38. साॅद - ص
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- सॉऽऽद, शपथ आहे उपदेशपूर्ण कुरआनची,
- किंबहुना हेच लोक, ज्यांनी मानण्यास नकार दिला आहे अत्यंत अहंकार व हट्टात गुरफटलेले आहेत
- यांच्यापूर्वी आम्ही अशा कित्येक जनसमूहांना नष्ट करून टाकले आहे (आणि जेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आले आहे) तेव्हा ते आक्रोश करून उठले आहेत, परंतु ही बचावाची वेळ नाही.
- या लोकांना या गोष्टीचे मोठे आश्चर्य वाटते की एक भय दाखविणारा खुद्द यांच्यातूनच आला, इन्कार करणारे म्हणू लागले की, ’’हा जादूगार आहे, अत्यंत खोटा आहे,
- याने सार्या ईश्वरांऐवजी केवळ एकच ईश्वर बनविला काय? ही तर फार आश्चर्यकारक गोष्ट आहे.’’
- आणि जनसमूहाचे सरदार असे म्हणून निघून गेले की, ’’चला आणि दृढ रहा आपल्या उपास्यांच्या उपासनेवर,
- ही गोष्ट तर काही वेगळ्याच हेतूने म्हटली जात आहे, ही गोष्ट आम्ही निकटवर्ती काळातील धर्मसमुदायांपैकी कोणाकडूनही ऐकली नाही, ही इतर काहीच नाही परंतु एक कपोलकल्पित गोष्ट.
- काय आमच्या दरम्यान केवळ हाच एक मनुष्य उरला होता ज्याच्यावर अल्लाहचे स्मरण अवतरले गेले?’’ खरी गोष्ट अशी आहे की हे माझ्या ’स्मरण’वर शंका घेत आहेत. आणि या सार्या गोष्टी अशासाठी करीत आहेत की यांनी माझ्या प्रकोपाचा आस्वाद घेतलेला नाही.
- काय तुझ्या प्रभुत्वसंपन्न आणि दात्या पालनकर्त्याच्या कृपेचे खजिने यांच्या ताब्यात आहेत?
- काय हे आकाश व पृथ्वी आणि त्याच्या दरम्यानातील वस्तूंचे मालक आहेत? तर यांना त्यांच्या सर्व साधनांनिशी प्रयत्न करू दे!
- हा तर जथ्यांपैकी एक लहानसा जथ्था आहे जो याच ठिकाणी पराभूत होणार आहे.
- यांच्यापूर्वी नूह (अ.) चा जनसमूह, आणि ’आद’ आणि मेखावाला ’फिरऔन’
- आणि ’समूद’, व ’लूत’ (अ.) चा जनसमूह, आणि ’ऐकावाले’ यांनी खोटे ठरविले आहे. जथ्थे ते होते.
- त्यांच्यापैकी प्रत्येकाने प्रेषितांना खोटे ठरविले आणि माझ्या प्रकोपाचा निर्णय त्याच्यावर लागू झाल्याविना राहिला नाही.
- हे लोकसुद्धा केवळ एका विस्फोटाच्या प्रतीक्षेत आहेत ज्यानंतर कोणताही दुसरा विस्फोट होणार नाही,
- आणि हे म्हणतात की हे आमच्या पालनकर्त्या, हिशेबाच्या दिवसापूर्वीच आमचा हिस्सा आम्हाला लवकर देऊन टाक.
- हे पैगंबर (स.), संयम राखा त्या गोष्टींसाठी ज्या हे लोक रचीत आहेत, आणि यांच्यासमोर आमचे दास दाऊद (अ.) यांचा किस्सा सांगा, जो प्रचंड शक्तींचा मालक होता. प्रत्येक बाबतीत अल्लाहकडे धाव घेणारा होता.
- आम्ही पर्वतांना त्याच्या अधीन करून ठेवले होते की सकाळ-संध्याकाळ ते त्याच्यासमवेत पावित्र्यगान करीत असत.
- पक्षी एकत्र येत असत, सर्वच्या सर्व त्याच्या पावित्र्यगानाकडे लक्ष केंद्रित करीत असत.
- आम्ही त्याचे राज्य बळकट केले होते, त्याला प्रबोध प्रदान केला होता आणि निर्णायक गोष्ट सांगण्याची क्षमता प्रदान केली होती.
- मग तुम्हाला काही वार्ता पोहचली आहे त्या वादी-प्रतिवादींची जे भिंत चढून आत शिरले होते?
- जेव्हा ते दाऊद (अ.) जवळ पोहचले होते तेव्हा तो त्यांना पाहून घाबरला. त्यांनी सांगितले, ’’भिऊ नका, आम्ही दोघे खटल्यातील पक्षकार आहोत ज्यांच्यापैकी एकाने दुसर्याची आगळीक केली आहे. आता आमच्या दरम्यान ठीकठीक सत्यानिशी निवाडा करा, अन्याय करू नका आणि आम्हाला सरळमार्ग दाखवा.
- हा माझा भाऊ आहे, याच्याजवळ नव्याण्णव मेंढ्या आहेत आणि माझ्याजवळ केवळ एकच मेंढी आहे. याने मला सांगितले की ही एक मेंढीसुद्धा माझ्या हवाली कर आणि याने बोलाचालीत माझ्यावर दडपण आणले.’’
- दाऊद (अ.) ने उत्तर दिले, ’’या व्यक्तीने आपल्या मेंढ्यासमवेत तुझी मेंढी सामील करण्याची मागणी करून निश्चितच तुझ्यावर अत्याचार केला, आणि वस्तुस्थिती तर अशी आहे की मिळून मिसळून एकत्र राहणारे लोक बहुधा एक दुसर्याची आगळीक करीत असतात, केवळ तेच लोक यापासून वाचलेले आहेत जे श्रद्धावंत आहेत व सत्कर्म करतात, आणि असे लोक कमीच आहेत.’’ (ही गोष्ट सांगता सांगता) दाऊद (अ.) ला कळून चुकले की ही तर आम्ही वास्तविकतः त्याची परीक्षा घेतली आहे, म्हणून त्याने आपल्या पालनकर्त्याकडे क्षमायाचना केली आणि नतमस्तक झाला आणि रुजू झाला.
- तेव्हा आम्ही त्याची ती चूक माफ केली आणि निश्चितच आमच्यापाशी त्याच्यासाठी निकटवर्ती स्थान आणि अधिक चांगला शेवट आहे.
- (आम्ही त्याला सांगितले) ’’हे दाऊद, आम्ही तुला पृथ्वीवर खलीफा (ईश्वराचा उत्तराधिकारी) बनविले आहे, म्हणून तू लोकांदरम्यान सत्यानिशी राज्य कर आणि मनोवासनेच्या आहारी जाऊ नकोस. ती तुला अल्लाहच्या मार्गापासून दूर करील. जे लोक अल्लाहच्या मार्गापासून भटकतात निश्चितच त्यांच्याकरिता कठोर शिक्षा आहे कारण हिशोबाचा दिवस ते विसरून गेले.’’
- आम्ही या आकाशाला व पृथ्वीला आणि या जगाला जे त्याच्या दरम्यान आहे व्यर्थ निर्माण केले नाही. ही तर त्या लोकांची कल्पना आहे ज्यांनी द्रोह केला आहे, आणि अशा अश्रद्धावंतांचा सर्वनाश आहे नरकाच्या अग्नीद्वारे.
- काय आम्ही अशा लोकांना जे श्रद्धा ठेवतात व सत्कृत्ये करतात आणि त्या लोकांना जे पृथ्वीवर उपद्रव माजविणारे आहेत, एकसमान करावे? काय ईशपरायणांना दुराचार्यांप्रमाणे करावे?
- हा एक मोठा समृद्धशाली ग्रंथ आहे जो (हे पैगंबर (स.)) आम्ही तुमच्याकडे अवतरित केला आहे, जेणेकरून या लोकांनी त्याच्या वचनांवर विचार करावा आणि बुद्धी व विवेक राखणार्यांनी यापासून बोध घ्यावा.
- आणि दाऊद (अ.) ला आम्ही सुलैमान (अ.) सारखा पुत्र प्रदान केला, उत्तम दास, मोठ्या प्रमाणात आपल्या पालनकर्त्याकडे रुजू होणारा.
- उल्लेखनीय आहे तो प्रसंग जेव्हा संध्याकाळच्या वेळी त्याच्यासमोर खूप प्रशिक्षित घोडे सादर केले गेले.
- तेव्हा तो म्हणाला, ’’मी या मालाचे प्रेम आपल्या पालनकर्त्याच्या स्मरणामुळे स्वीकारले आहे.’’ येथपावेतो जेव्हा ते घोडे दृष्टिआड झाले तेव्हा
- (त्याने आज्ञा दिली की) त्यांना माझ्याकडे परत आणा. मग लागला त्यांच्या पायावर व मानेवर हात फिरवायला.
- आणि (पहा की) सुलैमान (अ.) लाही आम्ही कसोटीला लावले आणि त्याच्या खुर्चीवर एक देह आणून टाकला. मग त्याने रुजू केले.
- आणि म्हटले की, ’’हे माझ्या पालनकर्त्या, मला क्षमा कर आणि मला ते राज्य प्रदान कर जे माझ्यानंतर कोणासाठीही पात्र ठरू नये, निःसंदेह तूच खरा दाता आहेस.’’
- तेव्हा आम्ही त्याच्यासाठी वार्याला अधीन केले जो त्याच्या आज्ञेने नरमाईने तो इच्छिल तिकडे प्रवाहित होत असे.
- आणि शैतानांना अधीन केले, हर प्रकारचे गवंडी आणि पाणबुडे.
- आणि अन्य जे साखळ्याने जखडलेले होते.
- (आम्ही त्याला सांगितले) ’’हे आमचे बक्षीस आहे. तुला हा अधिकार आहे की तू ज्याला हवे त्याला द्यावे व हवे त्यापासून रोखून धरावे, काही हिशेब नाही.’’
- निश्चितच त्याच्यासाठी आमच्याजवळ निकटवर्ती स्थान व अधिक चांगला शेवट आहे.
- आणि आमचा दास अय्यूब (अ.) ची आठवण करा जेव्हा त्याने आपल्या पालनकर्त्याला पुकारले की शैतानाने मला त्रास आणि यातनेत टाकले आहे.
- (आम्ही त्याला आज्ञा दिली) आपला पाय जमिनीवर आदळ, हे आहे शीतल जल स्नानासाठी व पिण्याकरिता.
- आम्ही त्याला त्याचे कुटुंब परत दिले आणि त्यांच्याबरोबर तितकेच अन्य आपल्याकडून कृपा म्हणून, आणि बुद्धी व विवेक बाळगणार्यांसाठी बोध म्हणून,
- (आणि आम्ही त्याला सांगितले) मूठभर गवत घे आणि त्याने मार, आपली शपथ मोडू नकोस आम्हाला तो सहनशील आढळला, उत्तम दास, आपल्या पालनकर्त्याकडे फार रुजू होणारा.
- आणि आमचे दास इब्राहीम (अ.), इसहाक (अ.) व याकूब (अ.) यांचे वर्णन करा, प्रचंड कार्यशक्ती बाळगणारे आणि द्रष्टे लोक होते.
- आम्ही त्यांना निव्वळ एका गुणवैशिष्ट्याच्या आधारावर निवडले होते आणि ते परलोकाच्या घराचे स्मरण करणारे होते.
- निश्चितच आमच्या येथे त्यांची गणना निवडलेल्या पुण्यशील लोकांत आहे.
- आणि इस्माईल (अ.) व अलयसअ (अ.) आणि जुलकिफ्ल (अ.) चे वर्णन करा, हे सर्व पुण्यशील लोकांपैकी होते.
- ही एक आठवण होती. (आता ऐका की) ईशपरायणांसाठी निश्चितच उत्तम ठिकाण आहे,
- सदैव राहणार्या स्वर्गात ज्यांची द्वारे त्यांच्यासाठी खुली असतील.
- त्यात ते लोड लावून बसले असतील, खूप खूप मेवे व पेये मागवीत असतील,
- आणि त्याच्याजवळ लाजर्या समवयस्क पत्नीं असतील.
- या त्या गोष्टी होत ज्या हिशेबाच्या दिवशी प्रदान करण्याचे तुम्हाला वचन दिले जात आहे.
- ही आमची सामग्री आहे जी कधीही संपणार नाही.
- हा तर आहे ईशपरायणांचा शेवट आणि दुराचार्यांसाठी अत्यंत वाईट ठिकाण आहे,
- नरक ज्यात ते होरपळले जातील, फारच वाईट ठिकाण.
- हे आहे त्यांच्यासाठी, बस्स त्यांनी चव घ्यावी उकळते पाणी आणि पू,
- रक्त व अशाच प्रकारच्या कटुतेची.
- (ते नरकाकडे आपल्या अनुयायांना येताना पाहून आपापसांत म्हणतील) ’’ही एक फौज तुमच्याकडे घुसून येत आहे, कोणतेही स्वागत यांच्यासाठी नाही, हे आगीत होरपळणारे आहेत.’’
- ते त्यांना उत्तर देतील, ’’नाही, किंबहुना तुम्हीच होरपळले जात आहात, कोणतेही स्वागत तुमच्यासाठी नाही. तुम्हीच तर हा शेवट आमच्या पुढ्यात वाढला आहे, किती वाईट आहे हे निवासस्थान.’’
- मग ते म्हणतील, ’’हे आमच्या पालनकर्त्या, ज्याने आम्हाला या शेवटापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था केली त्याला नरकाग्नीची दुहेरी शिक्षा दे.’’
- आणि ते आपापसात म्हणतील, ’’काय झाले आहे, आम्हाला ते लोक कोठेही दिसत नाहीत ज्यांना आम्ही जगात वाईट समजत होतो?
- आम्ही विनाकारणच त्यांना उपहासाचा विषय बनविला होता अथवा ते कुठे दृष्टिआड झाले आहेत?’’
- निःसंदेह ही गोष्ट सत्य आहे, नरकवासियांत अशाच प्रकारचे तंटे होणार आहेत.
- (हे पैगंबर (स.)) यांना सांगा, ’’मी तर केवळ सावध करणारा आहे. कोणी खरा उपास्य नाही. परंतु अल्लाह, जो एकमेव आहे सर्वांवर प्रभुत्वसंपन्न,
- आकाशांचा आणि पृथ्वीचा स्वामी आणि त्या सर्व वस्तूंचा स्वामी ज्या त्यांच्या दरम्यान आहेत, महान आणि क्षमाशील.’’
- यांना सांगा, ’’ही एक मोठी वार्ता आहे
- जी ऐकून तुम्ही तोंड वेंगाळता.’’
- (यांना सांगा) ’’मला त्या प्रसंगाविषयी काही ज्ञान नव्हते जेव्हा उच्चलोकियांत तंटा सुरू होता.
- मला तर दिव्यबोधाने या गोष्टी केवळ अशासाठी कळविल्या जातात की मी स्पष्टपणे सावध करणारा आहे.’’
- जेव्हा तुझ्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले, ’’मी मातीपासून एक मानव बनविला आहे,
- मग जेव्हा मी त्याला पूर्णपणे बनवीन आणि त्यात माझा आत्मा फुंकीन तेव्हा तुम्ही त्याच्यासमोर नतमस्तक व्हा!
- या आज्ञेनुसार दूत सर्वच्या सर्व नतमस्तक झाले,
- परंतु इब्लीसने आपल्या मोठेपणाची घमेंड केली आणि तो अश्रद्धावंतांपैकी बनला.
- पालनकर्त्याने फर्माविले, ’’हे इब्लीस, तुला कोणती गोष्ट त्याच्यासमोर नतमस्तक होण्यास बाधक ठरली ज्याला मी आपल्या दोन्ही हातांनी बनविले आहे? तू मोठा बनू लागला आहेस अथवा तू उच्च दर्जाच्या व्यक्तित्वांपैकी आहेस?’’
- त्याने उत्तर दिले, ’’मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण मला अग्नीपासून निर्माण केले आहे आणि याला मातीपासून.’’
- फर्माविले, ’’निघून जा येथून,
- तू बहिष्कृत आहेस आणि बदल्याच्या दिवसापर्यंत तुझा धिक्कार आहे.’’
- तो म्हणाला, ’’हे माझ्या पालनकर्त्या, अशी जर गोष्ट असेल तर मग त्या वेळेपर्यंत मला सवड दे जेव्हा हे लोक दुसर्यांदा उठविले जातील.’’
- फर्माविले, ’’बरे, तुला त्या दिवसापर्यंतची सवड आहे,
- ज्याची वेळ मला माहीत आहे.’’
- त्याने सांगितले, ’’तुझ्या प्रतिष्ठेची शपथ, मी या सर्व लोकांना बहकावून सोडीन,
- त्या तुझ्या दासांखेरीज ज्यांना तू प्रामाणिक केले आहेस.’’
- फर्माविले, ’’तर सत्य असे आहे आणि मी सत्यच बोलत असतो
- की मी नरकाला तुझ्याने आणि त्या सर्वांनी भरून टाकीन जे या माणसांपैकी तुझे अनुसरण करतील.’’
- (हे पैगंबर (स.)) यांना सांगा की मी या प्रचाराबद्दल तुमच्याकडे कोणताही मोबदला मागत नाही, आणि मी बनावट लोकांपैकीही नाही.
- हा तर एक उपदेश आहे सर्व जगवासियांसाठी
- आणि थोडाच अवधी लोटेल जेव्हा तुम्हा स्वतःला याची स्थिती कळून चुकेल.