Surah Taha With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

   20. ताॅहा - طه

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे


  1. तॉहा.
  2. आम्ही हे कुरआन तुमच्यावर यासाठी अवतरले नाही की तुम्ही संकटात पडावे.
  3. हे तर एक पुनःस्मरण होय. अशा प्रत्येक इसमासाठी ज्याने भीती बाळगावी.
  4. अवतरले गेले आहे त्याच्याकडून ज्याने निर्माण केले पृथ्वी आणि उत्तुंग आकाशांना.
  5. तो परमदयाळू (सृष्टीच्या) राजसिंहासनावर विराजमान आहे.
  6. स्वामी आहे त्या सर्व वस्तूंचा ज्या आकाशांत व पृथ्वीत आहेत, ज्या पृथ्वी व आकाशांच्या दरम्यान आहेत आणि ज्या मातीखाली आहेत.
  7. तुम्ही वाटल्यास आपले म्हणणे मोठ्याने सांगा, तो तर हळूच सांगितलेली गोष्ट किंबहुना त्याच्यापेक्षाही अधिक गुप्त गोष्टदेखील जाणतो.
  8. तो अल्लाह आहे, त्याच्याशिवाय अन्य कोणीच परमेश्वर नाही, त्याची उत्कृष्ट नामावली आहे.
  9. आणि तुम्हाला काही मूसा (अ.) ची वार्ताही मिळाली आहे का?
  10. जेव्हा त्याने एक अग्नी पाहिला आणि आपल्या कुटुंबियांना सांगितले की, ’’थोडे थांबा, मी एक अग्नी पाहिला आहे. कदाचित मी तुमच्यासाठी एखादा निखारा आणावा अथवा या अग्नीवर मला (रस्त्याविषयी) एखादे मार्गदर्शन प्राप्त व्हावे.’’
  11. तेथे पोहचला तेव्हा हाक दिली गेली, ’’हे मूसा (अ.)!
  12. मीच तुझा पालनकर्ता आहे. पादत्राणे काढून ठेव. तू ’तुवा’ या पवित्र खोर्‍यात आहेस
  13. आणि मी तुला निवडले आहे. ऐक, जे काही दिव्य प्रकटन केले जात आहे.
  14. मीच अल्लाह आहे. माझ्याशिवाय कोणीच ईश्वर नाही. म्हणून तू माझीच भक्ती कर आणि माझ्या स्मरणाकरिता नमाज कायम कर.
  15. पुनरुत्थानाची घटका अवश्य येणार आहे. मी ती वेळ गुप्त ठेवू इच्छितो जेणेकरून प्रत्येक सजीवाला आपल्या प्रयत्नानुसार मोबदला मिळावा,
  16. तर असा कोणताही इसम जो त्यावर श्रद्धा ठेवीत नाही आणि आपल्या मनोवासनांचा दास बनला आहे त्याने तुला त्या क्षणाच्या काळजीपासून रोखता कामा नये अन्यथा तू विनाशात पडशील.
  17. आणि हे मूसा, हे तुझ्या हातात काय आहे?’’
  18. मूसा (अ.). ने उत्तर दिले, ’’ही माझी काठी आहे. मी यावर आधार घेऊन चालतो, याने आपल्या शेळ्यांसाठी पाने झाडतो, आणखीही अनेक कामे आहेत जी हिच्या साह्याने पार पाडतो.’’
  19. फर्माविले, ’’फेकून दे हिला मूसा (अ.).’’
  20. त्याने फेकून दिली, आणि अकस्मात तो एक सर्प होता जो पळत होता.
  21. फर्माविले, ’’पकड याला आणि भिऊ नकोस, आम्ही याला पुन्हा तशीच करू जशी ही होती.
  22. आणि जरा आपला हात आपल्या काखेत दाब, तळपत निघेल कोणत्याही त्रासाविना. हा दुसरा संकेत आहे
  23. यासाठी की आम्ही तुला आपले मोठे संकेत दाखविणार आहोत.
  24. आता तू फिरऔनजवळ जा, तो दुर्वर्तनी झाला आहे.’’
  25. मूसा (अ.) ने विनविले, ’’हे पालनकर्त्या, माझे हृदय विस्तृत कर.
  26. आणि माझे कार्य माझ्यासाठी सुलभ कर.
  27. आणि माझी जिव्हाग्रंथी उलगडून दे,
  28. जेणेकरून लोकांना माझे बोलणे कळेल,
  29. आणि माझ्यासाठी माझ्या घराण्यातून एक वजीर नेमून दे
  30. हारून जो माझा भाऊ आहे,
  31. त्याच्याद्वारे माझे हात बळकट कर,
  32. आणि त्याला माझ्या कामात सहभागी कर,
  33. जेणेकरून आम्ही खूप तुझ्या पावित्र्याचे वर्णन करू,
  34. आणि तुझी चर्चा करू.
  35. तू नेहमी आमच्या स्थितीवर दृष्टि राखणारा आहेस.’’
  36. फर्माविले, ’’दिले गेले जे काही तू मागितलेस,
  37. हे मूसा (अ.), आम्ही पुन्हा एकदा तुझ्यावर उपकार केले.
  38. आठव ती घटका जेव्हा आम्ही तुझ्या आईला इशारा केला,
  39. असा इशारा जो दिव्य प्रकटनाद्वारेच केला जातो की या बाळाला पेटीत ठेव आणि पेटी नदीत सोडून दे. नदी तिला काठावर फेकून देईल आणि तिला माझा शत्रू आणि या बाळाचा शत्रू उचलून घेईल.’’ ’’मी माझे प्रेम तुझ्यावर पांघरले आणि अशी व्यवस्था केली की तुझे संगोपन माझ्या देखरेखीत व्हावे.
  40. स्मरण कर जेव्हा तुझी बहीण चालत होती, मग जाऊन सांगते की मी तुम्हाला तिचा पत्ता देऊ जी या बाळाचे पालनपोषण चांगल्या प्रकारे करील. अशा प्रकारे आम्ही तुला पुन्हा तुझ्या आईजवळ पोहचविले जेणेकरून तिचे डोळे थंड रहावेत आणि ती दुःखी होऊ नये. आणि (हेही आठव की) तू एका व्यक्तीला ठार केले होतेस, आम्ही तुला त्या फंद्यातून काढले आणि तुला निरनिराळ्या परीक्षांतून गुंतविले व तू मदयनच्या लोकांदरम्यान अनेक वर्षे वास्तव्य करून राहिलास. मग आता तू यथायोग्य वेळेवर आलेला आहेस.
  41. हे मूसा, मी तुला आपल्या कामास योग्य बनविले आहे.
  42. जा, तू आणि तुझा भाऊ माझ्या संकेतासह. आणि हे पहा तुम्ही माझ्या स्मरणात कसूर करू नका
  43. जा तुम्ही दोघे फिरऔनजवळ तो शिरजोर बनला आहे.
  44. त्याच्याबरोबर नरमाईने बोला, कदाचित तो उपदेश स्वीकारील अथवा भीती बाळगील?’’
  45. दोघांनी विनविले, ’’हे पालनकर्त्या आम्हाला भय आहे की तो आम्हावर अत्याचार करील अथवा तुटून पडेल.’’
  46. फर्माविले, ’’भिऊ नका, मी तुमच्यासमवेत आहे, सर्वकाही ऐकत आहे आणि पहात आहे
  47. जा त्याच्याजवळ आणि सांगा की आम्ही तुझ्या पालनकर्त्याचे प्रेषित आहोत, बनीइस्राईलना आमच्यासमवेत जाण्यासाठी मुक्त कर आणि त्यांना त्रास देऊ नकोस, आम्ही तुझ्याजवळ तुझ्या पालनकर्त्याचे संकेत घेऊन आलो आहोत आणि शांती व सुरक्षितता आहे त्याच्यासाठी जो सरळ मार्गाचे अनुसरण करील.
  48. आम्हाला दिव्य बोधाद्वारे कळविले गेले आहे की प्रकोप आहे त्याच्यासाठी जो खोटे ठरवील आणि तोंड फिरवील.’’
  49. फिरऔनने सांगितले, ’’बरे तर मग तुम्हा दोघांचा पालनकर्ता कोण आहे हे मूसा (अ.)?’’
  50. मूसा (अ.) ने उत्तर दिले, ’’आमचा पालकर्ता तो आहे ज्याने प्रत्येक वस्तूला तिचे स्वरूप प्रदान केले मग तिला मार्ग दाखविला.’’
  51. फिरऔन म्हणाला, ’’आणि पूर्वी ज्या पिढ्या होऊन गेल्या आहेत त्यांची मग काय स्थिती होती?’’
  52. मूसा (अ.) म्हणाला, ’’त्याचे ज्ञान माझ्या पालनकर्त्यापाशी एका लेखात सुरक्षित आहे. माझा पालनकर्ता चुकतही नाही आणि विसरतही नाही’’
  53. तोच, ज्याने तुमच्यासाठी जमिनीची चादर अंथरली, आणि तिच्यात तुमच्यासाठी (चालण्यास) मार्ग बनविले, व वरून पर्जन्यवृष्टी केली, मग त्याद्वारे अनेक जातीच्या वनस्पती निर्माण केल्या
  54. खा आणि आपल्या जनावरांनासुद्धा चारा. निश्चितच यात बरेच संकेत आहेत बुद्धी बाळगणार्‍यांसाठी.
  55. याच जमिनीतून आम्ही तुम्हाला निर्माण केले, हिच्यातच आम्ही तुम्हाला परत नेऊ आणि हिच्यातूनच तुम्हाला दुसर्‍यांदा बाहेर काढू.
  56. आम्ही फिरऔनला आमचे सर्वच संकेत दाखविले. परंतु तो खोटेच ठरवीत गेला आणि मानले नाही.
  57. म्हणू लागला, ’’हे मूसा (अ.), तू आमच्याजवळ यासाठी आलेला आहेस का की आपल्या जादूच्या जोरावर आम्हाला आमच्या देशातून बाहेर काढावे?
  58. बरे, आम्हीसुद्धा तुझ्या मुकाबल्यात तशीच जादू आणतो. ठरव, केव्हा आणि कोठे मुकाबला करावयाचा. आम्हीही या करारापासून फिरणार नाही आणि तूसुद्धा फिरू नकोस. खुल्या मैदानात समोर ये.’’
  59. मूसा (अ.) ने सांगितले, ’’उत्सवाचा दिवस ठरला, आणि दिवसाउजेडी लोकांनी जमा व्हावे.’’
  60. फिरऔनने परतून आपले सर्व डावपेच एकत्रित केले आणि मुकाबल्यासाठी आला.
  61. मूसा (अ.) ने (ऐनवेळी विरोधी दलास संबोधून) सांगितले, ’’हे दुर्दैवी लोकांनो, खोटे आळ रचू नका अल्लाहवर. नाहीतर तो एका भयंकर प्रकोपाने तुमचा सर्वनाश करील. ज्याने कोणी खोटे रचले तो निष्फळ ठरला.’’
  62. हे ऐकून त्यांच्या दरम्यान मतभेद उद्भवले आणि ते गुपचुपपणे आपापसात सल्लामसलत करू लागले.
  63. सरतेशेवटी काही लोकांनी सांगितले की, ’’हे दोघे तर केवळ जादूगार आहेत. यांचा उद्देश असा आहे की आपल्या जादूच्या बळावर तुम्हाला तुमच्या भूमीतून हद्दपार करावे आणि तुमच्या आदर्श जीवनपद्धतीचे उच्चाटन करावे
  64. आपल्या सर्व युक्त्या प्रयुक्त्या आज एकत्र करा आणि एकजुटीने मैदानात या. मात्र हे समजून असा की आज जो कोणी वरचढ ठरला तोच यशस्वी झाला.’’
  65. जादूगार म्हणाले, ’’मूसा (अ.) तुम्ही फेकता की आम्ही अगोदर फेकावे?’’
  66. मूसा (अ.) म्हणाला, ’’नाही, तुम्हीच फेका,’’ एकाएकी त्यांच्या दोर्‍या आणि काठ्या जादूच्या बळावर मूसा (अ.) ला पळत असल्याचे भासू लागल्या.
  67. आणि मूसा (अ.) आपल्या मनात भयभीत झाला.
  68. आम्ही सांगितले, ’’भिऊ नकोस, तूच वरचढ ठरशील.
  69. फेक जे काही तुझ्या हातात आहे, आताच यांच्या सर्व बनावटी वस्तूंना गिळून टाकील. यांनी जे काही घडवून आणले आहे ही तर जादूगारांची फसवेगिरी आहे, आणि जादूगार कदापि यशस्वी होऊ शकत नाही मग तो कितीही थाटात येवो.’’
  70. शेवटी असेच घडले की सर्व जादूगार नतमस्तक स्थितीत आणले गेले आणि त्यांनी पुकारले, ’’मानले आम्ही हारून आणि मूसा (अ.) च्या पालनकर्त्याला.’’
  71. फिरऔनने सांगितले, ’’तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवली यापूर्वी की मी तुम्हाला तशी परवानगी द्यावी? कळून चुकले की हा तुमचा गुरू आहे ज्याने तुम्हाला जादूगिरी शिकविली होती. बरे, आता मी तुमचे हात पाय विरूद्ध दिशेने कापावयास लावतो आणि खजुराच्या खोडावर तुम्हाला सुळी देतो, मग तुम्हाला कळेल की आम्हा दोघांपैकी कोणाचा प्रकोप अधिक कठोर आणि प्रदीर्घ आहे.’’ (म्हणजे मी तुम्हाला अधिक कठोर शिक्षा देऊ शकतो की मूसा (अ.))
  72. जादूगारांनी उत्तर दिले, ’’शपथ आहे त्याची ज्याने आम्हाला निर्माण केले आहे. हे कदापि संभव नाही की आम्ही उज्ज्वल संकेत समोर आल्यानंतरदेखील (सत्यावर) तुला प्राधान्य द्यावे, तुला जे काही करावयाचे असेल ते करून टाक. तू जास्तीत जास्त याच जगातील जीवनाचाच केवळ निर्णय करू शकतोस.
  73. आम्ही तर आमच्या पालनकर्त्यावर श्रद्धा ठेवली जेणेकरून त्याने आमचे अपराध माफ करावे आणि या जादूगिरीपासून, ज्यासाठी तू आम्हाला भाग पाडले होते, क्षमा करावी. अल्लाहच चांगला आहे आणि तो बाकी उरणार आहे.’’
  74. वस्तुस्थिती अशी आहे की जो अपराधी बनून आपल्या पालनकर्त्याच्या ठायी हजर होईल त्याच्यासाठी नरक आहे की जिच्यात तो जिवंतही राहणार नाही व मरणारही नाही.
  75. आणि जो त्याच्या ठायी श्रद्धावंत म्हणून हजर होईल, ज्याने सत्कृत्ये केली असतील अशा सर्व लोकांसाठी उच्च दर्जे आहेत,
  76. सदाबहार उद्याने आहेत ज्यांच्या खालून कालवे वहात असतील, त्यांच्यात ते सदैव राहतील, हा मोबदला आहे त्या व्यक्तीसाठी ज्याने पावित्र्य स्वीकारले.
  77. आम्ही मूसा (अ.) वर दिव्य प्रकटन केले की आता रात्रीच्या रात्री माझ्या दासांना घेऊन निघून जा, आणि त्यांच्यासाठी समुद्रातून शुष्क मार्ग बनव, तुला कोणाच्या पाठलागाचीही यत्किंचित धास्ती वाटू नये आणि (समुद्रामधून जात असताना) भीतीही वाटू नये.
  78. पाठीमागून फिरऔन आपले सैन्य घेऊन पोहचला, आणि मग समुद्र त्यांच्यावर असा आच्छादित झाला जसे यथायोग्य होते.
  79. फिरऔनने आपल्या लोकांना मार्गभ्रष्टच केले होते. काही सत्य मार्गदर्शन केले नव्हते.
  80. हे बनीइस्राईल, आम्ही तुम्हाला तुमच्या शत्रूपासून मुक्ती दिली आणि तूर पर्वताच्या उजव्या बाजूला तुमच्या हजेरीसाठी वेळ निश्चित केली आणि तुम्हावर मन्न व सलवा उतरविले.
  81. खा, आम्ही दिलेले शुद्ध अन्न आणि ते खाऊन दुर्वर्तन करू नका, नाहीतर तुम्हावर माझा प्रकोप कोसळेल आणि ज्याच्यावर माझा प्रकोप झाला, मग तो कोसळल्याविना राहिला नाही.
  82. तथापि जो पश्चात्ताप करील आणि श्रद्धा ठेवील व सत्कृत्ये करील, मग सरळ वाट चालत राहील त्याच्यासाठी मी फार क्षमा करणारा आहे.
  83. आणि कोणत्या गोष्टीने आपल्या लोकांच्या अगोदर तुला आणले हे मूसा (अ.)?
  84. त्याने सांगितले, ’’ते काय माझ्या पाठोपाठ येतच आहेत. मी घाई करून तुझ्या ठायी आलेलो आहे, हे माझ्या पालनकर्त्या, जेणेकरून तू माझ्यावर प्रसन्न व्हावे.’’
  85. फर्माविले, ’’बरे तर ऐका, आम्ही तुमच्या पाठीमागे तुमच्या लोकांना परीक्षेत टाकले आणि सामरीने त्यांना मार्गभ्रष्ट करून टाकले.’’
  86. मूसा (अ.) तीप रागाच्या व दुःखाच्या स्थितीत आपल्या लोकांकडे परतला. जाऊन त्याने सांगितले, ’’हे माझ्या समुहबांधवांनो, तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला चांगले वचन दिले नव्हते काय? तुम्हाला खूप दिवस लागले आहेत काय? अथवा तुम्ही आपल्या पालनकर्त्याचा प्रकोपच आपल्यावर ओढवून घेऊ इच्छित होता की तुम्ही माझ्याशी वचनभंग केला?’’
  87. त्यांनी उत्तर दिले, ’’आम्ही आपल्याशी वचनविरोध काही स्वअधिकाराने केला नाही, मामला असा झाला की लोकांच्या दागिन्यांच्या ओझ्याने आम्ही लादलो होतो आणि आम्ही बस्स, त्यांना फेकून दिले होते.’’ मग अशाच प्रकारे सामरीनेदेखील काही टाकले.
  88. आणि त्यांच्यासाठी एका वासराची मूर्ती बनवून बाहेर आणली जिच्यातून बैलासारखा आवाज निघत होता. लोक ओरडले, ’’हाच आहे तुमचा ईश्वर आणि मूसा (अ.) चा ईश्वर, मूसा (अ.) ला याचा विसर पडला.’’
  89. काय ते पहात नव्हते की तो त्यांच्या बोलण्याचे उत्तरही देत नाही आणि त्यांच्या लाभहानीचा काही अधिकारदेखील राखत नाही.
  90. हारून (अ.) ने (मूसा (अ.) च्या आगमना) पूर्वी त्यांना सांगून टाकले होते की, ’’लोकहो! तुम्ही याच्यामुळे उपद्रवात सापडला आहात, तुमचा पालनकर्ता तर ’रहमान’ (परमदयाळू) आहे, म्हणून तुम्ही माझे अनुकरण करा आणि माझे म्हणणे मान्य करा.’’
  91. परंतु त्यांनी त्याला सांगितले, ’’आम्ही तर याचीच पूजा करीत राहू जोपर्यंत की मूसा (अ.) आमच्यात परत येत नाही.’’
  92. मूसा (अ.) (आपल्या लोकांना दरडावल्यानंतर हारूनकडे वळला आणि) म्हणाला, ’’हारून (अ.), जेव्हा तू पाहिले होतेस की हे मार्गभ्रष्ट आहेत तेव्हा कोणत्या गोष्टीने तुझे हात रोखले होते
  93. की माझ्या पद्धतीचे अनुसरण करू नये. तू माझी आज्ञा भंग केलीस?’’
  94. हारूनने उत्तर दिले, ’’हे माझ्या आईच्या मुला! माझी दाढी धरू नकोस आणि माझ्या डोक्याचे केस ओढू नकोस. मला या गोष्टीचे भय होते की तू येऊन सांगशील की तूच बनीइस्राईलमध्ये फूट पाडलीस आणि माझ्या म्हणण्याचा मान राखला नाहीस.’’
  95. मूसा (अ.) ने सांगितले, ’’आणि सामरी तुझा काय मामला आहे?’’
  96. त्याने उत्तर दिले, ’’मी ती गोष्ट पाहिली जी या लोकांना दिसली नाही. मग मी प्रेषितांच्या पदचिन्हापासून एक मूठ भरून उचलली व ती टाकली. माझ्या मनाने मला काही असेच सुचविले,’’
  97. मूसा (अ.) ने सांगितले, ’’बरे तर जा, आता आजीवन तुला हेच ओरडावे लागणार आहे की मला स्पर्श करू नका. आणि तुझ्यासाठी जाब विचारण्याची एक घटका निश्चित आहे जी कदापि टळणार नाही आणि पहा आपल्या या उपास्याकडे ज्यावर तू भाळला होतास आम्ही आता याला जाळून टाकू आणि भुकटी करून नदीत प्रवाहित करू.
  98. लोकहो! तुमचा ईश्वर तर केवळ एक अल्लाहच आहे ज्याच्याव्यतिरिक्त इतर कोणी ईश्वर नाही. प्रत्येक वस्तूवर त्याचे ज्ञान व्याप्त आहे.’’
  99. हे पैगंबर (स.)! अशाप्रकारे आम्ही पूर्वी घडलेल्या प्रसंगाच्या वार्ता तुम्हाला ऐकवीत आहोत. आणि आम्ही खास आपल्यापासून तुम्हाला एक उपदेशपाठ (जिक्र) प्रदान केले आहे.
  100. जो कोणी यापासून पराङमुख होईल तो पुनरुत्थानाच्या दिवशी पापाचे भयंकर ओझे उचलेल,
  101. आणि असे सर्व लोक सदैव त्याच्या अरिष्टात गुरफटून राहतील आणि पुनरुत्थानाच्या दिवशी त्यांच्यासाठी (या अपराधाच्या जबाबदारीचे ओझे) भयंकर त्रासदायक ओझे असेल.
  102. त्यादिवशी जेव्हा शिंग फुंकले जाईल आणि आम्ही अपराध्यांना अशा स्थितीत घेरून आणू की त्यांचे डोळे (भीतीमुळे) थिजलेले असतील,
  103. आपापसांत हळूहळू म्हणतील की,’’जगात तुम्ही मुश्किलीने काही दहाच दिवस घालविलेअसतील.’’
  104. आम्हाला चांगलेच माहीत आहे की ते काय बोलत असतील. (आम्हाला हेदेखील माहीत आहे की) त्यावेळी त्यांच्यापैकी जो जास्तीत जास्त जपून अंदाज लावणारा असेल तो म्हणेल की नव्हे, तुमचे जगातील जीवन केवळ एका दिवसाचे होते.
  105. हे लोक तुम्हाला विचारतात की बरे, त्या दिवशी हे पर्वत जातील तरी कुठे? सांगा की माझा पालनकर्ता त्यांना धूळ बनवून उडवून देईल.
  106. आणि पृथ्वीला असे सपाट सुरळीत मैदान बनवून टाकील,
  107. की त्यात तुम्हाला एखादासुद्धा वळसा आणि सुरकुती दिसणार नाही.
  108. त्या दिवशी सर्व लोक हाक देणार्‍याच्या हाकेवर सरळ चालत येतील, कोणी थोडासुद्धा ताठपणा दाखवू शकणार नाही आणि आवाज कृपावंताच्या पुढे दबून जातील, एका चाहूलीव्यतिरिक्त तुम्हाला काहीही ऐकू येणार नाही.
  109. त्यादिवशी शिफारस उपयुक्त ठरणार नाही याशिवाय की एखाद्याला कृपावंत तशी परवानगी देईल आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेणे पसंत करील,
  110. तो लोकांची मागील पुढील सर्व स्थिती जाणतो आणि दुसर्‍यांना त्याचे पूर्ण ज्ञान नाही.
  111. लोकांची मस्तके त्या चिरंजीव व चिरस्थायीच्यासमोर नम्र होतील. निष्फळ ठरेल तो, ज्याने त्यावेळी एखाद्या अत्याचाराचे पापओझे उचललेले असेल,
  112. आणि कसलाही अत्याचार अथवा हक्क मारला जाण्याची भीती नसेल त्या व्यक्तीला जी सत्कृत्ये करील आणि याचबरोबर ती श्रद्धावंतसुद्धा असेल.
  113. आणि हे पैगंबर (स.), अशाच प्रकारे आम्ही याला अरबी भाषेत कुरआन अवतरले आहे आणि यात वेगवेगळ्या प्रकारे इशारे दिले आहेत कदाचित या लोकांनी तिरक्या चालीपासून दूर राहावे अथवा त्यांच्यात काही शुद्धीवर येण्याची चिन्हे याच्यामुळे दिसावीत.
  114. तर उच्च व श्रेष्ठ आहे अल्लाह, खरा बादशाह, आणि पहा, कुरआन पठणात घाई करत जाऊ नका जोपर्यंत तुमच्याकडे त्याचे दिव्य प्रकटन परिपूर्णत्वाला पोहचत नाही, आणि प्रार्थना करा की हे पालनकर्त्या, माझे ज्ञान वृद्धिंगत कर.
  115. आम्ही यापूर्वी आदमला एक आज्ञा दिली होती परंतु तो विसरून गेला आणि आम्हाला त्याच्यात निर्धार आढळला नाही.
  116. आठवा ती वेळ जेव्हा आम्ही दूतांना सांगितले होते की आदमपुढे नतमस्तक व्हा. ते सर्व तर नतमस्तक झाले पण एक इब्लीस (शैतान) ने नकार दिला.
  117. यावर आम्ही आदमला सांगितले की, ’’पहा, हा तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वैरी आहे, असे होता कामा नये की याने तुम्हाला स्वर्गामधून हुसकावून द्यावे आणि तुम्ही संकटात पडावे.
  118. येथे तर तुम्हाला अशा सुखसोयी उपलब्ध आहेत की तुम्ही उपाशी व वस्त्रहीन रहातही नाही
  119. की तहान व ऊनही तुम्हाला त्रास देत नाही.’’
  120. परंतु शैतानने त्याला फूस लावली, म्हणू लागला, ’’हे आदम, दाखवू का तुला ते झाड ज्यापासून चिरंतन जीवन व चिरकाल सत्ता प्राप्त होते?’
  121. सरतेशेवटी त्या उभयता (पती-पत्नी) नी त्या झाडाचे फळ खाऊन टाकले. परिणाम असा झाला की लगेच त्यांचे गुप्तांग एकमेकांसमोर उघड झाले आणि लागले ते स्वतःला स्वर्गाच्या पानांनी झाकावयास. आदम (अ.) ने आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली
  122. आणि सरळ मार्गावरून भरकटलानंतर त्याच्या पालनकर्त्याने निवड केली आणि त्याच्या पश्चात्तापाचा स्वीकार केला. आणि त्याला मार्गदर्शन प्रदान केले.
  123. आणि फर्माविले, ’’तुम्ही दोघे (पक्ष, म्हणजे मानव आणि शैतान) येथून खाली उतरा. तुम्ही एकमेकाचे शत्रू रहाल. आता जर माझ्याकडून एखादे मार्गदर्शन पोहचले तर जो कोणी माझ्या या मार्गदर्शनाचे अनुसरण करील तो भटकणारही नाही आणि दुर्भाग्यात गुरफटणारही नाही.
  124. आणि जो माझे ’जिक्र’ (उपदेशपाठ) पासून तोंड फिरवील त्याच्यासाठी त्याचे जीवन अडचणीचे होईल. आणि पुनरुत्थानाच्या दिवशी आम्ही त्याला अंध उठवू.’’
  125. तो म्हणेल, ’’हे पालनकर्त्या, जगात तर मी डोळस होतो, येथे मला आंधळा म्हणून का उठविले?’’
  126. सर्वश्रेष्ठ अल्लाह फर्मावील, ’’होय, अशाच प्रकारे तर आमच्या वचनांना, जेव्हा त्या तुझ्यापाशी आल्या होत्या तू विसरला होतास, त्याचप्रकारे आज तू विसरला जात आहेस.’’
  127. अशा तर्‍हेने आम्ही मर्यादेबाहेर जाणार्‍यांना आणि आपल्या पालनकर्त्याच्या संकेतांना न मानणार्‍यांना (जगात) बदला देत असतो. आणि मरणोत्तर जीवनाचा प्रकोप अधिक तीप आणि अधिक दीर्घकालीन आहे.
  128. मग काय त्या लोकांना (इतिहासाच्या या धड्याने) कोणतेही मार्गदर्शन मिळाले नाही की यांच्यापूर्वी कित्येक लोकसमुदायांना आम्ही नष्ट करून टाकले आहे ज्यांच्या (उद्ध्वस्त) वस्त्यांमध्ये हे आज वावरत आहेत? वास्तविकतः यांच्यात पुष्कळ संकेत आहेत त्या लोकांसाठी जे सद्बुद्धी बाळगणारे आहेत.
  129. जर तुझ्या पालनकर्त्याकडून पूर्वीच एक गोष्ट निश्चित केली गेली नसती आणि सवलतीची एक मुदत ठरविली गेली नसती तर अवश्य यांचासुद्धा निकाल लावला गेला असता.
  130. म्हणून हे पैगंबर (स.), ज्या गोष्टी हे रचत आहेत त्यावर संयम बाळगा आणि आपल्या पालनकर्त्याच्या गौरव व स्तुतीसमवेत त्याचे पावित्र्यगान करा सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तापूर्वी आणि रात्रीच्या वेळी देखील पावित्र्यगान करा आणि दिवसाच्या मध्यांवर, कदाचित तुम्ही संतुष्ट व्हावे.
  131. आणि नजरदेखील देऊ नकोस लौकिक जीवनातील त्या वैभवाकडे जे आम्ही यापैकी विविध प्रकारच्या लोकांना देऊन ठेवले आहे, ते तर आम्ही त्यांची परीक्षा पाहण्यासाठी दिले आहे, आणि तुझ्या पालनकर्त्याने दिलेली वैध उपजीविकाच उत्तम आणि चिरस्थायी आहे.
  132. आपल्या कुटुंबियांना नमाजचा आदेश द्या आणि स्वतः देखील त्याचे पालन करीत रहा. आम्ही तुमच्यापासून कसलीही उपजीविका इच्छित नाही, उपजीविका तर आम्हीच तुम्हाला देत आहोत आणि अंतीम कल्याण तर ईशपरायणतेसाठीच आहे.
  133. ते म्हणतात, हा इसम आपल्या पालनकर्त्याकडून एखादा संकेत (चमत्कार) का आणत नाही? आणि त्यांच्यापाशी पूर्वीच्या धर्मग्रंथाच्या सर्व शिकवणुकीचे वर्णन स्पष्टपणे आले नाही का?
  134. जर आम्ही त्याच्या येण्यापूर्वी यांना एखाद्या प्रकोपाने नष्ट केले असते तर मग या लोकांनीच सांगितले असते की हे आमच्या पालनकर्त्या, तू आमच्याकडे एखादा प्रेषित का पाठविला नाहीस की अपमानित होण्यापूर्वी व नामुष्की येण्याअगोदरच आम्ही तुझ्या संकेतांचे अनुसरण केले असते?
  135. हे पैगंबर (स.), यांना सांगा, प्रत्येकजण आपल्या कर्माच्या परिणामांच्या प्रतीक्षेत आहे, म्हणून आता प्रतीक्षेत रहा, लवकरच तुम्हाला कळेल की कोण सरळ मार्गावर चालणारे आहेत आणि कोण बोध लाभलेले आहेत.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post