Surah Al Ambiyah With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

    21. अल् अम्बिया - ٱلْأَنْبِيَاء

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे


  1. जवळ येऊन ठेपली आहे लोकांच्या हिशोबाची घटका आणि ते गाफील आहेत.
  2. त्यांच्याजवळ जो काही नवीन उपदेश त्यांच्या पालनकर्त्याकडून येतो, त्याला संकोचाने ऐकतात आणि खेळांत लागलेले रहातात.
  3. त्यांचे मन (दुसर्‍याच चिंतेत) दंग आहे. आणि अत्याचारी आपापसांत कानगोष्टी करतात की, ’’हा इसम खरे तुमच्यासारखाच एक मनुष्य तर आहे, मग काय तुम्ही डोळ्यादेखत जादूच्या फंद्यात अडकणार?’’
  4. पैगंबराने सांगितले, माझा पालनकर्ता ती प्रत्येक गोष्ट जाणतो जी आकाश आणि पृथ्वीत केली जाते, तो ऐकणारा व जाणणारा आहे.
  5. हे म्हणतात, ’’किंबहुना हे स्वप्ना विभ्रम आहे, किंवा स्वरचित आहे, एवढेच नव्हे तर ही व्यक्ती कवी आहे. अन्यथा आणावे याने एखादे संकेतचिन्ह ज्याप्रमाणे पूर्वकालीन पैगंबर संकेतचिन्हांसह पाठविले गेले होते.’’
  6. वस्तुतः यांच्यापूर्वी कोणत्याही वस्तीने, जिला आम्ही नष्ट केले, श्रद्धा ठेवली नव्हती. आता काय हे श्रद्धा ठेवतील?
  7. आणि हे पैगंबर (स.), तुमच्या अगोदरसुद्धा आम्ही माणसांनाच पैगंबर म्हणून पाठविले होते, ज्यांच्यावर आम्ही दिव्यबोध प्रकट करीत होतो. तुम्हाला जर याचे ज्ञान नसेल तर ग्रंथधारकांना विचारून घ्या
  8. त्या पैगंबरांना आम्ही आहार विरहित शरीर संपदा दिली नव्हती. तसेच ते अमर देखील नव्हते.
  9. मग पहा, की सरतेशेवटी आम्ही त्यांच्याशी केलेले वचन पूर्ण केले, आणि त्यांना व ज्यांना ज्यांना आम्ही इच्छिले, वाचविले, आणि मर्यादा भंग करणार्‍यांना आम्ही ठार केले.
  10. लोकहो, आम्ही तुमच्याकडे असा एक ग्रंथ पाठविला आहे ज्यामध्ये तुमचाच उल्लेख आहे, तुम्हाला कळत नाही काय?
  11. कित्येक अत्याचारी वसाहती आहेत, ज्यांना आम्ही चिरडून टाकले आणि त्यांच्यानंतर दुसर्‍या एखाद्या जनसमुदायास उभे केले.
  12. जेव्हा त्यांना आमचा प्रकोप जाणवला तेव्हा लागले तेथून पळ काढायला
  13. (म्हटले गेले) ’’पळू नका, जा आपल्या त्याच घरात आणि ऐश्वर्याच्या साधनांत ज्यात तुम्ही चैन करीत होता, कदाचित तुम्हाला विचारले जाईल.’’
  14. म्हणू लागले, ’’आमचे दुर्दैव! निःशंकपणे आम्ही अपराधी आहोत.’’
  15. आणि ते असाच पुकारा करीत राहिले येथपावेतो की आम्ही त्यांचे खळे केले. आणि त्यांच्यात आयुष्याची ठिणगी सुद्धा शिल्लक ठेवली नाही.
  16. आम्ही हे आकाश आणि पृथ्वी व जे काही त्याच्यात आहे, काही खेळ म्हणून बनविलेले नाही.
  17. जर आम्हाला एखादे खेळणे बनवायचे असते आणि जर असेच काही आम्हाला करावयाचे असते तर आपल्यापासूनच करून घेतले असते.
  18. परंतु आम्ही तर असत्यावर सत्याचा प्रहार करतो, जो त्याचे कपाळमोक्ष करतो आणि तो पाहता पाहता नष्ट होतो आणि तुम्हासाठी विनाश आहे त्या गोष्टीमुळे ज्या तुम्ही रचता.
  19. पृथ्वी व आकाशांत जी काही सृष्टी आहे ती अल्लाहचीच आहे. आणि जे (दूत) त्याच्याजवळ आहेत ते आपल्याला मोठे समजून त्याच्या भक्तीपासून बंड करीत नाहीत आणि शिथिलसुद्धा होत नाहीत.
  20. रात्रंदिवस त्याचे पावित्र्यगान करीत राहतात, विश्रांती घेत नाहीत.
  21. काय या लोकांचे पृथ्वीवरील बनविलेले उपास्य असे आहेत (जे निर्जीवाला सजीव करून) उभे करतात?
  22. जर आकाश व पृथ्वीत एका अल्लाहशिवाय दुसरे उपास्य असते तर (पृथ्वी व आकाश) दोहोंची व्यवस्था बिघडली असती. म्हणून पवित्र आहे राजसिंहासनाचा स्वामी अल्लाह त्या गोष्टीपासून जे हे लोक रचीत आहेत.
  23. तो आपल्या कामासाठी (कोणासमोर) उत्तरदायी नाही व सर्वजण उत्तरदायी आहेत.
  24. त्याला सोडून यांनी दुसरे उपास्य बनविले आहेत काय? हे पैगंबर (स.), यांना सांगा, ’’आणा आपले प्रमाण, हा ग्रंथ आहे त्यांचा जे माझ्यासोबत आहेत आणि त्यांचाही ग्रंथ आहे जे माझ्या पूर्वी होऊन गेले आहेत.’’ परंतु यांच्यापैकी बहुतेक लोक वस्तुस्थितीपासून अनभिज्ञ आहेत, म्हणून ते विमुख झालेले आहेत.
  25. आम्ही तुमच्यापूर्वीही जो पैगंबर पाठविला त्याला हाच दिव्य बोध दिला आहे की माझ्याव्यतिरिक्त अन्य कोणीच उपास्य नाही, म्हणून तुम्ही माझीच भक्ती करा.
  26. हे म्हणतात, ’’रहमान संतती बाळगतो.’’ ’’अल्लाह पवित्र आहे, ते (म्हणजे दूत) तर दास आहेत ज्यांना प्रतिष्ठा दिली गेली आहे.
  27. त्याच्या पाशी पुढे होऊन बोलत नाहीत आणि फक्त त्याच्या आज्ञेची अंमलबजावणी करतात.
  28. जे काही त्यांच्यासमोर आहे तेही तो जाणतो आणि जे काही त्यांच्या दृष्टीआड आहे तेसुद्धा तो जाणतो, ते कुणाचीही शिफारस करीत नाहीत, त्याव्यतिरिक्त की ज्याच्याबाबतीत शिफारस ऐकण्यास अल्लाह सहमत होतो, आणि ते त्याच्या भयाने लटपटतात,
  29. आणि जर त्यांच्यापैकी कुणी सांगितले की अल्लाहशिवाय मीदेखील एक उपास्य आहे तर आम्ही त्याला नरकाची शिक्षा देऊ. आमच्या येथे अत्याचार्‍यांचा हाच बदला आहे.
  30. काय ते लोक ज्यांनी (प्रेषिताचे म्हणणे ऐकण्यास) नकार दिला आहे, विचार करीत नाही की हे सर्व आकाश व पृथ्वी परस्पर एकसंघ होते, नंतर आम्ही त्यांना विभक्त केले, आणि पाण्यापासून प्रत्येक सजीव निर्माण केला? काय ते (आमच्या या निर्मितीस) मानत नाहीत?
  31. आणि आम्ही पृथ्वीत पर्वत रोवले जेणेकरून तिने यांना घेऊन कलंडू नये, आणि त्यात प्रशस्त मार्ग बनविले, कदाचित लोकांनी आपला मार्ग जाणून घ्यावा.
  32. आणि आम्ही आकाशाला एक सुरक्षित आच्छादन बनविले. परंतु हे सृष्टीच्या संकेतांकडे लक्षच देत नाहीत.
  33. आणि तो अल्लाहच आहे ज्याने रात्र आणि दिवस बनविले आणि सूर्य व चंद्र निर्माण केले, सर्व आपापल्या नभोमंडळात मार्गरत आहेत.
  34. आणि हे प्रेषित! (स.) तुमच्यापूर्वी आम्ही कोणाला सुद्धा चिरकाल ठेवले नाही. जर तुम्ही मर्त्य झाला तर हे लोक काय अमर्त्य राहू शकतील?
  35. प्रत्येक जीवीतास मृत्यूची चव चाखावयाची आहे. आणि आम्ही चांगल्या व वाईट स्थितीत आणून तुम्हा सर्वांची परीक्षा घेत आहोत. सरतेशेवटी तुम्हाला आमच्याकडेच रुजू व्हायचे आहे.
  36. हे सत्याचा इन्कार करणारे जेव्हा तुम्हाला पाहतात तेव्हा तुम्हाला थट्टेचा विषय बनवितात. म्हणतात, ’’हा आहे का तो इसम जो तुमच्या उपास्यांचा उल्लेख करीत असतो?’’ आणि त्यांची स्वतःची स्थिती अशी आहे की ते कृपावंताच्या स्मरणास नकार देतात.
  37. माणसाला (स्वभावतःच) उतावीळ बनविण्यात आले आहे. आता मी तुम्हाला आपले संकेत दाखवून देत आहे, घाई करू नका.
  38. हे लोक म्हणतात, ’’अखेर ही धमकी पूर्ण कधी होणार, जर तुम्ही खरे असाल?’’
  39. या ईशद्रोह्यांना त्या वेळेचे काही ज्ञान असते जेव्हा हे आपले तोंडही आगीपासून वाचवू शकणार नाहीत न आपल्या पाठी आणि यांना कोठून मदतही पोहचणार नाही.
  40. ती आपत्ती अकस्मात येईल आणि त्यांच्यावर अशाप्रकारे एकदम झडप घालील की हे तिला परतवूही शकणार नाहीत की यांना क्षणभर सवलतही मिळणार नाही.
  41. उपहास तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांचादेखील केला गेला आहे परंतु त्यांचा उपहास करणारे त्याच गोष्टीच्या फेर्‍यात आले ज्याचा उपहास ते करीत असत.
  42. हे पैगंबर (स.), यांना सांगा, ’’कोण आहे जो तुम्हाला रात्री अथवा दिवसा कृपावंतापासून वाचवू शकेल?’’ परंतु हे आपल्या पालनकर्त्याच्या उपदेशापासून तोंड फिरवीत आहेत.
  43. काय हे काही असे उपास्य बाळगतात जे आमच्या विरोधात यांना सहाय्य करतील? ते तर आपल्या स्वतःचीदेखील मदत करू शकत नाहीत आणि त्यांना आमचे समर्थनदेखील प्राप्त नाही.
  44. खरी गोष्ट अशी आहे की या लोकांना आणि यांच्या वाडवडिलांना आम्ही जीवनाची साधनसामुग्री देत राहिलो येथपावेतो की यांना दीर्घकाळ झाला. परंतु काय यांना दिसत नाही की आम्ही जमिनीला विविध दिशेने आकुंचित करीत राहिलो आहोत? मग काय हे वरचढ ठरतील?
  45. यांना सांगा, ’’मी तर दिव्य बोधाच्या आधारावर तुम्हाला सावध करीत आहे’’ परंतु बहिरे हाक ऐकत नसतात जेव्हा त्यांना सावध केले जाते
  46. आणि तुझ्या पालनकर्त्याच्याप्रकोपाचा थोडादेखील स्पर्श यांना झाला म्हणजे लगेच आक्रोश करू लागतील की, आमचे दुर्दैव! निःसंशय आम्ही अपराधी होतो.
  47. पुनरुत्थानाच्या दिवशी आम्ही ठीकठीक वजन करणारे तराजू ठेवू. मग कोणत्याही व्यक्तीवर यत्किंचितदेखील अत्याचार होणार नाही. ज्याने मोहरीच्या दाण्याबरोबरदेखील काही केले सवरले असेल ते आम्ही समोर आणू आणि हिशेब लावण्यास आम्ही पुरेसे आहोत.
  48. पूर्वी आम्ही मूसा आणि हारून (अ.) यांना कसोटी, प्रकाश आणि ’आठवण’ प्रदान केली आहे त्या ईशपरायण लोकांच्या कल्याणाकरिता
  49. ज्याना न बघता आपल्या पालनकर्त्याची भीती वाटते आणि ज्यांना (हिशोबाच्या) त्या घटकेचे भय लागून राहिले आहे,
  50. आणि आताही समृद्धशाली ’आठवण’ आम्ही (तुमच्यासाठी) अवतरली आहे. मग काय तुम्ही हिला स्वीकारण्यास नकार देता?
  51. त्याच्याही पूर्वी आम्ही इब्राहीम (अ.) याला सूज्ञपणा प्रदान केला होता. आणि आम्ही त्याला चांगल्याप्रकारे जाणत होतो.
  52. आठवा, तो प्रसंग जेव्हा त्याने आपल्या वडील व आपल्या लोकांना सांगितले होते की, ’’या मूर्ती कसल्या आहेत ज्यावर तुम्ही मोहित होत आहात?’’
  53. त्यांनी उत्तर दिले, ’’आम्हाला आमचे वाडवडील त्यांची उपासना करताना आढळले आहेत.’’
  54. त्याने सांगितले, ’’तुम्ही देखील पथभ्रष्ट आहात आणि तुमचे वाडवडीलदेखील स्पष्टपणे मार्गभ्रष्टतेत गुरफटले होते.’’
  55. त्यांनी सांगितले, ’’काय तू आमच्यासमोर आपले खरे विचार मांडत आहेस की थट्टा करीत आहेस?’’
  56. त्याने उत्तर दिले, ’’नाही, किंबहुना खरोखरच तुमचा पालनकर्ता तोच आहे जो आकाश आणि पृथ्वीचा स्वामी आणि त्यांचा स्रष्टा आहे.
  57. यावर मी तुम्हासमक्ष ग्वाही देतो आणि अल्लाह शपथ मी तुमच्या गैरहजेरीत तुमच्या मूर्तींचा जरूर समाचार घेईन.’’
  58. त्याप्रमाणे त्याने त्यांना छिन्नविछिन्न करून टाकले आणि केवळ त्यांच्या मोठ्याला सोडून दिले जेणेकरून कदाचित त्यांनी त्याच्याकडे रूजू व्हावे.
  59. (त्यांनी येऊन मूर्तींची ही दशा पाहिली तेव्हा) म्हणू लागले, ’’आमच्या उपास्यांची ही दशा कोणी केली? भलताच कोणी अत्याचारी होता तो.’’
  60. (काही लोक) म्हणाले, ’’आम्ही एका तरुणाला यांचा उल्लेख करताना ऐकले होते ज्याचे नाव इब्राहीम (अ.) आहे.’’
  61. त्यांनी सांगितले, ’’तर धरून आणा त्याला सर्वांसमक्ष, जेणेकरून लोकांनी पाहावे (त्याचा कसा समाचार घेतला जातो.)’’
  62. (इब्राहीमच्या आगमनानंतर) त्यांनी विचारले, ’’इब्राहीम (अ.), तू आमच्या उपास्यांशी हे कृत्य केले आहेस का?’’
  63. त्याने उत्तर दिले, ’’किंबहुना, हे सर्वकाही यांच्या या सरदाराने केले असेल, यांनाच विचारा जर हे बोलत असतील.’’
  64. हे ऐकून ते आत्माभिमुख झाले व (मनातल्या मनात) म्हणू लागले, ’’खरोखर तुम्ही स्वतःच अत्याचारी आहात.’’
  65. परंतु पुन्हा त्यांची बुद्धि फिरली, आणि म्हणाले, ’’तुला माहीत आहे की हे बोलत नाहीत.’’
  66. इब्राहीम (अ.) ने सांगितले, ’’मग काय तुम्ही अल्लाहला सोडून त्या वस्तूंना पूजत आहात ज्या तुमचा काही फायदा करण्यासही समर्थ नाहीत व नुकसानीसाठीही नाहीत.
  67. धिःकार असो तुम्हावर आणि तुमच्या या उपास्यांवर, ज्यांची तुम्ही अल्लाहला सोडून उपासना करीत आहात. काय तुम्हाला जरादेखील अक्कल नाही?’’
  68. त्यांनी सांगितले, ’’जाळून टाका याला, आणि सहाय्य करा आपल्या उपास्यांचे जर तुम्हाला काही करावयाचे असेल.’’
  69. आम्ही सांगितले, ’’हे अग्नी! थंड हो आणि शांती व सुरक्षा हो इब्राहीमसाठी.’’
  70. ते इच्छित होते की इब्राहीमशी दुष्टपणा करावा. परंतु आम्ही त्यांना दारूण अपयशी केले.
  71. आणि आम्ही त्याला आणि लूत (अ.) ला वाचवून त्या भूमीकडे काढून नेले, ज्यात आम्ही जगवासियांकरिता भरभराट ठेविली आहे,
  72. आणि आम्ही त्याला इसहाक (अ.) प्रदान केला व याकूब (अ.), त्यानंतर अधिक. आणि प्रत्येकाला सदाचारी बनविले.
  73. आणि आम्ही त्यांना नेता बनविले जे आमच्या आज्ञेने मार्गदर्शन करीत होते आणि आम्ही त्यांना दिव्य बोधद्वारे पुण्यकर्माचा आणि नमाज कायम करण्याचा आणि जकात देण्याचा आदेश दिला, आणि ते आमच्या भक्तीत राहणारे होते.
  74. आणि लूत (अ.) ला आम्ही अधिकार व ज्ञान प्रदान केले आणि त्याला त्या वस्तीतून वाचवून नेले जी (समलिंगी) व्यभिचार करीत होती. खरोखर तो अत्यंत वाईट, अवज्ञाकारी लोकसमूह होता
  75. आणि लूत (अ.) ला आम्ही आपल्या कृपाछत्रात दाखल केले, तो सदाचारी लोकांपैकी होता.
  76. आणि हीच देणगी आम्ही नूह (अ.) ला दिली. आठवा, जेव्हा या सर्वांच्या अगोदर त्याने आमचा धावा केला होता. आम्ही त्याची प्रार्थना स्वीकारली आणि त्याची व त्याच्या कुटुंबियांची महापीडेतून सुटका केली.
  77. आणि त्या लोकांच्याविरूद्ध त्याला सहाय्य केले, ज्यांनी आमचे संकेत खोटे ठरविले होते ते अत्यंत वाईट लोक होते म्हणून आम्ही त्या सर्वांना बुडवून टाकले.
  78. आणि याच देणगीने आम्ही दाऊद (अ.) आणि सुलेमान (अ.) यांना भूषविले. आठवा, तो प्रसंग जेव्हा ते दोघे एका शेतजमिनीच्या खटल्याचा निर्णय करीत होते, ज्यात रात्रीच्या वेळेस इतर लोकांच्या शेळ्या फैलावल्या होत्या आणि आम्ही त्यांच्या न्यायनिवाड्याकडे स्वतः पाहात होतो.
  79. त्यावेळी आम्ही अचूक निर्णय सुलैमानला उमगविले. वस्तुतः अधिकार व ज्ञान आम्ही दोघांनाही प्रदान केले होते. दाऊद (अ.) समवेत आम्ही पर्वत व पक्ष्यांना अधीन केले होते जे पावित्र्यगान करीत होते. या कार्याचे कर्ते आम्हीच होतो.
  80. आणि आम्ही त्याला तुमच्या फायद्यासाठी चिलखत बनविण्याचा उद्योग शिकविला होता जेणेकरून तुम्हाला एकमेकाच्या मार्‍यापासून वाचवावे. मग काय तुम्ही कृतज्ञ आहात?
  81. आणि सुलैमान (अ.) साठी आम्ही वेगवान वार्‍याला अधीन केले होते जो त्याच्या आज्ञेने त्या भूमीकडे वाहात असे ज्यात आम्ही समृद्धी ठेवली होती. आम्ही प्रत्येक गोष्टीचे ज्ञान राखणारे होतो.
  82. आणि शैतानांपैकी आम्ही अशा बर्‍याचशांना त्याचा ताबेदार बनविले होते जे त्याच्यासाठी सूर मारीत आणि याशिवाय इतर कामे करीत असत. या सर्वांची देखरेख करणारे आम्हीच होतो.
  83. आणि हीच (सुजाणपणा आणि अधिकार व ज्ञानाची देणगी) आम्ही अय्यूब (अ.) ला दिली होती. आठवा, जेव्हा त्याने आपल्या पालनकर्त्याचा धावा केला की, ’’मी यातनाग्रस्त आहे. आणि तू सर्वाधिक दयावान आहेस.’’
  84. आम्ही त्याची प्रार्थना स्वीकारली आणि जो त्रास त्यालाहोता तो दूर केला आणि केवळ त्याची मुलेबाळेच त्याला दिली असे नाही तर त्यांच्याबरोबर तितकेच आणखीन दिले, आपली विशेष कृपा म्हणून, आणि यासाठी की हा एक धडा ठरावा भक्तीत राहणार्‍यांसाठी.
  85. आणि हीच देणगी इस्माईल (अ.) व इद्रीस (अ.) आणि जुल्किफ्ल (अ.) यांना दिली की हे सर्व संयमी लोक होते.
  86. आणि त्यांना आम्ही आपल्या कृपाछत्रात दाखल केले कारण ते सदाचारींपैकी होते.
  87. आणि मासेवाल्यालादेखील आम्ही उपकृत केले, आठवा, जेव्हा तो रूसून निघून गेला होता. आणि समजला होता की आम्ही त्याला पकडणार नाही, सरतेशेवटी त्याने अंधारातून धावा केला, ’’नाही अन्य कोणी परमेश्वर परंतु तूच, पवित्र आहे तुझे अस्तित्व, निःसंशय मी अपराध केला.’’
  88. तेव्हा आम्ही त्याची प्रार्थना स्वीकारली आणि दुःखापासून त्याची मुक्तता केली, आणि अशाच प्रकारे आम्ही श्रद्धावंतांना वाचवीत असतो.
  89. आणि जकरिय्या (अ.) ला, जेव्हा त्याने आपल्या पालनकर्त्याचा धावा केला की, ’’हे पालनकर्त्या, मला एकटा सोडू नकोस, आणि सर्वोत्तम वारस तर तूच आहेस.’’
  90. तर आम्ही त्याची प्रार्थना स्वीकारली आणि त्याला याहया (अ.) प्रदान केला आणि त्याच्या पत्नीला त्याच्यासाठी सुधारून दिले. हे लोक सत्कृत्यांत धावपळ करीत असत आणि आवडीने व भीतीने आमचा धावा करीत असत आणि आमच्या पुढे विनम्र होत.
  91. आणि ती स्त्री जिने आपल्या शीलाचे रक्षण केले होते. आम्ही तिच्यात आपला आत्मा फुंकला व तिला आणि तिच्या पुत्रास सार्‍या दुनियेसाठी संकेत बनविले.
  92. हा तुमचा समूह वास्तविकतः एकच समूह आहे आणि मी तुमचा पालनकर्ता आहे. म्हणून तुम्ही माझी भक्ती करा.
  93. परंतु (हे लोकांचे कारस्थान आहे की) त्यांनी आपसात आपला धर्म तुकडे तुकडे करून टाकला. सर्वांना आमच्याकडे परतावयाचे आहे.
  94. मग जो पुण्यकर्म करील, श्रद्धावंत असेल तर त्याचे कार्य नाकारले जाणार नाही आणि त्याची आम्ही नोंद घेत आहोत.
  95. आणि शक्य नाही की ज्या वस्तीला आम्ही नष्ट केले आहे ती पुन्हा परतू शकेल.
  96. येथपावेतो की जेव्हा याजूज आणि माजूज मुक्त केले जातील आणि प्रत्येक उंचीवरून ते निघून येतील.
  97. आणि सत्यवचनाची पूर्तता होण्याची वेळ जेव्हा निकट येऊन ठेपेल तेव्हा अकस्मातपणे त्या लोकांचे डोळे विस्फरलेलेच राहतील ज्यांनी द्रोह केला होता. म्हणतील, ’’आमचे दुर्दैव, आम्ही या गोष्टीपासून बेसावध राहिलो होतो, किंबहुना आम्ही अपराधी होतो.’’
  98. निःसंदेह तुम्ही आणि तुमचे ते उपास्य ज्यांची तुम्ही अल्लाहला सोडून उपासना करता नरकाचे इंधन होत, तेथेच तुम्हाला जावयाचे आहे.
  99. जर हे खरोखर ईश्वर असते तर तेथे गेले नसते, आता सर्वांना सदैव त्यातच राहावयाचे आहे.
  100. तेथे ते उसासे टाकतील व स्थिती अशी बनेल की त्यात काहीही ऐकू येणार नाही.
  101. उरले ते लोक ज्यांच्यासाठी आमच्याकडून कल्याणाचा अगोदरच निर्णय झाला आहे, तर ते निश्चितच त्यापासून दूर ठेवले जातील,
  102. तिचे सळसळणेदेखील ते ऐकणार नाहीत आणि ते सदासर्वदा आपल्या आवडत्या वस्तूंच्या दरम्यान राहतील,
  103. तो अत्यंत भीतीचा क्षण, त्यांना थोडेसुद्धा अस्वस्थ करणार नाही, आणि दूत त्यांना पुढे होऊन भेटतील व म्हणतील, ’’हा तुमचा तोच दिवस आहे ज्याचे तुम्हाला वचन दिले जात होते.’’
  104. तो दिवस जेव्हा आकाशाला आम्ही असे गुंडाळून ठेवू जसे कागदाच्या गुंडाळीमध्ये कागद गुंडाळले जातात. ज्याप्रमाणे पूर्वी आम्ही निर्मितीचा प्रारंभ केला होता त्याचप्रमाणे आम्ही पुन्हा त्याची पुनरावृत्ती करू. हे एक वचन आहे आमच्याकडून. आणि हे काम आम्हाला कोणत्याही परिस्थितीत करावयाचे आहे.
  105. आणि जबूरमध्ये उपदेशानंतर आम्ही हे लिहून ठेवले आहे की पृथ्वीचे वारस आमचे सदाचारी दास ठरतील.
  106. यात एक मोठी वार्ता आहे भक्तीमध्ये राहणार्‍या लोकांसाठी.
  107. हे पैगंबर (स.), आम्ही तर तुम्हाला जगवासियांसाठी कृपा बनवून पाठविले आहे.
  108. त्यांना सांगा, ’’माझ्यापाशी जो दिव्य बोध येतो तो असा आहे की तुमचा परमेश्वर केवळ एकच परमेश्वर आहे, मग तुम्ही आज्ञापालनासाठी मान तुकविता काय?’’
  109. जर त्यांनी तोंड फिरविले तर त्यांना सांगून टाका की, ’’मी जाहिरपणे तुम्हाला सावध केले आहे. आता हे मला माहीत नाही की ती गोष्ट जिचे वचन तुम्हाला दिले जात आहे, जवळ आहे की दूर.
  110. अल्लाह त्या गोष्टीदेखील जाणतो ज्या मोठ्या आवाजात सांगितल्या जातात आणि त्यादेखील ज्या तुम्ही लपवून करता.
  111. मी तर असे समजतो की कदाचित हा (उशीर) तुमच्यासाठी एक उपद्रव आहे. आणि तुम्हाला एका विशिष्ट अवधीपर्यंत मजा करण्याची संधी दिली जात आहे.’’
  112. (सरतेशेवटी) पैगंबर (स.) नी सांगितले की, ’’हे माझ्या पालनकर्त्या! सत्यानिशी निर्णय कर आणि हे लोकहो, तुम्ही ज्या गोष्टी रचीत आहात त्यांच्या विरोधात आमचा दयाळू पालनकर्ता आमच्यासाठी मदतीचा आधार आहे.’’

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post