7.अल् आराफ - ٱلْأَعْرَاف
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- अलिफ लाऽऽम मीऽऽम सॉऽऽद
- हा एक ग्रंथ आहे जो तुमच्याकडे अवतरला गेला आहे. म्हणून हे पैगंबर (स.), तुमच्या मनात यासंबंधी कोणतीही शंका असू नये. हा अवतरण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही याच्याद्वारे (नकार देणार्यांना) भय दाखवावे आणि श्रद्धा ठेवणार्या लोकांना उपदेश करावा.
- लोकहो! जे काही तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्यावर अवतरले गेले आहे त्याचे अनुसरण करा आणि आपल्या पालनकर्त्याला सोडून अन्य कोणाचे अनुकरण करू नका - पण तुम्ही उपदेश कमीच मानता.
- कित्येक वस्त्या आहेत ज्यांना आम्ही नष्ट केले. त्यांच्यावर आमचा प्रकोप अकस्मात रात्रीच्या वेळी कोसळला, अथवा दिवसाढवळ्या अशा समयी आला जेव्हा ते विश्रांती घेत होते.
- आणि जेव्हा आमचा प्रकोप त्यांच्यावर आला तेव्हा त्यांच्या तोंडात याशिवाय कोणताही उच्चार नव्हता की खरोखरच आम्ही अत्याचारी होतो.
- म्हणून खचितच हे होणार आहे की आम्ही त्या लोकांना जाब विचारावे ज्यांच्याकडे आम्ही प्रेषित पाठविले आहेत आणि प्रेषितांना देखील विचारू (की त्यांनी संदेश पोहचविण्याचे कर्तव्य कितपत पार पाडले व त्यांना त्याचे काय उत्तर मिळाले.)
- मग आम्ही स्वतः संपूर्ण ज्ञानानिशी पूर्ण अहवाल त्यांच्यासमोर मांडू, बरे आम्ही कोठे गायब तर नव्हतो ना.
- आणि वजन त्या दिवशी अगदी बरोबर असेल, ज्यांचे पारडे जड असतील तेच सफलता प्राप्त करणारे असतील
- आणि ज्यांचे पारडे हलके असतील तेच स्वतःला नुकसानीत टाकणारे असतील कारण ते आमच्या संकेतवचनांशी अत्याचारी वर्तन करीत राहिले होते.
- आम्ही तुम्हाला भूतलावर अधिकारांनिशी वसविले आणि तुमच्यासाठी तेथे जीवनसामुग्री उपलब्ध केली, परंतु तुम्ही लोक कमीच कृतज्ञता व्यक्त करता.
- आम्ही तुमच्या निर्मितीचा प्रारंभ केला मग तुम्हाला स्वरूप दिले मग दूतांना सांगितले की आदमसमोर नतमस्तक व्हा (सजदा करा). या आज्ञेनुसार सर्व नतमस्तक झाले परंतु इब्लीस नतमस्तक होणार्यांमध्ये सामील झाला नाही.
- विचारले, ’’तुला कोणत्या गोष्टीने नतमस्तक होण्यापासून रोखले जेव्हा मी तुला आज्ञा दिली होती?’’ म्हणाला, ’’मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तू मला अग्निपासून निर्माण केले व त्याला मातीपासून.’’
- फर्माविले, ’’असे होय, तर, तू येथून खाली उतर, तुला अधिकार नाही येथे मोठेपणाचा अहंकार करावा. चालता हो, की वस्तुतः तू त्यांच्यापैकी आहेस जे स्वतः आपला अपमान इच्छितात.’’
- तो म्हणाला, ’’मला त्या दिवसापर्यंत सवलत दे जेव्हा हे सर्व दुसर्यांदा उत्थापित केले जातील.’’
- फर्माविले, ’’तुला सवलत आहे.’’
- म्हणाला, ’’बरे तर, ज्या तर्हेने तू मला मार्गभ्रष्ट केले आहेस, मीसुद्धा आता तुझ्या सरळ मार्गावर असलेल्या या मानवाच्या पाळतीवर राहीन.
- पुढून आणि मागून, उजवीकडून व डावीकडून चोहोबाजूंनी मी त्यांना घेरेन आणि तुला त्यांच्यापैकी बहुतेक कृतज्ञ आढळणार नाहीत
- फर्माविले, ’’चालता हो येथून, अपमानित व धिःकारित. विश्वास ठेव की यांच्यापैकी जे तुझे अनुकरण करतील तुझ्यासहित त्या सर्वांनिशी नरक भरून टाकीन.
- आणि हे आदम तू आणि तुझी पत्नी दोघे या स्वर्गामध्ये राहा, येथे जी वस्तू खाण्याची तुमची इच्छा असेल ती खा, परंतु त्या वृक्षाच्याजवळ फिरकू नका, नाहीतर अत्याचार्यांपैकी व्हाल.’’
- मग शैतानने त्यांना बहकविले जेणेकरून त्यांचे गुप्तांग जे एकमेकापासून लपविले गेले होते त्यांच्यासमोर उघड झाले. त्याने त्या दोघांना सांगितले, ’’तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला या वृक्षाची जी मनाई केली आहे त्याचे कारण याशिवाय काहीही नाही की एखाद्या वेळेस तुम्ही देवदूत बनू नये. अथवा तुम्हाला अमरत्व लाभू नये.’’
- आणि त्याने शपथ घेऊन त्यांना सांगितले की मी तुमचा खरा हितचिंतक आहे.
- अशा प्रकारे त्या दोघांना फसवून त्याने हळूहळू आपल्या वळणावर आणले. सरतेशेवटी जेव्हा त्यांनी त्या वृक्षाचा आस्वाद घेतला तेव्हा त्यांचे गुप्तांग एकमेकासमोर उघडे झाले आणि ते आपल्या गुप्तांगाना स्वर्गातील पानांनी झाकू लागले. तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांना पुकारले, ’’काय मी तुम्हाला त्या वृक्षापासून रोखले नव्हते आणि म्हटले नव्हते की शैतान तुमचा उघड शत्रू आहे?’’
- दोघे बोलते झाले, ’’हे पालनकर्त्या, आम्ही स्वतःवर अत्याचार केला, जर आता तू आम्हाला क्षमा केली नाहीस व दया केली नाहीस तर खचितच आम्ही तोट्यात राहू.’’
- फर्माविले, ’’चालते व्हा, तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात, आणि तुमच्यासाठी एका विशिष्ट मुदतीपर्यंत पृथ्वीवरच निवासस्थान व जीवनसामग्री आहे.’’
- आणि फर्माविले, ’’तेथेच तुम्हाला जगणे व तेथेच मरणे आहे आणि त्यातूनच तुम्हाला सरतेशेवटी काढले जाईल.’’
- हे आदमच्या मुलांनो, आम्ही तुमच्यासाठी पोशाख उतरविला आहे की तुमच्या शरीरातील लज्जा-अंगांना झाकावे. आणि तुमच्यासाठी शरीर रक्षण व भूषणाचे साधन देखील व्हावे, आणि सर्वोत्तम पोशाख ईशकोपच्या भयाचा पोशाख होय. हा अल्लाहच्या संकेतापैकी एक संकेत आहे कदाचित लोकांनी यापासून धडा घ्यावा.
- हे आदमच्या मुलांनो, असे होऊ नये की शैतानाने तुम्हाला पुन्हा तसेच उपद्रवामध्ये गुंतवावे ज्याप्रमाणे त्याने तुमच्या आई-वडिलांना स्वर्गामधून काढले होते आणि त्यांचे पोशाख त्यांच्यावरून उतरविले होते जेणेकरून त्यांचे गुप्तांग एकमेकासमोर उघडे करावेत. तो आणि त्याचे सोबती तुम्हाला अशा ठिकाणाहून पाहतात की जेथून तुम्ही त्यांना पाहू शकत नाही. या शैतानांना आम्ही अश्रद्ध लोकांचा मित्र बनविले आहे.
- हे लोक जेव्हा एखादे अश्लिल कृत्य करतात तेव्हा ते म्हणतात की आमचे वाड-वडील याच रीतीवर आम्हाला आढळले आहेत आणि अल्लाहनेच आम्हाला असे करण्याची आज्ञा दिली आहे. त्यांना सांगा की अल्लाह अश्लिलतेची आज्ञा कदापि देत नसतो. काय तुम्ही अल्लाहचे नाव घेऊन त्या गोष्टी सांगता ज्यांच्यासंबंधी तुम्हाला ज्ञान नाही की त्या अल्लाहकडून आहेत?
- हे पैगंबर (स.), यांना सांगा की माझ्या पालनकर्त्याने तर सचोटी व न्यायाची आज्ञा दिली आहे. आणि त्याची आज्ञा तर अशी आहे की प्रत्येक उपासनेत आपली दिशा नीट ठेवा आणि त्याचे सच्चे भक्त होऊन त्यालाच पुकारा, ज्याप्रमाणे त्याने आता तुम्हाला निर्माण केले आहे तसेच तुम्ही पुन्हा निर्माण केले जाल.
- एका जमातीला तर त्याने सरळमार्ग दाखविला आहे पण दुसर्या जमातीवर तर मार्गभ्रष्टता चिकटून बसली आहे कारण त्यांनी अल्लाहऐवजी शैतानांना आपले पालक बनविले आहे व ते समजतात की आपण सरळ मार्गावर आहोत.
- हे आदमचे वंशज, प्रत्येक उपासनेच्या वेळी यथायोग्य पोषाख परिधान करा. आणि खा, प्या परंतु मर्यादांचे उल्लंघन करू नका, अल्लाह मर्यादेच्या बाहेर जाणार्यांना पसंत करीत नाही.
- हे पैगंबर (स.), यांना सांगा की कोणी अल्लाहच्या त्या भूषणाला अवैध करून टाकले ज्याला अल्लाहने आपल्या भक्तांसाठी निर्मिले होते आणि कोणी अल्लाहने प्रदान केलेल्या विशुद्ध वस्तूंना प्रतिबंध केला? सांगा, या सार्या वस्तू ऐहिक जीवनातसुद्धा श्रद्धावंतांसाठी होत आणि मरणोत्तर जीवनाच्या दिवशी तर खास त्यांच्यासाठीच असतील. अशाप्रकारे आम्ही आपल्या गोष्टी स्पष्टपणे मांडतो त्या लोकांसाठी ज्यांना ज्ञान आहे.
- हे पैगंबर (स.), यांना सांगा की माझ्या पालनकर्त्याने ज्या वस्तू निषिद्ध केल्या आहेत त्या तर अशा आहेत, निर्लज्जपणाची कामे - मग ती उघड असोत अथवा गुप्त - आणि पाप आणि सत्याच्या विरोधात अतिरेक आणि अल्लाहबरोबर तुम्ही एखाद्या अशाला भागीदार कराल ज्याच्या संबंधात त्याने कोणतेही प्रमाण उतरविले नाही, आणि असे की अल्लाहच्या नावाने तुम्ही एखादी अशी गोष्ट सांगावी जिच्यासंबंधी तुम्हाला ज्ञान नसेल (की ती खरोखर त्यानेच फर्माविली आहे.)
- प्रत्येक जनसमूहाकरिता एका निश्चित कालावधीचा काळ ठरलेला आहे. मग जेव्हा एखाद्या जनसमूहाचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा एक क्षणभर देखील मागेपुढे होत नाही.
- (आणि ही गोष्ट अल्लाहने उत्पत्तीच्या प्रारंभीच स्पष्ट सांगून टाकली होती की) हे आदमच्या मुलांनो! लक्षात ठेवा, जर तुमच्यापाशी खुद्द तुमच्यापैकीच असे प्रेषित आले जे तुम्हाला माझी संकेतवचने ऐकवीत असतील, तर जो कोणी अवज्ञेपासून दूर राहील आणि आपल्या वर्तणुकीत सुधारणा घडवून आणील त्याच्यासाठी कोणतेही भय अथवा दुःखाचा प्रसंग नाही,
- आणि जे लोक आमची वचने खोटी ठरवतील आणि त्यांच्या विरोधात दुर्वर्तन करतील तेच नरकवासी असतील जेथे ते सदैव राहतील.
- त्याहून मोठा अत्याचारी कोण असेल ज्याने निव्वळ खोट्या गोष्टी रचून अल्लाहशी त्याचा संबंध जोडला अथवा अल्लाहच्या सत्य वचनांना खोटे लेखले? अशी माणसे आपल्या भाग्यलिखिताप्रमाणे आपला वाटा घेत राहतील इथपावेतो की ती घटका येऊन ठेपेल जेव्हा आमचे पाठविलेले दूत त्यांचे प्राणहरण करण्याकरिता पोहोचतील. त्यावेळेस ते त्यांना विचारतील की सांगा, ’’आता कोठे आहेत तुमचे आराध्य दैवत ज्यांचा तुम्ही अल्लाहच्या ऐवजी धावा करीत होता?’’ ते सांगतील, ’’ते सर्व आम्हापासून लोप पावले.’’ ते स्वतः आपल्याविरूद्ध साक्ष देतील की खरोखरच आम्ही सत्य नाकारणारे होतो.
- अल्लाह फर्मावील, ’’जा, तुम्हीसुद्धा त्याच नरकामध्ये दाखल व्हा ज्यात तुमच्यापूर्वी होऊन गेलेले जिन्न व मानवसमूह दाखल झाले आहेत.’’ प्रत्येक गट जेव्हा नरकात प्रवेश करील तेव्हा तो आपल्या पुढे गेलेल्या गटाचा धिक्कार करीत प्रवेश करील इथपावेतो की जेव्हा सर्व तेथे जमा होतील तेव्हा प्रत्येक नंतरचा गट आपल्या अगोदरच्या गटासंबंधी सांगेल की, हे पालनकर्त्या! हेच लोक होते ज्यांनी आम्हाला मार्गभ्रष्ट केले, म्हणून यांना नरकाची दुप्पट यातना दे. उत्तरादाखल फर्माविण्यात येईल, प्रत्येकासाठी दुप्पटच यातना आहेत परंतु तुम्ही जाणत नाही.
- आणि पहिला गट दुसर्या गटाला सांगेल (जर आम्ही दोषास पात्र होतो) तर तुम्हाला आमच्यावर कोणते श्रेष्ठत्व प्राप्त होते, आता आपल्या कमाईचा परिणाम म्हणून प्रकोपाचा आस्वाद घ्या.
- खात्री बाळगा! ज्या लोकांनी आमची वचने खोटी ठरवली आणि त्यांच्या विरोधात शिरजोरी दाखविली आहे त्यांच्यासाठी आकाशाची दारे कदापि उघडली जाणार नाहीत. त्यांचा स्वर्गामध्ये प्रवेश तितकाच अशक्य आहे जितका सुईच्या छिद्रातून उंटाचे जाणे. अपराध्यांना आमच्यापाशी असाच बदला मिळत असतो.
- त्यांच्यासाठी नरकाचेच अंथरूण असेल व नरकाचेच पांघरूण असेल. हेच आहे फळ जे आम्ही अत्याचारींना देत असतो.
- याच्या उलट ज्या लोकांनी आमची वचने मान्य केली आहेत आणि सत्कृत्ये केली आहेत - आणि याबाबतीत आम्ही प्रत्येकाला त्याच्या ऐपतीप्रमाणेच जबाबदार ठरवीत असतो, हे स्वर्गात वास करणारे आहेत जेथे ते सदैव राहतील.
- त्यांच्या मनात एक दुसर्याच्याविरूद्ध जी मलीनता असेल ती आम्ही दूर करू. त्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि ते सांगतील, ’’स्तुती फक्त अल्लाहकरिताच आहे ज्याने आम्हाला हा मार्ग दाखविला. आम्ही स्वतः मार्ग प्राप्त करू शकलो नसतो जर अल्लाहने आमचे मार्गदर्शन केले नसते. आमच्या पालनकर्त्याने पाठविलेले प्रेषित खरोखर सत्यच घेऊन आले होते.’’ त्यावेळेस वाणी ऐकू येईल, ’’हा स्वर्ग ज्याचे तुम्ही वारस बनविले गेले आहात तो तुम्हाला त्या कृत्यांच्या मोबदल्यात मिळाला आहे, जी तुम्ही करीत राहिला होता.’’
- मग हे स्वर्गामधील लोक नरकामधील लोकांना हांक मारून म्हणतील, ’’आम्हाला ती वचने सत्य आढळली जी आमच्या पालनकर्त्याने आमच्याशी केली होती. तुम्हाला देखील ती वचने सत्य आढळली काय जी तुमच्या पालनकर्त्याने केली होती?’’ ते उत्तर देतील, ’’होय’’, तेव्हा एक हाक मारणारा त्यांच्या दरम्यान हाक देईल की, ’’अल्लाहकडून धिक्कार असो त्या अत्याचारी लोकांचा
- जे अल्लाहच्या मार्गापासून लोकांना प्रतिबंध करीत होते व त्या मार्गाला वक्र करू इच्छित होते आणि परलोक नाकारणारे होते.’’
- या दोन्ही गटांच्या दरम्यान एक आडोसा राहिला असेल ज्याच्या उंचवट्यावर (आअराफ) काही अन्य लोक असतील, हे प्रत्येकाला त्याच्या चेहर्याच्या अवलोकनाने ओळखतील आणि स्वर्गवासियांना हांक मारून सांगतील की, ’’तुमचे कल्याण असो.’’ हे लोक स्वर्गामध्ये दाखल तर झाले नसतील परंतु त्याची आशा करीत असतील
- मग जेव्हा त्यांची दृष्टी नरकवासियांच्याकडे वळेल तेव्हा म्हणतील, ’’हे पालनकर्त्या! आम्हाला या अत्याचारी लोकांत सामील करू नकोस.
- मग हे आअराफ (उंचवट्या) चे लोक नरकाच्या काही मोठमोठ्या व्यक्तींना त्याच्या खाणाखुणावरून ओळखून हांक मारतील की, ’’पाहिले ना तुम्ही, आज तुमच्या झुंडीही तुम्हाला उपयोगी पडल्या नाहीत आणि ती साधनसामुग्रीदेखील तुम्हाला उपयुक्त ठरली नाही ज्यांना तुम्ही मोठ्या अभिमानास्पद वस्तू समजत होता.
- आणि हे स्वर्गवासी लोक तेच नाहीत काय ज्यांच्याविषयी तुम्ही शपथा घेऊन सांगत होता की यांना तर अल्लाह आपल्या कृपेतून काहीच देणार नाही? आज यानाच सांगण्यात आले की, दाखल व्हा स्वर्गामध्ये तुम्हासाठी भयही नाही व दुःख देखील नाही.’’
- आणि नरकातील लोक स्वर्गातील लोकांना हांक मारतील की, थोडेसे पाणी आम्हावर ओता अथवा जी उपजीविका अल्लाहने तुम्हाला दिली आहे त्यातीलच काही तरी आमच्याकडे टाका. ते उत्तर देतील की, ’’अल्लाहने या दोन्ही वस्तू सत्य नाकारणार्या त्या लोकांकरिता निषिद्ध केल्या आहेत,
- ज्यांनी आपल्या धर्माला खेळ व मनोरंजन बनविले होते आणि ज्यांना ऐहिक जीवनाने भुरळ पाडली होती. अल्लाह फर्मावितो की आज आम्हीसुद्धा त्यांना त्याचप्रमाणे विसरून जाऊ ज्याप्रमाणे ते या दिवसाच्या भेटीला विसरत राहिले व आमच्या वचनांना नाकारीत राहिले.’’
- आम्ही या लोकांपर्यंत एक असा ग्रंथ आणलेला आहे ज्याला आम्ही ज्ञानाच्या आधारे तपशीलवार बनविला आहे आणि जो श्रद्धावंतांसाठी मार्गदर्शन व कृपा आहे.
- आता काय हे लोक याच्याशिवाय इतर एखाद्या गोष्टीची वाट पाहात आहेत की तो शेवट समोर यावा ज्याची वार्ता हा ग्रंथ देत आहे? ज्या दिवशी तो शेवट प्रत्यक्षात येईल तेव्हा तेच लोक ज्यांनी पूर्वी त्याला दुर्लक्षिले होते म्हणतील, ’’खरोखर आमच्या पालनकर्त्याचे प्रेषित सत्य घेऊन आले होते, मग काय आता आम्हाला काही शिफारस करणारे मिळतील जे आमच्यासाठी शिफारस करतील? अथवा आम्हाला पुन्हा परत पाठविले जाईल जेणेकरून जे काही आम्ही पूर्वी करीत होतो त्याऐवजी आता दुसर्या पद्धतीने कार्य करून दाखवावे’’ - त्यांनी स्वतःला नुकसानीत घातले आणि ते सर्व असत्य जे त्यांनी रचले होते ते त्यांच्यापासून आज हरवले.
- वस्तुतः तुमचा पालनकर्ता अल्लाहच आहे ज्याने आकाशांना व पृथ्वीला सहा दिवसांत निर्माण केले, मग आपल्या सिंहासनावर (अर्श) विराजमान झाला. जो रात्रीला दिवसावर झाकतो व परत दिवस रात्रीच्या पाठीमागे धावत येतो. ज्याने सूर्य, चंद्र व तारे निर्माण केले, सर्व त्याच्या आदेशाच्या अधीन आहेत. सावध रहा त्याचीच सृष्टी आहे व त्याचाच हुकूम आहे. फार समृद्धशाली आहे अल्लाह, सर्व विश्वाचा मालक व पालनकर्ता.
- आपल्या पालनकर्त्याला हाक मारा विनवणी करून आणि मौनपणे. खचितच तो मर्यादांचे उल्लंघन करणार्याला पसंत करीत नसतो
- सुधारणा झालेल्या पृथ्वीवर हिंसाचार माजवू नका जेव्हा त्यात सुधारणा झालेली आहे आणि ईश्वरालाच हाक मारा, भय आणि अभिलाषेने, खचितच अल्लाहची कृपा सदाचारी लोकांच्या निकट आहे.
- आणि तो अल्लाहच आहे जो वार्यांना आपल्या दयेच्या पुढे पुढे शुभवार्ता घेऊन पाठवितो, मग जेव्हा ते पाण्याने भरलेले ढग वर उचलून घेतात तेव्हा तो त्यांना एखाद्या निर्जिव भूमीकडे घेऊन जातो आणि तेथे वृष्टी करून विविध प्रकारची फळे काढतो. पहा, अशाप्रकारे आम्ही मृतांना मृतावस्थेतून बाहेर काढतो. कदाचित तुम्ही या निरीक्षणापासून बोध घ्याल.
- जी जमीन चांगली असते ती आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेने खूप फळे फुले उगविते आणि जी निकृष्ट असते त्यापासून निरुपयोगी पिकाशिवाय काहीच निघत नाही. अशाच प्रकारे आम्ही संकेत पुन्हा पुन्हा प्रस्तुत करतो त्या लोकांकरिता जे कृतज्ञ रहाणारे आहेत.
- आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’
- त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पाहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’
- नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे.
- मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही.
- काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’’
- परंतु त्यांनी त्याला नाकारले. सरतेशेवटी आम्ही त्याला व त्याच्या सोबत्यांना एका नावेतून सुटका दिली आणि त्या लोकांना बुडविले ज्यांनी आमची संकेतवचने खोटी ठरविली होती. निःसंशय ते आंधळे लोक होते.
- आणि ’आद’कडे आम्ही त्यांचे बंधू हूद (अ.) ला पाठविले. त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा. त्याच्याशिवाय तुमचा कोणी ईश्वर नाही. मग काय तुम्ही दुर्वर्तनापासून दूर राहणार नाही?’’
- त्याच्या समाजाच्या सरदारांनी, जे त्याच्या गोष्टी ऐकण्यास नकार देत होते, उत्तरादाखल सांगितले, ’’आम्ही तर तुम्हाला मूर्ख समजतो आणि आम्हाला वाटते की तुम्ही खोटे आहात.’’
- त्याने सांगितले, ’’हे जातीबांधवांनो! मी मूर्ख नाही याउलट मी जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे
- तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो आणि तुमचा असा हितैषी आहे की ज्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो.
- काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी स्वतः तुमच्या स्वकीयांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून ’स्मरण’ आले, ज्याद्वारे त्याने तुम्हाला सावध करावे? विसरू नका की तुमच्या पालनकर्त्याने नूह प्रेषिताच्या लोकानंतर तुम्हाला त्याचे उत्तराधिकारी बनविले आणि तुम्हाला खूप धष्टपुष्ठ केले, म्हणून अल्लाहच्या सामर्थ्याच्या चमत्काराची आठवण ठेवा, आशा आहे की तुम्ही यश संपादन कराल.’’
- त्यांनी उत्तर दिले, ’’काय तू आमच्यापाशी याकरिता आला आहेस की आम्ही एकट्या अल्लाहचीच उपासना करावी आणि त्यांना सोडून द्यावे ज्यांची उपासना आमचे पूर्वज करीत आले आहेत? घेऊन ये त्या यातना ज्यांची तू आम्हाला धमकी देतोस जर तू खरा असशील.’’
- त्याने सांगितले, ’’तुमच्या पालनकर्त्याने तुमचा धिक्कार केला व त्याचा प्रकोप कोसळला. तुम्ही त्या नावांकरिता माझ्याशी भांडता ज्याचे नामकरण तुम्ही आणि तुमच्या पूर्वजांनी केले आहे, ज्यांच्यासाठी अल्लाहने कोणतेच प्रमाण अवतरित केले नाही? ठिक आहे! तुम्हीसुद्धा प्रतीक्षा करा व मी देखील तुमच्याबरोबर प्रतीक्षा करतो.’’
- सरतेशेवटी आम्ही आपल्या कृपेने हूद (अ.) आणि त्यांच्या सोबत्यांना वाचविले आणि त्या लोकांचे समूळ उच्चाटन केले ज्यांनी आमची संकेतवचने खोटी ठरविली होती आणि श्रद्धाळू नव्हते.
- आणि समूदकडे त्यांचे बंधू सालेह (अ.) ला पाठविले त्याने सांगितले, ’’हे जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणी ईश्वर नाही, तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याचे उघड प्रमाण आले आहे. ही अल्लाहची सांडणी तुमच्यासाठी एक संकेतचिन्ह स्वरूप आहे, म्हणून हिला मोकळी सोडा जेणेकरून ती अल्लाहच्या जमिनीत चरत राहील. तिला कोणत्याही वाईट हेतूने स्पर्श करू नका नाहीतर एक अत्यंत दुःखदायक यातना तुम्हाला गाठील.
- आठवा, तो प्रसंग जेव्हा अल्लाहने आद लोकानंतर तुम्हाला त्यांचे उत्तराधिकारी बनविले आणि तुम्हाला भूतलावर वास्तव्य प्रदान केले की आज तुम्ही त्याच्या समतल मैदानांवर वैभवशाली महाल बनविता आणि त्याच्या पर्वतांना कोरून घरे बनविता, म्हणून त्याच्या सामर्थ्याच्या चमत्कारापासून बेसावध बनू नका आणि भूतलांवर हिंसाचार माजवू नका.’’
- त्याच्या जातीच्या सरदारांनी जे गर्वाने मोठे झाले होते, दुबळ्या वर्गाच्या त्या लोकांना ज्यांनी श्रद्धा ठेवली होती - सांगितले, ’’काय तुम्हाला खरोखरच माहीत आहे की सालेह (अ.) आपल्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे?’’ त्यांनी उत्तर दिले, ’’निःसंशय ज्या संदेशासहित त्याला पाठविण्यात आले आहे, तो आम्ही मान्य करतो.’’
- त्या मोठेपणाच्या वल्गना करणार्यांनी सांगितले, ’’जी गोष्ट तुम्ही मान्य केली आहे आम्ही तिला नाकारणारे आहोत.’’
- मग त्यांनी त्या सांडणीला ठार मारले आणि अत्यंत उद्धटपणे आपल्या पालनकर्त्याची आज्ञा भंग केली. आणि सालेह (अ.) ना सांगितले की, ’’जर तू प्रेषित आहेस तर तू सांगतोस त्या यातना आमच्यावर घेऊन ये.’’
- सरतेशेवटी एका हादरून सोडणार्या संकटाने त्यांना गाठले आणि ते आपल्या घरांत उघडेच्या उघडेच पडून राहिले.
- आणि सालेह (अ.) हे सांगत त्यांच्या वस्तीतून बाहेर निघून गेला, ’’हे माझ्या जाती बांधवांनो! मी आपल्या पालनकर्त्याचा संदेश तुम्हाला पोहोचविला आणि मी तुमचे खूप हित चिंतिले परंतु मी काय करू तुम्हाला आपले हितचिंतक पसंतच नाहीत.’’
- आणि लूत (अ.) ला आम्ही प्रेषित बनवून पाठविले, मग आठवा जेव्हा त्याने आपल्या लोकांना सांगितले, ’’तुम्ही इतके निर्लज्ज झाला आहात की ती अश्लील कृत्ये करता जी तुमच्या अगोदर जगात कोणी केली नाहीत?
- तुम्ही स्त्रियांना सोडून पुरुषाकडून आपली कामवासना भागविता? वस्तुस्थिती अशी आहे, तुम्ही सर्वस्वी मर्यादेचे उल्लंघन करणारे लोक आहात.’’
- परंतु त्याच्या लोकांचे उत्तर याव्यतिरिक्त काही नव्हते की, ’’हाकलून द्या या लोकांना आपल्या वस्त्यातून, मोठे आले हे पवित्र व सोवळे बनून’’
- सरतेशेवटी आम्ही लूत (अ.) व त्याच्या परिवाराला - फक्त त्याच्या पत्नीला वगळून जी मागे राहणार्यांपैकी होती - वाचवून बाहेर काढले
- आणि त्या जनसमुदायावर वर्षाव केला एका वृष्टीचा, तेव्हा पहा त्या अपराध्यांचा शेवट काय झाला?
- आणि मदयनवासियांकडे आम्ही त्यांचे बंधू शुऐब (अ.) याला पाठविले. त्याने सांगितले, ’’हे जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणी ईश्वर नाही. तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याचे स्पष्ट मार्गदर्शन आले आहे, म्हणून वजन व मापे प्रामाणिकपणे करा, लोकानां त्यांच्या वस्तूत कमी देऊ नका आणि सुधारणा झालेल्या या भूतलावर हिंसाचार माजवू नका, यातच तुमचे भले आहे जर खरोखरीच तुम्ही श्रद्धावंत असाल. (आणि जीवनाच्या)
- प्रत्येक मार्गावर वाटमारे बनून बसू नका की तुम्ही लोकांना भयग्रस्त करावे आणि श्रद्धा ठेवणार्या लोकांना अल्लाहच्या मार्गापासून तुम्ही प्रतिबंध करावा आणि सरळमार्गाला वाकडे बनविण्यासाठी तुम्ही उत्सुक व्हावे. आठवा तो काळ जेव्हा तुम्ही थोडेसे होता. मग अल्लाहने तुमची संख्या वाढविली आणि डोळे उघडून पहा की जगात उपद्रव माजविणार्या लोकांचा काय शेवट झाला.
- जर तुमच्यापैकी एक गट त्या शिकवणुकीवर, ज्याच्यासहित मला पाठविण्यात आले आहे, श्रद्धा ठेवीत आहे आणि दुसरा गट श्रद्धा ठेवीत नाही तर संयमाने पाहात राहा इथपावेतो की अल्लाहने आपल्या दरम्यान निर्णय करावा आणि तोच सर्वोत्तम न्यायनिवाडा करणारा आहे.’’
- त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी जे आपल्या मोठेपणाच्या दर्पात पडले होते, त्याला सांगितले की, ’’हे शुऐब! आम्ही तुला व त्या लोकांना ज्यांनी तुझ्यासमवेत श्रद्धा ठेवली, आपल्या वस्तीतून हाकलून लावू अन्यथा तुम्हा लोकांना आमच्या संप्रदायात परत यावे लागेल.’’ शुऐबने उत्तर दिले, ’’काय बळजबरीने आम्हाला परतविले जाईल, आम्ही तयार नसलो तरी?
- आम्ही अल्लाहवर कुभांड रचणारे ठरू जर आम्ही तुमच्या संप्रदायात परत आलो जेव्हा अल्लाहने त्यापासून आमची सुटका केली आहे, आमच्यासाठी त्याकडे परतणे आता कोणत्याही प्रकारे शक्य नाही याव्यतिरिक्त की ईश्वराने तशी इच्छा केली. आमच्या पालनकर्त्याचे ज्ञान प्रत्येक वस्तूवर व्याप्त आहे. त्याच्यावरच आम्ही भिस्त ठेवली. हे पालनकर्त्या! आमच्या व आमच्या जातीबांधवांच्या दरम्यान ठीक-ठीक निर्णय कर आणि तूच सर्वोत्तम निर्णय करणारा आहेस.’’
- त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी, ज्यांनी त्याच्या गोष्टी स्वीकार करण्यास नकार दिला होता, एकमेकास सांगितले, ’’जर तुम्ही शुऐबचे अनुयायित्व स्वीकारले तर नष्ट व्हाल.’’
- परंतु घडले असे की एका थरकांप उडवून देणार्या संकटाने त्यांना गाठले व ते आपल्या घरांत उघडेच्या उघडे पडलेले राहिले.
- ज्या लोकांनी शुऐब (अ.) ला खोटे ठरविले ते नाश पावले जणूकाही कधी त्या घरांत ते राहीलेच नव्हते. शुऐबला खोटे ठरविणारेच शेवटी नष्ट झाले
- व शुऐब (अ.) असे सांगून त्यांच्या वस्त्यांतून बाहेर पडला की, ’’हे जातीबांधवांनो! मी आपल्या पालनकर्त्याचे संदेश तुम्हाला पोहोचविले आणि तुमच्या हितचिंतकाचे कर्तव्य पार पाडले, आता मी सत्य नाकारणार्या लोकांबद्दल खेद तरी कसा व्यक्त करणार?’’
- कधी असे घडले नाही की आम्ही एखाद्या वस्तीत प्रेषित पाठविला आणि त्या वस्तीतील लोकांना त्या आधी अडचणीच्या व कठीण परिस्थितीत टाकले नाही जेणेकरून ते विनम्र व्हावेत.
- मग आम्ही त्यांच्या दुरावस्थेला सुस्थितीत परिवर्तित केले इतके की ते खूप संपन्न झाले व म्हणू लागले की, ’’आमच्या पूर्वजांवरदेखील बरे वाईट दिवस येतच राहिले आहेत.’’ सरतेशेवटी आम्ही त्यांना अचानक पकडले त्यांना कळलेसुद्धा नाही.
- जर वस्त्यातील लोकांनी श्रद्धा ठेवली असती व त्यांनी ईशपरायणतेचे वर्तन अंगिकारले असते तर आम्ही त्यांच्यावर आकाश व पृथ्वीतील समृद्धीची दारे उघडली असती, पण त्यांनी तर हे खोटे ठरविले, म्हणून आम्ही त्यांच्या त्या वाईट कमाईच्या हिशेबात त्यांना धरले, जी ते गोळा करीत होते.
- मग काय वस्त्यातील लोक आता यापासून निर्भय झाले आहेत की आमची धाड कधी अचानक त्यांच्यावर रात्रीच्या वेळी पडणार नाही जेव्हा ते झोपलेले असतील?
- अथवा काय ते निश्चिंत झाले आहेत की आमचा जबरदस्त हात कधी आकस्मिक त्यांच्यावर दिवसा पडणार नाही जेव्हा ते खेळत असतील?
- काय हे लोक अल्लाहच्या कारवाईपासून निर्भय आहेत? खरे पाहता अल्लाहच्या कारवाया पासून तोच जनसमुदाय निर्भय बनतो ज्याचा विनाश होणार असेल.
- आणि काय त्या लोकांना जे पूर्वीच्या भूवासियानंतर पृथ्वीचे वारस बनतात, या वस्तूस्थितीने त्यांना कोणताही धडा दिलेला नाही की जर आम्ही इच्छिले तर त्यांच्या अपराधांबद्दल त्यांना पकडू शकतो? (पण ते उद्बोधक वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात). आम्ही त्यांच्या हृदयाला मोहरबंद करून टाकतो, ते काहीच ऐकू शकत नाही.
- हे जनसमूह ज्यांच्या हकीगती आम्ही तुम्हाला ऐकवीत आहोत (तुमच्यासमोर उदाहरणस्वरूप उपस्थित आहेत) त्यांचे प्रेषित त्यांच्याजवळ स्पष्ट संकेतचिन्हे घेऊन आले. पण ज्या गोष्टीला त्यांनी एकदा खोटे ठरविले होते परत त्यांना ते मानणारे नव्हते. पहा अशाप्रकारे आम्ही सत्याचा इन्कार करणार्या लोकांची हृदये मोहरबंद करून टाकतो.
- आम्हाला त्यांच्यापैकी बहुतेकांमध्ये करारपालनाची आस्था आढळली नाही बहुतेकजण अवज्ञाकारीच आढळले.
- मग त्या लोकसमुदायानंतर (त्यांचा उल्लेख वर करण्यात आला आहे) आम्ही मूसा (अ.) ला आपल्या संकेतवचनांसह फिरऔन आणि त्याच्या जनसमुदायाच्या सरदाराकडे पाठविले परंतु त्यांनी देखील आमच्या संकेत वचनांशी अन्याय केला, मग पहा, त्या उपद्रव माजविणार्यांचा काय शेवट झाला.
- मूसा (अ.) ने सांगितले, ’’हे फिरऔन! मी सृष्टीच्या स्वामीकडून पाठविला गेलो आहे.
- माझा पदाधिकार हाच आहे की अल्लाहचे नाव घेऊन कोणतीही गोष्ट सत्याशिवाय मी सांगू नये, मी तुम्हा लोकांपाशी तुमच्या पालनकर्त्याकडून नियुक्तीचे स्पष्ट प्रमाण घेऊन आलो आहे, म्हणून तू बनीइस्राईलना माझ्याबरोबर पाठव.’’
- फिरऔनने सांगितले, ’’जर तू एकतरी संकेत आणला असशील आणि तू आपल्या दाव्यात खरा असशील तर ती सादर कर.’’
- मूसा (अ.) ने आपली काठी खाली फेकताक्षणीच तो एक साक्षात अजगर होता.
- त्याने आपल्या खिशातून हात बाहेर काढला तर सर्व पाहणार्यांसमोर तो चकाकत होता.
- याउपर फिरऔनच्या लोकसमूहाच्या सरदारांनी आपापसात सांगितले की, ’’खरोखर हा मनुष्य तर मोठा कुशल जादूगार आहे.
- तुम्हाला तुमच्या भूमीपासून वंचित करू इच्छितो. आता सांगा तुमचे काय म्हणणे आहे?
- मग त्या सर्वांनी फिरऔनला सल्ला दिला की याला व याच्या भावाला प्रतीक्षेत ठेवा आणि सर्व शहरात दवंडी देणारे पाठवा
- की प्रत्येक कुशल जादूगाराला तुमच्यापाशी आणावे.
- अशाप्रकारे जादूगार फिरऔनपाशी आले. त्यांनी सांगितले, ’’जर आम्ही वरचढ ठरलो तर आम्हाला त्याचा मोबदला अवश्य मिळेल ना?’’
- फिरऔनने उत्तर दिले, ’’होय, आणि तुम्ही आमच्यापाशी निकटवर्ती ठराल.’’
- मग त्यांनी मूसा (अ.) ला सांगितले, ’’तुम्ही टाकता की आम्ही टाकावे.’’
- मूसा (अ.) ने सांगितले, ’’तुम्हीच टाका.’’ त्यांनी जेव्हा आपला इंद्रजाल टाकला तेव्हा लोकांचे डोळे चक्रावून गेले, हृदयांना भयग्रस्त करून सोडले आणि महाभयंकर जादू साकार केली.
- आम्ही मूसा (अ.) ला संकेत दिला, टाक आपली काठी. त्याने टाकल्याबरोबर क्षणार्धात त्यांची ती खोटी जादू काठीने गिळून टाकली.
- अशाप्रकारे जे सत्य होते ते सत्य सिद्ध झाले आणि जे काही त्यांनी बनविले होते ते मिथ्या होऊन गेले.
- फिरऔन आणि त्याचे सोबती सामन्याच्या मैदानात पराजित झाले आणि (विजयी होण्याऐवजी) उलट अपमानित झाले
- आणि जादूगारांची अवस्था अशी झाली की जणूकाय एखाद्या गोष्टीने आतूनच त्यांना नतमस्तक होण्यास भाग पाडले,
- म्हणू लागले, ’’आम्ही सकल जगांच्या पालनकर्त्याला मानले,
- त्या पालनकर्त्याला ज्याला मूसा (अ.) आणि हारून (अ.) मानतात.’’
- फिरऔनने सांगितले, ’’मी तुम्हाला परवानगी देण्यापूर्वी तुम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवली? निश्चितच हा एखादा गुप्त कट होता जो तुम्ही या राजधानीत केला जेणेकरून त्याच्या स्वामींना सत्ताभ्रष्ट करावे. बरे तर याचा परिणाम आता तुम्हाला माहीत होईल.
- मी तुमचे हात पाय उलट बाजूंनी तोडीन त्यानंतर तुम्हा सर्वांना सुळावर चढवीन.’’
- त्यांनी उत्तर दिले, ’’कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आमच्या पालनकर्त्याकडेच परतावयाचे आहे.
- तू ज्या कारणासाठी आमच्यावर सूड उगवू इच्छितोस तो याचसाठी की आमच्या पालनकर्त्याचे संकेत जेव्हा आमच्या समोर आले तेव्हा आम्ही ते मानले. हे पालनकर्त्या, आमच्यावर संयमाचा वर्षाव कर. आणि आम्हाला जगांतून अशा स्थितींत उचल की आम्ही तुझे आज्ञाधारक असू.
- फिरऔनला त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी सांगितले, ’’काय तू मूसा (अ.) आणि त्याच्या जातीबांधवांना असेच सोडून देशील की देशात त्यांनी उपद्रव माजवावे आणि त्यांनी तुझी व तुझ्या आराध्य देवतांची भक्ती सोडून द्यावी?’’ फिरऔनने उत्तर दिले, ’’मी त्यांच्या मुलांची हत्या करवीन आणि त्यांच्या स्त्रियांना जिवंत राहू देईन. आमच्या सत्तेची पकड त्यांच्यावर भक्कम आहे.’’
- मूसा (अ.) ने आपल्या जातीबांधवांना सांगितले, ’’अल्लाहची मदत मागा, आणि संयम राखा भूमी अल्लाहची आहे, तो आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला तिचा वारस बनवितो, आणि अंतिम विजय त्यांच्याचसाठी आहे जे त्याला भिऊन काम करतील.’’
- त्याच्या जातीबांधवांनी सांगितले, ’’तुझ्या आगमनापूर्वीही आम्ही छळले जात होतो आणि आता तुझ्या आगमनानंतरदेखील आम्हाला छळले जात आहे.’’ त्याने उत्तर दिले, ’’जवळ आहे ती वेळ की तुमच्या पालनकर्त्याने तुमच्या शत्रूचा नाश करावा आणि तुम्हाला जमिनींवर उत्तराधिकारी बनवावे, मग पाहू या की तुम्ही कसे आचरण करता.’’
- आम्ही फिरऔनच्या लोकांना कित्येक वर्षांपर्यंत दुष्काळ व उत्पत्तीच्या टंचाईत गुरफटविले की कदाचित ते शुद्धीवर येतील.
- परंतु त्यांची अवस्था अशी होती की जेव्हा सुकाळ येत असे तेव्हा सांगत की आम्ही यालाच पात्र आहोत व जेव्हा वाईट वेळ येत असे तेव्हा मूसा (अ.) आणि त्याच्या साथीदारांना आपल्या संबंधात अपशकूनी ठरवीत असत. खरे पाहता मुळात त्यांचा अपशकून अल्लाहपाशी होता, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक अज्ञानी होते.
- त्यांनी मूसा (अ.) ला सांगितले की, ’’तू आम्हाला मोहित करण्यासाठी वाटेल ते संकेत आणलेस तरी आम्ही तुझी गोष्ट मान्य करणार नाही.’’
- सरतेशेवटी आम्ही त्यांच्यावर वादळ पाठविले, टोळधाड सोडली, जिवाणू फैलावले, बेडूक टाकले आणि रक्ताचा वर्षाव केला. हे सर्व संकेत वेगवेगळे करून दाखविले. परंतु ते दुर्वर्तन करीतच राहिले आणि ते फारच अपराधी लोक होते
- जेव्हा जेव्हा त्यांच्यावर आपत्ती कोसळत असे तेव्हा तेव्हा ते म्हणत, ’’हे मूसा, तुला आपल्या पालनकर्त्याकडून जो हुद्दा प्राप्त आहे त्याच्या आधारे आमच्यासाठी प्रार्थना कर, यावेळी तू जर आमच्यावरील ही आपत्ती टाळलीस तर आम्ही तुझे म्हणणे मान्य करू आणि बनीइस्राईलना तुझ्याबरोबर पाठवून देऊ.’’
- पण जेव्हा आम्ही त्यांच्यावरून आमचा प्रकोप एका ठराविक काळासाठी ज्याप्रत ते कोणत्याही परिस्थितीत पोहचणार होते, हटवीत असू तेव्हा ते पूर्णपणे आपल्या करारापासून पराङमुख होत असत
- तेव्हा आम्ही त्यांच्यावर सूड उगविला व त्यांना समुद्रात बुडविले कारण त्यांनी आमच्या संकेतांना खोटे ठरविले होते व त्यांपासून बेपर्वा झाले होते.
- आणि त्यांच्या जागी आम्ही त्या लोकांना ज्यांना दुबळे करून सोडले गेले होते, त्या भूमीच्या पूर्व व पश्चिमेचे वारस बनविले जिला आम्ही समृद्धीने संपन्न केले होते. अशाप्रकारे बनीइस्राईलच्या बाबतीत तुझ्या पालनकर्त्याचे इष्ट वचन पूर्ण झाले कारण त्यांनी संयमाची कास धरली होती आणि आम्ही फिरऔन व त्याच्या लोकांचे ते सर्वकाही नष्ट करून टाकले जे ते बनवीत होते व उभारीत होते.
- बनीइस्राईलना आम्ही समुद्रातून पार केले, मग ते मार्गस्थ झाले व मार्गात एका अशा जनसमुदायाप्रत त्यांचे येणे झाले जो आपल्या काही मूतर्विर मुग्ध झाला होता. सांगू लागले, ’’हे मूसा! आमच्याकरितादेखील एखादा असा उपास्य बनवा जसे या लोकांचे आराध्य दैवत आहेत, मूसा (अ.) ने सांगितले, ’’तुम्ही लोक मोठ्या नादानपणाच्या गोष्टी करता.
- हे लोक ज्या पद्धतीचे अनुसरण करीत आहेत ती तर विनाश पावणारी आहे आणि जे काम ते करीत आहेत ते सर्वस्वी मिथ्या आहे.’’
- मग मूसा (अ.) ने सांगितले, ’’काय मी अल्लाहव्यतिरिक्त अन्य कोणी उपास्य तुमच्यासाठी शोधावा? तो अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला जगातील सर्व लोकसमुदायावर श्रेष्ठत्व प्रदान केले आहे.
- आणि (अल्लाह फर्मावीत आहे) तो प्रसंग आठवा जेव्हा आम्ही फिरऔनवाल्यांपासून तुमची सुटका केली ज्यांची अवस्था अशी होती की ते तुम्हाला भयंकर यातना देत होते. तुमच्या मुलांना ठार करीत होते व तुमच्या स्त्रियांना जिवंत राहू देत होते आणि त्यात तुमच्या पालनकर्त्याकडून तुमची कठोर परीक्षा होती.’’
- आम्ही मूसा (अ.) ला तीस रात्री व दिवसांकरिता (सीना पर्वतावर) पाचारण केले व नंतर दहा दिवसांनी पुन्हा वाढ केली, अशाप्रकारे त्याच्या पालनकर्त्याकडून ठरविलेली मुदत पूर्ण चाळीस दिवस झाली. मूसा (अ.) ने जाताना आपले बंधू हारून (अ.) ला सांगितले, ’’माझ्या पाठीमागे तुम्ही माझ्या लोकसमूहात माझे उत्तराधिकारी बनून राहा आणि नीट कार्य करीत राहा आणि उपद्रव माजविणार्यांच्या मार्गाचे अनुसरण करू नका.’’
- जेव्हा तो आमच्या ठरविलेल्या समयी पोहोचला आणि त्याच्या पालनकर्त्याने त्याच्याशी संभाषण केले, तेव्हा त्याने विनंती केली की, ’’हे पालनकर्त्या! मला सक्षम दृष्टी दे की मी तुला पाहावे.’’ त्याने फर्माविले, ’’तू मला पाहू शकत नाहीस, बरे तर त्या समोरील पर्वताकडे पहा, जर तो आपल्या जागी स्थिर राहिला तर अलबत तू मला पाहू शकशील.’’ म्हणून त्याच्या पालनकर्त्याने जेव्हा पर्वतावर तेज प्रगट केले तेव्हा त्याला चक्काचूर केले आणि मूसा (अ.) घेरी येऊन कोसळला. जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा म्हणाला, ’’पवित्र आहे तुझे अस्तित्व, मी तुझ्यापाशी पश्चात्ताप व्यक्त करतो. आणि सर्वप्रथम श्रद्धा ठेवणारा मी आहे.’’ -
- फर्माविले, ’’हे मूसा! मी तमाम लोकांवर प्राधान्य देऊन तुला निवडले की तू माझे प्रेषितत्व करावे आणि माझ्याशी संभाषण करावे. म्हणून मी जे काही तुला देईन ते घे आणि कृतज्ञता व्यक्त कर.’’
- त्यानंतर आम्ही मूसा (अ.) ला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासंबंधी उपदेश आणि प्रत्येक अंगाबाबतीत सुस्पष्ट मार्गदर्शन पाट्यावर लिहून दिले आणि त्याला सांगितले, या आदेशांना बळकट हातांनी सांभाळ आणि आपल्या लोकसमूहाला आज्ञा दे की याच्या उत्तम आशयाचे अनुसरण करा. लवकरच मी तुम्हाला अवज्ञाकारीचे घर दाखवीन.
- मी आपल्या संकेतांकडून त्या लोकांची दृष्टी फिरवीन जे कसल्याही हक्काविना भूतलावर मोठे बनतात, त्यांनी कोणतेही संकेत जरी पाहिले तरीदेखील कधीही ते त्या संकेतांवर श्रद्धा ठेवणार नाहीत. जर सरळमार्ग त्यांच्यासमोर आला तर याचा अवलंब करणार नाहीत आणि जर वक्र मार्ग दिसून आला तर त्याच्यावर चालू लागतील, याकरिता की त्यांनी आमच्या संकेतांना खोटे ठरविले आणि त्यापासून ते बेपर्वाई करीत राहिले.
- आमच्या संकेतांना ज्याने कोणी खोटे ठरविले आणि निर्णयाच्या दिवशी (अल्लाहच्या पुढे) मरणोत्तर जीवनाच्या हजेरीचा इन्कार केला, त्याचे सर्व केले सवरले वाया गेले. काय लोक याच्याखेरीज इतर काही मोबदला प्राप्त करू शकतात की जसे करावे तसे भरावे?
- मूसा (अ.) च्या पाठीमागे त्याच्या राष्ट्राच्या लोकांनी आपल्या अलंकारापासून एका वासराची मूर्ती बनविली ज्यातून बैलासारखा आवाज निघत होता, काय त्यांना दिसत नव्हते की तो त्यांच्याशी बोलतही नाही, तसेच एखाद्या बाबतीत त्यांचे मार्गदर्शनही करीत नाही? परंतु तरी देखील त्यांनी त्याला आपला आराध्य बनविले आणि ते भयंकर अत्याचारी होते.
- मग जेव्हा त्यांच्या मोहाचा पाश भंग पावला आणि त्यांनी पाहिले की वास्तविकतः ते मार्गभ्रष्ट झाले आहेत तेव्हा म्हणू लागले की, ’’जर आमच्या पालनकर्त्याने आमच्यावर दया दाखविली नाही व आम्हाला क्षमा केली नाही तर आम्ही नष्ट होऊ.’’
- तिकडून मूसा (अ.) क्रोध व दुःखाने भरलेला आपल्या लोकांकडे परतला. येताक्षणीच त्याने सांगितले, ’’फारच वाईट वारसा चालविला तुम्ही लोकांनी माझ्या पाठीमागे! काय इतके देखील तुम्हाला संयम राखता आले नाही की आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेची प्रतीक्षा केली असती?’’ आणि पाट्या फेकल्या आणि आपल्या बंधू (हारून) च्या डोक्याचे केस धरून त्याला ओढले. हारून (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या आईच्या सुपुत्रा! या लोकांनी मला दाबून टाकले आणि त्यांनी मला ठार करावे हे नजीक आले होते, म्हणून शत्रूंना माझा उपहास करण्याची तू संधी देऊ नकोस आणि त्या अत्याचारी गटासमवेत माझी गणना करू नकोस.’’
- तेव्हा मूसा (अ.) ने सांगितले, ’’हे पालनकर्त्या, मला व माझ्या भावाला क्षमा कर आणि आम्हाला आपल्या कृपाछत्रात घे, तू सर्वांत जास्त दयाळू आहेस.’’
- (उत्तरादाखल फर्माविण्यात आले की,) ’’ज्या लोकांनी वासराला उपास्य बनविले ते जरूर आपल्या पालनकर्त्याच्या क्रोधांत सापडल्याशिवाय राहणार नाहीत आणि जगातील जीवनात अपमानित होतील. असत्य रचणार्यांना आम्ही अशीच शिक्षा देतो.
- आणि जे लोक वाईट कृत्ये करतील व मग पश्चात्ताप व्यक्त करतील व श्रद्धा ठेवतील तर निश्चितच या पश्चात्ताप व श्रद्धेनंतर तुझा पालनकर्ता क्षमा करणारा व दया दर्शविणारा आहे.’’
- मग जेव्हा मूसा (अ.) चा राग शांत झाला तेव्हा त्याने त्या पाट्या उचलून घेतल्या ज्यांच्या लिखाणांत मार्गदर्शन व कृपा होती त्या लोकांसाठी जे आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगतात,
- आणि त्याने आपल्या लोकसमूहातील सत्तर लोकांची निवड केली की त्यांनी (त्याच्यासमवेत) आम्ही ठरवून दिलेल्या वेळेवर हजर व्हावे. जेव्हा त्यांना एका भयंकर भूकंपाने गाठले तेव्हा मूसा (अ.) ने विनविले, ’’हे माझ्या स्वामी, तू इच्छिले असते तर अगोदरच यांना व मला नष्ट करू शकत होता. काय तू त्या अपराधापायी जो आमच्यापैकी काही मूर्खांनी केला होता, आम्हा सर्वांना नष्ट करणार आहेस? ही तर तू घेतलेली एक परीक्षा होती की ज्याद्वारे तू ज्याला इच्छितो त्याला मार्गभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो त्याला सन्मार्ग प्रदान करतो. आमचा पालक तर तूच आहेस, म्हणून आम्हाला क्षमा कर आणि आमच्यावर कृपा कर, तू सर्वापेक्षा जास्त क्षमा करणारा आहेस
- आणि आमच्यासाठी या जगातीलही भले लिहा व मरणोत्तर जीवनातसुद्धा. आम्ही आपल्याकडे रूजू झालो आहोत. उत्तरादाखल फर्माविण्यात आले, ’’शिक्षा तर मी ज्याला इच्छितो त्याला करतो, पण माझी कृपा प्रत्येक वस्तूवर आच्छादित आहे आणि ती मी त्या लोकांसाठी लिहीन जे अवज्ञापासून दूर राहतील, जकात देतील व माझ्या संकेतांवर श्रद्धा ठेवतील.’’
- (म्हणून आज ही कृपा त्या लोकांचा वाटा आहे) जे या निरक्षर पैगंबर-नबी (स.) चे अनुयायित्व पत्करतील ज्याचा उल्लेख त्यांना त्यांच्या तौरात व इंजीलमध्ये लिखित स्वरूपात आढळतो. तो त्यांना सदाचाराची आज्ञा देतो, दुराचारापासून रोखतो, त्यांच्यासाठी स्वच्छ वस्तू हलाल करतो व अस्वच्छ वस्तू हराम करतो, आणि त्यांच्यावरून ते ओझे उतरवितो जे त्यांच्यावर लादलेले होते आणि ती बंधने सोडतो ज्यामध्ये ते जखडलेले होते. म्हणून जे लोक याच्यावर श्रद्धा ठेवतील आणि याचे समर्थन व सहाय्य करतील व त्या प्रकाशाचे अनुसरण करतील जो याच्याबरोबर अवतरला गेला आहे, तेच सफल होणारे आहेत.
- हे मुहम्मद (स.) सांगा की, ’’हे मानवांनो, मी तुम्हा सर्वांकडे त्या अल्लाहचा प्रेषित आहे जो पृथ्वी व आकाशांच्या राज्यांचा स्वामी आहे, त्याच्याशिवाय इतर कोणीही ईश्वर नाही, तोच जीवन प्रदान करतो व तोच मृत्यू देतो, म्हणून श्रद्धा ठेवा अल्लाहवर आणि त्याने पाठविलेल्या निरक्षर नबी (स.) वर जो अल्लाह व त्याच्या आदेशांना मानतो, आणि अनुसरण करा त्याचे, जेणेकरून तुम्ही सरळमार्ग प्राप्त कराल.’’
- मूसा (अ.) च्या लोकांत एक गट असा देखील होता जो सत्यानुसार मार्गदर्शन करीत असे व सत्यानुसारच न्याय करीत असे.
- आणि आम्ही त्या जनसमूहास बारा घराण्यांत विभागून त्यांना स्वतंत्र गटाचे रूप दिले होते. आणि जेव्हा मूसा (अ.) कडे त्याच्या लोकांनी पाणी मागितले, तेव्हा आम्ही त्याला संकेत दिला की अमुक खडकावर आपली लाठी मार. म्हणून त्या खडकामधून अकस्मात बारा झरे फुटले आणि प्रत्येक गटाने आपला पाणवठा निश्चित केला, आम्ही त्यांच्यावर ढगांची सावली केली आणि त्यांच्यावर ’मन्न’ व ’सलवा’ (आकाशातून अवतरलेले खाद्य) उतरविले, - ’’खा ते स्वच्छ पदार्थ जे आम्ही तुम्हाला प्रदान केले आहेत.’’ परंतु यानंतर त्यांनी जे काही केले ते आमच्यावर त्यांनी अत्याचार केला नाही तर उलट स्वतःवरच अत्याचार करीत राहिले.
- स्मरण करा तो प्रसंग जेव्हा त्यांना सांगितले गेले होते की, ’’या वस्तीत जाऊन राहा आणि याच्या उत्पन्नांतून आपल्या मर्जीनुसार उपजीविका प्राप्त करा व ’’हित्ततून हित्ततून’’ म्हणत जा आणि शहराच्या दारातून नतमस्तक होत होत प्रवेश करा, आम्ही तुमचे अपराध माफ करू आणि पवित्र वर्तन राखणार्यांना जास्त कृपेने उपकृत करू.’’
- परंतु जे लोक त्यांच्यापैकी अत्याचारी होते, त्यांनी ती गोष्ट जी त्यांना सांगितली गेली होती बदलून टाकली, आणि परिणाम असा झाला की आम्ही त्यांच्या अत्याचाराच्या शिक्षेपायी त्यांच्यावर आकाशातून प्रकोप पाठविला.
- आणि जरा यांना त्या वस्तीची कैफियतदेखील विचारा जी समुद्र किनारी वसली होती. यांना आठवून द्या तो प्रसंग की तेथील लोक सब्त (शनिवार) च्या दिवशी अल्लाहची आज्ञा भंग करीत होते आणि असे की मासे शनिवारच्या दिवशीच उसळून उसळून पृष्ठभागावर त्यांच्यासमोर येत असत व शनिवार सोडून इतर दिवशी येत नसत. हे यासाठी घडत असे की आम्ही त्यांच्या अवज्ञेपायी त्यांना परीक्षेत टाकत होतो.
- आणि यांना हे देखील आठवून द्या की जेव्हा त्यांच्यापैकी एका गटाने दुसर्या गटास सांगितले होते, ’’तुम्ही अशा लोकांना उपदेश का करता, ज्यांना अल्लाह नष्ट करणार आहे अथवा कठोर शिक्षा देणार आहे.’’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले होते की, ’’आम्ही हे सर्वकाही तुमच्या पालनकर्त्याच्या पुढे आपल्या बचावाचे साधन म्हणून आणि या अपेक्षेने करीत आहोत की कदाचित हे लोक त्याच्या अवज्ञेपासून दूर राहतील.’’
- सरतेशेवटी जेव्हा ते त्या आदेशांना पूर्णतः विसरून गेले ज्याची त्यांना आठवण करून दिली गेली होती तेव्हा आम्ही त्या लोकांना वाचविले जे वाईटापासून रोखत होते, आणि उरलेल्या सर्व लोकांना जे अत्याचारी होते, त्यांच्या अवज्ञेपायी त्यांना कठोर प्रकोपात पकडले.
- मग जेव्हा ते पूर्ण शिरजोरीने तीच कृत्ये करीत राहिले ज्यापासून त्यांना रोखले गेले होते, तेव्हा आम्ही सांगितले, माकड बना अपमानित व तिरस्कृत.
- आणि आठवा जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने जाहीर केले की, ’’तो पुनरुत्थानापर्यंत सतत असले लोक बनीइस्राईलवर लादत राहील जे त्यांना अत्यंत वाईट यातना देतील.’’ निःसंशय तुमचा पालनकर्ता शिक्षा देण्यात फार सत्वर आहे आणि निश्चितपणे तो क्षमा व दया दर्शविणारा देखील आहे.
- आम्ही भूतलावर त्यांच्या तुकड्या, करून अनेक जनसमूहात त्यांना विभागून टाकले. काही लोक त्यांच्यात सदाचारी होते आणि काही त्यांच्यापेक्षा वेगळे. आणि आम्ही त्यांना बर्या आणि वाईट स्थितीने परीक्षेत टाकीत राहिलो की कदाचित हे परत वळतील.
- मग अगोदरच्या पिढ्यानंतर असे अपात्र त्यांचे उत्तराधिकारी झाले जे अल्लाहच्या ग्रंथाचे वारस असूनसुद्धा याच तुच्छ जगताचे लाभ उपटतात आणि सांगून टाकतात की अपेक्षा आहे की आम्हाला माफ केले जाईल, आणि जर तीच ऐहिक संपत्ती समोर आल्यास लगबगीने ती घेतात. काय त्यांच्याकडून ग्रंथाची प्रतिज्ञा घेतली गेली नाही की अल्लाहच्या नावाने तीच गोष्ट सांगावी जी सत्य आहे? आणि यांनी स्वतःच वाचले आहे जे ग्रंथात लिहिलेले आहे. परलोकातील निवासस्थान तर ईशपरायण लोकांसाठीच उत्तम आहे. काय एवढीशी गोष्ट देखील तुम्हाला कळत नाही?
- जे लोक ग्रंथाचे पालन करतात व ज्यांनी नमाज कायम केली आहे, निश्चितच अशा सदाचारी लोकांचा मोबदला आम्ही वाया जाऊ देणार नाही
- यांना तो प्रसंग देखील आठवतो काय जेव्हा आम्ही पर्वताला हलवून यांच्यावर अशा प्रकारे आच्छादिले होते की जणूकाय ती छत्री असावी आणि हे कल्पना करीत होते की तो यांच्यावर कोसळेल आणि तेव्हा आम्ही यांना सांगितले होते की जो ग्रंथ आम्ही तुम्हाला देत आहोत त्याला समर्थपणे उचलून धरा, आणि जे काही त्यात लिहिले आहे, त्याला स्मरणांत ठेवा, अपेक्षा आहे की तुम्ही दुर्वर्तनापासून अलिप्त राहाल.
- आणि हे नबी (स.), लोकांना आठवण करून द्या त्या प्रसंगाची जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने आदमच्या संततीच्या पाठीतून समस्त मानवजातीला अस्तित्वात आणले होते आणि त्यांना स्वतः त्यांच्यावरच साक्षीदार ठरवीत विचारले होते, ’’काय मी तुमचा पालनकर्ता नाही?’’ त्यांनी सांगितले, ’’निश्चितच आपण आमचे पालनकर्ता आहात, आम्ही याची ग्वाही देतो,’’ हे आम्ही याकरिता केले की एखादे वेळी पुनरुत्थानाच्या दिवशी असे सांगू नये की, ’’आम्ही तर या गोष्टीपासून अनभिज्ञ होतो.’
- अथवा असे सांगू नये की, ’’अनेकेश्वरवादाचा प्रारंभ तर आमच्या वाड-वडिलांनी आमच्या अगोदरच केला होता आणि आम्ही त्यानंतर त्यांच्या वंशात जन्मलो, मग आपण आम्हाला त्या अपराधाबद्दल पकडता काय जो दुष्कृत्य करणार्या लोकांनी केला होता?’’
- पहा! अशा तर्हेने आम्ही संकेत स्पष्टपणे प्रस्तुत करतो. आणि अशासाठी करतो की या लोकांनी त्याकडे परत यावे.
- आणि हे पैगंबर (स.), यांच्यासमोर त्या माणसाच्या स्थितीचे वर्णन करा ज्याला आम्ही आमच्या संकेतवचनांचे शिक्षण दिले होते परंतु त्याने त्यांच्या निर्बंधातून पळ काढला. सरतेशेवटी शैतान त्याच्या मागे लागला येथपर्यंत की त्याचा भरकटलेल्या लोकांत समावेश झाला.
- जर आम्ही इच्छिले असते तर त्याला त्या संकेतवचनांद्वारे उच्चस्थान दिले असते, परंतु त्याचा तर जमिनीकडेच कल राहिला आणि आपल्या मनोवासनेच्याच आहारी गेला, म्हणून त्याची स्थिती कुत्र्यासारखी झाली की तुम्ही त्याच्यावर हल्ला केला तरी तो जीभ लोंबकळत ठेवतो आणि त्याला सोडून दिले तरी जीभ लोंबकळतच ठेवतो. हेच उदाहरण आहे त्या लोकांचे जे आमच्या संकेतवचनांना खोटे लेखतात. तुम्ही या हकीगती त्यांना ऐकवीत राहा कदाचित हे काही विचार व चिंतन करतील.
- अत्यंत वाईट उदाहरण आहे, अशा लोकांचे ज्यांनी आमच्या संकेतवचनांना खोटे ठरविले, आणि ते स्वतःवर स्वतःच अत्याचार करीत राहिले आहेत.
- ज्याला अल्लाह मार्गदर्शन करतो फक्त तोच सरळमार्ग प्राप्त करतो व ज्याला अल्लाह आपल्या मार्गदर्शनापासून वंचित करतो तोच अयशस्वी व निराश बनतो.
- आणि ही सत्य स्थिती आहे की बरेचसे जिन्न व माणसे अशी आहेत ज्यांना आम्ही नरकासाठीच निर्माण केले आहे. त्यांच्याजवळ मने आहेत पण ते त्यांनी विचार करीत नाहीत, त्यांच्यापाशी डोळे आहेत पण ते पाहात नाहीत, त्यांच्याजवळ कान आहेत पण ते ऐकत नाहीत. ते जनावरांसारखे आहेत किंबहुना त्यांच्यापेक्षाही तुच्छ आहेत, हे ते लोक होत जे गफलतीत हरपले आहेत.
- अल्लाह चांगल्या नावानांच पात्र आहे, त्याचा चांगल्या नावांनीच धावा करा आणि त्या लोकांना त्यांच्या स्थितीत सोडा, जे त्याची नावे ठेवण्यात सत्यापासून पराङमुख होतात. जे काही ते करतात त्यांचा बदला त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही,
- आमच्या निर्मितीत एक गट असा देखील आहे जो पुरेपूर सत्यानुसार मार्गदर्शन व सत्यानुसार न्याय करतो.
- उरले ते लोक ज्यांनी आमची संकेतवचने खोटी लेखली आहेत, तर त्यांना आम्ही क्रमाक्रमाने अशा पद्धतीने विनाशाकडे नेऊ की त्यांना पत्ता देखील लागणार नाही.
- मी त्यांना वाव देत आहे, माझ्या डावपेचांना काही तोड नाही.
- आणि काय या लोकांनी कधी विचार केला नाही? यांच्या मित्रावर वेडेपणाचा काहीच परिणाम नाही. तो तर एक सावध करणारा आहे जो (वाईट परिणाम समोर येण्यापूर्वी) स्पष्टपणे खबरदार करीत आहे.
- काय या लोकांनी आकाश आणि पृथ्वीच्या व्यवस्थेवर कधी विचार केला नाही आणि कोणत्याही वस्तूला देखील जी अल्लाहने निर्मिली आहे डोळे उघडून पाहिले नाही? आणि काय याचा देखील यांनी कधी विचार केला नाही कदाचित यांचा जीवनकाल संपुष्टात येण्याची घटका जवळ येऊन ठेपली असेल? मग शेवटी पैगंबरांच्या या सूचनेनंतर इतर कोणती गोष्ट अशी असू शकते ज्यावर यांनी श्रद्धा ठेवावी?
- ज्याला अल्लाहने मार्गदर्शनापासून वंचित केले त्याच्याकरिता मग कोणीच मार्गदर्शक नाही, आणि अल्लाह त्यांना दुर्वर्तनातच भटकलेल्या अवस्थेत सोडून देतो.
- हे लोक तुम्हाला विचारतात की शेवटी ती पुनरुत्थानाची घटका अवतरणार तरी कधी? सांगा, ’’त्याचे ज्ञान माझ्या पालनकर्त्याजवळच आहे, तिला तिच्या वेळेवर तोच जाहीर करील. आकाशांत व जमिनीत ती अत्यंत कठीण वेळ असेल, ती तुमच्यावर अकस्मात येईल.’’ हे लोक त्यासंबंधी तुम्हाला अशाप्रकारे विचारतात जणूकाय तुम्ही तिच्या शोधात लागला आहात, सांगा, ’’त्याचे ज्ञान तर केवळ अल्लाहला आहे पण बहुतेक लोक या सत्यापासून अनभिज्ञ आहेत.’’
- हे पैगंबर (स.), यांना सांगा की, ’’मी स्वतःकरिता कोणत्याही नफा तोट्याचा अधिकार बाळगत नाही, अल्लाहच जे काही इच्छितो ते होते आणि जर मला परोक्षाचे ज्ञान असते तर मी पुष्कळसे लाभ स्वतःसाठी प्राप्त करून घेतले असते व मला कधीही एखादे नुकसान पोहचले नसते. मी तर केवळ एक खबरदार करणारा व खुषखबर ऐकविणारा आहे त्या लोकांसाठी जे माझे म्हणणे मान्य करतील.’’
- तो अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला एका जिवापासून निर्माण केले व त्याच्याच जातीपासून जोडी बनविली म्हणजे तिच्या सान्निध्यात संतोष प्राप्त करावा. मग जेव्हा पुरुषाने स्त्रीला झाकले तेव्हा तिला एक सूक्ष्म गर्भ राहिला त्याचा भार वाहून ती संचार करीत राहिली, मग जेव्हा तिचा तो भार वाढला तेव्हा दोघांनी मिळून अल्लाहचा, आपल्या पालनकर्त्याचा धावा केला की, जर तू आम्हाला चांगले मूल दिलेस तर आम्ही तुझे कृतज्ञ राहू.
- पण जेव्हा अल्लाहने त्यांना एक सुखरूप मूल दिले तेव्हा ते त्याच्या बक्षीस व मेहरबानीत इतरांना त्याचा भागीदार ठरवू लागले. अल्लाह फार उच्च व श्रेष्ठ आहे त्या अनेकेश्वरवादी गोष्टीपासून जी हे लोक करतात.
- कसले नादान आहेत हे लोक की त्यांना अल्लाहचा भागीदार ठरवितात जे कोणतीही वस्तू निर्माण करीत नाहीत उलट स्वतः निर्मिले जातात.
- जे यांचीही मदत करू शकत नाहीत आणि आपल्या स्वतःचे सहाय्य करण्यास देखील समर्थ नाहीत
- जर तुम्ही यांना सरळमार्गावर येण्याचे आमंत्रण द्याल तर ते तुमच्या पाठीमागे येणार नाहीत. मग तुम्ही त्यांना हांक द्या अथवा स्तब्ध राहा, दोन्हीही अवस्थेत तुमच्यासाठी ते सारखेच राहतील.
- तुम्ही अल्लाहला सोडून ज्यांचा धावा करता ते तर केवळ दास आहेत ज्याप्रमाणे तुम्ही दास आहात. यांच्याकडे प्रार्थना करून पहा, यांनी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर द्यावे जर यांच्याबाबतीत तुमच्या धारणा खर्या आहेत.
- काय यांना पाय आहेत की त्यांच्या सहाय्याने चालतील? काय यांना हात आहेत की त्यांनी पकडतील? काय यांना डोळे आहेत की ज्यांनी पाहतील? काय यांना कान आहेत की ज्यांनी ऐकतील? हे पैगंबर (स.), यांना सांगा की, ’’बोलावून घ्या आपल्या मानलेल्या भागीदारांना, मग तुम्ही सर्वजण मिळून माझ्याविरूद्ध डावपेच रचा आणि मला मुळीच सवड देऊ नका,
- माझा संरक्षक व सहायक तो अल्लाह आहे ज्याने हा ग्रंथ अवतरला आहे आणि तो सदाचारी लोकांची मदत करतो.
- याउलट तुम्ही अल्लाहव्यतिरिक्त ज्यांचा धावा करता ते तुम्हाला सहाय्य करू शकत नाहीत आणि स्वतः आपल्याला मदत करण्याचे देखील सामर्थ्य त्यांच्यात नाही,
- इतकेच नव्हे तर जर तुम्ही त्यांना सरळ मार्गावर येण्याचे आवाहन कराल तर ते तुमचे म्हणणे ऐकूही शकत नाहीत. सकृतदर्शनी तुम्हाला असे दिसते की ते तुमच्याकडे पाहात आहेत परंतु वस्तुतः ते काहीही पाहात नाहीत.’’
- हे पैगंबर (स.), मृदूता आणि क्षमाशीलतेच्या मार्गाचा अंगिकार करा. भलेपणाचे उद्बोधन देत राहा आणि अडाण्यांशी विवाद टाळा
- जर एखादे वेळी शैतानने तुम्हाला उद्युक्त केले तर अल्लाहचा आश्रय मागा, तो सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.
- वास्तविक पाहता जे लोक ईशभीरू आहेत त्यांची स्थिती तर अशी असते की एखाद्या वेळी शैतानाच्या प्रभावाने एखादा वाईट विचार त्यांना स्पर्श जरी करून जात असेल तरी ते ताबडतोब सावध होतात आणि मग त्यांना स्पष्ट दिसू लागते की त्यांच्यासाठी योग्य कार्यपद्धती कोणती आहे.
- उरले त्यांचे (अर्थात शैतानांचे) भाऊबंद, तर ते त्यांना त्यांच्या वाकड्या चालीत खेचून घेऊन जातात आणि त्यांना भटकविण्यात काहीही कसूर करीत नाहीत.
- हे पैगंबर (स.), जेव्हा तुम्ही या लोकांसमोर एखादे संकेतचिन्ह (अर्थात चमत्कार) प्रस्तुत करीत नाही तेव्हा ते म्हणतात की तुम्ही स्वतःसाठी एखाद्या संकेताची निवड का म्हणून केली नाही? त्यांना सांगा, ’’मी तर केवळ त्या (वह्य) दिव्य प्रकटनाचे अनुसरण करतो जे माझ्या पालनकर्त्याने माझ्याकडे पाठविले आहे, हा डोळसपणा आणणारा प्रकाश आहे तुमच्या पालनकर्त्याकडून आणि मार्गदर्शन व कृपा आहे त्या लोकांसाठी जे याला स्वीकारतील.
- जेव्हा कुरआनचे पठण तुमच्यासमोर केले जात असेल तेव्हा त्याला लक्षपूर्वक ऐका व शांत राहा कदाचित तुमच्यावरसुद्धा कृपा होईल.’’
- हे पैगंबर (स.), आपल्या पालनकर्त्याचे सकाळी व संध्याकाळी स्मरण करीत जा, मनातल्या मनात, अनुनय विनय आणि भय बाळगून आणि तोंडाने देखील हलक्या आवाजात. तुम्ही त्या लोकांपैकी बनू नका जे गाफील बनले आहेत.
- जे दूत तुमच्या पालनकर्त्याच्या ठायी निकटतम स्थान राखतात ते कधीही आपल्या मोठेपणाच्या दर्पात त्याच्या भक्तीपासून पराङमुख होत नाहीत. आणि त्याचे पावित्र्यगान करतात आणि त्याच्यापुढे नतमस्तक होतात.