Surah Al Anaam With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

6.अल् अनआम - ٱلْأَنْعَام


अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

  1. स्तुती अल्लाहकरिता आहे ज्याने आकाश व पृथ्वी बनविली. अंधकार व प्रकाश निर्माण केले, तरी देखील ते लोक ज्यांनी सत्याचे आवाहन मानण्यास नकार दिला आहे, इतरांना आपल्या पालनकर्त्यासमान ठरवीत आहेत!
  2. तोच आहे ज्याने तुम्हाला मातीपासून निर्मिले, मग तुमच्याकरिता जीवनाची एक कालमर्यादा ठरवून दिली, आणि एक दुसरी कालमर्यादा आणखी देखील आहे जी त्याच्याजवळ ठरलेली आहे. परंतु तुम्ही लोक आहात की शंका-कुशंकांत गुरफटला आहात.
  3. तोच एक ईश्वर आकाशातही आहे व पृथ्वीवरदेखील, तुमच्या गुप्त व प्रकट सर्व अवस्था जाणतो आणि जो वाईटपणा वा चांगुलपणा तुम्ही कमविता ते त्याला चांगल्याप्रकारे माहीत आहे.
  4. लोकांची परिस्थिती अशी आहे की, त्यांच्या पालनकर्त्याच्या संकेतांपैकी एकही संकेत असा नाही जो त्यांच्यासमोर आला आणि ते त्यापासून पराङमुख झाले नाहीत,
  5. म्हणून आता जे सत्य त्यांच्यापाशी आले त्यालादेखील त्यांनी खोटे ठरविले. तेव्हा, ज्या गोष्टीचा ते आतापर्यंत उपहास करीत राहिले आहेत, लवकरच त्याच्याशी संबंधित काही बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील.
  6. यांनी पाहिले नाही की यांच्याअगोदर कित्येक अशा जनसमूहांना आम्ही नष्ट करून टाकले ज्यांचे आपापल्या काळांत प्राबल्य राहिले आहे? त्यांना आम्ही भूतलावर ती सत्ता प्रदान केली होती जी तुम्हाला प्रदान केलेली नाही, त्यांच्यावर आम्ही आकाशातून भरपूर वृष्टी केली आणि त्यांच्या खाली कालवे प्रवाहित केले, (परंतु जेव्हा त्यांनी कृतघ्नता दर्शविली तेव्हा) सरतेशेवटी आम्ही त्यांना त्यांच्या अपराधापायी नष्ट करून टाकले आणि त्यांच्याजागी नंतरच्या काळातील लोकांना उभे केले.
  7. हे पैगंबर (स.), आम्ही कागदावर लिखित एखादा ग्रंथ जरी तुमच्यावर अवतरित केला असता आणि लोकांनी आपल्या हातांनी स्पर्श करून जरी पाहिले असते तरी देखील ज्यांनी सत्याचा इन्कार केला आहे त्यांनी हेच सांगितले असते की ही तर उघड जादू आहे.
  8. ते म्हणतात की या पैगंबरावर एखादा दूत का अवतरला गेला नाही? जर आम्ही एखादा दूत अवतरला असता तर आतापावेतो केव्हाच निर्णय झाला असता, मग यांना कोणतीच सवलत दिली गेली नसती.
  9. आणि आम्ही दूत जरी अवतरला असता तरी देखील त्याला मानवी रूपातच अवतरला असता आणि अशाप्रकारे यांना त्याच शंकेत गुरफटविले असते, ज्यात सध्या हे गुरफटलेले आहेत.
  10. हे नबी (स.), तुमच्याअगोदर देखील कित्येक प्रेषितांचा उपहास केला गेला आहे, परंतु त्या टवाळकी करणार्‍या लोकांवर सरतेशेवटी तेच सत्य उलटल्याविना राहिले नाही ज्याचा उपहास ते करीत होते.
  11. यांना सांगा, जरा पृथ्वीतलावर फेरफटका मारून पाहा, खोटे ठरविणार्‍यांचा शेवट कसा झाला आहे.
  12. यांना विचारा, आकाशांत व पृथ्वीतलावर जे काही आहे ते कोणाचे आहे? - सांगून टाका, सर्वकाही अल्लाहचेच आहे, त्याने दया व कृपेची नीति स्वतःसाठी अनिवार्य करून घेतली आहे. (म्हणूनच तो अवज्ञा व उद्धटपणावर तुम्हाला लगेच पकडीत नाही.) पुनरुत्थानाच्या दिवशी तो तुम्हा सर्वांना अवश्य जमा करील. हे एक सर्वस्वी निःसंदिग्ध सत्य आहे. परंतु ज्या लोकांनी आपणहून स्वतःला विनाशाच्या धोक्यात टाकले आहे ते त्याला मानीत नाहीत.
  13. रात्रीच्या अंधारात आणि दिवसाच्या उजेडात जे काही स्थिरावले आहे, सर्व अल्लाहचे आहे आणि तो सर्वकाही ऐकतो व जाणतो.
  14. सांगा, अल्लाहला सोडून काय मी इतर कोणाला आपला पालक बनवू? त्या अल्लाहला सोडून जो आकाश व पृथ्वीचा निर्माता आहे. तो उपजीविका देतो, उपजीविका घेत नाही. सांगून टाका, मला तर हाच आदेश दिला गेला आहे की सर्वप्रथम मी त्याच्यापुढे आज्ञापालनार्थ मान तुकवावी, (आणि ताकीद करण्यात आली आहे की कोणी अनेकेश्वरवादी होत असेल तर होवो) तू कोणत्याही परिस्थितीत अनेकेश्वरवाद्यांत सामील होऊ नकोस.
  15. सांगा, जर मी आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली तर मला भय वाटते की एका मोठ्या (भयंकर) दिवशी मला शिक्षा भोगावी लागेल.
  16. त्यादिवशी जो शिक्षेपासून वाचेल त्यावर अल्लाहने मोठीच दया केली. आणि हेच (उघड) स्पष्ट यश आहे.
  17. जर अल्लाहने तुम्हाला एखाद्या प्रकारची हानी पोहोचवली तर त्याच्याशिवाय इतर असा कोणीच नाही जो तुम्हाला त्या हानीपासून वाचवू शकेल. आणि जर त्याने तुम्हाला एखाद्या चांगल्या गोष्टीने उपकृत केले तर त्याला प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य प्राप्त आहे.
  18. त्याला आपल्या दासांवर सर्वाधिकार प्राप्त आहे आणि तो बुद्धिमान व जाणकार आहे.
  19. यांना विचारा, कोणाची साक्ष सर्वाहून श्रेष्ठ आहे? - सांगा, माझ्या व तुमच्यामध्ये अल्लाह साक्षी आहे आणि हा कुरआन माझ्याकडे ’वह्य’ (दिव्य अवतरण) द्वारे पाठविला गेला आहे जेणेकरून तुम्हाप्रत आणि ज्या ज्या लोकांपर्यंत हा पोहोचेल त्या सर्वांना मी सावध करावे. काय खरोखरच तुम्ही अशी साक्ष देऊ शकता की अल्लाहबरोबर इतर ईश्वर देखील आहेत? सांगून टाका, अशी साक्ष तर मी कदापि देऊ शकत नाही. सांगून टाका, ईश्वर तर तोच एक आहे आणि मी त्या अनेकेश्वरवाद्यांपासून सर्वस्वी अलिप्त आहे ज्यांत तुम्ही गुरफटला आहात.
  20. ज्या लोकांना आम्ही ग्रंथ दिला आहे ते या गोष्टीला अशाप्रकारे निःसंदिग्धपणे ओळखतात जशी त्यांना आपल्या पुत्रांना ओळखण्यात यत्किंचितही शंका वाटत नाही. परंतु ज्यांनी आपण होऊन स्वतःला नुकसानीत टाकले आहे ते हे मान्य करीत नाहीत.
  21. आणि त्या व्यक्तीपेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल जो अल्लाहवर खोटे आळ घेतो अथवा अल्लाहची संकेतवचने खोटी ठरवितो. निःसंशय असले अत्याचारी कधीही सफल होऊ शकणार नाहीत.
  22. ज्या दिवशी आम्ही या सर्वांना एकत्र करू आणि अनेकेश्वरवाद्यांना विचारू की आता ते तुमचे ठरविलेले भागीदार कोठे आहेत ज्यांना तुम्ही आपला ईश्वर समजत होता?
  23. तर ते याखेरीज कोठलाच उपद्रव माजवू शकणार नाहीत (अशी खोटी साक्ष देतील) की हे आमच्या स्वामी! तुझी शपथ, आम्ही मुळीच अनेकेश्वरवादी नव्हतो.
  24. पहा, त्या वेळेस हे कशाप्रकारे आपल्याविरूद्ध स्वतःच असत्य रचतील, आणि तेथे यांचे सर्व बनावट उपास्य हरवलेले असतील.
  25. यांच्यापैकी काही लोक असे आहेत जे कान देऊन तुमचे म्हणणे ऐकल्यासारखे दाखवतात परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही त्यांच्या हृदयावर पडदे घातले आहेत ज्यामुळे त्यांच्या काहीच लक्षात येत नाही आणि त्यांच्या कानांना बधिरता आणली आहे (की सर्वकाही ऐकूनसुद्धा काहीच ऐकत नाहीत.) मग त्यांनी कोणताही संकेत पाहिला तरी त्यावर ते श्रद्धा ठेवणार नाहीत. यावर परमावधी अशी की जेव्हा ते तुमच्याजवळ येऊन तुमच्याशी भांडतात तेव्हा त्यांच्यातील ज्या लोकांनी सत्य नाकारण्याचा निर्णय घेतला आहे ते (सर्व गोष्टी ऐकल्यानंतर) हेच सांगतात की या तर पुरातन कथांशिवाय इतर काहीच नाहीत
  26. ते या सत्य गोष्टीला मान्य करण्यापासून लोकांना प्रतिबंध करतात आणि स्वतः देखील त्यापासून दूर पळतात (ते समजतात की अशा कृतीमुळे ते तुमचे काही वाईट करीत आहेत.) खरे पाहता मुळात ते स्वतःच्याच विनाशाची सामग्री तयार करीत आहेत. परंतु त्यांना याचे भान नाही.
  27. किती बरे झाले असते जर तुम्ही त्यावेळेची परिस्थिती पाहू शकला असता जेव्हा ते नरकाच्या काठावर उभे केले जातील, त्यावेळी ते म्हणतील, एखादा मार्ग असा निघावा की आम्हाला पृथ्वीवर पुन्हा परत पाठविले जावे आणि आपल्या पालनकर्त्याची संकेतवचने आम्ही खोटी ठरवू नये आणि श्रद्धा ठेवणार्‍यांमध्ये सामील व्हावे, तर किती बरे होईल!
  28. खरे पाहता ही गोष्ट ते केवळ या कारणास्तव म्हणतील की ज्या सत्यावर त्यांनी पडदा घातला होता ते त्यावेळी उघड होऊन त्यांच्यासमोर आलेले असेल. अन्यथा जर त्यांना पूर्व आयुष्याकडे परत पाठविले गेले तर पुन्हा ते तेच सर्वकाही करतील ज्यांची त्यांना मनाई करण्यात आली आहे. ते तर आहेतच लबाड, (म्हणून आपल्या या इच्छेच्या अभिव्यक्तीत देखील लबाडीचाच आधार घेतील.)
  29. आज हे लोक सांगतात की जीवन जे काही आहे ते फक्त हेच आमचे लौकिक जीवन आहे आणि आम्ही मृत्यूनंतर मुळीच पुन्हा जिवंत उठविले जाणार नाही.
  30. जर तुम्ही ते दृश्य पाहू शकाल तर किती छान होईल, जेव्हा हे आपल्या पालनकर्त्यासमोर उभे केले जातील, तेव्हा त्यांचा पालनकर्ता त्यांना विचारील, ’’काय ही वस्तुस्थिती नव्हे?’’ हे म्हणतील, ’’होय, आमच्या पालनकर्त्या ही वस्तुस्थितीच आहे.’ तो फर्माविल, ’’बरे! तर आता वस्तुस्थितीच्या आपल्या नाकारण्याबद्दलच्या प्रकोपाचा आस्वाद घ्या.’’
  31. नुकसानीत आहेत ते लोक ज्यांनी अल्लाहशी आपल्या भेटीच्या वार्तेला खोटे ठरविले. जेव्हा आकस्मिक ती घटका येऊन ठेपेल तेव्हा हेच लोक खेद व्यक्त करतील की, ’’आमच्याकडून याबाबतीत कशी चूक झाली.’’ आणि यांची दशा अशी असेल की त्यांनी आपल्या पाठीवर आपल्या पापाचे ओझे घेतले असेल. पहा किती वाईट ओझे आहे जे हे उचलत आहेत.
  32. ऐहिक जीवन तर एक खेळ-तमाशा आहे. वास्तविक पाहता मरणोत्तर जीवनाचे ठिकाणच त्या लोकांकरिता अधिक उत्तम आहे जे दुराचारापासून अलिप्त राहू इच्छितात. मग काय तुम्ही बुद्धीचा उपयोग करणार नाही?
  33. हे पैगंबर (स.), आम्हाला माहीत आहे की ज्या गोष्टी हे लोक रचत आहेत त्यापासून तुम्हाला दुःख होते, परंतु हे लोक तुम्हाला खोटे ठरवीत नाहीत तर हे अत्याचारी खरे पाहता अल्लाहच्या संकेतवचनांचा इन्कार करीत आहेत.
  34. तुमच्यापूर्वी देखील अनेक पैगंबर खोटे ठरविले गेले, परंतु या खोटे ठरविण्यावर आणि त्यांना दिल्या गेलेल्या यातनांवर त्यांनी संयम दाखविला येथपर्यंत की आमची मदत त्यांना पोहोचली. अल्लाहच्या गोष्टींना बदलण्याची शक्ती कोणातच नाही. आणि पूर्वीच्या पैगंबरांशी जो काही व्यवहार झाला त्याविषयी बातम्या तुम्हापर्यंत आल्याच आहेत.
  35. तथापि जर या लोकांची उपेक्षा तुम्हाला सहन होत नसेल तर मग तुमच्यात जर काही सामर्थ्य असेल तर जमिनीतील एखादा भुयारी मार्ग शोधा किंवा आकाशाला शिडी लावा आणि त्यांच्यापाशी एखादे संकेतचिन्ह आणण्याचा प्रयत्न करा. जर अल्लाहने इच्छिले असते तर या सर्वांना सन्मार्गावर जमा केले असते, म्हणून अज्ञानी बनू नका.
  36. सत्याच्या आवाहनास तेच प्रतिसाद देतात जे ऐकणारे आहेत! मृतांना तर अल्लाह कबरीतूनच उठवील आणि नंतर ते (त्याच्या न्यायालयात सादर होण्यासाठी) परत आणले जातील.
  37. हे लोक म्हणतात की या पैगंबरावर त्याच्या पालनकर्त्याकडून एखादे संकेतवचन का अवतरले गेले नाही? सांगा, अल्लाह संकेतवचन अवतरण्याचे पूर्ण सामर्ध्य बाळगतो परंतु यांच्यामधील बहुतेक लोक अज्ञानात गुरफटलेले आहेत.
  38. जमिनीवर चालणार्‍या एखाद्या प्राण्याला आणि हवेत पंखाने उडणार्‍या एखाद्या पक्ष्याला पहा, हे सर्व तुमच्यासारख्याच प्रजातींमध्ये मोडतात. आम्ही त्याच्या भाग्यलेखात कोणतीही कसर ठेवली नाही, मग हे सर्व आपल्या पालनकर्त्याकडे एकवटले जातील,
  39. पण जे लोक आमच्या संकेतवचनांना खोटे ठरवितात, ते बहिरे आणि मुके आहेत, अंधारात पडलेले आहेत. अल्लाह इच्छितो त्याला पथभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो त्याला सरळ मार्गावर लावतो.
  40. यांना सांगा, थोडे विचार करून सांगा, जेव्हा तुमच्यावर अल्लाहकडून एखादे मोठे संकट येऊन कोसळते अथवा अंतिम घटका येऊन ठेपते तर काय तेव्हा तुम्ही अल्लाहशिवाय इतर कुणाचा धावा करता? सांगा, जर तुम्ही खरे असाल तर.
  41. त्यावेळी तुम्ही अल्लाहचाच धावा करता, मग जर त्याने इच्छिले तर तो तुमच्यावरून संकट टाळतो . अशा प्रसंगी तुम्ही ज्यांना अल्लाहचे भागीदार ठरविले आहे त्यांना विसरून जाता.
  42. तुमच्यापूर्वी अनेक जनसमूहांकडे आम्ही प्रेषित पाठविले आणि त्या जनसमूहांना संकटात व दुःखात टाकले जेणेकरून त्यांनी नम्रपणे आमच्यासमोर झुकावे. मग जेव्हा आमच्याकडून त्यांच्यावर संकट आले तेव्हा त्यांनी नम्रता का दर्शविली नाही?
  43. परंतु त्यांची हृदये तर अधिकच कठोर झाली आणि शैतानाने त्यांना दिलासा दिला की जे काही तुम्ही करीत आहात ते उत्तमच करीत आहात.
  44. मग जेव्हा त्यांना दिलेल्या उपदेशाचे त्यांनी विस्मरण केले तेव्हा आम्ही सर्व प्रकारच्या सुखसमृद्धिची दारे त्यांच्यासाठी उघडी केली, येथपावेतो की जेव्हा ते त्यांना दिल्या गेलेल्या सुखसमृद्धित खूप मग्न झाले, तेव्हा - अचानकपणे आम्ही त्यांना पकडले आणि आता परिस्थिती अशी होती की ते प्रत्येक मांगल्यापासून निराश झाले होते.
  45. अशा प्रकारे त्यांची मुळे कापून टाकली गेली, ज्यांनी अत्याचार केले होते आणि सर्व प्रशंसा आहे सकल जगांचा पालनकर्ता अल्लाहसाठीच.
  46. हे पैगंबर (स.), यांना सांगा, कधी तुम्ही याचा तरी विचार केला, की जर अल्लाहने तुमची दृष्टी व श्रवणशक्ती तुमच्यापासून हिरावून घेतली आणि तुमच्या हृदयावर शिक्कामोर्तब केले तर अल्लाहशिवाय इतर कोणता असा ईश्वर आहे जो ह्या शक्ती तुम्हाला परत बहाल करू शकेल? पहा, कशाप्रकारे आम्ही वरचेवर आपली संकेतवचने त्यांच्यासमोर ठेवतो आणि हे कशाप्रकारे त्याच्यापासून दृष्टी चुकवितात.
  47. सांगा, कधी तुम्ही विचार केला की जर अल्लाहकडून अकस्मात किंवा जाहिररीत्या तुमच्यावर प्रकोप आला तर अत्याचार्‍यांशिवाय इतर कोणी नष्ट होईल काय?
  48. आम्ही जो पैगंबर पाठवितो तो याचकरिता तर पाठवितो की ते सदाचारी लोकांना खुषखबरी देणारे व दुराचारी लोकांना भय दाखविणारे असतील. मग ते लोक त्यांचे म्हणणे ऐकतील व आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करतील त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भयाचा व दुःखाचा प्रसंग नाही.
  49. आणि जे आमच्या वचनांना खोटे ठरवतील ते आपल्या अवज्ञेपायी शिक्षा भोगल्याशिवाय राहणार नाहीत.
  50. हे पैगंबर (स.), यांना सांगा, ’’मी तुम्हाला असे सांगत नाही की माझ्याजवळ अल्लाहचे खजिने आहेत. मला परोक्षाचे ज्ञानही नाही व असेही सांगत नाही की मी ईशदूत आहे. मी तर केवळ त्या ’वह्य’ (दिव्य अवतरण) चे पालन करतो जे माझ्यावर अवतरले जाते.’’ मग यांना विचारा, ’’आंधळा व डोळस दोघे समान असू शकतात काय? तुम्ही विचार करीत नाही?’’
  51. आणि हे पैगंबर (स.), तुम्ही या (दिव्य प्रकटनाच्या ज्ञाना) द्वारे त्या लोकांना उपदेश करा जे लोक याचे भय बाळगतात की, आपण आपल्या पालनकर्त्यासमोर कधी तरी अशा अवस्थेत हजर केले जाऊ जेथे त्याच्याशिवाय कोणीही (असा सत्ताधीश) नसेल जो त्यांचा समर्थक व सहायक असेल किंवा त्यांची शिफारस करील, कदाचित (या उपदेशाने सावध होऊन) त्यांनी ईशपरायणतेचे वर्तन अंगिकारावे.
  52. आणि जे लोक आपल्या पालनकर्त्याचा अहोरात्र धावा करीत असतात व त्याची प्रसन्नता प्राप्त करण्यात गुंतलेले असतात त्यांना आपल्यापासून दूर लोटू नका त्यांच्या हिशेबातील कोणत्याही गोष्टीचा भार तुमच्यावर नाही व तुमच्या हिशेबातील कोणत्याही गोष्टीचा भार त्यांच्यावर नाही. याउपर देखील जर तुम्ही त्यांना दूर लोटले तर अत्याचारी लोकांत गणले जाल,
  53. खरे पाहता आम्ही अशा तर्‍हेने या लोकांपैकी काहींना काहींच्याद्वारे परीक्षेत टाकले आहे जेणेकरून त्यांनी त्यांना पाहून म्हणावे, ’’हेच ते आमच्यातील लोक आहेत ज्यांच्यावर अल्लाहची दया व कृपा झाली आहे?’’ होय! काय अल्लाह आपल्या कृतज्ञ दासांना यांच्यापेक्षा अधिक जाणत नाही?
  54. जेव्हा तुमच्याजवळ ते लोक येतील जे आमच्या वचनांवर श्रद्धा ठेवतात तेव्हा त्यांना सांगा, ’’तुमच्यावर शांती असो. तुमच्या पालनकर्त्याने दया आणि कृपेचा परिपाठ स्वतःसाठी अनिवार्य केला आहे. (ही त्याची दया व कृपाच आहे की) जर तुमच्यापैकी एखाद्याने अज्ञानाने एखादे दुष्कर्म केले असेल व नंतर पश्चात्ताप व्यक्त केला व सुधारणा केली तर तो त्याला माफ करतो, नरमाई दाखवितो.’’
  55. आणि आम्ही अशा तर्‍हेने आमची संकेतचिन्हे उघड करून प्रस्तुत करतो, जेणेकरून अपराध्यांचा मार्ग अगदी स्पष्ट व्हावा.
  56. हे पैगंबर (स.), यांना सांगा, ’’तुम्ही लोक अल्लाहशिवाय इतर ज्यांचा धावा करीत आहात त्यांची भक्ती करण्यास मला मनाई करण्यात आली आहे.’’ सांगा, ’’मी तुमच्या इच्छांचे अनुकरण करणार नाही, जर मी असे केले तर मी पथभ्रष्ट होईल, सरळमार्ग प्राप्त करणार्‍यांपैकी राहू शकणार नाही.’’
  57. सांगा, ’’मी आपल्या पालनकर्त्यातर्फे एका उज्ज्वल प्रमाणावर कायम आहे आणि तुम्ही त्याला खोटे ठरविले आहे, आता माझ्या अखत्यारीत ती गोष्ट मुळीच नाही जिच्याबद्दल तुम्ही घाई करीत आहात, निर्णयाचा सर्वस्वी अधिकार अल्लाहला आहे. तोच सत्य बाबी सांगतो आणि तोच सर्वोत्कृष्ट निवाडा करणारा आहे.’’
  58. सांगा, ’’जर एखादे वेळी ती गोष्ट माझ्या अखत्यारीत असती जिच्यासाठी तुम्ही घाई करीत आहात तर माझ्यात आणि तुमच्यात केव्हाच निर्णय लागला असता. परंतु अल्लाह अधिक चांगले जाणतो की अत्याचार्‍यांशी कोणता व्यवहार केला गेला पाहिजे.
  59. त्याच्याजवळच परोक्षाच्या किल्ल्या आहेत ज्यांचे ज्ञान त्याच्याशिवाय इतर कोणालाच नाही. समुद्र व जमिनीत जे काही आहे ते सर्व त्याला माहीत आहे. झाडावरून गळून पडणारे कोणतेच पान असे नाही ज्याची माहिती त्याला नाही जमिनीच्या अंधकारपूर्ण थरांत कोणताच दाणा असा नाही, ज्याचे त्याला ज्ञान नाही. आर्द्र व शुष्क सर्वकाही एका खुल्या ग्रंथात लिहिलेले आहे.
  60. तोच तर आहे जो रात्री तुमचे प्राण हरण करतो व दिवसा जे काही तुम्ही करता ते जाणतो, मग, दुसर्‍या दिवशी तो तुम्हाला याच ऐहिक जगात परत पाठवितो जेणेकरून जीवनाची ठराविक मुदत पूर्ण व्हावी. सरतेशेवटी त्याच्याकडेच तुम्हाला परत जायचे आहे, मग तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय करीत होता.
  61. आपल्या दासांवर तो संपूर्ण प्रभुत्व राखतो आणि तुमच्यावर निरीक्षक नियुक्त करून पाठवितो, येथपावेतो की जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याची मृत्यूघटका येऊन ठेपते तेव्हा त्याने पाठविलेले दूत त्याचे प्राण हरण करतात व आपले कर्तव्य बजावण्यात जरा देखील चूक करीत नाहीत
  62. मग सर्वचेसर्व आपल्या खर्‍या स्वामी अल्लाहकडे परत आणले जातात, सावधान! निर्णयाचे सर्व अधिकार त्यालाच प्राप्त आहेत आणि हिशोब घेण्यात तो अत्यंत सत्वर आहे.’’
  63. हे पैगंबर (स.), यांना विचारा, वाळवंट व समुद्राच्या अंधकारांत कोण तुम्हाला संकटापासून वाचवितो? कोण आहे ज्याच्याजवळ तुम्ही (संकटसमयी) गयावया करून आणि गुपचुपपणे प्रार्थना करता? कुणाला म्हणता की जर त्याने या संकटातून वाचविले तर आम्ही जरूर कृतज्ञ बनू? 
  64. सांगा, अल्लाह तुम्हाला यापासून व प्रत्येक यातनांपासून मुक्त करतो. मग तुम्ही इतरांना त्याचा भागीदार ठरविता. 
  65. सांगा, ’’तो याला समर्थ आहे की तुम्हावर एखादा प्रकोप वरून कोसळवेल, अथवा तुमच्या पायाखालून उसळवेल किंवा तुम्हाला गटागटांत विभागून एका गटाला दुसर्‍या गटांच्या शक्तीचा आस्वाद चाखवील.’’ पहा, आम्ही कशाप्रकारे वरचेवर विविध पद्धतींनी आमची संकेतवचने यांच्यासमोर प्रस्तुत करीत आहोत की कदाचित यांना सत्य समजावे.
  66. तुमचे समाजबांधव त्याचा इन्कार करीत आहेत, वास्तविक पाहता ते सत्य आहे. यांना सांगा की मी तुमच्यावर राखणदार बनविलो गेलो नाही
  67. प्रत्येक वार्तेच्या प्रकट होण्याची एक वेळ निर्धारित आहे. लवकरच तुम्हाला स्वतःच परिणाम कळेल.
  68. आणि हे पैगंबर (स.), जेव्हा तुम्ही पाहाल की लोक आमच्या संकेतवचनांवर टीका करीत आहेत तर त्यांच्यापासून दूर व्हा - येथपावेतो की त्यांनी हे संभाषण सोडून दुसर्‍या गोष्टीत लागावे. आणि जर एखादे वेळी शैतानाने तुम्हाला विसर पाडला, तर जेव्हा तुम्हाला त्या चुकीची जाणीव होईल त्यानंतर पुन्हा अशा अत्याचार्‍यांच्या जवळ बसू नका.
  69. त्याच्या हिशोबातील कोणत्याही गोष्टीची जबाबदारी पापभीरू लोकांवर नाही, परंतु त्यांना उपदेश करणे तुमचे कर्तव्य आहे कदाचित ते दुर्वर्तनापासून वाचू शकतील.
  70. सोडा त्या लोकांना ज्यांनी आपल्या धर्माला खेळ व तमाशा बनवून टाकले आहे आणि ज्यांना ऐहिक जीवनाने भुलविले आहे. होय, त्यांना हा कुरआन ऐकवून उपदेश व ताकीद देत राहा की एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती स्वतः केलेल्या कृत्यांच्या आपत्तीत सापडू नये, आणि जर अशा अवस्थेत सापडली तर अल्लाहपासून वाचविणारा कोणी समर्थक व सहायक आणि कोणी बाजू मांडणारा तिच्यासाठी नसेल, आणि वाटेल ती वस्तू मोबदल्यात देऊन सुटू इच्छित असेल तर तीसुद्धा स्वीकारली जाणार नाही. कारण असे लोक तर स्वतः आपल्या कर्माच्या परिणामस्वरूप पकडले जातील. त्यांना तर सत्याच्या आपल्या इन्काराच्या मोबदल्यात उकळते पाणी पिण्यास मिळेल आणि दुःखदायक प्रकोप भोगावयास मिळेल.
  71. हे पैगंबर (स.)! त्यांना विचारा, काय आम्ही अल्लाहला सोडून त्यांचा धावा करावा जे आम्हाला लाभही पोहोचवू शकत नाहीत व नुकसानही नाही? आणि ज्याअर्थी अल्लाहने आम्हाला सन्मार्ग दाखवून दिला आहे तर काय आम्ही परत पावली मागे फिरावे? काय आम्ही आपली दशा त्या माणसासारखी करून घ्यावी ज्याला शैतानांनी वाळवंटात भटकविले असावे आणि तो हैराण व विक्षिप्तपणे फिरत असावा, वास्तविकपणे त्याचे सोबती त्याला हाका मारीत असतील की इकडे ये, हा सरळमार्ग अस्तित्वात आहे, सांगा, ’’वस्तुतः खरे मार्गदर्शन तर केवळ अल्लाहचेच मार्गदर्शन आहे आणि त्याच्याकडून आम्हाला हा आदेश मिळाला आहे की सर्व सृष्टीच्या स्वामीपुढे मान तुकवा.
  72. नमाज स्थापित करा आणि त्याच्या अवज्ञेपासून दूर राहा, त्याच्याकडेच तुम्ही एकत्र केले जाल.’’
  73. तोच आहे ज्याने आकाश व पृथ्वीला सत्यानिशी निर्माण केले आहे. आणि ज्या दिवशी तो सांगेल की पुनरुत्थान व्हावे तेव्हा त्याच दिवशी ते होईल. त्याचेकथन सर्वस्वी सत्य आहे आणि ज्या दिवशी नरसिंग फुंकले जाईल त्या दिवशी सत्ता त्याचीच असेल, तो परोक्ष आणि अपरोक्ष प्रत्येक वस्तूचा ज्ञाता आहे आणि बुद्धिमान व जाणकार आहे.
  74. इब्राहीम (अ.) च्या घटनेची आठवण करा जेव्हा त्याने आपल्या पित्या आजरला सांगितले होते, ’’काय तू मूर्तींना ईश्वर बनविलेस, मी तर तुला व तुझ्या लोकांना उघड पथभ्रष्ट पाहात आहे.’’
  75. इब्राहीम (अ.) ला आम्ही अशाप्रकारे पृथ्वी व आकाशांचे व्यवस्थापन दाखवीत होतो आणि याकरिता की तो विश्वास राखणार्‍यांपैकी व्हावा.
  76. म्हणून जेव्हा रात्र त्याच्यावर पसरली तेव्हा त्याने एक नक्षत्र पाहिले, म्हणाला, ’’हा माझा पालनकर्ता आहे परंतु जेव्हा ते मावळले तेव्हा म्हणाला, अस्त पावणार्‍यांवर तर मी आकर्षित होत नाही.
  77. मग जेव्हा चकाकणारा चंद्र पाहिला तेव्हा म्हणाला, हा माझा पालनकर्ता आहे. मग जेव्हा तो देखील अस्त पावला तर म्हणाला, जर माझ्या पालनकर्त्याने माझे मार्गदर्शन केले नसते तर मी सुद्धा मार्गभ्रष्ट लोकांत सामील झालो असतो.
  78. मग जेव्हा सूर्याला दैदीप्यमान पाहिले तर म्हणाला, हा आहे माझा पालनकर्ता, हा सर्वात मोठा आहे. परंतु तोही जेव्हा लयास गेला तेव्हा इब्राहीम (अ.) उद्गारला, हे माझ्या जातीबांधवांनो! मी त्या सर्वांपासून विरक्त आहे ज्यांना तुम्ही ईश्वराचा भागीदार ठरविता.
  79. मी तर एकाग्र होऊन आपले मुख त्या अस्तित्वाकडे केले आहे ज्याने जमीन आकाशांना निर्माण केले आहे आणि मी कदापि अनेकेश्वरवाद्यांपैकी नाही.’’
  80. त्याचे लोक त्याच्याशी भांडू लागले तर त्याने लोकांना सांगितले, ’’काय तुम्ही लोक अल्लाहच्या बाबतीत माझ्याशी भांडता? वास्तविक पाहता त्याने मला सरळमार्ग दाखविला आहे. आणि तुम्ही ठरविलेल्या भागीदारांना मी भीत नाही. होय, जर माझ्या पालनकर्त्याने काही इच्छिले तर ते अवश्य घडू शकते. माझ्या पालनकर्त्याचे ज्ञान प्रत्येक वस्तूवर पसरले आहे, मग काय तुम्ही शुद्धीवर येणार नाही?
  81. आणि मग मी तुमच्या मानलेल्या भागीदारांना कसे भ्यावे जेव्हा तुम्ही अल्लाहबरोबर त्या वस्तूंना ईशत्वामध्ये भागीदार ठरविण्यास भीत नाही ज्यांच्यासाठी त्याने तुम्हांवर कोणतेही प्रमाण अवतरले नाही? आम्हा उभयपक्षांपैकी कोण निश्चिंतता व संतोषाला जास्त पात्र आहे?
  82. सांगा, जर काही तुम्हाला ज्ञान असेल तर खरे पाहता शांती तर त्यांच्यासाठी आहे आणि सन्मार्गावर तेच आहेत ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि ज्यांनी आपल्या श्रद्धेला अत्याचाराशी जोडले नाही.’’
  83. हे होते आमचे ते बोधप्रमाण जे आम्ही इब्राहीम (अ.) ला त्याच्या लोकांविरूद्ध प्रदान केले. आम्ही ज्याला इच्छितो त्याला उच्च मान मरातब बहाल करतो. सत्य असे आहे की तुमचा पालनकर्ता अत्यंत बुद्धिमान व ज्ञानी आहे.
  84. मग आम्ही इब्राहीम (अ.) ला, इसहाक (अ.) व याकूब (अ.) प्रमाणेच संतती दिली व प्रत्येकाला सन्मार्ग दाखविला (तोच सन्मार्ग जो) त्याच्याअगोदर नूह (अ.) ला दाखविला होता. आणि त्याच्याच वंशात आम्ही दाऊद (अ.), सुलैमान (अ.), अय्यूब (अ.), यूसुफ (अ.), मूसा (अ.) आणि हारून (अ.) यांना (सन्मार्ग) दाखविला. अशा प्रकारे आम्ही सदाचरण करणार्‍या लोकांना त्यांच्या पुण्याईचे फळ देतो.
  85. (त्यांच्याच संततीत) जकरिय्या (अ.), यह्या (अ.), ईसा (अ.) आणि इलयास (अ.) यांना (मार्गस्थ केले). त्यांच्यापैकी प्रत्येकजण सदाचारी होता.
  86. (त्यांच्याच वंशातून) इस्माईल (अ.), यसअ (अ.) आणि यूनुस (अ.) आणि लूत (अ.) यांना (मार्ग दाखविला). यांच्यापैकी प्रत्येकाला सर्व जगवासियांवर आम्ही श्रेष्ठत्व प्रदान केले.
  87. त्याचप्रमाणे त्यांचे वाड-वडील व त्यांची संतती व त्यांच्या भाऊबंदापैकी बहुतेकांना आम्ही उपकृत केले. त्यांना आमच्या सेवेसाठी निवडले आणि सरळ मार्गाकडे त्यांचे मार्गदर्शन केले!
  88. हे अल्लाहचे मार्गदर्शन आहे ज्याच्याद्वारे तो आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो. परंतु जर एखाद्या वेळी त्या लोकांनी अनेकेश्वरवाद स्वीकारला असता तर त्यांचे सर्व कर्मकृत्य नष्ट झाले असते.
  89. ते लोक होते ज्यांना आम्ही ग्रंथ, अधिकार आणि प्रेषितत्व प्रदान केले होते. आता जर हे लोक हे मान्य करण्यास नकार देत असतील तर (पर्वा नाही). आम्ही काही अन्य लोकांना हा कृपा-प्रसाद सुपूर्द केला आहे जे त्याला नाकारीत नाहीत.
  90. हे पैगंबर (स.), अल्लाहकडून मार्गदर्शन प्राप्त झालेले तेच लोक होते, त्यांच्याच मार्गावर तुम्ही चला आणि सांगून टाका की मी (या प्रचार व मार्गदर्शनाच्या) कामासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नाही, हा तर सार्वजनिक उपदेश आहे तमाम जगवासियांसाठी.
  91. या लोकांनी अल्लाहसंबंधी फारच चुकीचा अंदाज लावला जेव्हा सांगितले की अल्लाहने कोणत्याही माणसावर काहीही अवतरलेले नाही. यांना विचारा, मग तो ग्रंथ ज्याला मूसा (अ.) ने आणले होते, जो तमाम मानवजातीसाठी प्रकाश व मार्गदर्शक होता, ज्याला तुम्ही खंड-खंड करून ठेवता, काही दाखविता व बरेचसे लपवून ठेवता, आणि ज्याच्या माध्यमाने तुम्हाला ते ज्ञान दिले गेले; जे तुम्हालाही प्राप्त झाले नव्हते व तुमच्या वाडवडिलांना देखील नव्हते, तर मग तो अवतरविणारा कोण होता? - केवळ एवढे सांगा की अल्लाह, मग त्यांना त्यांच्या युक्तीवादाशी खेळण्यास मोकळे सोडा.
  92. (त्याच ग्रंथासारखा) हा एक ग्रंथ आहे जो आम्ही अवतरला आहे. अत्यंत कल्याणकारी व समृद्धी प्रदान करणारा आहे. त्या वस्तूची सत्यता प्रमाणित करतो जी यापूर्वी आली होती आणि याकरिता अवतरित केला गेला आहे की याद्वारे तुम्ही लोकवस्तीच्या या केंद्राला (अर्थात मक्का) आणि त्याच्या परिसरात राहणार्‍यांना सावध करावे. जे लोक परलोकाला मानतात ते या ग्रंथावर श्रद्धा ठेवतात आणि त्यांची अवस्था अशी आहे की आपल्या नमाजात नियमितपणा राखतात.
  93. आणि त्या माणसापेक्षा मोठा अत्याचारी इतर कोण असेल जो अल्लाहवर खोटे कुभांड रचतो अथवा सांगतो की माझ्याकडे दिव्य प्रकटन आले आहे. खरे पाहता त्यांच्यावर कसलेही दिव्य प्रकटन अवतरले गेले नाही. अथवा जो अल्लाहच्या अवतरित केलेल्या वस्तूच्या विरोधात सांगत असेल की मी देखील अशी वस्तू अवतरवून दाखवीन? किती छान होईर्ल बरे जर तुम्ही अत्याचार्‍यांना अशा दशेत पाहू शकाल जेव्हा ते मृत्यूच्या घरघरीत गटांगळ्या घेत असतील आणि दूत हात पुढे करून करून सांगत असतील की, ’’आणा, काढा आपले प्राण, आज तुम्हाला त्या गोष्टींपायी अपमानजनक यातना दिली जाईल, ज्या तुम्ही अल्लाहवर दोषारोप करून हकनाक बरळत होता आणि त्याच्या संकेतवचनांविरूद्ध उद्धटपणा करीत होता.’’
  94. (आणि अल्लाह फर्मावील) ’’तर पहा आता तुम्ही तसेच एकटे आमचे समोर हजर झालात जशा प्रकारे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा एकाकी जन्माला घातले होते, जे काही आम्ही तुम्हाला जगांत दिले होते ते सर्व तुम्ही पाठीमागे सोडून आला आहात आणि आता आम्हाला तुमच्यासमवेत तुमची शिफारस करणारे देखील दिसत नाहीत, ज्यांच्याबद्दल तुम्ही समजत होता की तुमचे कार्य सिद्धीस नेण्यात त्यांचाही काही वाटा आहे, तुमचे आपापसातील सर्व संबंध तुटले आणि ते सर्व तुमच्यापासून अलिप्त झालेले आहेत ज्यांचा तुम्ही अहंकार बाळगत होता!’’
  95. दाणे आणि बीज काढणारा अल्लाह आहे. तोच सजीवाला निर्जीवातून काढतो आणि तोच निर्जीवाला सजीवातून बाहेर काढणारा आहे. ही सर्व कामे करणारा तर अल्लाहच आहे, मग तुम्ही कोठे भरकटले जात आहात?
  96. रात्रीचे आवरण फाडून तोच प्रातःकाळ करतो, त्यानेच रात्रीला विश्रांतीची वेळ बनविली आहे. त्यानेच चंद्र व सूर्याच्या उदय आणि अस्ताचे प्रमाण ठरविले आहे. हे सर्व त्याच प्रचंड सामर्थ्य व ज्ञान असणार्‍याचे निश्चित केलेले अंदाज आहेत.
  97. आणि तोच आहे ज्याने तुमच्यासाठी तार्‍यांना वाळवंट व समुद्रातील अंधःकारात मार्ग शोधण्याचे साधन बनविले. पहा, आम्ही संकेत उघड करून सांगितले आहेत त्या लोकांसाठी की ज्यांना ज्ञान आहे.
  98. आणि तोच आहे ज्याने एका जिवापासून तुम्हाला निर्माण केले मग प्रत्येकासाठी एक विश्रामस्थान आहे आणि एक ती सुपूर्द केली जाण्याची जागा, हे संकेत आम्ही स्पष्ट केले आहेत त्या लोकांसाठी जे बोध घेतात
  99. आणि तोच आहे ज्याने आकाशातून पाण्याचा वर्षाव केला मग त्याद्वारे सर्व प्रकारच्या वनस्पती उगविल्या, मग त्याद्वारे हिरवीगार शेते व झाडे उगविली, मग त्याच्यापासून थरावर थर असलेले दाणे काढले आणि खजुराच्या फुलोर्‍यांतून फळांचे घोसच्या घोस उत्पन्न केले जे ओझ्यापायी झुकले जात आहेत आणि द्राक्षे, जैतून (ऑलिव्ह) व डाळिंबाच्या बागा, ज्यांची फळे एक दुसर्‍याशी साम्य तर ठेवतात तरीसुद्धा त्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. या झाडांना जेव्हा फळे येतात तेव्हा फळे येण्याची व मग ती पिकण्याची प्रक्रिया जरा विचारपूर्वक पाहा, या गोष्टीत संकेत आहेत त्या लोकांसाठी जे श्रद्धा ठेवतात.
  100. यावरही लोकांनी ’जिन्न’ना (अदृश्य निर्मितींना) अल्लाहचे भागीदार ठरविले वास्तविक पाहता तो त्यांचा निर्माता आहे आणि न समजता उमजता त्याच्यासाठी मुले व मुली बनविल्या, खरे पाहता तो पवित्र व उच्चतर आहे, त्या गोष्टीपासून ज्या हे लोक बोलतात.
  101. तो तर आकाशांचा व पृथ्वीचा आविष्कारक आहे, त्याची कोणी संतती कशी असू शकेल? ज्याअर्थी त्याची कोणीही जीवनसाथी नाही? त्याने प्रत्येक वस्तू निर्माण केली आहे व त्याला प्रत्येक वस्तूचे ज्ञान आहे.
  102. हा आहे अल्लाह तुमचा पालनकर्ता, कोणीही ईश्वर त्याच्या व्यतिरिक्त नाही, प्रत्येक वस्तूचा निर्माता. म्हणून तुम्ही त्याचीच भक्ती करा आणि तो प्रत्येक वस्तूचा रक्षणकर्ता आहे.
  103. दृष्टी त्याला पाहू शकत नाही पण तो दृष्टीला पाहत असतो. तो अत्यंत सूक्ष्मदर्शी आणि जाणकार आहे.
  104. पहा तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याकडून डोळे उघडणारा प्रकाश आला आहे आता जो डोळसपणे कार्य करील तो आपलेच भले करील आणि जो आंधळ्याप्रमाणे करील तो स्वतःचे नुकसान करून घेईल. मी तुमच्यावर काही पहारेकरी म्हणून नव्हे!
  105. अशा प्रकारे आम्ही आमचे संकेत वरचेवर विविध प्रकारे विशद याकरिता करतो की ह्या लोकांनी म्हणावे, ’’तुम्ही एखाद्याकडून शिकून आला आहात.’’ आणि ज्या लोकांना ज्ञान आहे त्यांच्यावर वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी.
  106. हे पैगंबर (स.), त्या ’वह्य’ - दिव्य अवतरणाचे अनुसरण करीत जा जे तुमच्यावर तुमच्या पालनकर्त्याकडून अवतरले आहे कारण त्या एका पालनकर्त्याशिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही. आणि अनेकेश्वरवादींच्या पाठीमागे लागू नका.
  107. जर अल्लाहने इच्छिले असते तर या लोकांनी अनेकेश्वरवाद केलाच नसता. तुम्हाला आम्ही त्यांच्यावर संरक्षक नेमलेले नाही की रखवालदार देखील नाही.
  108. आणि (हे मुसलमानांनो), हे लोक अल्लाहशिवाय ज्याचा धावा करतात त्यांचा उपहास करू नका, एखादे वेळेस असे होऊ नये की ते अनेकेश्वरवादाच्या पुढे जाऊन अज्ञानामुळे अल्लाहचा उपहास करू लागतील. आम्ही तर अशाच प्रकारे प्रत्येक गटासाठी त्याच्या कृतीला आकर्षक बनविले आहे, मग त्यांना आपल्या पालनकर्त्याकडेच परतून यावयाचे आहे, तेव्हा तो त्यांना दाखवील की ते काय करीत राहिले होते.
  109. हे लोक कठोर शपथा घेऊन-घेऊन सांगतात की जर एखादा संकेत (म्हणजे चमत्कार) आमच्यासमोर आला तर आम्ही त्यावर श्रद्धा ठेवू. हे पैगंबर (स.), यांना सांगा की, ’’संकेत तर अल्लाहच्या अखत्यारीत आहेत.’’ आणि बरे तुम्हाला कसे समजावयाचे की जरी संकेत आले तरी हे श्रद्धा ठेवणार नाहीत.
  110. आम्ही त्याचप्रमाणे यांच्या हृदयांना व दृष्टीला फिरवीत आहोत ज्याप्रमाणे यांनी प्रथमतः या ग्रंथावर श्रद्धा ठेवली नव्हती आम्ही यांना यांच्या दुर्वर्तनातच भटकण्यासाठी सोडून देत आहोत
  111. जर आम्ही यांच्यावर ईशदूत जरी अवतरले असते आणि मृत लोक यांच्याशी बोलले जरी असते आणि जगभरातील वस्तू जरी यांच्या दृष्टीसमोर गोळा केल्या असत्या तरीसुद्धा यांनी श्रद्धा ठेवली नसती, ही गोष्ट वेगळी की अल्लाहची इच्छा हीच असावी. (की यांनी श्रद्धा ठेवावी) परंतु बहुतेकजण अज्ञानाची कृत्ये करतात.
  112. आणि आम्ही तर अशाच प्रकारे नेहमी शैतानी प्रवृत्तीच्या मानव व जिन्न यांना प्रत्येक प्रेषितांचे शत्रू बनविले आहे जे एक दुसर्‍यापाशी तोंडपुजलेपणा, धोकेबाजी व फसवणूक करीत राहिले आहेत. जर तुमच्या पालनकर्त्याची ही इच्छा असती की ते असे करू नये तर त्यांनी कधीही केले नसते, म्हणून तुम्ही त्यांना त्यांच्या स्थितीत सोडून द्या की ते कुभांड रचीत राहतील.
  113. (हे सर्वकाही आम्ही त्यांना याचकरिता करू देत आहोत की) जे लोक परलोकावर श्रद्धा ठेवीत नाहीत त्यांची हृदये (या आकर्षक फसवणुकीकडे) आकर्षिली जावीत आणि त्याने ते प्रसन्न व्हावेत आणि त्या वाईट गोष्टींची कमाई करावी ज्यांची कमाई ते करू इच्छितात.
  114. मग ज्याअर्थी वस्तुस्थिती अशी आहे तर काय मी अल्लाहखेरीज इतर कोणी निर्णय करणारा शोधावा? खरे पाहता त्याने तर सर्व तपशीलासहित तुमच्याकडे ग्रंथ अवतरला आहे? आणि ज्या लोकांना आम्ही (तुमच्या अगोदर) ग्रंथ दिला होता, त्यांना माहीत आहे की हा ग्रंथ तुमच्या पालनकर्त्याकडूनच सत्यानिशी अवतरला आहे. म्हणून तुम्ही शंका घेणार्‍यांमध्ये सामील होऊ नका.
  115. तुमच्या पालनकर्त्याचे वचन सत्य व न्यायाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. कोणी त्याच्या आदेशांना बदलणारा नाही आणि तो सर्वकाही ऐकतो व जाणतो.
  116. आणि हे पैगंबर (स.), जर तुम्ही त्या लोकांतील बहुतेकांच्या सांगण्यानुसार वागू लागला जे भूतलावर वास्तव्य करून आहेत, तर ते तुम्हाला अल्लाहच्या मार्गापासून भ्रष्ट करतील, ते तर फक्त कल्पनेच्या आधारे चालतात व तर्क लढवितात.
  117. खरे पाहता तुमचा पालनकर्ता अधिक चांगल्याप्रकारे जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून हटला आहे आणि कोण सन्मार्गावर आहे.
  118. मग जर तुम्ही लोक अल्लाहच्या वचनांवर श्रद्धा ठेवता तर ज्या जनावरावर अल्लाहचे नाव घेतले गेले आहे त्याचे मांस खा.
  119. ज्यावर अल्लाहचा नामोच्चार झाला असेल तुम्ही ती वस्तू का खाऊ नये? वस्तुतः ज्या वस्तूंचा उपयोग अगदी नाइलाज झाल्याखेरीज इतर सर्व परिस्थितीत अल्लाहने निषिद्ध ठरविला आहे त्यांचा तपशील त्याने तुम्हाला दिला आहे. पुष्कळशा लोकांची परिस्थिती अशी आहे की ज्ञानाविना केवळ आपल्या इच्छेपोटी पथभ्रष्ट करणार्‍या गोष्टी करतात. या मर्यादा ओलांडणार्‍यांना तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो.
  120. तुम्ही उघड गुन्ह्यापासूनही अलिप्त राहा आणि गुप्त गुन्ह्यापासूनसुद्धा, जे लोक पापकर्मे करतात ते आपल्या या कर्माचा मोबदला अवश्य प्राप्त करतील.
  121. आणि जे जनावर अल्लाहचे नाव घेऊन कापले गेले नसेल त्याचे मांस खाऊ नका, असे करणे अवज्ञा होय. शैतान आपल्या सोबत्यांच्या मनात शंका व आक्षेप भरवितात ते याकरिता की त्यांनी तुमच्याशी भांडण करावे, परंतु जर तुम्ही त्यांची आज्ञा मानली तर निश्चितच तुम्ही अनेकेश्वरवादी आहात.
  122. तो मनुष्य जो अगोदर मृत होता मग आम्ही त्याला जीवन दिले आणि त्याला प्रकाश प्रदान केला ज्याच्या उजेडात तो लोकांमध्ये जीवनाची वाटचाल करतो, तो त्या माणसासारखा होऊ शकतो काय जो अंधःकारात पडलेला असेल आणि कोणत्याही प्रकारे त्यातून बाहेर पडत नसेल? अश्रद्धावंतांकरिता तर त्यांची कृत्ये अशाचप्रकारे आकर्षक बनविण्यात आली आहेत,
  123. आणि अशाचप्रकारे आम्ही प्रत्येक वस्तीत तिच्या मोठमोठ्या अपराध्यांना गुंतविले आहे की तेथे त्यांनी आपल्या कुटिल नीतीचे जाळे पसरवावे. खरे पाहता ते आपल्या कुटिलतेच्या जाळ्यांत स्वतःच गुरफटतात, परंतु त्यांना त्याचे भान नाही.
  124. जेव्हा त्यांच्यासमोर एखादे वचन येते तेव्हा ते सांगतात, ’’आम्ही मान्य करणार नाही जोपर्यंत ती गोष्ट स्वतः आम्हाला दिली जात नाही जी अल्लाहच्या प्रेषितांना दिली गेली आहे.’’ अल्लाह अधिक चांगल्या प्रकारे जाणतो की आपल्या प्रेषितत्वाचे काम कोणाकडून घ्यावे व कसे घ्यावे? जवळच आहे तो काळ, जेव्हा या अपराधींना आपल्या कुटिलतेपायी अल्लाहपाशी, अपमान आणि कठोर यातनेला सामोरे जावे लागेल.
  125. म्हणून (ही वस्तुस्थिती आहे की) ज्याला अल्लाह मार्गदर्शन प्रदान करण्याची इच्छा करतो त्याचे मन इस्लामकरिता मोकळे करतो आणि ज्याला पथभ्रष्टतेत गुरफटविण्याची इच्छा करतो त्याच्या मनाला संकुचित बनवितो आणि अशा प्रकारे बनवितो की (इस्लामची कल्पना करताच) त्याला असे वाटू लागते जणू त्याचा आत्मा वर आकाशाकडे गमन करत आहे. (अशा प्रकारे अल्लाह सत्यापासून पलायन व त्याच्या द्वेषाची) अपवित्रता त्या लोकांवर प्रस्थापित करतो जे श्रद्धा ठेवीत नाहीत.
  126. वास्तविकतः हा मार्ग तुमच्या पालनकर्त्याचा सरळमार्ग आहे आणि त्याची चिन्हे त्या लोकांकरिता स्पष्ट केली आहेत जे उपदेश आत्मसात करतात.
  127. त्यांच्या पालनकर्त्याजवळ त्यांच्याकरिता शांतीचे निवासस्थान आहे आणि तो त्यांचा वाली आहे, त्या उचित कार्यप्रणालीमुळे जी त्यांनी अंगिकारली.
  128. ज्या दिवशी अल्लाह या सर्वांना वेढून एकत्र करील त्या दिवशी तो जिन (जिनरूपी शैतान) यांना संबोधून फर्मावील, ’’हे जिनसमुदाय! तुम्ही तर मानवजातीचा खूपच उपयोग करून घेतला,’’ मानवांपैकी जे त्यांचे सोबती होते ते म्हणतील, ’’हे पालनकर्त्या, आम्हापैकी प्रत्येकाने एकमेकांचा खूपच उपयोग करून घेतला आणि आम्ही त्या घटकेपर्यंत येऊन पोहचलो आहोत जी तू आम्हासाठी निश्चित केली होती.’’ अल्लाह फर्मावील, ’’बरे तर अग्नी तुमचे निवासस्थान आहे, त्यांत तुम्ही सदैव राहाल.’’ यापासून तेच लोक वाचतील ज्यांना अल्लाह वाचवू इच्छील, निःसंशय तुमचा पालनकर्ता बुद्धिमान व सर्वज्ञ आहे.
  129. पहा, अशा प्रकारे आम्ही (परलोकात) अत्याचार्‍यांना एकमेकाचे सोबती बनवू, हे त्या कर्मामुळे जे ते (जगात एक दुसर्‍याच्या सहकार्याने) करीत होते.
  130. (त्याप्रसंगी अल्लाह त्यांना हेदेखील विचारील की) ’’हे जिन्न व मानवसमुदाय! काय तुमच्यापाशी स्वतः तुमच्यापैकी असे प्रेषित आले नव्हते जे तुम्हाला माझी संकेतवचने ऐकवीत होते आणि या दिवसाच्या परिणामाचे भय दाखवीत होते.’’ ते म्हणतील, ’’होय, आम्ही आमच्याविरूद्ध स्वतःच ग्वाही देत आहोत.’’ आज ऐहिक जीवनाने या लोकांना फसविले आहे, परंतु त्यावेळेस ते स्वतः आपल्याविरूद्ध ग्वाही देतील की ते अश्रद्ध होते
  131. (ही साक्ष त्यांच्याकडून या कारणास्तव घेतली जाईल की हे सिद्ध व्हावे की) तुमचा पालनकर्ता वस्त्यांना अत्याचाराने नष्ट करणारा नव्हता जेव्हा त्यांचे निवासी वास्तवतेपासून अनभिज्ञ असावेत.
  132. प्रत्येक माणसाचा दर्जा त्याच्या कर्मानुसार आहे आणि तुमचा पालनकर्ता लोकांच्या कर्मापासून गाफील नाही.
  133. तुमचा पालनकर्ता निरपेक्ष आहे आणि त्याची अनुकंपा मोठी आहे. जर तो इच्छील तर तुम्हाला पदच्युत करील व तुमच्या जागी इतर ज्यांची इच्छील त्या लोकांची नियुक्ती करील, ज्याप्रमाणे त्याने तुम्हाला इतर काही लोकांच्या वंशातून उभे केले.
  134. तुम्हाला ज्या गोष्टीचे वचन दिले जात आहे ती निश्चितच अस्तित्वात येणार आहे आणि तुम्ही अल्लाहला विवश करण्याचे सामर्थ्य बाळगत नाही.
  135. हे पैगंबर (स.), सांगून टाका की लोकहो, तुम्ही आपल्या जागी कर्म करीत राहा आणि मीसुद्धा आपल्या जागी कर्म करीत आहे. लवकरच तुम्हाला माहीत पडेल की शेवट कोणाकरिता उत्तम ठरणार आहे. ही वस्तुस्थिती आहे की अत्याचारी केव्हाही सफल होऊ शकत नाही.
  136. ज्या लोकांनी अल्लाहकरिता स्वतः उत्पन्न केलेल्या शेती व जनावरांपैकी एक वाटा ठरविला आहे, आणि सांगतात की हा अल्लाहकरिता आहे, स्वकल्पनेने, आणि हे आम्ही ठरविलेल्या ईशभागीदाराकरिता. मग जो वाटा त्यांनी ठरविलेल्या भागीदाराकरिता आहे तो तर अल्लाहला पोहोचत नाही परंतु जो अल्लाहसाठी आहे तो त्यांच्या भागीदाराला पोहोचतो. किती वाईट निर्णय घेतात हे लोक.
  137. आणि अशाच प्रकारे कित्येक बहुदेववादींसाठी त्यांच्या भागीदारांनी (कल्पित देवांनी) त्यांच्या मुलांच्या हत्येस आकर्षक बनविले आहे. जेणेकरून त्यांना विनाशात टाकावे आणि त्यांच्याकरिता त्यांचा धर्म धूसर बनविला. जर अल्लाहने इच्छिले असते तर त्यांनी तसे केले नसते म्हणून यांना मोकळीक द्या की यांनी आपल्या कुभांड रचण्यात मग्न राहावे.
  138. सांगतात की ही जनावरे व ही शेते सुरक्षित आहेत, यांना फक्त तेच लोक खाऊ शकतात ज्यांना आम्ही खाऊ द्यावे. वस्तुतः हे निर्बंध त्यांचे स्वनिर्मित आहेत. मग काही जनावरे आहेत ज्यांच्यावर स्वार होणे व ओझे लादणे निषिद्ध केले गेले आहे आणि काही जनावरे आहेत की ज्यांच्यावर हे अल्लाहचे नामोच्चारण करीत नाहीत आणि हे सर्वकाही त्यांनी अल्लाहवर मिथ्या रचले आहे, लवकरच अल्लाह त्यांना यांच्या कुभांड रचण्याचा बदला देईल.
  139. आणि सांगतात की जे काही या जनावरांच्या पोटांत आहे हे पुरुषांकरिता वैध आहे आणि आमच्या स्त्रियांसाठी निषिद्ध आहे, परंतु जर ते मृत असेल तर ते खाण्यात दोघे सामील होऊ शकतात. या गोष्टी ज्या त्यांनी रचल्या आहेत त्याचे फळ अल्लाह त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही, निःसंशय तो बुद्धिमान आहे व सर्व गोष्टींची त्याला खबर आहे.
  140. खचितच नुकसानीत आले ते लोक ज्यांनी आपल्या मुलांना अज्ञानाने व नादानपणे ठार केले आणि अल्लाह्च्या दिलेल्या उपजीविकेला अल्लाहवर थोतांड रचून निषिद्ध मानले. निश्चितच ते मार्गभ्रष्ट झाले व कदापि ते सरळमार्ग प्राप्त करणार्‍यांपैकी नव्हते.
  141. तो अल्लाहच आहे ज्याने तर्‍हेतर्‍हेच्या बागा व वेलीचे लतामंडपी उद्यान आणि पाणथळी (ओयासिस) निर्माण केल्या, शेती उगविली ज्यापासून विविध प्रकारची खाद्यान्ने प्राप्त होतात. त्याने जैतून (ऑलिव्ह) आणि डाळिंबाची झाडे निर्माण केली ज्यांची फळे बाह्यस्वरूपात सदृश्य बाळगतात आणि स्वादात विभिन्न असतात. खा, यांची फळे जेव्हा ही बहरतील आणि अल्लाहचा हक्क अदा करा जेव्हा त्याची कापणी कराल आणि मर्यादेचे उल्लंघन करू नका. अल्लाह मर्यादेचे उल्लंघन करणार्‍यांना पसंत करीत नाही.
  142. मग तोच तर आहे ज्याने, चतुष्पादांपैकी ती जनावरेदेखील निर्माण केली ज्यांच्याकडून स्वारी व ओझे वाहण्याची कामे घेतली जातात आणि ती जनावरेदेखील जे अन्न आणि वस्त्रांच्या उपयोगी पडतात. खा त्या वस्तूंतून ज्या अल्लाहने तुम्हाला प्रदान केल्या आहेत आणि शैतानचे अनुकरण करू नका की तो तुमचा उघड शत्रू आहे!
  143. या आठ नर व माद्या आहेत, दोन मेंढ्यांच्या जातीचे आणि दोन शेळ्यांच्या जातीचे. हे पैगंबर (स.), यांना विचारा की अल्लाहने त्यांचे नर निषिद्ध केलेले आहेत की माद्या अथवा ती कोकरे जे मेंढ्या व शेळ्यांच्या पोटात आहेत? ठीकठीक ज्ञानाच्या आधारे सांगा जर तुम्ही सत्यवचनी असाल.
  144. आणि अशाच तर्‍हेने दोन उंटाच्या जातीचे आणि दोन गाईच्या जातीचे. विचारा, यांचे नर अल्लाहने निषिद्ध केलेले आहेत अथवा माद्या की ती वासरे जी सांडणी व जी गाईच्या पोटात आहेत? तुम्ही त्यावेळी हजर होता काय जेव्हा अल्लाहने हे निषिद्ध केल्याची आज्ञा तुम्हाला दिली होती? मग त्या माणसापेक्षा मोठा अत्याचारी दुसरा कोण असेल ज्याने अल्लाहशी संबंधित खोटी गोष्ट सांगावी जेणेकरून ज्ञानाविनाच लोकांना चुकीचे मार्गदर्शन करावे. निःसंशय अल्लाह अशा अत्याचार्‍यांना सन्मार्ग दाखवीत नसतो.
  145. हे पैगंबर (स.), यांना सांगा की जे दिव्यप्रकटन (वह्य) माझ्याजवळ आले आहे त्याच्यात तर मला कोणतीही वस्तू अशी आढळत नाही जी एखाद्या खाणार्‍यासाठी निषिद्ध आहे. याखेरीज की ती मृत असेल किंवा सांडलेले रक्त असेल अथवा डुकराचे मांस जे अशुद्ध आहे अथवा असा मर्यादाभंग की अल्लाहशिवाय इतर कोणाच्या नावाने प्राणी बळी दिला गेला असेल. मग एखाद्याने नाइलाजाने (यांच्यातील एखादी वस्तू खाल्ली) आणि तो मर्यादाभंग करण्याची इच्छा बाळगत नसेल, आणि तो गरजेच्या मर्यादेचे उल्लंघन करीत नसेल तर निःसंशय तुमचा पालनकर्ता क्षमा करणारा व दया दाखविणारा आहे
  146. आणि ज्या लोकांनी यहूदी धर्म अवलंबिला त्यांच्यासाठी आम्ही नखधारी सर्व प्राणी निषिद्ध केले होते आणि गाय व बकरीची चरबीदेखील या व्यतिरिक्त की त्यांच्या पाठींना व त्यांच्या आतड्यांना लागलेली असावी अथवा हाडांना लागलेली असेल. ही आम्ही त्यांना त्यांच्या दुर्वर्तनाची शिक्षा दिली होती. आणि हे जे काही आम्ही सांगत आहोत अगदी खरे सांगत आहोत.
  147. आणि आता जर त्यांनी तुम्हाला खोटे ठरविले तर त्यांना सांगा की तुमच्या पालनकर्त्याचे कृपाछत्र विशाल आहे आणि अपराध्यांकडून त्याचा प्रकोप परतविला जाऊ शकत नाही.
  148. हे अनेकेश्वरवादी लोक (तुमच्या या गोष्टीच्या उत्तरादाखल) जरूर सांगतील की, ’’जर अल्लाहने इच्छिले असते तर आम्हीही शिर्क (अनेकेश्वरवाद) केले नसते आणि आमच्या वाडवडिलांनी देखील, आणि आम्ही एखाद्या वस्तूला निषिद्ध देखील ठरविले नसते.’’ अशाच खोट्या गोष्टी रचून रचून यांच्यापूर्वीच्या लोकांनी देखील सत्याला खोटे पाडले होते, इथपावेतो की सरतेशेवटी आमच्या प्रकोपाचा आस्वाद त्यांनी चाखला, यांना सांगा, ’’तुमच्याजवळ काही ज्ञान आहे काय जे तुम्ही आमच्यासमोर सादर करू शकाल? तुम्ही तर केवळ कल्पनाविलास करीत आहात, नुसते तर्क लढवीत आहात.
  149. मग सांगा, (तुमच्या या वादाविरूद्ध) ’’सत्याप्रत नेणारे, बोधप्रमाण तर अल्लाहपाशीच आहे, निःसंशय जर अल्लाहने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांना मार्गदर्शन केले असते.’’
  150. यांना सांगा की, ’’आणा, आपले ते साक्षीदार जे या गोष्टीची साक्ष देतील की अल्लाहनेच या वस्तू निषिद्ध केल्या आहेत.’’ मग जर त्यांनी (खोटी) साक्ष दिली तर तुम्ही त्यांच्याबरोबर ग्वाही देऊ नका, आणि त्यांच्या इच्छेचे मुळीच अनुसरण करू नका ज्यांनी आमचे संकेत खोटे ठरविले आहेत आणि जे मरणोत्तर जीवनाचा इन्कार करतात आणि जे इतरांना आपल्या पालनकर्त्यासमान ठरवितात.
  151. हे पैगंबर (स.), यांना सांगा की, ’’या, मी तुम्हाला ऐकवितो की तुमच्या पालनकर्त्याने तुमच्यावर काय निर्बंध घातले आहेत. हे की त्याच्यासमवेत कुणालाही भागीदार बनवू नका आणि आई-वडिलांशी सद्वर्तन करा. आणि आपल्या संततीला दारिद्र्याच्या भीतीने ठार मारू नका, आम्ही तुम्हालादेखील उपजीविका देतो आणि त्यांनाही देतो व अश्लील गोष्टीच्या जवळपासदेखील फिरकू नका मग त्या उघड असोत अथवा गुपित, आणि कोणत्याही जीवाला ज्याला अल्लाहने आदरणीय ठरविले आहे ठार करू नका परंतु न्यायसंगत (असेल तर). या गोष्टी आहेत ज्यांचा आदेश त्याने तुम्हाला दिला आहे, कदाचित तुम्ही बुद्धीचा उपयोग कराल.
  152. आणि अनाथाच्या संपत्तीजवळ जाऊ नका, परंतु अशा मार्गाने जो योग्य असेल, येथपावेतो की तो प्रौढत्व गाठील. व वजनमापांत काटेकोर न्याय पाळा, आम्ही प्रत्येक माणसावर जबाबदारीचा तितकाच भार टाकतो जितका त्याच्या आवाक्यात आहे. आणि जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा न्यायोचित बोला मग ती गोष्ट आपल्या नातेवाईकांच्या बाबतीत का असेना व अल्लाहशी केलेल्या कराराची पूर्तता करा. या गोष्टीचे आदेश अल्लाहने तुम्हाला दिले आहेत कदाचित तुम्ही उपदेशाचा स्वीकार कराल. तसेच त्याचा आदेश असा आहे की हाच माझा सन्मार्ग आहे.
  153. म्हणून तुम्ही याच मार्गावर चला आणि इतर मार्गांवर चालू नका की ते त्याच्या मार्गापासून हटवून तुम्हाला परागंदा करतील, हाच आहे तो आदेश जो तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला दिला आहे, अधिक संभव आहे की, तुम्ही पथभ्रष्टतेपासून दूर राहाल
  154. मग आम्ही मूसा (अ.) यांना ग्रंथ प्रदान केला होता जो सद्वर्तनाचा अंगिकार करणार्‍या माणसांवर देणगीची परिपूर्तता व प्रत्येक आवश्यक गोष्टींचा तपशील तसेच पुरेपूर मार्गदर्शन व कृपा होता (आणि यासाठी बनीइस्स्राईलना दिला गेला होता की) कदाचित लोक आपल्या पालनकर्त्याच्या भेटीवर श्रद्धा ठेवतील.
  155. आणि अशाच प्रकारे हा ग्रंथ आम्ही अवतरला आहे, एक समृद्धशाली ग्रंथ. म्हणून तुम्ही याचे अनुसरण करा व अल्लाहच्या प्रकोपाला भिऊन वागा, जेणेकरून तुमच्यावर दया केली जाईल.
  156. आता तुम्ही असे सांगू शकणार नाही की ग्रंथ तर आमच्या पूर्वीच्या दोन समूहांना दिले गेले होते, आणि आम्हाला काहीच माहीत नव्हते की ते काय शिकत व शिकवित होते.
  157. आणि तुम्ही आता हा बहाणा देखील करू शकत नाही की जर आमच्यावर ग्रंथ अवतरला गेला असता तर आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त सरळमार्गी सिद्ध झालो असतो. तुमच्याकडे तुमच्या प्रभूकडून उज्ज्वल प्रमाण आणि मार्गदर्शन व कृपा आलेली आहे. आता त्याच्यापेक्षा मोठा अत्याचारी कोण असेल जो अल्लाहची वचने खोटी ठरवीत असेल, आणि त्यांच्यापासून पराङमुख होत असेल, जे लोक आमच्या संकेत वचनांपासून पराङमुख होतात त्यांना या तोंड फिरविण्याबद्दल आम्ही अत्यंत वाईट शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.
  158. मग आता लोक काय या प्रतीक्षेत आहेत की दूतांनी त्यांच्यासमोर येऊन ठेपावे, अथवा तुमचा पालनकर्ता स्वतः यावा, किंवा तुमच्या पालनकर्त्याचे काही स्पष्ट संकेतचिन्हे प्रकट व्हावीत? ज्या दिवशी तुमच्या पालनकर्त्याचे काही विशिष्ट संकेत प्रकट होतील तेव्हा मग एखाद्या अशा माणसाला त्याची श्रद्धा काहीही लाभ पोहचविणार नाही ज्याने आधीपासून श्रद्धा ठेवली नसेल किंवा त्याने आपल्या श्रद्धेमध्ये कोणताही भलेपणा जर कमविला नसेल. हे पैगंबर (स.), यांना सांगा, की तुम्ही वाट पाहा, आम्ही देखील प्रतीक्षा करीत आहोत.
  159. ज्या लोकांनी आपल्या धर्माचे तुकडे-तुकडे करून टाकले आणि गटा-गटांत विभाजित झाले खचितच त्यांच्याशी तुमचा काडीमात्र संबंध नाही, त्यांचा मामला तर अल्लाहच्या स्वाधीन आहे, तोच त्यांना दाखवील की त्यांनी काय-काय केले आहे.
  160. जो अल्लाहपाशी सद्व्यवहार घेऊन येईल त्याच्यासाठी दसपट मोबदला आहे आणि जो दुर्व्यवहार घेऊन येईल त्याला तेवढाच मोबदला दिला जाईल जितका गुन्हा त्याने केला असेल आणि कोणावरही अत्याचार केला जाणार नाही.
  161. हे पैगंबर (स.), सांगा माझ्या पालनकर्त्याने खचितच मला सरळमार्ग दाखविला आहे, अगदी सरळ धर्म, ज्यांत कोणतीही वक्रता नाही, इब्राहीम (अ.) ची पद्धत जी त्याने एकाग्रतेने अवलंबिली होती आणि तो अनेकेश्वरवाद्यांपैकी नव्हता.
  162. सांगा, माझी नमाज, माझ्या तमाम उपासनेच्या पद्धती, माझे जीवन व मरण, सर्वकाही समस्त विश्वांचा स्वामी अल्लाहसाठीच आहे,
  163. ज्याचा कोणीही भागीदार नाही. अशीच मला आज्ञा दिली गेली आहे आणि सर्वप्रथम आज्ञापालनात मान तुकविणारा मीच आहे.
  164. सांगा, मी अल्लाहशिवाय एखादा दुसरा पालनकर्ता शोधावा काय, वास्तविक तोच प्रत्येक वस्तूचा पालनकर्ता आहे? प्रत्येक व्यक्ती जे काही कमविते त्याला जबाबदार ती स्वतःच आहे, कोणीही ओझे उचलणारा दुसर्‍याचे ओझे उचलत नसतो, मग तुम्हा सर्वांना आपल्या पालनकर्त्या-कडे परतावयाचे आहे, त्यावेळी तो तुमच्यातील मतभेदांची वास्तवता तुमच्यावर प्रकट करील.
  165. तोच आहे ज्याने तुम्हाला भुतलावरील खलीफा (नायब) बनविला आणि तुमच्यापैकी काहींना काहींच्या तुलनेत अधिक उच्च दर्जे बहाल केले की ज्यायोगे जे काही तुम्हाला दिले आहे त्यात तुमची परीक्षा घ्यावी, निःसंशय तुमचा पालनकर्ता शिक्षा देण्यातही अत्यंत सत्वर आहे आणि फार क्षमाशील व दया करणारा देखील आहे.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post