Surah Al Maidah With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

5.अल् माईदा - ٱلْمَائِدَة


अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
  1. हे श्रद्धावंतांनो! निषिद्धाचे पुरेपूर पालन करा. तुमच्याकरिता चतुष्पाद वर्गातील सर्व जनावरे वैध केली गेली आहेत त्यांच्या व्यतिरिक्त ज्यांच्याबद्दल पुढे तुम्हाला सांगण्यात येईल. परंतु एहराम (हजकरिता परिधान केलेली वस्त्रे) च्या अवस्थेत शिकारीला आपल्याकरिता वैध ठरवू नका. निःसंशय अल्लाह जे इच्छितो ती आज्ञा देतो.
  2. हे श्रद्धावंतांनो, ईश्वरी विधींची विटंबना करू नका. निषिद्ध महिन्यांपैकी एखाद्याला वैध करू नका, कुर्बानीच्या जनावरांवर हात टाकू नका. त्या जनावरांवर हात टाकू नका ज्यांच्या गळ्यात ईश्वरार्पणाच्या खुणा म्हणून पट्टे घातले आहेत, त्या लोकांना छळू नका जे आपल्या पालनकर्त्याची कृपा आणि त्याच्या प्रसन्नतेच्या शोधात पवित्र गृहा (काबा) कडे जात असतील. मग जेव्हा एहरामची स्थिती संपेल तेव्हा तुम्ही शिकार करू शकता - आणि पहा एका गटाने तुमच्यासाठी मस्जिदेहराम (काबा मस्जिद) चा मार्ग रोखला आहे तर या गोष्टीवर तुमच्या रागाने तुम्हाला इतके भडकवू नये की तुम्ही देखील त्याच्या विरोधात अत्याचार कराल. नाही, जे कार्य पुण्याईचे व ईशपरायणतेचे आहे, त्यामध्ये सर्वांशी सहकार्य करा आणि जी पाप व अत्याचाराची कामे आहेत, त्यामध्ये कोणाशीही सहकार्य करू नका. अल्लाहचे भय बाळगा, त्याची शिक्षा फार कठोर आहे.
  3. तुम्हाकरिता निषिद्ध करण्यात आले आहेत मेलेले प्राणी, रक्त, डुकराचे मांस, ते जनावर जे अल्लाहशिवाय इतर कोणाच्या नावाने बळी दिले असेल. ते जे गुदमरून अथवा मार लागून अथवा उंचस्थानावरून पडून अथवा टक्कर लागून मेले असेल अथवा ज्याला एखाद्या हिंस्र प्राण्याने फाडले असेल त्याव्यतिरिक्त ज्याला जिवंत अवस्थेत असताना तुम्ही कापले असेल अथवा ते जे देवीवर बळी दिले असेल. तसेच हे देखील तुमच्यासाठी निषिद्ध आहे की, फासे टाकून आपले भविष्य पाहावे. या सर्व कृती आज्ञा भंग करणार्‍या आहेत. आज अश्रद्धावंतांना तुमच्या धर्माकडून पूर्ण निराशा झाली आहे म्हणून तुम्ही त्यांना भिऊ नका तर माझ्या कोपाचे भय बाळगा. आज रोजी मी तुमचा धर्म तुमच्याकरिता परिपूर्ण केला आहे आणि आपली कृपा तुम्हावर परिपूर्ण केली आहे. आणि तुमच्यासाठी इस्लाम तुमचा धर्म म्हणून संमत केला आहे. (म्हणून वैध आणि अवैधतेची जी बंधने तुमच्यावर घातली गेली आहेत त्यांचे पालन करा.) परंतु जर एखाद्याने भुकेने विवश होऊन यापैकी एखादी वस्तू खाल्ली अन्यथा गुन्ह्याकडे त्याचा कल झाला असता तर निःसंशय अल्लाह क्षमा करणारा व कृपा करणारा आहे.
  4. लोक विचारतात की त्यांच्याकरिता काय वैध केले गेले आहे, त्यांना सांगा, तुमच्याकरिता सर्व पवित्र वस्तू वैध केल्या गेल्या आहेत. आणि ज्या शिकारी जनावरांना तुम्ही प्रशिक्षित केले असेल - ज्यांना अल्लाहने प्रदान केलेल्या ज्ञानाच्या आधारावर तुम्ही शिकार करण्याचे प्रशिक्षण देत असता - ते ज्या जनावराला तुमच्यासाठी धरून ठेवतील त्यालाही तुम्ही खाऊ शकता. तथापि त्यावर अल्लाहचे नाव उच्चारा आणि अल्लाहचा कायदा भंग करण्यापासून त्याची भीती बाळगा. अल्लाहस हिशेब घेताना वेळ लागत नाही.
  5. आज तुमच्यासाठी सर्व पवित्र वस्तू वैध करण्यात आल्या आहेत. ग्रंथधारकांचे भोजन तुमच्यासाठी वैध आणि तुमचे जेवण त्यांच्याकरिता वैध आहे चारित्र्यवान व स्वतंत्र स्त्रिया मग त्या श्रद्धावंतांच्या जमातीतील असोत अथवा त्या लोकसमूहातील ज्यांना तुमच्यापूर्वी ग्रंथ दिला गेला होता, परंतु अट अशी की तुम्ही त्यांचे महर अदा करूनच विवाह बंधनात त्यांचे रक्षक बनावे. असे होऊ नये की, तुम्ही त्यांच्याशी स्वैर कामतृप्तीत लागावे किंवा लपून छपून अनैतिक संबंध ठेवावेत आणि एखाद्याने श्रद्धेच्या मार्गावर चालण्याचे नाकारले तर त्याचे संपूर्ण जीवनकार्य वाया जाईल व तो मरणोत्तर जीवनामध्ये दिवाळखोर बनेल.
  6. हे श्रद्धावंतांनो, जेव्हा तुम्ही नमाजसाठी उठाल तेव्हा हे आवश्यक आहे की तुम्ही आपले तोंड व हात कोपरापर्यंत धुवावे, डोक्यावर हात फिरवावे व पाय घोट्यापर्यंत धूत जावे. जर जनाबत (अपवित्रते) च्या स्थितीत असाल तर स्नान करून शुचिर्भूत व्हा. जर आजारी असाल किंवा प्रवासात असाल अथवा तुमच्यापैकी एखादा शौचास जाऊन आला असेल अथवा स्त्री-स्पर्श केला असेल, जर पाणी उपलब्ध नसेल तर स्वच्छ मातीचा उपयोग करा, त्या मातीवर फक्त हात मारून आपल्या चेहर्‍यावर व हातांवर फिरवा. अल्लाह तुमचे जीवन अडचणीचे करू इच्छित नाही तर तो इच्छितो की तुम्हाला शुचिर्भूत करावे व आपली देणगी तुम्हावर पूर्ण करावी, जेणेकरून तुम्ही कृतज्ञ बनाल.
  7. अल्लाहने जी देणगी तुम्हाला प्रदान केली आहे, त्याची आठवण ठेवा आणि त्या दृढवचनाला विसरू नका जे त्याने तुमच्याकडून घेतले आहे, म्हणजे तुमचे हे कथन की ’’आम्ही ऐकिले व आज्ञाधारकता स्वीकारली.’’ अल्लाहचे भय बाळगा, अल्लाह मनांतील रहस्य देखील जाणतो.
  8. हे श्रद्धावंतांनो, अल्लाहसाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा, हे ईशपरायणतेशी अधिक निकटवर्ती आहे. अल्लाहचे भय बाळगून कार्य करीत राहा. जे काही तुम्ही करता, अल्लाह त्याची पुरेपूर खबर ठेवणारा आहे.
  9. जे लोक श्रद्धा ठेवतील व सत्कृत्य करतील, अल्लाहने त्यांना वचन दिले आहे की त्यांच्या चुका माफ केल्या जातील व त्यांना मोठा मोबदला मिळेल.
  10. उरले ते लोक जे द्रोह करतील व अल्लाहची संकेतवचने खोटी ठरवतील, तर ते नरकात जाणारे आहेत.
  11. हे श्रद्धावंतांनो, अल्लाहच्या त्या उपकाराचे स्मरण करा जो त्याने (आता नुकतेच) तुम्हावर केला आहे, जेव्हा एका गटाने तुमच्यावर हात टाकण्याचा निश्चय केलेला होता परंतु अल्लाहने त्यांचे हात तुमच्यावर उठण्यापासून रोखले. अल्लाहच्या कोपाचे भय बाळगून कार्य करीत राहा, श्रद्धावंतांनी अल्लाहवरच भंरवसा ठेवला पाहिजे.
  12. अल्लाहने बनीइस्राईलकडून पक्के करार करून घेतले होते आणि त्यांच्यात बारा निरीक्षक नियुक्त केले होते व त्यांना सांगितले होते की, ’’मी तुमच्याबरोबर आहे. जर तुम्ही नमाज प्रस्थापित केली आणि जकात अदा केली व माझ्या प्रेषितांना मानले आणि त्यांना मदत केली व ईश्वराला उत्तम कर्ज देत राहिला तर खात्री बाळगा की मी तुमच्यातील वाईट गोष्टी नाहीशा करीन आणि तुम्हाला अशा उद्यानांत दाखल करीन ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील, परंतु त्यानंतर तुमच्यापैकी ज्याने अश्रद्धेचे वर्तन अंगिकारले तर त्याने वास्तविक पाहता सन्मार्ग हरवून टाकला.’’
  13. मग त्यांचे हे करारभंग करणेच होते की ज्यामुळे आम्ही त्यांना आपल्या कृपेपासून दूर ढकलले आणि त्यांची मने कठोर बनविली. आता त्यांची दशा अशी आहे की शब्दात फेरफार करून गोष्ट कोठल्या कोठे नेतात. जी शिकवण त्यांना दिली गेली होती त्याचा मोठा भाग ते विसरले आहेत आणि तुम्हाला नेहमीच त्यांच्या कोणत्या न कोणत्या अपहाराची माहिती मिळत असते. त्यांच्यापैकी फारच थोडे या दोषापासून वाचले आहेत. (मग जेव्हा हे या स्थितीप्रत पोहोचले आहेत तर ते जो काही खोडसाळपणा करतील तो यांच्याकडून अपेक्षितच आहे.) म्हणून यांना क्षमा करा आणि त्यांच्या कृत्याकडे दुर्लक्ष करीत राहा. अल्लाह त्या लोकांना पसंत करतो जे उत्तम वर्तन राखतात.
  14. याचप्रमाणे आम्ही त्या लोकांकडून पक्के वचन घेतले होते ज्यांनी सांगितले होते की आम्ही नसारा (ख्रिश्चन) आहोत परंतु त्यांना देखील जो पाठ दिला गेला होता, त्यांचा फार मोठा भाग ते विसरलेत. सरतेशेवटी आम्ही त्यांच्या दरम्यान पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत शत्रुत्व आणि परस्पर द्वेष व द्रोहाचे बीज पेरले. आणि अवश्य एक वेळ अशी येईल ज्या वेळेस अल्लाह त्यांना दाखवील की ते जगात काय करीत होते.
  15. हे ग्रंथधारकांनो! आमचा पैगंबर तुमच्यापाशी आला आहे जो दैवी ग्रंथातील पुष्कळशा त्या गोष्टी तुमच्यासमोर स्पष्ट करीत आहे ज्यावर तुम्ही पडदा टाकीत आहात आणि तुमच्या कित्येक गोष्टी माफही करतो. तुमच्यापाशी अल्लाहकडून प्रकाश आणि एक असा सत्यदर्शी ग्रंथ आला आहे,
  16. ज्याच्याद्वारे सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या लोकांना जे त्याच्या प्रसन्नतेचे इच्छुक आहेत, शांती व सुरक्षिततेच्या पद्धती दाखवितो आणि आपल्या आदेशाने त्यांना अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे आणतो आणि सरळ मार्गाकडे त्यांचे मार्गदर्शन करतो.
  17. निःसंशय अश्रद्धा त्या लोकांनी केली ज्यांनी सांगितले की मरयमपुत्र मसीह हाच ईश्वर आहे. हे नबी (स.) त्यांना सांगा की जर अल्लाहने मरयमपुत्र मसीह आणि त्याची आई तसेच पृथ्वीवरील सर्वांना नष्ट करू इच्छिले तर कोण त्याला या इराद्यापासून रोखू शकेल? अल्लाह तर पृथ्वी आणि आकाशांचा आणि त्या सर्व वस्तूंचा स्वामी आहे ज्या पृथ्वी आणि आकाशांमध्ये आढळतात तो जे काही इच्छितो सृजन करतो व त्याचे प्रभुत्व प्रत्येक वस्तूवर आहे.
  18. यहुदी आणि ख्रिस्ती सांगतात की आम्ही अल्लाहचे पुत्र व त्याचे लाडके आहोत. त्यांना विचारा, मग तो तुमच्या अपराधांकरिता तुम्हाला शिक्षा का देतो? खरे पाहता तुम्ही देखील तशीच माणसे आहात जशी इतर माणसे अल्लाहने निर्माण केली आहेत. तो ज्याला इच्छितो माफ करतो आणि ज्याला इच्छितो शिक्षा देतो. पृथ्वी, आकाश आणि त्यात अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्या मालकीच्या आहेत आणि त्याच्याकडे सर्वांना परतावयाचे आहे.
  19. हे ग्रंथधारकांनो! आमचा हा पैगंबर अशा वेळी तुमच्यापाशी आला आहे आणि धर्माची अशी सुस्पष्ट शिकवण तुम्हाला देत आहे - जेव्हा प्रेषितांच्या आगमनाचा क्रम एका दीर्घ काळापासून बंद होता - ते अशाकरिता की तुम्ही असे सांगू नये की आमच्यापाशी कोणी शुभवार्ता देणारा आणि भय दाखविणारा आला नाही, तर पाहा, आता तो शुभवार्ता देणारा व भय दाखविणारा आला आहे - आणि अल्लाह प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व-संपन्न आहे.
  20. आठवा, तो प्रसंग जेव्हा मूसा (अ.) यांनी आपल्या लोकांना सांगितले होते की, ’’हे माझ्या बांधवांनो! अल्लाहची ती देणगी ध्यानात घ्या जी त्याने तुम्हाला प्रदान केली होती. त्याने तुमच्यात नबी (प्रेषित) निर्माण केले. तुम्हाला सत्ताधारी बनविले आणि तुम्हाला ते सर्वकाही दिले जे या जगात कोणालाच दिले नव्हते.
  21. हे माझ्या बांधवांनो! या पवित्रभूमीत दाखल व्हा जी अल्लाहने तुमच्याकरिता विधिपूर्वक बहाल केली आहे. मागे फिरू नका नाहीतर अयशस्वी व निराश परताल.’’
  22. त्यांनी उत्तर दिले, ’’हे मूसा! तेथे तर मोठे शक्तीशाली लोक राहतात. आम्ही तेथे कदापि जाणार नाही जोपर्यंत ते तेथून निघून जात नाहीत. परंतु होय, जर ते निघून गेले तर आम्ही दाखल होण्यास तयार आहोत.’’
  23. त्या भिणार्‍यांपैकी दोन माणसे अशी देखील होती ज्यांना अल्लाहने आपल्या कृपेने उपकृत केले होते. त्यांनी सांगितले की, ’’या शक्तीशाली लोकांच्या मुकाबल्यासाठी दरवाजात प्रवेश करा, जेव्हा तुम्ही आत दाखल व्हाल तेव्हा तुम्हासच वर्चस्व प्राप्त होईल, अल्लाहवर भरवसा ठेवा जर तुम्ही श्रद्धावंत असाल.’’
  24. परंतु त्यांनी पुन्हा तेच सांगितले की, ’’हे मूसा! आम्ही तर तेथे कदापि जाणार नाही जोपर्यंत ते तेथे आहेत. तुम्ही आणि तुमचा पालनकर्ता दोघे जा आणि लढा. आम्ही येथेच बसलो आहोत.’’
  25. यावर मूसा (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या पालनकर्त्या! माझ्या अखत्यारीत कोणी नाही परंतु एक तर मी स्वतः अथवा माझा भाऊ, तर तू आम्हाला या अवज्ञा करणार्‍या लोकांपासून वेगळे करून सोड.’’
  26. अल्लाहने उत्तर दिले, ’’बरे तर, तो प्रदेश चाळीस वर्षांपर्यंत यांच्याकरिता निषिद्ध आहे. हे भूतलावर वणवण भटकत राहतील, या अवज्ञाकारींच्या स्थितीवर मुळीच दया दाखवू नका.’’
  27. आणि जरा यांना आदम (अ.) च्या दोन मुलांची गोष्टदेखील पूर्णपणे ऐकवा, जेव्हा त्या दोघांनी कुर्बानी दिली तेव्हा त्यांच्यापैकी एकाची कुर्बानी स्वीकारली गेली आणि दुसर्‍याची स्वीकारली गेली नाही. त्याने सांगितले, ’’मी तुला ठार मारीन.’’ त्याने उत्तर दिले, ’’अल्लाह तर पापभीरू लोकांच्याच भेटी स्वीकारतो.
  28. जरी तू मला ठार मारण्यासाठी हात उचलशील तरी मी तुला मारण्याकरिता हात उचलणार नाही. मी सर्व विश्वांचा स्वामी अल्लाहच्या प्रकोपाला भितो.
  29. मी इच्छितो की माझा आणि तुझा गुन्हा तूच संचित करशील आणि नरकवासी बनून राहशील. अत्याचारीच्या अत्याचाराला हाच खरा योग्य मोबदला आहे.’’
  30. सरतेशेवटी त्याच्या मोहाने आपल्या भावाची हत्या करणे त्यासाठी सोपे केले आणि तो त्याला ठार मारून त्या लोकांत सामील झाला जे नुकसान सोसणारे आहेत.
  31. मग अल्लाहने एक कावळा पाठविला जो जमीन खणू लागला जेणेकरून त्याला दाखवावे की आपल्या भावाचे प्रेत कसे लपवावे. हे पाहून तो उद्गारला, ’’खेद आहे मजवर! मी या कावळ्यासारखासुद्धा बनू शकलो नाही की आपल्या भावाचे प्रेत लपविण्याची युक्ती काढली असती.’’ यानंतर त्याने आपल्या कृत्यावर फार पश्चात्ताप केला.
  32. याच कारणास्तव बनीइस्राईलकरिता आम्ही हे फर्मान लिहिले होते की, ’’ज्याने एखाद्या माणसाला खुनाबद्दल अथवा पृथ्वीतलावर उपद्रव पसरविण्याव्यतिरिक्त अन्य कारणाने ठार केले तर त्याने जणू काही सर्व मानवांना ठार केले. आणि ज्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले.’’ परंतु त्यांची अवस्था अशी आहे की आमचे प्रेषित वरचेवर त्यांच्यापाशी उघड उघड आदेश घेऊन आले तरीसुद्धा त्यांच्यात मोठ्या संख्येने पृथ्वीवर अतिरेक करणारे लोक आहेत.
  33. जे लोक अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांच्याशी युद्ध करतात आणि भूमीवर याकरिता धावपळ करतात की हिंसाचार माजवावा, त्यांची शिक्षा ही आहे की ते ठार मारले जातील अथवा सुळावर चढविले जातील अथवा परस्परविरूद्ध दिशेने त्यांचे हात-पाय कापले जातील, अथवा त्यांना देशांतर करावयास लावले जाईल. हा अपमान व नामुष्की तर त्यांच्यासाठी दुनियेत आहे आणि मरणोत्तर जीवनामध्ये त्यांच्याकरिता याहून मोठी शिक्षा आहे.
  34. परंतु जे लोक पश्चात्ताप करतील यापूर्वी की तुम्ही त्यांच्यावर प्रभुत्व प्रस्थापित करावे - तुम्हाला माहीत असावयास हवे की अल्लाह माफ करणारा व दया करणारा आहे.
  35. हे श्रद्धावंतांनो! अल्लाहच्या कोपाचे भय बाळगा आणि त्याच्या ठायी त्याची प्रसन्नता मिळविण्याचे साधन शोधा. आणि त्याच्या मार्गात संघर्ष करा कदाचित तुम्हाला यश प्राप्त होईल
  36. चांगले समजून असा की ज्या लोकांनी अश्रद्धेचे वर्तन अंगिकारले आहे जर त्यांच्या ताब्यात पृथ्वीवरील सर्व संपत्ती असली आणि तितकीच पुनश्च, आणि ते इच्छा करतील की ती मोबदल्यात देऊन पुनरुत्थानाच्या दिवसाच्या यातनेपासून सुटका व्हावी तरी ती त्यांच्याकडून स्वीकारली जाणार नाही आणि त्यांना दुःखदायक शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.
  37. ते इच्छा करतील की नरकाच्या अग्नीमधून पळून जावे परंतु बाहेर निघू शकणार नाहीत आणि त्यांना चिरंतन शिक्षा दिली जाईल.
  38. आणि चोर मग तो पुरुष असो अथवा स्त्री दोघांचे हात कापून टाका, हा त्यांच्या कर्माचा बदला आहे आणि अल्लाहकडून अद्दल घडविणारी शिक्षा! अल्लाहचे सामर्थ्य सर्वांवर प्रभावी आहे आणि तो बुद्धिमान व द्रष्टा आहे.
  39. मग जो कोणी अत्याचार केल्यानंतर पश्चात्ताप करील आणि स्वतःला सुधारेल तर अल्लाहची कृपादृष्टी पुनश्च त्याच्याकडे वळेल. अल्लाह अत्यंत क्षमा करणारा व दया करणारा आहे.
  40. तुम्हाला माहीत नाही काय की अल्लाह पृथ्वी व आकाशांच्या साम्राज्याचा स्वामी आहे? ज्याला इच्छिल त्याला शिक्षा करील आणि ज्याला इच्छिल त्याला क्षमा करील आणि तो प्रत्येक गोष्टीचा अधिकार बाळगतो.
  41. हे पैगंबर! ते लोक तुमच्या दुःखाला कारणीभूत ठरू नयेत जे अश्रद्धेच्या मार्गात फार घाई करीत आहेत. मग ते त्यापैकी असोत जे फक्त तोंडाने बोलतात की आम्ही श्रद्धा ठेवली परंतु त्यांची हृदये श्रद्धा ठेवीत नाहीत, अथवा त्यापैकी जे यहुदी आहेत ज्यांची अवस्था अशी आहे की असत्यासाठी कान टवकारून असतात आणि इतर लोकांकरिता जे तुमच्यापाशी कधीच आले नाहीत कानोसा घेत फिरत असतात. अल्लाहच्या ग्रंथाच्या शब्दांना त्यांची खरी जागा ठरलेली असताना देखील मूळ अर्थापासून फिरवतात आणि लोकांना सांगतात की जर तुम्हाला हा आदेश दिला गेला तर मान्य करा नाही तर मानू नका. ज्याला अल्लाहनेच उपद्रवामध्ये टाकण्याचा इरादा केला त्याला अल्लाहच्या पकडीतून वाचविण्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही. हे ते लोक आहेत ज्यांच्या हृदयांना अल्लाहने शुद्ध करणे इच्छिले नाही. यांच्याकरिता जगात नामुष्की आणि परलोकात कठोर शिक्षा आहे.
  42. हे असत्य ऐकणारे व निषिद्ध माल खाणारे आहेत, म्हणून हे जर तुमच्यापाशी आले तर तुम्हाला अधिकार देण्यात येत आहे की तुमची इच्छा असल्यास त्यांचा न्यायनिवाडा करा किंवा नकार द्या. नकार दिला तर हे तुमचे काही बिघडवू शकत नाही आणि निर्णय द्यायचा असेल तर मग न्यायपूर्ण रीतीने द्या, कारण अल्लाह न्यायी लोकांना पसंत करतो.
  43. आणि हे तुम्हाला न्याय-निवाडा देणारा तरी कसे बनवितात जेव्हा यांच्याजवळ तौरात उपलब्ध आहे ज्यात अल्लाहचा आदेश लिहिलेला आहे, आणि हे त्यापासून पराडमुख होत आहेत? वस्तुस्थिती अशी आहे की हे लोक श्रद्धाच बाळगत नाहीत.
  44. आम्ही तौरात हा ग्रंथ अवतरला ज्यात मार्गदर्शन व प्रकाश होता. सर्व नबी (प्रेषित) जे मुस्लिम होते त्याला अनुसरून या यहुदी लोकांच्या सर्व बाबींचा निर्णय देत असत. आणि याचप्रकारे धर्मपंडित आणि धर्मशास्त्री देखील (यावरच आपल्या निर्णयाची मदार राखत असत.) कारण त्यांना अल्लाहच्या ग्रंथाच्या संरक्षणाचे जबाबदार बनविण्यात आले होते व यावर ते साक्षी होते. म्हणून (हे यहूदी लोकहो!) तुम्ही लोकांना भिऊ नका तर माझे भय बाळगा आणि माझी संकेतवचने क्षुल्लक मोबदल्यात विकणे सोडून द्या. जे लोक अल्लाहच्या अवतरित केलेल्या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करीत नसतील तेच द्रोही होत.
  45. तौरातमध्ये आम्ही यहूदी लोकांसाठी हा आदेश लिहिला होता की प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्यासाठी डोळा, नाकासाठी नाक, कानाबद्दल कान, दाताबद्दल दात आणि सर्व जखमांबद्दल बरोबरीचा बदला. मग जो किसास (हत्यादंड) ऐवजी दान (सदका) करील तर तो त्याच्यासाठी पापक्षालन (कफ्फारा) होय. आणि जे लोक अल्लाहद्वारे अवतरित केलेल्या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करत नसतील तेच अत्याचारी होत.
  46. मग आम्ही त्या प्रेषितानंतर मरयमपुत्र ईसाला पाठविले तौरातपैकी जे काही त्याच्यासमोर उपलब्ध होते, तो त्याची सत्यता प्रमाणित करणारा होता. आणि आम्ही त्याला ’इंजील’ (नवा करार) प्रदान केले ज्यात मार्गदर्शन व दिव्य प्रकाश होता आणि तो ग्रंथदेखील तौरातपैकी जे काही त्याकाळी उपलब्ध होते त्यातील सत्य प्रमाणित करणारा होता तसेच त्यात अल्लाहचे भय बाळगणार्‍या लोकांसाठी पुरेपूर मार्गदर्शन व उपदेश होता.
  47. आमची आज्ञा होती की इन्जीलधारकांनी या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करावा जो अल्लाहने त्यात अवतरित केला आहे, व जे लोक अल्लाहने अवतरित केलेल्या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करीत नसतील तेच फासिक (अवज्ञा करणारे) होत.
  48. मग हे पैगंबर (स.), आम्ही तुमच्याकडे हा ग्रंथ पाठविला जो सत्य घेऊन आला आहे आणि अलकिताब (पूर्वकालीन ईश्वरीय ग्रंथ) पैकी जे काही त्याच्यासमोर उपलब्ध आहे त्यातील सत्य प्रमाणित करणारा व त्याचा संरक्षक व त्याची निगा राखणारा आहे, म्हणून तुम्ही अल्लाहने अवतरित केलेल्या कायद्यानुसारच लोकांच्या मामल्यांचा न्यायनिवाडा करा आणि जे सत्य तुमच्यापाशी आले आहे त्यापासून पराडमुख होऊन त्यांच्या इच्छेचे अनुकरण करू नका - आम्ही तुम्हा (मानवा) पैकी प्रत्येकासाठी एकच शरीअत (जीवनाचा कायदा) व एकच कार्यप्रणाली निश्चित केली. जर तुमच्या ईश्वराने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांना एकच लोकसमूह (उम्मत) बनवू शकत होता परंतु त्याने हे यासाठी केले की जे काही त्याने तुम्हा लोकांना दिले आहे त्यात तुमची परीक्षा घ्यावी. म्हणून चांगुलपणात एक दुसर्‍यापेक्षा सरस ठरण्याचा प्रयत्न करा. सरतेशेवटी तुम्हा सर्वांना अल्लाहकडेच परत जावयाचे आहे, मग तो तुम्हाला सत्यःस्थिती दाखवून देईल ज्यामध्ये तुम्ही मतभेद करीत राहिला आहात
  49. तर हे पैगंबर (स.), तुम्ही अल्लाहद्वारे अवतरित केलेल्या कायद्यानुसार या लोकांच्या मामल्यांचा न्यायनिवाडा करा व त्यांच्या इच्छाआकांक्षाचे अनुकरण करू नका. सावध राहा की ह्या लोकांनी तुम्हाला संकटात गुंतवून त्या मार्गदर्शनापासून यत्किंचित देखील पराडमुख करता कामा नये, जे मार्गदर्शन तुमच्याकडे अल्लाहने अवतरित केले आहे, मग जर हे यापासून पराङमुख झाले तर समजा की अल्लाहने यांच्या काही अपराधांची शिक्षा म्हणून यांना संकटात गुंतवून टाकण्याचा इरादाच केला आहे, आणि ही वस्तुस्थिती आहे की या लोकांतील बहुतेक अवज्ञा करणारे आहेत.
  50. (जर हे अल्लाहच्या वायद्यापासून विमुख होत आहेत) तर मग काय हे अज्ञानमूलक निर्णय इच्छितात? वास्तविक पाहता जे लोक अल्लाहवर विश्वास ठेवतात त्यांच्या दृष्टिने अल्लाहपेक्षा उत्तम न्याय देणारा दुसरा कोण असू शकेल?
  51. हे श्रद्धावंतांनो, दांभिक यहूदी व पाखंडी ख्रिस्तींना आपले जीवलग बनवू नका, हे आपापसांतच एक दुसर्‍याचे मित्र आहेत आणि जर तुमच्यापैकी कोणी त्यांना आपला मित्र बनवीत असेल तर त्याची देखील गणना त्यांच्यातच होईल,निःसंशय अल्लाह अत्याचार्‍यांना आपल्या मार्गदर्शनापासून वंचित करतो.
  52. तुम्ही पाहता की त्यांच्या हृदयाला दांभिकतेचा रोग जडला आहे ते त्याच्यातच धावपळ करीत राहतात. सांगतात की, ’’आम्हाला भय वाटते की कदाचित आम्ही संकटाच्या चक्रात सापडू.’’ परंतु दूर नव्हे की अल्लाह जेव्हा तुम्हाला निर्णायक विजय प्रदान करील अथवा आपल्याकडून इतर एखादी गोष्ट प्रकट करील तेव्हा हे लोक आपल्या या दांभिकपणावर जो ते आपल्या हृदयात लपवून आहेत पश्चात्ताप करतील
  53. आणि त्या वेळी श्रद्धावंत सांगतील, ’’काय हे तेच लोक आहेत जे अल्लाहच्या नावावर मोठ्या कठोर शपथा घेऊन खात्री देत होते की आम्ही तुमच्याबरोबर आहोत?’’ त्यांची सर्व कृत्ये वाया गेली आणि सरतेशेवटी ते अपयशी व निराश होऊन राहिले.
  54. हे श्रद्धावंतांनो! जर तुमच्यापैकी कोणी आपल्या धर्मापासून पराङमुख होत असेल (तर खुशाल व्हावे) अल्लाह आणखी कित्येक लोक असे निर्माण करील जे अल्लाहला प्रिय असतील आणि अल्लाह त्यांना प्रिय असेल, जे सत्जनांसाठी मृदू आणि दुर्जनांसाठी कठोर असतील, जे अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि कोणत्याही निर्भर्त्सना करणार्‍यांच्या निर्भर्त्सनेला भिणार नाहीत. ही अल्लाहची कृपा आहे, तो ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो. अल्लाह सर्वव्यापी आहे आणि सर्वकाही जाणतो.
  55. तुमचे मित्र तर खरे पाहता केवळ अल्लाह आणि अल्लाहचा पैगंबर आणि ते श्रद्धावंत होत जे नमाज प्रस्थापित करतात, जकात देतात व अल्लाहसमोर झुकणारे आहेत.
  56. आणि ज्याने अल्लाह आणि त्याचा पैगंबर व श्रद्धावंतांना आपले मित्र बनविले, त्याला माहीत असावे की अल्लाहचाच पक्ष यशस्वी राहणारा आहे.
  57. हे श्रद्धावंतांनो, तुमच्या पूर्वीच्या ग्रंथधारकांपैकी ज्या लोकांनी तुमच्या धर्माला थट्टा व मनोरंजनाचे साधन बनविले आहे, त्यांना व इतर अश्रद्धावंतांना आपले मित्र व सोबती बनवू नका. अल्लाहच्या कोपाचे भय बाळगा जर तुम्ही श्रद्धावंत असाल.
  58. जेव्हा तुम्ही नमाजसाठी आवाहन करता तेव्हा ते त्याची थट्टा करतात व त्याला खेळ समजतात. याचे कारण असे आहे की त्यांना बुद्धी नाही.
  59. त्यांना सांगा, ’’हे ग्रंथधारकांनो, तुम्ही ज्या गोष्टीने आमच्याशी वैर करीत आहात ती या व्यतिरिक्त अन्य काय आहे की आम्ही अल्लाहवर आणि धर्माच्या त्या शिकवणुकीवर श्रद्धा ठेवली आहे जी आमच्यावर अवतरली आहे व आमच्यापूर्वी देखील अवतरली होती, आणि तुमच्यापैकी बहुतेक लोक तर अवज्ञा करणारे आहेत?’’
  60. मग सांगा, ’’काय मी त्या लोकांचा निर्देश करू, ज्यांचा शेवट अल्लाहपाशी अवज्ञा करणार्‍यांच्या शेवटापेक्षा अधिक वाईट आहे? ते, अल्लाहने ज्यांचा धिक्कार केला आणि ज्यांच्यावर त्याचा प्रकोप कोसळला, ज्यांच्यापैकी माकड व डुक्कर बनविले गेले, ज्यांनी ’तागूत’ (अल्लाहशी द्रोह करणारे) ची भक्ती केली, त्यांचे स्थान आणखीनच वाईट आहे - आणि ते सन्मार्गापासून दूरवर भरकटलेले आहेत.’’
  61. जेव्हा हे तुमच्यापाशी येतात तेव्हा म्हणतात की आम्ही श्रद्धा ठेवली, खरे पाहता ते अश्रद्धा घेऊन आले होते व अश्रद्धा घेऊनच परत गेले आणि जे काही त्यांनी आपल्या हृदयात लपविले आहे ते अल्लाह चांगल्याप्रकारे जाणतो.
  62. तुम्ही पाहता की त्यांच्यापैकी पुष्कळसे लोक पाप व जुलूम आणि अत्याचाराच्या कृत्यांत धावपळ करीत हिंडतात आणि निषिद्ध माल खातात. अत्यंत वाईट कृत्ये आहेत जी ते करीत आहेत.
  63. यांचे धर्ममार्तंड व पुरोहित यांना पाप-वचनांच्या उच्चारणापासून व निषिद्ध माल खाण्यापासून का बरे प्रतिबंध करीत नाहीत? खचितच अत्यंत वाईट जीवनकार्य आहे जे ते रचित आहेत.
  64. यहूदी म्हणतात, अल्लाहचे हात बांधलेले आहेत. - बांधले गेले यांचे हात आणि धिक्कारले गेले हे त्या बडबडीबद्दल जी हे करीत आहेत - अल्लाहचे हात तर उदार आहेत तो जसे इच्छितो तसे खर्च करतो. वस्तुस्थिती अशी की जी वाणी तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्यावर अवतरली आहे ती उलट यांच्यापैकी बहुतेकांच्या शिरजोरी व असत्यप्रियतेत वृद्धी होण्यास कारणीभूत झाली आहे, आणि (याची शिक्षा म्हणून) आम्ही यांच्या दरम्यान पुनरूत्थान घडेपर्यंत वैर व शत्रुत्व घातले आहे. जेव्हा कधी हे युद्धाचा अगग्नी भडकवितात, अल्लाह त्या अग्नीला विझवून टाकतो. हे पृथ्वीवर हिंसाचार पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत पण अल्लाह हिंसाचार माजविणार्‍यांना मुळीच पसंत करीत नाही.
  65. जर (या शिरजोरीऐवजी) या ग्रंथधारकांनी श्रद्धा ठेवली असती व ईशभीरूतेचे वर्तन अंगिकारले असते तर आम्ही यांच्यातील वाईट गोष्टी यांच्यापासून दूर केल्या असत्या आणि यांना ऐश्वर्यसंपन्न स्वर्गामध्ये प्रवेश दिला असता.
  66. किती छान झाले असते जर यांनी तौरात व इंजील आणि त्या दुसर्‍या ग्रंथांना रूढ केले असते जे यांच्या पालनकर्त्याकडून यांच्याजवळ पाठविले गेले होते. असे केले असते तर यांच्यासाठी वरून अन्नवृष्टी झाली असती व खालून जमिनीतून अमाप भेटले असते. जरी त्यांच्यात काहीजण सरळमार्गीसुद्धा आहेत परंतु त्यांच्यातील बहुसंख्य अत्यंत दुराचारी आहेत.
  67. हे पैगंबर (स.), जे काही तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्यावर अवतरले आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा. जर तुम्ही असे केले नाही तर प्रेषितत्वाचे कर्तव्य पार पाडले नाही. अल्लाह तुम्हाला लोकांच्या दुष्टतेपासून वाचविणारा आहे. खात्री बाळगा की तो अश्रद्धावंतांना (तुमच्या विरोधात) यशाचा मार्ग मुळीच दाखविणार नाही.
  68. स्पष्ट सांगून टाका की, ’’हे ग्रंथधारकांनो, तुम्ही कदापि कोणत्याच मुलाधारावर नाही जोपर्यंत तौरात व इंजील आणि त्या इतर ग्रंथांवर तुम्ही दृढ रहात नाही जे तुमच्याकडे तुमच्या पालनकर्त्याकडून अवतरित केले गेले आहेत.’’ खचितच हा आदेश जो तुमच्यावर अवतरित केला गेला आहे तो यांच्यापैकी बहुतेकांची प्रतारणा व इन्कार अधिक वाढवेल. पण नाकारणार्‍यांच्या स्थितीबद्दल काही खेद करू नका.
  69. (खात्री बाळगा की येथे कुणाचीही मक्तेदारी नाही) मुसलमान असोत अथवा यहूदी, साबी असोत अथवा ख्रिस्ती, जो कोणी अल्लाह व अंतिम दिनावर श्रद्धा ठेवील आणि प्रामाणिक आचरण करील निःसंशय त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भयाला स्थान नाही, आणि तो दुःखी होणार नाही.
  70. आम्ही बनीइस्राईलकडून दृढवचन घेतले आणि त्यांच्याकडे अनेक प्रेषित पाठविले परंतु जेव्हा कधी एखादा प्रेषित त्यांच्या मनोवासनेविरूद्ध काही घेऊन आला तेव्हा त्यांनी काहींना खोटे ठरविले आणि काहींना ठार केले.
  71. आणि आपल्याठायी अशी समजूत करून घेतली की कोणताही उपद्रव उद्भवणार नाही, जणू आंधळे आणि बहिरे बनले. तरीही अल्लाहने त्यांना माफ केले तेव्हा त्यांच्यापैकी बहुतेक लोक अधिकच आंधळे आणि बहिरे बनत गेले. अल्लाह त्यांची ही सर्व कृत्ये पाहात राहिलेला आहे.
  72. खचितच द्रोह त्या लोकांनी केला ज्यांनी म्हटले की, अल्लाह मरयमपुत्र-मसीह (येशू) च आहे. वास्तविक पाहता मसीह (अ.) ने सांगितले होते की, ’’हे बनीइस्राईल अल्लाहची भक्ती करा जो माझा व तुमचासुद्धा पालनकर्ता आहे.’’ ज्याने एखाद्याला अल्लाहसमवेत सहभागी ठरविले त्याच्यावर अल्लाहने स्वर्ग प्रतिबंधित केले आणि त्याचे स्थान नरक आहे व अशा अत्याचार्‍यांचा कोणीच सहायक नाही.
  73. खचितच द्रोह केला त्या लोकांनी, ज्यांनी म्हटले की, अल्लाह तिन्हींपैकी एक आहे खरे पाहता एकमेव ईश्वराशिवाय कोणीही ईश्वर नाही. जर हे लोक आपल्या या गोष्टीपासून परावृत्त झाले नाहीत तर यांच्यापैकी ज्याने द्रोह केला आहे त्याला कठोर शिक्षा दिली जाईल.
  74. मग काय हे लोक अल्लाहपाशी पश्चात्ताप व्यक्त करणार नाहीत आणि त्याच्याजवळ माफी मागणार नाहीत? अल्लाह फार क्षमाशील व दया करणारा आहे.
  75. मरयमपुत्र येशू याशिवाय काही नाही की तो फक्त एक प्रेषित होता. त्याच्यापूर्वी देखील अनेक प्रेषित होऊन गेले होते, त्याची आई एक सत्यवादी स्त्री होती, आणि ते दोघे (इतर माणसांप्रमाणेच) अन्न भक्षण करीत होते. पहा, आम्ही कशाप्रकारे त्यांच्यासमोर सत्यवचने स्पष्ट करतो, शेवटी पहा ते कुठे उलट परतून जातात.
  76. त्यांना सांगा, काय तुम्ही अल्लाहला सोडून त्याची उपासना करता जो तुमच्या नुकसानीचाही अधिकार बाळगत नाही की फायद्याचाही नाही? वास्तविक पाहता सर्वांचे ऐकणारा व सर्वकाही जाणणारा तर अल्लाहच आहे.
  77. सांगा, ’’हे ग्रंथधारकांनो, आपल्या धर्मामध्ये नाहक अतिरेक करू नका आणि त्या लोकांच्या कल्पनांचे अनुसरण करू नका, जे तुमच्या अगोदर स्वतः पथभ्रष्ट झाले व बहुतेकांना ज्यांनी पथभ्रष्ट केले आणि सन्मार्गापासून भरकटले.’’
  78. बनीइस्राईलपैकी ज्या लोकांनी अश्रद्धेचा मार्ग अवलंबिला ते दाऊद (अ.) आणि मरयमपुत्र येशू यांच्या वाणीद्वारे धिक्कारले गेले कारण ते दुराचारी झाले होते व मर्यादा-भंग करू लागले होते,
  79. त्यांनी एकमेकाला अपकृत्यापासून परावृत्त करण्याचे सोडून दिले होते, वाईट आचरण होते त्यांचे, जे त्यांनी अंगिकारले.
  80. आज तुम्ही त्यांच्यात पुष्कळसे असे लोक पाहता जे (श्रद्धावंतांच्या विरोधात) अश्रद्धावंतांचे समर्थन व त्यांच्याशी मैत्री करतात. निश्चितपणे अत्यंत वाईट शेवट आहे त्यांचा, ज्याची तयारी त्यांनी स्वतः आपल्यासाठी केली आहे. अल्लाह त्यांच्यावर क्रोधित झाला आहे आणि ते चिरस्थायी यातना भोगणारे होत.
  81. जर खरोखर हे लोक अल्लाह व पैगंबर आणि त्या गोष्टीला मानणारे असते, जी पैगंबरांवर अवतरली होती तर कदापि (श्रद्धावंतांविरूद्ध) अश्रद्धावंतांना त्यांनी आपले मित्र बनविले नसते. पण त्यांच्यापैकी तर बहुतेक लोक ईश्वराच्या आज्ञाधारकतेच्या बाहेर निघाले आहेत.
  82. तुम्हाला श्रद्धावंतांविरूद्ध सर्वात जास्त कठोर यहुदी व अनेकेश्वरवादी आढळतील आणि श्रद्धावंतांच्या मित्रत्वांत ते लोक अधिक जवळ असल्याचे आढळतील ज्यांनी सांगितले होते की आम्ही ख्रिश्चन आहोत, हे अशा कारणास्तव की त्यांच्यात उपासना-मग्न विद्वान व विरक्त साधू आढळतात आणि त्यांच्यात अहंकार नाही
  83. जेव्हा ते ही वाणी ऐकतात जी पैगंबरावर अवतरली आहे तेव्हा तुम्ही पाहता की सत्याची ओळख पटल्यामुळे त्यांचे डोळे अश्रूंनी भिजतात. ते अनायासे उद्गारतात, ’’हे पालनकर्त्या, आम्ही श्रद्धा ठेवली, आमचे नाव ग्वाही देणार्‍यांमध्ये लिही.’’
  84. आणि ते म्हणतात, ’’का म्हणून आम्ही अल्लाहवर श्रद्धा ठेवू नये आणि जे सत्य आमच्यापर्यंत आलेले आहे ते का मान्य करू नये जेव्हा आम्ही अशी इच्छा बाळगतो की आमच्या पालनकर्त्याने आम्हाला सदाचारी लोकांत समाविष्ट करावे?’’
  85. त्यांच्या या कथनामुळे अल्लाहने त्यांना असा स्वर्ग प्रदान केला ज्याच्याखालून कालवे वाहतात व ते तेथेच सदैव राहतील. हा मोबदला आहे उत्तम आचरण करणार्‍या लोकांकरिता,
  86. त्यांच्या या कथनामुळे अल्लाहने त्यांना असा स्वर्ग प्रदान केला ज्याच्याखालून कालवे वाहतात व ते तेथेच सदैव राहतील. हा मोबदला आहे उत्तम आचरण करणार्‍या लोकांकरिता,
  87. हे श्रद्धावंतांनो, ज्या शुद्ध वस्तू अल्लाहने तुमच्यासाठी वैध (धर्मसम्मत) केलेल्या आहेत, त्या निषिद्ध ठरवू नका आणि मर्यादांचे उल्लंघन करू नका. अल्लाहला अतिरेक करणारे अत्यंत अप्रिय आहेत.
  88. जे काही वैध व विशुद्ध अन्न अल्लाहने दिले आहे ते खा व प्या आणि ईश्वराच्या अवज्ञेपासून दूर राहा ज्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवली आहे.
  89. तुम्ही लोक ज्या निरर्थक शपथा घेता त्याबद्दल अल्लाह तुम्हाला परत शिक्षा करणार नाही पण ज्या शपथा तुम्ही जाणूनबुजून घेता, त्यांच्यासाठी तो जरूर तुम्हाला पकडील. (अशी शपथ मोडण्याचे) प्रायश्चित्त हे होय की दहा गरिबांना त्या सर्वसाधारण प्रकारचे जेवण तुम्ही द्यावे, जे तुम्ही आपल्या मुलाबाळांना देता, अथवा त्यांना वस्त्रे द्यावीत किंवा एका गुलामाला मुक्त करावे आणि ज्याची अशी ऐपत नसेल त्याने तीन दिवसाचे उपवास करावेत. हे तुमच्या शपथांचे प्रायश्चित्त आहे की जेव्हा तुम्ही शपथ घेऊन ती मोडली असेल, आपल्या शपथांचे पालन करीत जा. अशाप्रकारे अल्लाह आपल्या आज्ञा तुमच्यासाठी स्पष्ट करीत आहे कदाचित तुम्ही कृतज्ञता दर्शवाल.
  90. हे श्रद्धावंतांनो, ही दारू आणि जुगार व वेदी आणि शकून ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, यांच्यापासून दूर राहा, आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.
  91. शैतानाची तर अशीच इच्छा आहे की दारू व जुगाराद्वारे तुमच्यात शत्रुत्व व कपट निर्माण करावे आणि तुम्हाला अल्लाहचे स्मरण व नमाजपासून रोखावे. मग काय तुम्ही या गोष्टीपासून अलिप्त राहाल?
  92. अल्लाह व त्याच्या पैगंबराचे म्हणणे मान्य करा आणि अलिप्त राहा, परंतु जर तुम्ही अवज्ञा केली तर हे समजून असा की आमच्या पैगंबरावर स्पष्टपणे आदेश पोहचविण्याची फक्त जबाबदारी होती.
  93. ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि चांगले आचरण करू लागले त्यांनी पूर्वी जे काही खाल्ले व प्यायले त्यासाठी त्यांना (जबाबदार) धरले जाणार नाही, परंतु या अटीवर की भविष्यात त्यांनी त्या गोष्टीपासून दूर राहावे ज्या निषिद्ध केल्या गेल्या आहेत आणि श्रद्धेवर अढळ राहावे आणि सत्कार्य करावे, मग ज्या ज्या गोष्टींपासून प्रतिबंध केला जाईल त्यापासून दूर राहावे आणि जो अल्लाहचा आदेश असेल त्याला मान्य करावे, मग ईशपरायणतेनिशी सद्वर्तन ठेवावे. अल्लाह सदाचारी लोकांना पसंत करतो!
  94. हे श्रद्धावंतांनो, अल्लाह तुमची त्या शिकारीद्वारे कठोर परीक्षा घेईल जी अगदी तुमच्या हाताच्या व भाल्यांच्या मार्‍यात असेल, हे पाहण्यासाठी की तुमच्यापैकी कोण त्याला अप्रत्यक्षरीत्या भितो, मग ज्याने यानंतर देखील अल्लाहने ठरवून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन केले त्याच्यासाठी भयंकर दुःखदायक शिक्षा आहे.
  95. हे श्रद्धावंतांनो, एहरामच्या (हजच्या परिवेशाच्या) स्थितीत शिकार करू नका, आणि जर तुमच्यापैकी कोणी जाणूनबुजून असे केले तर जो प्राणी त्याने ठार केला असेल तर त्याला त्याच तोडीचा एक प्राणी जनावरांपैकी भेट द्यावा लागेल ज्याची निवड तुमच्यापैकी दोन न्यायी व्यक्ती करतील, आणि ही भेट काबागृहास पोहचविली जाईल, तसे नसेल तर या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून काही गरिबांना जेवू घालावे लागेल किंवा त्या प्रमाणात उपवास करावे लागतील जेणेकरून त्याने आपल्या कर्माचे फळ चाखावे. पूर्वी जे काही घडले ते अल्लाहने माफ करून टाकले, परंतु जर कोणी या कृत्याची पुनरावृत्ती केली तर त्याचा अल्लाह बदला घेईल, अल्लाह सर्वांवर वर्चस्व राखणारा आहे आणि बदला घेण्याचे सामर्थ्य राखतो.
  96. तुमच्यासाठी समुद्रातील शिकार व तिचे भक्षण वैध करण्यात आले, जेथे तुम्ही मुक्काम कराल तेथेसुद्धा ती तुम्ही खाऊ शकता आणि काफिल्यासाठी शिदोरी म्हणूनसुद्धा ती घेऊ शकता परंतु खुष्कीवरील शिकार, जोपर्यंत तुम्ही एहरामच्या अवस्थेत आहात, तुम्हासाठी निषिद्ध करण्यात आली आहे. म्हणून दूर राहा त्या ईश्वराच्या अवज्ञेपासून ज्याच्यासमोर तुम्हा सर्वांना गोळा करून हजर केले जाईल.
  97. अल्लाहने आदरणीय गृह, काबाला लोकांकरिता (सामूदायिक जीवनाच्या) प्रस्थापनेचे साधन बनविले आणि (आदरणीय) महिना व कुर्बानीची जनावरे आणि पट्टेसुद्धा (या कार्यात सहायक बनविले) जेणेकरून तुम्हाला कळावे की अल्लाह आकाशांच्या व पृथ्वीच्या सर्व परिस्थितीचा जाणकार आहे आणि त्याला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आहे.
  98. सावध व्हा, अल्लाह शिक्षा देण्यात सुद्धा कठोर आहे आणि त्याचबरोबर फार क्षमाशील व दयाळूदेखील आहे.
  99. पैगंबरावर तर केवळ संदेश पोहचविण्याची जबाबदारी आहे, यानंतर तुमच्या उघड व गुप्त सर्व गोष्टींना जाणणारा अल्लाह आहे.
  100. हे पैगंबर (स.), यांना सांगा की पवित्र आणि अपवित्र कोणत्याही परिस्थितीत एकसारखे नाहीत मग निषिद्ध गोष्टींचे आधिक्य तुम्हाला कितीही मोहित करणारे असो, म्हणून हे सबुद्ध लोकांनो, अल्लाहच्या अवज्ञेपासून दूर राहा, आशा आहे की तुम्हाला यश लाभेल.
  101. हे श्रद्धावंतांनो, अशा गोष्टी विचारीत जाऊ नका ज्या तुम्हासमोर उघड केल्या गेल्या तर तुम्हाला त्या वाईट वाटतील. परंतु जर तुम्ही त्या अशावेळी विचारल्यात जेव्हा कुरआन अवतरित होत असेल तर त्या तुमच्यासमोर उघड करण्यात येतील आतापर्यंत जे काही तुम्ही केले ते अल्लाहने माफ केले, तो क्षमाशील व सहिष्णू आहे.
  102. तुमच्यापूर्वी एका समुदायाने अशाच प्रकारचे प्रश्न केले होते, मग ते लोक याच गोष्टीमुळे अश्रद्धेमध्ये गुरफटून गेले.
  103. अल्लाहने कोणालादेखील बहिरा ठरविले नाही अथवा सायबा किंवा वसीला आणि हाम, पण हे अश्रद्धावंत अल्लाहवर खोटे आरोप ठेवतात आणि त्यांच्यापैकी बहुतेकजण निर्बुद्ध आहेत.
  104. (की अशा भ्रामक कल्पनांवर विश्वास ठेवतात.) आणि जेव्हा त्यांना सांगण्यात येते की या, त्या कायद्याकडे जो अल्लाहने अवतरला आहे आणि या, पैगंबराकडे, तर ते उत्तर देतात की आमच्यासाठी तर तीच पद्धत पुरेशी आहे ज्यावर आमचे पूर्वज आम्हाला आढळले आहेत. मग काय हे पूर्वजांचेच अनुकरण करीत राहतील जरी त्यांना काहीही माहीत नसेल व योग्य मार्गाची त्यांना जाणीवच नाही?
  105. हे श्रद्धावंतांनो, स्वतःची काळजी घ्या, एखाददुसर्‍याच्या पथभ्रष्ट होण्याने तुमचे काहीही बिघडत नाही जर तुम्ही स्वतः सरळ मार्गावर असाल, अल्लाहकडे तुम्हां सर्वांना परत जायचे आहे मग तो तुम्हाला दाखवेल की तुम्ही काय करीत राहिला आहात.
  106. हे श्रद्धावंतांनो, जेव्हा तुम्हापैकी एखाद्याची मृत्यूघटका येईल आणि तो मृत्यूपत्र करीत असेल तर त्याच्यासाठी साक्षीचे प्रमाण हे होय की तुमच्या समाजामधील दोन न्यायप्रिय व्यक्तींना साक्षीदार बनवावे, किंवा जर तुम्ही प्रवासात असाल आणि त्यावेळी मृत्यूचे संकट आले, तर परक्यांमधून दोन साक्षीदार घ्यावेत. मग जर एखादी शंका निर्माण झाली तर नमाजनंतर दोन्ही साक्षीदारांना (मसजिदमध्ये) थांबवून घ्यावे व त्यांनी ईश्वराची शपथ घेऊन सांगावे की, ’’आम्ही एखाद्या व्यक्तिगत फायद्यासाठी साक्ष विकणारे लोक नाही, आणि जरी कोणी आमचा नातेवाईक असला तरी (आम्ही त्याचा पक्ष घेणार नाही), आणि ईश्वराप्रीत्यर्थ दिलेल्या साक्षीला देखील आम्ही लपविणार नाही, जर आम्ही असे केले तर गुन्हेगारांमध्ये आमची गणना होईल.’’
  107. परंतु जर असे कळले की त्या दोघांनी स्वतःला गुन्ह्यात लोटले आहे तर मग त्यांच्याऐवजी आणखी दोन व्यक्ती जे त्यांच्या तुलनेत साक्ष देण्यात अधिक प्रामाणिक असतील त्यांनी त्या लोकांतून उभे राहावे ज्यांचा हक्क मारला गेला असेल, आणि त्यांनी ईश्वराची शपथ घेऊन सांगावे की, ’’आमची साक्ष त्यांच्या साक्षीपेक्षा जास्त सत्याधिष्ठित आहे आणि आम्ही आमच्या साक्षीमध्ये कोणताही अतिरेक केलेला नाही, जर का आम्ही तसे केले तर आम्ही अत्याचार्‍यांपैकी एक बनू.’’
  108. या पद्धतीने रास्त अपेक्षा केली जाऊ शकते की लोक खरीखुरी साक्ष देतील, किंवा कमीत कमी या गोष्टीचे तरी भय बाळगतील की त्यांच्या शपथांनंतर एखादे वेळी दुसर्‍या शपथांमुळे रद्दबातल होऊ नयेत. अल्लाहच्या कोपाचे भय बाळगा आणि ऐका, अल्लाह अवज्ञा करणार्‍यांना आपल्या मार्गदर्शनापासून वंचित करतो.
  109. ज्या दिवशी अल्लाह सर्व प्रेषितांना एकत्र करून विचारील की तुम्हाला काय प्रत्युत्तर दिले गेले, तेव्हा ते म्हणतील की, आम्हाला काहीही कल्पना नाही, तूच सर्व गुप्त हकीकती जाणतोस!
  110. मग कल्पना करा त्या प्रसंगाची जेव्हा अल्लाह फर्मावील की, ’’हे मरयमपुत्र ईसा, आठव माझ्या त्या देणगीला जी मी तुला व तुझ्या मातेला प्रदान केली होती. मी पवित्र आत्म्यामार्फत तुला सहाय्य केले, तू पाळण्यातदेखील लोकांशी संभाषण करीत होतास, आणि वय वाढल्यानंतरसुद्धा. मी तुला ग्रंथ आणि शहाणपणा व तौरात आणि इंजिलचे शिक्षण दिले, तू माझ्या आज्ञेने पक्षाकृती मातीचा पुतळा बनवून त्यात फुंकर घालत असे आणि तो माझ्या आज्ञेने पक्षी बनत असे, तू जन्मजात आंधळ्याला व महारोग्याला माझ्या आज्ञेने रोगमुक्त करीत असे. तू मृतांना माझ्या आज्ञेने बाहेर काढत असे. मग जेव्हा तू बनीइस्राईलपाशी स्पष्ट संकेतचिन्हे घेऊन पोहोचलास आणि त्यांच्यापैकी जे लोक सत्याचा इन्कार करणारे होते त्यांनी म्हटले की हे संकेत जादुगिरीशिवाय इतर काहीही नाही,
  111. तेव्हा मीच तुला त्यांच्यापासून वाचविले. आणि मी जेव्हा ’हवारी’ना (येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना) इशारा केला की माझ्यावर व माझ्या प्रेषितांवर श्रद्धा ठेवा, तेव्हा त्यांनी सांगितले की, ’’आम्ही श्रद्धा ठेवली आणि साक्षी राहा की आम्ही मुस्लिम आहोत.’’ -
  112. (हवारींच्या संबंधी) हा प्रसंगसुद्धा लक्षात ठेवावा की जेव्हा येशू ख्रिस्ताच्या अनुयायांनी सांगितले, ’’हे मरयमपुत्र ईसा काय तुमचा पालनकर्ता आमच्यासाठी जेवणाचे एक (मोठे) ताट आकाशातून उतरवू शकेल? तेव्हा ईसा (अ.) नी सांगितले की अल्लाहच्या कोपाचे भय बाळगा जर तुम्ही श्रद्धावंत असाल.
  113. त्यांनी सांगितले, ’’आम्ही तर केवळ हेच इच्छितो की त्या ताटांत जेवावे आणि आमची मने संतुष्ट व्हावीत व अल्लाहला कळावे की आपण जे काही आम्हाला सांगितले आहे ते सत्य आहे व त्याचे आम्ही साक्षीदार व्हावे.’’
  114. तेव्हा मरयम-पुत्र ईसाने प्रार्थना केली, ’’हे अल्लाह, आमच्या पालनकर्त्या, आम्हावर आकाशातून एक ताट उतरव जे आमच्यासाठी व आमच्या अगोदरच्या व नंतरच्यासाठी आनंदाचा प्रसंग ठरावा आणि तुझ्याकडून एक संकेत ठरावा, आम्हाला अन्न दे व तू सर्वोत्कृष्ट अन्नदाता आहेस.’’
  115. अल्लाहने उत्तर दिले, ’’मी ते तुमच्यावर अवतरणार आहे, परंतु त्यानंतर तुमच्यापैकी जो कोणी द्रोह करील त्याला मी अशी शिक्षा देईन जी जगात कोणाला दिली गेली नसेल.’’
  116. तात्पर्य, जेव्हा (या उपकारांची आठवण करून दिल्यानंतर) अल्लाह फर्माविल, ’’हे मरयमपुत्र ईसा! काय तू लोकांना सांगितले होतेस की अल्लाहशिवाय मला आणि माझ्या मातेस देखील ईश्वर बनवा?’’ तेव्हा तो उत्तरादाखल सांगेल, ’’पवित्र आहे अल्लाह, माझे हे काम नव्हते की ती गोष्ट सांगावी जी सांगण्याचा मला अधिकार नव्हता, जर मी तसे सांगितले असते तर अवश्य तुला माहीत झाले असते, तू जाणतो जे काही माझ्या मनात आहे, मी जाणत नाही जे काही तू जाणतोस, तू तर सर्व गुप्त हकिगतीचा ज्ञानी आहेस.
  117. मी त्यांना त्याशिवाय काहीच सांगितले नाही ज्याची मला तू आज्ञा दिली होती. ते हे की अल्लाहची भक्ती करा जो माझा पालनकर्ता आहे आणि तुमचा पालनकर्ता देखील मी त्या वेळेपर्यंतच त्यांचा निरीक्षक होतो जोपर्यंत मी त्याच्या दरम्यान होतो. जेव्हा तू मला परत बोलावून घेतलेस तेव्हा तूच त्यांचा निरीक्षक होतास आणि तू तर सर्वच गोष्टींचा निरीक्षक आहेस.
  118. आता जर तू त्यांना शिक्षा केलीस तर ते तुझे दास आहेत व जर तू माफी दिली तर तू प्रभुत्वसंपन्न व बुद्धिमान आहेस.’’
  119. तेव्हा अल्लाह फर्माविल, ’’हा तो दिवस आहे, ज्या दिवशी खर्‍यांना त्यांची सचोटी लाभदायक ठरेल. त्यांच्याकरिता अशी उद्याने आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहात आहेत. येथे ते सदैव राहतील, अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न झाला व ते अल्लाहवर. हेच महान यश आहे.’’
  120. पृथ्वी व आकाशांवर आणि त्यात अस्तित्वात असलेल्या सर्वांवर राज्य अल्लाहचेच आहे आणि प्रत्येक वस्तूवर तो प्रभुत्व राखतो.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post