेवा की अल्लाह एखाद्या अशा व्यक्तीला पसंत करत नाही जी आपल्या अहंभावात गर्विष्ठ असते व आपल्या मोठेपणावर अभिमान करीत असते.
- आणि असे लोकदेखील अल्लाहला पसंत नाहीत जे कंजूषपणा करतात आणि दुसर्यांनासुद्धा कंजूषपणाचा आदेश देतात व जे काही अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना दिले आहे त्यास ते लपवितात. अशा कृतघ्न अश्रद्धावंत लोकांकरिता आम्ही नामुष्की आणणारी शिक्षा तयार ठेवली आहे.
- आणि ते लोक देखील अल्लाहला नापसंत आहेत जे आपली संपत्ती लोकांना केवळ दाखविण्यासाठी खर्च करतात आणि खरे पाहता ते अल्लाहवरही श्रद्धा बाळगत नाहीत अथवा अंतिम दिनावरदेखील. सत्य असे आहे की शैतान ज्याचा मित्र झाला त्याला अत्यंत वाईट मैत्री मिळाली
- बरे तर या लोकांवर कोणते संकट कोसळले असते जर यांनी अल्लाह व अंतिम दिनावर श्रद्धा ठेवली असती आणि जे काही अल्लाहने दिले आहे त्यातून खर्च केले असते. जर यांनी असे केले असते तर अल्लाहपासून यांच्या पुण्याईची स्थिती लपून राहिली नसती.
- अल्लाह कोणावरही तिळमात्रसुद्धा अत्याचार करीत नाही. जर कोणी एक पुण्य केले तर अल्लाह त्याला द्विगुणीत करतो व मग आपल्यातर्फे मोठा मोबदला प्रदान करतो.
- मग विचार करा की तेव्हा हे लोक काय करतील जेव्हा आम्ही प्रत्येक लोकसमूहामधून एक साक्षीदार आणू आणि या लोकांवर तुम्हाला (अर्थात पैगंबर मुहम्मद-स. यांना) साक्षीदार म्हणून उभे करू.
- तेव्हा ते सर्वजण ज्यांनी पैगंबरांचे म्हणणे ऐकले नाही आणि त्यांची अवज्ञा करीत राहिले, इच्छा करतील की पृथ्वीने तिच्या उदरात आम्हांस सामावून घेतले तर किती छान! तेथे हे आपली कोणतीही गोष्ट अल्लाहपासून लपवू शकणार नाहीत.
- हे श्रद्धावानांनो, जेव्हा तुम्ही नशेच्या स्थितीत असाल तेव्हा नमाजच्या जवळ जाऊ नका नमाज त्या वेळेस अदा केली पाहिजे जेव्हा तुम्हाला कळत असेल की तुम्ही काय बोलत आहात आणि याचप्रमाणे अपवित्रतेच्या स्थितीतसुद्धा नमाजच्याजवळ जाऊ नका जोपर्यंत तुम्ही स्नान करीत नाही याव्यतिरिक्त की तुम्ही रस्त्याने जात असाल आणि कधी जर असे घडले की तुम्ही आजारी असाल किंवा प्रवासात असाल अथवा तुम्हापैकी एखादा शौचास जाऊन आला असेल अथवा तुम्ही स्त्रियांना स्पर्श केला असेल, आणि मग पाणी उपलब्ध झाले नाही तर स्वच्छ मातीचा उपयोग करा आणि ती आपल्या चेहर्या व हातावर फिरवा निःसंदेह अल्लाह मृदू व्यवहार करणारा व क्षमा करणारा आहे.
- तुम्ही त्या लोकांनासुद्धा पाहिले आहे काय ज्यांना ग्रंथाच्या ज्ञानाचा काही भाग दिला गेला आहे? ते स्वतः मार्गभ्रष्टतेचे ग्राहक बनले आहेत आणि ते इच्छितात की तुम्हीसुद्धा मार्गभ्रष्ट व्हावे.
- अल्लाह तुमच्या शत्रूंना चांगल्या प्रकारे जाणतो आणि तुमच्या पुष्टी व सहाय्याकरिता अल्लाहच पुरेसा आहे.
- जे लोक यहुदी आहेत त्यांच्यात काही लोक आहेत जे शब्दांना त्यांच्या जागेपासून फिरवितात ’समीअना व असैना’ आणि ’इसमअ गैर मुसमइन’ व ’राइना’ खरे पाहता जर त्यांनी म्हटले असते ’समिअना व अतअना’ आणि ’इसमाअ’ व ’उन्जुरना’ तर हे त्यांच्यासाठीच उत्तम होते आणि ती अधिक सत्यनिष्ठतेची पद्धत होती. परंतु त्यांच्यावर तर त्यांच्या असत्यवादामुळे अल्लाहचा धिक्कार ओढवला आहे, म्हणून ते अल्लाहवर कमीच श्रद्धा ठेवतात.
- हे लोकहो ज्यांना ग्रंथ दिला गेला होता! मान्य करा त्या ग्रंथाला जो आता आम्ही अवतरला आहे आणि जो त्या ग्रंथाची सत्यता प्रमाणित करतो व समर्थन करतो जो तुमच्याजवळ अगोदरपासूनच उपलब्ध होता. यावर श्रद्धा ठेवा या अगोदर की आम्ही चेहरे विद्रूप करून मागे फिरवावे किंवा त्यांना त्याचप्रकारे धिःकारित करावे ज्याप्रकारे सब्तवाल्याशी (शनिवार न पाळणार्यांशी) केले होते आणि लक्षात ठेवा की अल्लाहचा आदेश लागू होतच असतो
- अल्लाह निःसंशय त्याच्यासोबत अन्य कुणाला सामील करणार्यांना क्षमा करीत नाही. याव्यतिरिक्त इतर जितके गुन्हे आहेत तो हवे ते माफ करतो, अल्लाहबरोबर ज्याने इतर कोणाला भागीदार केले त्याने तर एक मोठे असत्य रचले आणि भयंकर मोठ्या पापाची गोष्ट केली.
- तुम्ही त्या लोकांनासुद्धा पाहिले आहे काय जे स्वतः फार फार शुद्धात्मा असल्याचा दावा करतात? वास्तविक पाहता शुद्धता तर अल्लाहच ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो, आणि त्यांच्यावर तिळमात्र जुलूम केला जात नाही.
- पाहा तर खरे, हे अल्लाहबद्दल देखील खोटे कुभांड रचण्यास चुकत नाहीत आणि यांच्या स्पष्टपणे गुन्हेगार असण्यास एवढा एकच गुन्हा पुरेसा आहे.
- तुम्ही त्या लोकांना पाहिले नाही काय ज्यांना ग्रंथाच्या ज्ञानातून काही भाग दिला गेला आहे आणि त्यांची दशा अशी आहे की ते मिथ्या व तागूत (मर्यादेबाहेर जाणारा) ला मानतात. आणि अश्रद्धावंतांच्या बाबतीत म्हणतात की श्रद्धा ठेवणार्यांपेक्षा तर हेच अधिक सन्मार्गावर आहेत.
- असेच लोक आहेत ज्यांचा अल्लाहने धिक्कार केला आहे आणि ज्याचा अल्लाहने धिक्कार केला मग त्याचा कोणीही सहायक तुम्हाला आढळणार नाही.
- राज्यात यांचा काही वाटा आहे काय? जर असे असते तर यांनी इतरांना एक फुटकी कवडीदेखील दिली नसती.
- मग काय हे इतरांशी याकरिता मत्सर करतात की अल्लाहने त्यांना आपल्या कृपेने उपकृत केले जर ही गोष्ट आहे तर यांना माहीत असावे की आम्ही तर इब्राहीम (अ.) च्या संततीस ग्रंथ व विवेक प्रदान केले व महान राज्य प्रदान केले.
- परंतु त्यांच्यापैकी काहींनी त्यावर श्रद्धा ठेवली व काही पराडमुख झाले, आणि विमुख होणार्यांकरिता तर केवळ नरकाचा भडकणारा अग्नीच पुरेसा आहे.
- ज्या लोकांनी आमची संकेतवचने मानण्यास नकार दिला आहे त्यांना खचितच आम्ही अग्नीत झोकून देऊ आणि जेव्हा त्यांच्या शरीराची त्वचा गळून पडेल तेव्हा त्या जागी दुसरी त्वचा निर्माण करू जेणेकरून ते प्रकोपाचा खूपच आस्वाद घेतील, अल्लाह खूप समर्थ आहे आणि आपल्या निर्णयांना अंमलात आणण्याची हिकमत चांगल्या प्रकारे जाणतो.
- आणि ज्या लोकांनी आमची संकेतवचने मान्य केली आणि सत्कृत्ये केली त्यांना आम्ही अशा उद्यानात दाखल करू ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील, जेथे ते सदासर्वदा राहतील आणि त्यांना पवित्र भार्या मिळतील आणि त्यांना आम्ही दाट छायेत ठेवू.
- मुसलमानांनो! अल्लाह तुम्हाला आज्ञा देतो की ठेवी ठेवीदारांच्या स्वाधीन करा, आणि जेव्हा लोकांदरम्यान न्यायनिवाडा कराल तेव्हा न्यायाने निवाडा करा अल्लाह तुम्हाला उत्तम उपदेश देत आहे आणि निःसंशय अल्लाह सर्वकाही ऐकतो व पाहतो.
- हे श्रद्धावंतानो! आज्ञापालन करा अल्लाहचे, आज्ञापालन करा पैगंबराचे, आणि त्या लोकांचे जे तुमच्यापैकी आज्ञाधिकारी असतील. मग जर तुमच्या दरम्यान एखाद्या बाबतीत वाद निर्माण झाला तर त्याला अल्लाह व पैगंबराकडे न्या. जर तुम्ही खरोखरच अल्लाह व अंतिम दिनावर श्रद्धा बाळगत असाल. हीच एक योग्य कार्यपद्धती आहे आणि शेवटाच्या दृष्टीने देखील अधिक चांगली आहे.
- हे नबी (स.)! तुम्ही पाहिले नाही काय त्या लोकांना जे दावा तर करतात की आम्ही श्रद्धा ठेवतो आहोत त्या ग्रंथावर जे तुमच्याकडे अवतरविले गेले आहे आणि त्या ग्रंथावर जे तुमच्याअगोदर अवतरविण्यात आले होते परंतु इच्छितात असे की आपल्या बाबींचा निवाडा करण्यासाठी तागूतकडे (विद्रोही लोक) रुजू व्हावेत. वस्तुतः त्यांना तागूतशी द्रोह करण्याचा आदेश देण्यात आला होता. शैतान त्यांना भटकवून सरळ मार्गापासून फार लांब नेऊ इच्छितो.
- आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की या, त्या गोष्टीकडे, जी अल्लाहने अवतरली आहे आणि या, पैगंबराकडे, तेव्हा तुम्ही या दांभिकांना पाहता की हे तुमच्याकडे येण्याचे टाळतात.
- मग तेव्हा काय होते जेव्हा यांनी स्वहस्ते ओढवून घेतलेले संकट यांच्यावर कोसळते? त्या वेळेस हे तुमच्याजवळ शपथा घेत येतात आणि सांगतात की ईश्वराची शपथ, आम्ही तर केवळ भले इच्छित होतो आणि आमची मनिषा तर अशी होती की उभयपक्षात कोणत्या न कोणत्या प्रकारे समेट व्हावा
- अल्लाह जाणतो जे काही यांच्या मनांत आहे, यांच्याकडे लक्ष देऊ नका. यांची समजूत घाला व असा उपदेश द्या जो यांच्या अंतःकरणात उतरावा.
- (यांना सांगा की) आम्ही जो कोणी प्रेषित पाठविला आहे. याकरिताच पाठविला की अल्लाहच्या आदेशांच्या आधारावर त्याची आज्ञा पाळली जावी. जर यांनी ही पद्धत अंगिकारिली असती की जेव्हा हे स्वतःवर अत्याचार करून बसले होते तेव्हा तुमच्यापाशी आले असते आणि अल्लाहजवळ क्षमायाचना केली असती आणि प्रेषितांनी देखील माफीची दरखास्त केली असती, तर निःसंशय अल्लाह यांना क्षमा करणारा व कृपा करणारा आढळला असता.
- नाही, हे मुहम्मद (स.)! तुमच्या पालनकर्त्याची शपथ, हे कधीही श्रद्धावंत होऊ शकत नाहीत, जोपर्यंत आपल्या वादग्रस्त प्रश्नात हे तुम्हाला निर्णय देणारा मान्य करीत नाहीत. मग जो काही निर्णय तुम्ही द्याल त्यावर आपल्या मनांत देखील काही संकोच वाटू नये तर पूर्णतः मान्य करावे.
- जर आम्ही यांना आज्ञा दिली असती की आत्मघात करा अथवा आपल्या घरातून निघून जा तर यांच्यापैकी थोड्याच लोकांनी त्याची अंमलबजावणी केली असती. वास्तविक पाहता जो उपदेश यांना दिला जात आहे जर यांनी ते अमलात आणले असते तर हे यांच्यासाठी अधिक हितकारक व अधिक दृढतेचे कारण बनले असते.
- आणि जेव्हा यांनी असे केले असते तर आम्ही यांना आपल्याकडून फार मोठा मोबदला दिला असता.
- आणि यांना सरळमार्ग दाखविला असता.
- जे लोक अल्लाह आणि अल्लाहच्या पैगंबरांची आज्ञापालन करणारे लोक त्यांच्या समवेत असतील ज्यांना अल्लाहने आपल्या कृपाप्रसादाने अनुग्रहित केले आहे. अर्थात, नबी (प्रेषित), सत्यवचनी, शहीद व सदाचारी लोक. आणि किती चांगले मित्र आहेत हे!
- ही वास्तविक कृपा आहे जी अल्लाहकडून प्रदान होते आणि वास्तविकता समजण्याकरिता केवळ अल्लाहचे ज्ञानच पुरेसे आहे.
- हे श्रद्धावंतांनो! संघर्षासाठी सदैव सज्ज राहा, मग जसा प्रसंग असेल तसे वेगवेगळ्या तुकड्यांच्या स्वरूपात निघा अथवा एकत्र होऊन,
- होय, तुम्हामध्ये कोणी असादेखील आहे जो लढाईपासून अंग काढतो, जर तुमच्यावर एखादे संकट आले तर म्हणतो की अल्लाहने माझ्यावर मोठी कृपा केली की मी या लोकांबरोबर गेलो नाही,
- आणि जर अल्लाहकडून तुमच्यावर कृपा झाली तर म्हणतो- जणू काय तुमच्या व त्याच्या दरम्यान प्रेमाचे काही संबंधच नव्हते - मीदेखील त्यांच्याबरोबर असतो तर किती मोठे काम साधले असते.
- (अशा लोकांना माहीत असावे की) अल्लाहच्या मार्गात लढाई केली पाहिजे, त्या लोकांनी जे पारलौकिक जीवनाच्या बदल्यात ऐहिक जीवनाचा सौदा (विक्री) करतात, मग जो अल्लाहच्या मार्गात लढेल आणि मारला जाईल अथवा वरचढ राहील त्याला आम्ही अवश्य महान मोबदला प्रदान करू.
- मग काय कारण आहे की तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या असहाय पुरुष स्त्रियां आणि मुलांकरिता लढू नये ज्यांचे दुर्बल असल्यामुळे दमन केले गेले आहे आणि धावा करीत आहेत की, हे पालनकर्त्या! आम्हाला या वस्तीतून बाहेर काढ ज्याचे रहिवाशी अत्याचारी आहेत, आणि तुझ्याकडून आमचा एखादा वाली व सहायक निर्माण कर.
- ज्या लोकांनी श्रद्धेचा मार्ग अवलंबिला आहे ते अल्लाहच्या मार्गात लढतात आणि ज्यांनी अश्रद्धेचा मार्ग अवलंबिला आहे ते तागूतच्या (विद्रोही लोकांच्या) मार्गात लढतात, तर शैतानाच्या साथीदारांशी लढा आणि खात्री बाळगा की शैतानाची कारस्थाने खरे पाहता अत्याधिक दुर्बल आहेत.
- तुम्ही त्या लोकांनादेखील पाहिले आहे का ज्यांना सांगण्यात आले होते की आपले हात रोखून ठेवा, आणि नमाज कायम करा व जकात अदा करा? आता जेव्हा त्यांना लढाईचा आदेश दिला गेला तर त्यांच्यापैकी एका गटाची अवस्था अशी आहे की लोकांना असे भीत आहेत जसे अल्लाहला भ्यायले पाहिजे अथवा याहूनही काही अधिक, म्हणतात, हे परमेश्वरा! हा आम्हावर लढाईचा आदेश का लादलास? आम्हाला आणखी सवलत का दिली नाहीस? यांना सांगा, ऐहिक जीवनाचे भांडवल फार थोडे आहे आणि परलोक ईशपरायण माणसाकरिता अधिक उत्तम आहे आणि तुम्हावर जुलूम तिळमात्रदेखील केला जाणार नाही.
- उरला मृत्यू तर जेथे कोठे तुम्ही असाल तो कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला येणारच, मग तुम्ही कितीही मजबूत इमारतीत असा. जर त्यांना एखादा लाभ पोहचतो तर म्हणतात की हा अल्लाहकडून आहे आणि जर एखादे नुकसान झाले तर म्हणतात की हे नबी (स.), हे तुमच्यामुळे आहे, सांगा की सर्वकाही अल्लाहकडूनच आहे. या लोकांना झाले तरी काय की कोणतीच गोष्ट यांच्या लक्षात येत नाही?
- हे माणसा, तुला जी कोणती भलाई प्राप्त होते अल्लाहच्या कृपेने होते आणि जी संकटे तुझ्यावर ओढवतात ती तुझ्या स्वतःच्याच कृत्यामुळे होय. हे मुहम्मद (स.), आम्ही तुम्हाला लोकांसाठी पैगंबर बनवून पाठविले आहे आणि यासाठी अल्लाहची साक्ष पुरेशी आहे.
- ज्याने पैगंबराची आज्ञा पाळली त्याने खरे म्हणजे अल्लाहचे आज्ञापालन केले आणि जो पराडमुख झाला तर आम्ही तुम्हाला या लोकांवर पहारेकरी म्हणून तर पाठविले नाही.
- ते तोंडावर म्हणतात की, आम्ही आज्ञाधारक आहोत. पण जेव्हा ते तुमच्यापासून निघून जातात तेव्हा त्यांच्यापैकी एक गट रात्री एकत्र होऊन तुमच्या गोष्टींविरूद्ध सल्लामसलत करतो. अल्लाह त्यांच्या या सर्व कुजबूजींची नोंद घेत आहे. तुम्ही त्यांची पर्वा करू नका आणि अल्लाहवर भीस्त ठेवा, तोच भीस्त ठेवण्यास पुरेसा आहे
- काय हे लोक कुरआनवर विचार करीत नाहीत? जर हे अल्लाहशिवाय अन्य कोणाकडून असते तर यांत पुष्कळसा विसंवाद आढळला असता.
- जेव्हा त्यांच्यापर्यंत शांततेची किंवा धोक्याची बातमी पोहचते तेव्हा हे तिचा (सर्वत्र) प्रसार करतात. जर त्यांनी पैगंबर आणि जबाबदार लोकांसमोर निवेदन केले असते तर त्यांच्यातील जाणकार लोकांनी तिचे स्वरूप जाणून अचूक निष्कर्ष काढला असता. तुम्हा लोकांवर अल्लाहची कृपा व मेहरबानी नसती तर (तुमच्या उणीवा अशा होत्या की) काही मोजक्या व्यक्ती सोडून तुम्ही सर्वजण शैतानच्या नादी लागला असता.
- तर हे नबी (स.), तुम्ही अल्लाहच्या मार्गात लढा, तुम्ही आपल्या स्वतःखेरीज इतर कोणासाठी जबाबदार नाही तथापि श्रद्धावंताना लढण्यासाठी प्रवृत्त करा, दूर नाही की अल्लाह अश्रद्धावंतांचा जोर मोडून काढील. अल्लाहचा जोर सर्वात प्रचंड व त्याचे शासन कठोर आहे.
- जो चांगुलपणाची शिफारस करील त्याला त्यात वाटा मिळेल आणि जो वाईट गोष्टीची शिफारस करील त्याला त्यातून वाटा मिळेल, आणि अल्लाह सर्व गोष्टींवर नजर ठेवणारा आहे.
- आणि जेव्हा एखादा अदबीने तुम्हाला सलाम करील तर त्याला त्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे उत्तर द्या किंवा कमीतकमी त्याचप्रमाणे, अल्लाह प्रत्येक गोष्टीचा हिशेब घेणारा आहे
- अल्लाह ज्याच्याशिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही, तो तुम्हा सर्वांना त्या पुनरुत्थानाच्या दिवशी एकत्र करील ज्याच्या येण्यात कोणताही संशय नाही, आणि अल्लाहच्या वचनापेक्षा अधिक खरी गोष्ट कोणाची बरे असू शकेल?
- मग हे तुम्हाला झाले तरी काय आहे की दांभिकासंबंधी तुमच्यादरम्यान मतभिन्नता किंवा दुमत आढळते वस्तुतः जे दुष्कर्म त्यांनी कमाविले आहे त्यांच्यामुळे अल्लाहने त्यांना परत फिरविले आहे. काय तुम्ही हे इच्छिता की ज्याला अल्लाहने सरळ मार्गावर आणले नाही त्यांना तुम्ही सरळ मार्गावर आणाल? वस्तुतः ज्याला अल्लाहने मार्गभ्रष्ट केले त्याच्यासाठी तुम्हाला कोणताच सन्मार्ग आढळणार नाही.
- ते तर हे इच्छितात की ज्याप्रमाणे ते स्वतः अश्रद्धावंत आहेत त्याचप्रमाणे तुम्हीही अश्रद्धावंत बनावे, म्हणजे तुम्ही व ते सर्वजण एकसारखेच व्हावे. म्हणून त्यांच्यापैकी कोणालाही आपला मित्र बनवू नका जोपर्यंत ते अल्लाहच्या मार्गात देशांतर (हिजरत) करून येत नाहीत, आणि जर ते स्थलांतरापासून पराडमुख राहतील तर जेथे आढळतील तेथे त्यांना पकडा व ठार करा आणि त्यांच्यापैकी कोणासही आपला मित्र व सहायक बनवू नका.
- परंतु ते दांभिक या आदेशाला अपवाद आहेत जे एखाद्या अशा जनसमुदायाला जाऊन मिळतील ज्याच्याशी तुमचा करार आहे, अशाचप्रकारे ते दांभिक देखील अपवाद आहेत जे तुमच्यापाशी येतात आणि युद्धाविषयी त्यांचे मन खिन्न आहे. ते तुमच्याशीही युद्ध करू इच्छित नाहीत आणि आपल्या लोकांशीही नाही. अल्लाहने इच्छिले असते तर त्यांना तुमच्यावर लादले असते आणि ते देखील तुमच्याशी लढले असते. म्हणून जर ते तुमच्यापासून अलिप्त झाले आणि लढाईपासून दूर राहिले आणि तुमच्याकडे सलोखा व शांतीचा हात पुढे केला तर त्यांच्यावर हात उचलण्याचा कोणताच मार्ग अल्लाहने तुमच्यासाठी ठेवला नाही.
- आणखी एका प्रकारचे दांभिक तुम्हाला असे आढळतील जे इच्छितात की तुमच्याकडून देखील अभय लाभावे व आपल्या लोकांकडूनसुद्धा. पण जेव्हा कधी त्यांना उपद्रवाची संधी लाभेल तेव्हा ते त्यात उडी घेतील, असले लोक जर तुमच्याशी दोन हात करण्यापासून दूर राहत नसतील आणि समेट व सुरक्षा तुम्हापुढे सादर करत नसतील व आपले हात आवरत नसतील तर जेथे ते सापडतील त्यांना धरा व मारा, त्याच्यावर हात टाकण्यासाठी आम्ही तुम्हाला उघड अधिकार देऊन टाकला आहे.
- कोणत्याही श्रद्धावंताचे हे काम नव्हे की त्याने दुसर्या श्रद्धावंताला ठार करावे जोपर्यंत त्याच्याकडून चूक घडत नाही. आणि जी व्यक्ती एखाद्या श्रद्धावंताला चुकून ठार करील तर त्याचे प्रायश्चित हे आहे की तिने एका श्रद्धावंताला गुलामीतून मुक्त करावे. आणि ठार झालेल्या व्यक्तीच्या वारसांना खुनाबद्दल भरपाई द्यावी. परंतु त्याला अपवाद तो की जो खुनाची किंमत माफ करील, परंतु जर ठार झालेला तो मुसलमान एखाद्या अशा जनसमुदायापैकी असेल ज्याच्याशी तुमचे शत्रुत्व आहे तर त्याचे प्रायश्चित्त एक श्रद्धावंत गुलाम मुक्त करणे होय, आणि जर तो एखाद्या अशा मुस्लिमेतर जनसमुदायापैकी असेल ज्याच्याशी तुमचा करार आहे तर त्याच्या वारसांना खुनाबद्दल भरपाई द्यावी आणि एका श्रद्धावंत गुलामाला मुक्त करावे लागेल. परंतु ज्याला गुलाम आढळले नाही त्याने लागोपाठ दोन महिन्याचे उपवास करावेत. ही या गुन्ह्यासाठी अल्लाहसमोर तौबा (पश्चात्ताप) करण्याची रीत आहे, आणि अल्लाह ज्ञानी व बुद्धिमान आहे.
- उरली गोष्ट त्या व्यक्तीची की जो एखाद्या श्रद्धावंताला जाणूनबुजून ठार करील तर त्याचा मोबदला नरक आहे ज्यात तो सदैव राहील त्याच्यावर अल्लाहचा प्रकोप आणि त्याचा धिक्कार आहे आणि अल्लाहने त्याच्यासाठी कठोर शिक्षा तयार ठेवली आहे.
- हे श्रद्धावंतांनो, जेव्हा तुम्ही अल्लाहच्या मार्गात लढण्यासाठी निघाल तेव्हा मित्र व शत्रू यांच्या मधील फरक जाणून घ्या. आणि जो तुमच्या शांतीसाठी प्रार्थना करील त्याला म्हणू नका की तू श्रद्धावंत नाहीस, जर तुम्ही दुनियेतील लाभाची इच्छा करीत असाल तर अल्लाहजवळ तुमच्यासाठी पुष्कळशी संपत्ती (माले गनिमत) आहे. बरे ह्याच स्थितीत तुम्ही स्वतः देखील तर यापूर्वी गुरफटून गेलेला होता, नंतर अल्लाहने तुमच्यावर उपकार केले, म्हणून शहानिशा करून घ्या. जे काही तुम्ही करता त्याची अल्लाहला खबर आहे.
- मुसलमानांपैकी ते लोक की जे एखाद्या निमित्ताविना घरी बसून राहतात व जे अल्लाहच्या मार्गात प्राण व संपत्तीनिशी जिहाद (प्रयत्नांची पराकाष्टा) करतात, दोघांची स्थिती एकसमान नाही. अल्लाहने बसून राहणार्यापेक्षा प्राण व संपत्तीनिशी युद्ध करणार्यांचा दर्जा श्रेष्ठ ठेवला आहे असे अल्लाहने प्रत्येकासाठी भलाईचेच वचन दिले आहे परंतु त्याच्याजवळ जिहाद करणार्यांच्या सेवेचा मोबदला बसून राहणार्यांपेक्षा फार जास्त आहे,
- त्यांच्यासाठी अल्लाहकडून मोठे दर्जे आहेत आणि क्षमा व कृपा आहे आणि अल्लाह मोठा माफ करणारा व दया करणारा आहे.
- जे लोक आपणच स्वतःवर अत्याचार करीत राहिले होते त्यांचे आत्मे जेव्हा दूतांनी कब्जात घेतले तेव्हा त्याना विचारले की तुम्ही या कसल्या धिक्कारलेल्या अवस्थेत दशेत गुरफटला होता? त्यांनी उत्तर दिले की, आम्ही पृथ्वीवर निर्बल व विवश होतो. दूतांनी सांगितले की अल्लाहची पृथ्वी विशाल नव्हती काय की तुम्ही देशत्याग करून दुसरीकडे जावे? अशा लोकांचे ठिकाण नरक आहे. आणि ते फारच वाईट ठिकाण आहे.
- परंतु जे पुरुष, ज्या स्त्रिया व जी मुले खरोखरच विवश आहेत आणि देशांतराचा कोणताच मार्ग आणि साधन सापडत नाही,
- हे दूर नव्हे की अल्लाह त्यांना माफ करील. अल्लाह मोठा माफ करणारा व क्षमा करणारा आहे.
- जो कोणी अल्लाहच्या मार्गात देशांतर करील तो पृथ्वीवर आश्रय घेण्यासाठी मुबलक जागा व उदरनिर्वाहासाठी मोठी सुबत्ता प्राप्त करील आणि जो आपल्या घरातून अल्लाह व पैगंबराकडे देशांतरासाठी निघाला, नंतर त्याला वाटेतच मृत्यू आला, त्याचा मोबदला अल्लाहच्या जवळ अनिवार्य ठरला, अल्लाह फार क्षमा करणारा व कृपाळू आहे.
- आणि जेव्हा तुम्ही प्रवासाला निघाल तर याच्यात काही हरकत नाही की तुम्ही नमाजला संक्षिप्त करावे (विशेषतः) जेव्हा तुम्हाला भीती वाटेल की अश्रद्धावंत तुम्हाला सतावतील कारण ते उघडउघड तुमच्या शत्रुत्वावर आहेत.
- आणि हे नबी (स.), जेव्हा तुम्ही मुसलमानांच्या दरम्यान असाल आणि (युद्धाच्या स्थितीत) त्यांना नमाज पठण करविण्यासाठी उभे असाल तर हे आवश्यक आहे की त्यांच्यातील एक गट तुमच्याबरोबर उभा रहावा आणि आपले हत्यार घेऊन असावा, नंतर त्याने जेव्हा सजदा केला असेल तेव्हा त्याने पाठीमागे जावे आणि दुसरा गट ज्याने अद्याप नमाज अदा केली नाही, त्याने येऊन तुमच्यासह नमाज अदा करावी आणि त्यानेसुद्धा जागरूक राहावे व सशस्त्र असावे, कारण अश्रद्धावंत यासाठी टपून आहेत की तुम्ही आपले हत्यार आणि आपले सामानाविषयी थोडे देखील गाफिल झालात तर ते एकदम तुमच्यावर तुटून पडतील, परंतु जर तुम्हाला पावसामुळे त्रासाचे वाटत असेल अथवा आजारी असाल तर शस्त्र दूर ठेवण्यात काहीही हरकत नाही, तरीसुद्धा जागरूक रहा. विश्वास ठेवा की अल्लाहने अश्रद्धावंतांसाठी अपमानजनक शिक्षा तयार ठेवली आहे.
- नंतर जेव्हा नमाज आटोपून घ्याल तेव्हा उभे असताना, बसले असताना किंवा पहुडले असताना देखील प्रत्येक स्थितीत अल्लाहचे स्मरण करीत रहा व जेव्हा शांतता लाभेल तर पूर्ण नमाज पठण करा. नमाज वास्तविक पाहता असे अनिवार्य कार्य आहे जे नियमित वेळेसह श्रद्धावंतांसाठी आवश्यक केले गेले आहे.
- या गटाचा पाठलाग करण्यात दुबळेपणा दाखवू नका, जर तुम्ही त्रास सहन करीत आहात तर तुमच्याप्रमाणे ते देखील त्रास सहन करीत आहेत. आणि तुम्ही अल्लाहकडून त्या गोष्टीची आशा बाळगता ज्याची आशा ते बाळगीत नाहीत. अल्लाह सर्वकाही जाणतो आणि तो विवेकशील व बुद्धिमान आहे.
- हे नबी (स.)! आम्ही हा ग्रंथ सत्यानिशी तुमच्याकडे उतरविला आहे की जो सरळ मार्ग अल्लाहने तुम्हाला दाखविला आहे त्यानुसार लोकांमध्ये न्यायनिवाडा करा. तुम्ही अपहार करणारांचे समर्थक बनू नका.
- अल्लाहजवळ क्षमेची याचना करा, तो मोठा क्षमा करणारा व दयावंत आहे.
- जे लोक स्वतःशी बेईमानी करतात, तुम्ही त्यांचे समर्थन करू नका अल्लाहला अप्रामाणिक व दुराचरणी गुन्हेगार पसंत नाहीत.
- हे लोक माणसापासून आपल्या कारवाया लपवू शकतात परंतु अल्लाहपासून लपवू शकत नाहीत. तो तर त्या वेळेसदेखील यांच्याबरोबर असतो जेव्हा हे रात्री गुप्तपणे त्याच्या मर्जीविरूद्ध सल्लामसलत करतात, यांच्या सर्व कृत्यांना अल्लाहने घेरले आहे.
- बरे तर तुम्ही लोकांनी या अपराध्यांतर्फे लौकिक जीवनात तर युक्तिवाद केलेत परंतु पुनरुत्थानाच्या दिवशी यांच्यासाठी कोण युक्तिवाद करील? शेवटी त्यांचा तेथे कोण बरे वकील असेल?
- जर एखाद्या व्यक्तीकडून वाईट कृत्य घडले अथवा आपल्या स्वतःवर अत्याचार केले आणि त्यानंतर अल्लाहजवळ माफीची विनंती केली तर अल्लाह त्याला क्षमा करणारा व कृपा करणारा आढळून येईल.
- जो वाईट कर्म करील तर त्याची ही कमाई त्याच्याकरिता संकट ठरेल. अल्लाहला सर्व गोष्टीची खबर आहे व तो विवेकशील व बुद्धिमान आहे.
- मग जो एखादी चूक वा अपराध करून त्याचा आरोप इतर निरपराध व्यक्तींवर लादेल, त्याने तर मोठे कुभांड व उघड पापाचे ओझे शिरावर घेतले.
- हे नबी (स.)! जर अल्लाहची कृपा तुमच्यावर नसती व त्याची दया तुमच्या सोबत नसती तर त्यांच्यातील एका गटाने तुमचा गैरसमज करण्याचा निश्चय केला होता. खरे पाहता वस्तुस्थिती अशी होती की ते स्वतः आपल्या व्यतिरिक्त इतर कोणाचा गैरसमज करीत नव्हते, आणि तुमचे काही नुकसान करू शकत नव्हते. अल्लाहने तुमच्यावर ग्रंथ व विवेक अवतरित केला आहे. आणि तुम्हाला ते सर्वकाही ज्ञात करून दिले आहे जे तुम्हाला माहीत नव्हते, आणि त्याची कृपा तुम्हांवर मोठी आहे.
- लोकांच्या गुप्त कानगोष्टींमध्ये बहुधा काहीही भले असत नाही परंतु होय, जर कोणी दानधर्मासाठी गुप्तरित्या प्रवृत्त केले अथवा एखाद्या पुण्य कार्यासाठी अथवा लोकांच्या व्यवहारात सुधारणा घडवून आणण्यासाठी एखाद्याला काही सांगितले तर अर्थातच ही चांगली गोष्ट आहे, आणि जो कोणी अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी असे करील त्याला आम्ही मोठा मोबदला प्रदान करू.
- परंतु जो कोणी पैगंबराच्या विरोधात कंबर कसेल आणि श्रद्धावंतांचे मार्गानुकरण करण्याऐवजी इतर मार्गाचे अनुसरण करील तेही अशा परिस्थितीत की त्याच्यावर सरळ मार्ग स्पष्ट झाला असेल तर त्याला आम्ही त्याच मार्गावर चालवू जिकडे तो स्वतः वळला आणि त्याला नरकामध्ये झोकू जे अत्यंत वाईट ठिकाण आहे.
- अल्लाहजवळ फक्त अनेकेश्वरवादासाठी क्षमा नाही, याखेरीज इतर सर्वकाही माफ होऊ शकते, ज्याला तो माफ करू इच्छितो. ज्याने अल्लाहबरोबर इतर कोणाला भागीदार केले तो तर मार्गभ्रष्टतेत फारच लांब भरकटत गेला
- ते अल्लाहला सोडून देवदेवतांना उपास्य बनवितात, ते त्या विद्रोही शैतानाला उपास्य बनवितात,
- की ज्याला अल्लाहने धिक्कारग्रस्त केले आहे. (ते त्या शैतानाची आज्ञा पाळत आहेत) ज्याने अल्लाहला सांगितले होते, ’’मी तुझ्या दासांकडून एक निश्चित वाटा घेऊनच राहीन,
- मी त्यांना बहकवीन, मोहपाशात अडकवीन व मी त्यांना आदेश देईन व ते माझ्या आज्ञेने जनावरांचे कान चिरतील. व मी त्यांना आज्ञा करीन व ते माझ्या आज्ञेने अल्लाहच्या रचनेत फेरबदल करतील.’’ त्या शैतानाला ज्याने अल्लाहऐवजी आपला वाली व पालक बनविला तो उघडपणे तोट्यात आला.
- तो या लोकांना अभिवचन देतो आणि यांना आशा दाखवितो, परंतु शैतानाची सर्व अभिवचने फसवणुकीशिवाय दुसरे काहीच नाही.
- या लोकांचे ठिकाण नरक आहे ज्यातून सुटकेचा कोणताही मार्ग यांना सापडणार नाही.
- उरले ते लोक ज्यांनी श्रद्धा ठेवली व सत्कृत्ये केली तर त्यांना आम्ही अशा उद्यानात दाखल करू ज्यांच्या खालून कालवे वहात असतील आणि ते तेथे सदासर्वदा राहतील. हे अल्लाहचे सत्यवचन आहे, आणि अल्लाहपेक्षा आपल्या वचनात अन्य कोण सच्चा असू शकतो?
- कर्मफळ तर तुमच्या इच्छेवरही अवलंबून नाही व ग्रंथधारकांच्या इच्छेवरदेखील नाही, जो कोणी दुष्कर्म करील त्याचे तो फळ भोगील आणि अल्लाहच्याविरूद्ध त्याला कोणी समर्थक व सहायक लाभणार नाही
- आणि जो कोणी सत्कृत्य करील मग तो पुरुष असो अथवा स्त्री जर तो श्रद्धावंत असेल तर असेच लोक स्वर्गामध्ये दाखल होतील आणि त्यांचा हक्क यत्किंचित देखील हिरावून घेतला जाणार नाही.
- त्या माणसापेक्षा अन्य कोणाची जीवनपद्धती उत्तम असू शकते ज्याने अल्लाह समोर मान तुकविली आणि आपली वर्तणूक चांगली राखली आणि एकाग्र होऊन इब्राहीम (अ.) च्या पद्धतीचे अनुकरण केले, त्या इब्राहीम (अ.) च्या पद्धतीचे ज्याला अल्लाहने आपला मित्र बनविला होता.
- आकाशात व पृथ्वीत जे काही आहे ते अल्लाहचे आहे आणि प्रत्येक वस्तू अल्लाहने व्यापिली आहे.
- लोक तुमच्याकडे स्त्रियांसंबंधी आदेश विचारतात सांगा, अल्लाह तुम्हाला त्यांच्यासंबंधी आदेश देतो आणि त्याचबरोबर त्या आदेशांची आठवण करून देतो जे पूर्वीपासून तुम्हाला या ग्रंथात ऐकविले जात आहेत, अर्थात ते आदेश जे त्या अनाथ मुलींच्या संबंधी आहेत ज्यांचे हक्क तुम्ही अदा करत नाही आणि ज्यांचेबरोबर विवाह करण्यापासून दूर राहता (अथवा लालसेपोटी तुम्ही स्वतः त्यांच्याशी विवाह करू इच्छिता), आणि ते आदेश जे त्या मुलांविषयी आहेत जे बिचारे काहीच बळ राखत नाहीत, अल्लाह तुम्हाला आदेश देतो की अनाथासाठी न्यायावर दृढ रहा आणि जे काही चांगले तुम्ही कराल ते अल्लाहच्या माहितीपासून गुप्त राहणार नाही.
- जर एखाद्या स्त्रीला आपल्या पतीकडून वाईट वागणूक अथवा उपेक्षेचे भय असेल तर यामध्ये काहीही हरकत नाही की पतीपत्नी (काही हक्काच्या कमी अधिक प्रमाणावर) परस्पर तडजोड करतील. तडजोड अधिक चांगली आहे. मने संकुचितपणाकडे शीघ्रतेने वळतात परंतु जर तुम्ही उपकारी वृत्तीने आणि अल्लाहचे भय बाळगून वागाल तर खात्री बाळगा की अल्लाह तुमच्या या कार्यपद्धतीपासून अनभिज्ञ राहणार नाही.
- पत्नींच्या दरम्यान पुरेपूर न्याय राखणे तुम्हाला शक्य नाही. तुम्ही इच्छिले तरी त्याला तुम्ही समर्थ ठरू शकत नाही. (म्हणून अल्लाहच्या आदेशाचा हेतू साध्य करण्यासाठी हे पुरेसे आहे की) एका पत्नीकडे इतके झुकू नका की दुसरी अधांतरी राहील. जर तुम्ही आपली वागणूक नीटनेटकी ठेवलीत आणि अल्लाहचे भय बाळगत राहिला तर अल्लाह क्षमाशील आणि कृपा करणारा आहे.
- परंतु पति-पत्नींनी एकदुसर्यापासून फारकत घेतलीच तर अल्लाह आपल्या विशाल सामर्थ्याने प्रत्येकाला दुसर्यावर अवलंबून राहण्यापासून मुक्त करील. अल्लाहचे औदार्य अतिविशाल आहे व तो बुद्धिमान व द्रष्टा आहे.
- आकाशात आणि पृथ्वीत जे काही आहे सर्व अल्लाहचेच आहे. तुमच्यापूर्वी ज्यांना ग्रंथ दिला होता त्यांना देखील हाच आदेश दिला होता आणि आता तुम्हाला देखील हाच आदेश देत आहोत की अल्लाहचे भय बाळगून काम करीत रहा परंतु जर तुम्ही मानत नसाल तर मानू नका, आकाश आणि पृथ्वीतील सर्व वस्तूंचा मालक अल्लाहच आहे व तो निरपेक्ष आहे, सर्वस्तुतीला पात्र.
- होय अल्लाहच मालक आहे त्या सर्व वस्तूंचा ज्या आकाशात आणि पृथ्वीत आहेत आणि कार्यसिद्धीकरिता केवळ तोच पुरेसा आहे.
- लोकहो! जर अल्लाहने इच्छिले तर तो तुम्हाला बाजूस सारून तुमच्या जागी इतरांना आणील, आणि यावर त्याचे सर्वस्वी प्रभुत्व आहे.
- जो कोणी केवळ ऐहिक लाभाचा इच्छुक आहे त्याला माहीत असावे की अल्लाहजवळ ऐहिक लाभदेखील आहे आणि परलोकचा लाभसुद्धा. आणि अल्लाह सर्वकाही ऐकणारा व सर्वकाही पाहणारा आहे.
- हे श्रद्धावंतांनो! न्यायावर दृढ राहा आणि अल्लाहसाठी साक्षीदार बना, यद्यपि तुमच्या न्यायाचा व तुमच्या साक्षीचा आघात तुम्हा स्वतःवर अथवा तुमच्या आईबापावर व नातेवाईकांवर जरी होत असेल तरी देखील! मामल्यातील पक्षकार मग तो श्रीमंत असो अथवा गरीब, अल्लाह तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितचितक आहे. म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका आणि जर तुम्ही पक्षपाताची गोष्ट बोललाच अथवा सत्याला बगल दिली तर समजून असा की जे काही तुम्ही करता अल्लाहला त्याची माहिती आहे.
- हे श्रद्धावंतांनो! श्रद्धा ठेवा अल्लाहवर त्याच्या पैगंबरावर आणि त्या ग्रंथावर जो अल्लाहने आपल्या पैगंबरावर उतरविला आहे आणि प्रत्येक त्या ग्रंथावर जो यापूर्वी त्याने उतरविला आहे. ज्याने अल्लाह आणि त्याचे दूत व त्याचे ग्रंथ आणि त्याचे प्रेषित आणि अंतिम निवाड्याच्या दिवसावर श्रद्धा ठेवली नाही (कुफ़्र), तो मार्गभ्रष्टतेत भरकटून फार दूर निघाला.
- ज्यांनी श्रद्धा ठेवली, मग द्रोह केला, पुन्हा श्रद्धा ठेवली, पुन्हा द्रोह केला मग आपल्या अश्रद्धेमध्येच वाढत गेले तर अल्लाह त्यांना कदापि क्षमा करणार नाही आणि त्याना कधी सरळ मार्गही दाखवणार नाही.
- आणि जे दांभिक श्रद्धावंतांना सोडून अश्रद्धावंतांना आपला मित्र बनवितात, त्यांना हा इशारा द्या की त्यांच्याकरिता दुःखदायक शिक्षा तयार आहे.
- काय हे लोक मानसन्मानाच्या इच्छेपायी त्यांच्याजवळ जातात? खरे पाहता मानसन्मान तर सर्वस्वी अल्लाहकरिताच आहे.
- अल्लाहने या ग्रंथात पूर्वीच तुम्हाला आदेश दिला आहे की जेथे तुम्ही ऐकाल की अल्लाहच्या वचनांविरूद्ध द्रोह केला जात आहे आणि त्यांची थट्टा केली जात आहे तेथे बसू नका, जोपर्यंत ते लोक एखाद्या दुसर्या गोष्टीत लागत नाहीत. आता जर तुम्ही असे करीत आहात तर तुम्ही देखील त्या लोकांसारखे आहात. खात्री बाळगा की अल्लाह दांभिकांना व अश्रद्धावंतांना नरकामध्ये एकत्र जमा करणारा आहे.
- हे दांभिक तुमच्या संबंधात प्रतीक्षा करीत आहेत. जर अल्लाहकडून विजय तुमचा झाला तर हे येऊन सांगतील की काय आम्ही तुमच्याबरोबर नव्हतो? जर अश्रद्धावंतांचे पारडे जड झाले तर त्यांना सांगतील की आम्ही तुमच्याविरूद्ध लढण्यास समर्थ नव्हतो काय, व तरी देखील आम्ही तुम्हाला मुसलमानांपासून वाचविले? बरे तर अल्लाहच तुमच्या आणि त्यांच्या मामल्याचा निर्णय पुनरुत्थानाच्या दिवशी करील आणि (त्या निर्णयाला) अल्लाहने अश्रद्धावंतांसाठी मुसलमानांवर वर्चस्व प्राप्त करण्याचा कोणताच वाव मुळीच ठेवला नाही.
- हे ढोंगी अल्लाहशी धोकेबाजी करीत आहेत, खरे पाहता तर अल्लाहनेच त्यांना फसवणुकीत टाकले आहे. जेव्हा हे नमाजसाठी उठतात तर आळसावलेले, केवळ लोकांना दर्शविण्यासाठी उठतात आणि अल्लाहचे क्वचितच स्मरण करतात. अश्रद्धा आणि श्रद्धा यांच्यामध्ये दोलायमान आहेत,
- धड या बाजूसही नाहीत व धड त्या बाजूसदेखील नाहीत. ज्याला अल्लाहने पथभ्रष्ट केले आहे त्यांच्याकरिता तुम्हाला कोणताही मार्ग सापडणार नाही.
- हे श्रद्धावंतांनो! श्रद्धावंतांना सोडून अश्रद्धावंतांना आपले मित्र बनवू नका. काय तुम्ही इच्छिता की अल्लाहला स्वतःच्याविरूद्ध उघड पुरावा द्यावा?
- खात्री बाळगा की ढोंगी नरकामध्ये सर्वात खालच्या थरात जातील आणि तुम्हाला त्यांचा सहायक कोणीच आढळणार नाही.
- परंतु यांच्यापैकी जे पश्चात्ताप करतील आणि आपल्या वागणुकीत सुधारणा करतील आणि अल्लाहशी बांधील राहतील आणि आपला धर्म फक्त अल्लाहसाठीच निर्भेळ ठेवतील, असे लोक श्रद्धावंतांसमवेत आहेत. आणि अल्लाह श्रद्धावंतांना अवश्य महान मोबदला प्रदान करील.
- शेवटी अल्लाहला काय पडले आहे की तुम्हाला विनाकारण त्याने शिक्षा द्यावी. जर तुम्ही कृतज्ञ दास बनून राहिलात आणि श्रद्धेच्या मार्गावर चालत राहिलात तर अल्लाह मोठा गुणग्राहक आहे. आणि सर्वांची परिस्थिती जाणणारा आहे.
- अल्लाह हे पसंत करीत नाही की माणसाने अपशब्दाकरिता तोंड उघडावे परंतु या व्यतिरिक्त की एखाद्यावर अत्याचार केला गेला असेल, आणि अल्लाह सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.
- (अत्याचारपीडित अवस्थेत जरी तुम्हाला अपशब्द उच्चारण्याचा हक्क आहे) परंतु जर तुम्ही अंतर्बाह्य चांगुलपणाच दाखवाल अथवा कमीत कमी वाईटाकडे दुर्लक्ष कराल, तर अल्लाह (चा देखील हाच गुण आहे की तो) मोठा क्षमा करणारा आहे यद्यपि तो शिक्षा देण्याचे पूर्ण सामर्थ्य बाळगतो.
- जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी द्रोह करतात आणि इच्छितात की अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांच्या दरम्यान भेदभाव करावा आणि म्हणतात की आम्ही काहींना मान्य करू आणि काहींना मानणार नाही
- व अश्रद्धा व श्रद्धा यांच्या दरम्यानातून एक मार्ग काढण्याचा निश्चय करतात, ते सर्व पक्के अश्रद्धावंत आहेत आणि अशा अश्रद्धावंतांसाठी आम्ही अशी शिक्षा तयार करून ठेवली आहे जी त्यांना अपमानित व तिरस्करणीय करून सोडणारी असेल.
- याविरूद्ध जे लोक अल्लाह आणि त्याच्या सर्व प्रेषितांना मानतील आणि त्यांच्या दरम्यान फरक करणार नाहीत, त्यांना आम्ही अवश्य त्यांचा मोबदला प्रदान करू आणि अल्लाह मोठा क्षमा करणारा व दया करणारा आहे.
- हे पैगंबर (स.)! हे ग्रंथधारक जर आज तुमच्याकडे मागणी करीत आहेत की तुम्ही आकाशातून एखादे लिखित त्यांच्यावर उतरवा तर याहून वरचढ अपराधयुक्त मागण्या यांनी पूर्वी मूसा (अ.) यांच्याजवळ केल्या आहेत. त्याला तर यांनी सांगितले होते की आम्हाला जाहिररीत्या ’ईश्वर’ दाखवा आणि त्यांच्या याच अतिरेकामुळे अकस्मात त्यांच्यावर वीज कोसळली होती. मग त्यांनी वासराला आपला उपास्य बनविला. वस्तुतः यांनी उघड उघड संकेतचिन्हे पाहिली होती, याउपर देखील आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही मूसा (अ.) यांना स्पष्ट फर्मान प्रदान केले,
- आणि या लोकांवर तूर पर्वताला उचलून यांच्याकडून (या फर्मानाच्या पालनाची) प्रतिज्ञा घेतली. आम्ही यांना आदेश दिला की दरवाजातून नतमस्तक होऊन दाखल व्हा. आम्ही यांना सांगितले की ’सब्त’च्या कायद्याचा भंग करू नका आणि यावर यांच्याकडून पक्के वचन घेतले.
- सरतेशेवटी यांच्या प्रतिज्ञाभंग करण्यामुळे आणि या कारणास्तव की यांनी अल्लाहच्या वचनांना खोटे ठरविले आणि अनेक प्रेषितांना नाहक ठार केले आणि इथपर्यंत सांगितले की आमची हृदये आवरणांत सुरक्षित आहेत. वस्तुतः खरे पाहता यांच्या असत्यप्रियतेमुळे अल्लाहने यांची हृदये मोहरबंद केली आहेत. आणि यामुळेच हे फारच कमी श्रद्धा ठेवतात
- मग आपल्या अश्रद्धेमध्ये हे इतके पुढे गेले की मरयमवर भयंकर आळ घेतला.
- आणि खुद्द सांगितले की आम्ही प्रेषित मसीह मरयमपुत्र ईसा (अ.) याला ठार केले आहे. खरे पाहता प्रत्यक्षात यांनी त्याला ठारही केले नाही की क्रुसावरदेखील चढवले नाही, परंतु मामला यांच्याकरिता संदिग्ध बनविण्यात आला. आणि ज्या लोकांनी यासंबंधी मतभेद दर्शविले आहे ते देखील खरे पाहता शंकेत गुरफटले आहेत. यांच्याजवळ या मामल्यासंबंधी काहीच ज्ञान नाही, केवळ अनुमानाचे अनुसरण आहे त्यांनी ’मसीह’ला खचितच ठार केलेले नाही,
- किंबहुना अल्लाहने त्यांना आपल्याकडे उचलून घेतले, अल्लाह जबरदस्त शक्तिशाली आणि बुद्धिमान आहे.
- आणि ग्रंथधारकांपैकी कोणी असा असणार नाही जो त्याच्या मृत्यूपूर्वी त्याच्यावर श्रद्धा ठेवणार नाही आणि पुनरुत्थानाच्या दिवशी तो त्यांच्यावर ग्वाही देईल,
- तात्पर्य असे की यहुदींच्या याच अत्याचारी वर्तणुकीमुळे आणि या कारणास्तव की हे मोठ्या प्रमाणात अल्लाहच्या मार्गापासून रोखतात,
- आणि व्याज घेतात ज्यांची यांना मनाई केली गेली होती, आणि अवैधरीतीने लोकांचे माल खातात, आम्ही यांच्यासाठी त्या बर्याचशा पवित्र वस्तू निषिद्ध ठरविल्या ज्या पूर्वी यांच्यासाठी वैध होत्या आणि यांच्यापैकी जे अश्रद्धावंत आहेत त्यांच्यासाठी आम्ही दुःखदायक प्रकोप तयार ठेवला आहे,
- परंतु यांच्यामध्ये जे लोक परिपक्व ज्ञान राखणारे आहेत आणि श्रद्धावंत आहेत ते सर्व त्या शिकवणीवर श्रद्धा ठेवतात, जी हे नबी (स.)! तुमच्याकडे अवतरली गेली आहे आणि जी तुमच्यापूर्वी अवतरली गेली होती. अशा प्रकारे श्रद्धा ठेवणार्या आणि नमाज व जकातचे नियमित पालन करणार्या आणि अल्लाह आणि मरणोत्तर जीवनाच्या दिवसावर खरी श्रद्धा बाळगणार्या लोकांना आम्ही अवश्य महान मोबदला प्रदान करू.
- हे नबी (स.)! आम्ही तुमच्याकडे त्याचप्रकारे दिव्य प्रकटन (वही) पाठविले आहे, ज्याप्रकारे नूह (अ.) आणि त्यानंतरच्या प्रेषितांकडे पाठविले होते आम्ही इब्राहीम (अ.), इस्माईल (अ.), इसहाक(अ.), याकूब (अ.) आणि याकूबची सन्तान, ईसा (अ.), अय्यूब, यूनुस, हारून आणि सुलेमान (अ.) कडे दिव्य प्रकटन पाठविले. आम्ही दाऊद (अ.) यांना जबूर दिला.
- आम्ही त्या प्रेषितांवर देखील दिव्य प्रकटन अवतरित केले ज्यांचा उल्लेख आम्ही यापूर्वी केला आहे आणि त्या प्रेषितांवर देखील ज्यांचा उल्लेख तुमच्याजवळ केला नाही. आम्ही मूसा (अ.)शी अशाप्रकारे बातचीत केली ज्या रीतीने बातचीत केली जाते.
- हे सर्व प्रेषित शुभवार्ता देणारे व भय दाखवणारे म्हणून पाठविले होते की त्यांना पाठविल्यानंतर लोकांजवळ अल्लाहच्याविरूद्ध कोणतेही प्रमाण राहू नये. आणि अल्लाह सर्व परिस्थितीत वर्चस्व बाळगणारा व बुद्धिमान व विवेकशील आहे.
- (लोक मानत नाहीत तर न मानोत) परंतु अल्लाह ग्वाही देतो की हे नबी (स.)! जे काही त्याने तुमच्यावर अवतरले आहे आपल्या ज्ञानाने अवतरले आहे, यावर ईशदूत देखील साक्षी आहेत यद्यपि अल्लाह साक्षी असणे सर्वथा पुरेसे आहे.
- जे लोक त्याला मानण्यास स्वतः नकार देतात व इतरांना अल्लाहच्या मार्गापासून रोखतात, निःसंशय ते पथभ्रष्टतेत सत्यापासून फारच दूर गेले आहेत.
- अशा प्रकारे ज्या लोकांनी अश्रद्धा व विद्रोहाची पद्धत अवलंबिली आणि जुलूम व अत्याचारास प्रवृत्त झाले, अल्लाह त्यांना मुळीच क्षमा करणार नाही आणि त्यांना कोणताच मार्ग दाखविणार नाही,
- नरकाच्या मार्गाशिवाय ज्यामध्ये ते सदैव राहतील अल्लाहसाठी हे काही अवघड कार्य नाही.
- लोकहो! हा पैगंबर तुमच्याजवळ तुमच्या पालन-कर्त्याकडून सत्य घेऊन आला आहे. श्रद्धा ठेवा, तुमच्यासाठीच उत्तम आहे, आणि नकार देत असाल तर लक्षात ठेवा आकाशात व पृथ्वीत जे काही आहे ते सर्व अल्लाहचे आहे आणि अल्लाह सर्वज्ञ देखील आहे व बुद्धिमानसुद्धा.
- हे ग्रंथधारकांनो, आपल्या धर्मात अतिरेक करू नका. आणि अल्लाहशी सत्याखेरीज इतर कोणतीही गोष्ट जोडू नका. मसीह, मरयमपुत्र ईसा याव्यतिरिक्त इतर काहीच नव्हता की तो अल्लाहचा एक प्रेषित होता. आणि एक आदेश होता की जो अल्लाहने मरयमकडे पाठविला. आणि एक आत्मा होता अल्लाहकडून (ज्याने मरयमच्या गर्भात मुलाचे रूप धारण केले) म्हणून तुम्ही अल्लाह व त्याच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवा आणि असे म्हणू नका की, ’’तीन’’ आहेत. परावृत्त व्हा. हे तुमच्याच हिताचे आहे. अल्लाह तर फक्त एकच आहे. तो पवित्र आहे यापासून की त्याचा कोणी पुत्र असावा. पृथ्वी व आकाशांतील सार्या वस्तू त्याच्या मालकीच्या आहेत, आणि त्यांच्या पालनासाठी व देखरेखीसाठी केवळ तोच पुरेसा आहे.
- मसीह आणि निकटवर्ती ईशदूतांना तो (मसीह) दास असल्याबद्दल मुळीच संकोच वाटला नाही. जो कोणी (अल्लाहच्या) दास्यत्वास संकोच करण्यायोग्य गर्व करेल तर अल्लाह सर्वांना आपल्या समोर हजर करण्याची वेळ लवकरच आणील
- तेव्हा ज्या लोकांनी श्रद्धा ठेवून सदाचरण अंगिकारले आहे ते आपला मोबदला पुरेपूर प्राप्त करतील आणि अल्लाह आपल्या कृपेने त्यांना जादा मोबदला प्रदान करील, आणि ज्या लोकांनी भक्तीला लांच्छनास्पद मानले व गर्व बाळगला, त्यांना अल्लाह यातनादायक शिक्षा देईल आणि अल्लाहव्यतिरिक्त ज्याच्या ज्याच्या पालकत्वावर व मदतीवर ते विश्वास ठेवतात त्यांच्यापैकी कोणीच त्यांना तेथे आढळणार नाही.
- लोकहो, तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्याजवळ उज्ज्वल प्रमाण आले आहे आणि आम्ही तुमच्याकडे असा प्रकाश पाठविला आहे जो तुम्हाला स्पष्ट मार्गदर्शन करणारा आहे.
- मग जे लोक अल्लाहची गोष्ट मान्य करतील व त्याचा आश्रय शोधतील, त्यांना अल्लाह आपल्या दया व कृपेच्या छत्राखाली घेईल आणि आपल्याकडे येण्याचा सरळमार्ग त्यांना दाखवील.
- हे नबी (स.), लोक तुम्हाला कलालासंबंधी आदेश विचारतात, सांगा, अल्लाह तुम्हाला आदेश देतो, जर एखादा मनुष्य निःसंतान मेला असेल आणि त्याची एक बहीण असेल तर तिला त्याच्या ठेवलेल्या मालमत्ते (वारसा) तून निम्मा हिस्सा मिळेल, आणि जर बहीण निःसंतान वारली असेल तर भाऊ तिचा वारस ठरेल. जर मृताचे वारस दोन बहिणी असतील तर त्या ठेवलेल्या मालमत्तेतून दोन तृतीयांशच्या हक्कदार ठरतील, आणि जर अनेक भाऊ-बहिणी असतील तर स्त्रियांचा एकेरी व पुरुषांचा दुप्पट वाटा असेल. अल्लाह तुमच्यासाठी आदेशांचे स्पष्टीकरण करीत आहे, जेणेकरून तुम्ही भटकत फिरू नये आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचे ज्ञान बाळगतो.