39. अज़् ज़ुमर - ٱلزُّمَر
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- या ग्रंथाचे अवतरण महान व बुद्धिमान अल्लाहकडून आहे.
- (हे पैगंबर (स.)) हा ग्रंथ आम्ही तुमच्याकडे सत्याधिष्ठित अवतरला आहे. म्हणून तुम्ही अल्लाहचीच भक्ती करा, धर्माला त्याच्यासाठी निर्भेळ करताना.
- सावधान, विशुद्ध धर्म हा अल्लाहचा अधिकार आहे. उरले ते लोक ज्यांनी त्याच्याशिवाय इतरांना वाली बनवून ठेवले आहे (आणि आपल्या या कृतीचे समर्थन असे करतात की) आम्ही तर त्यांची उपासना केवळ एवढ्यासाठीच करतो की आम्हाला अल्लाहचे सान्निध्य लाभावे. अल्लाह निश्चितच त्यांच्यादरम्यान त्या सर्व गोष्टींचा निर्णय लावील ज्यात ते मतभेद दर्शवीत आहेत. अल्लाह अशा कोणत्याही इसमाला मार्गदर्शन करीत नसतो जो खोटा आणि सत्याचा इन्कार करणारा असतो.
- जर अल्लाह एखाद्याला पुत्र बनवू इच्छित असता तर आपल्या निर्मितीपैकी हवे त्याला निवडले असते, पवित्र आहे तो यापासून (की एखादा त्याचा पुत्र असावा), तो अल्लाह आहे एकमेव आणि सर्वांवर प्रभुत्वसंपन्न.
- त्याने आकाशांना व पृथ्वीला सत्याधिष्ठित निर्माण केले आहे. तोच दिवसावर रात्र आणि रात्रीवर दिवसाला गुंडाळतो. त्यानेच सूर्य आणि चंद्राला अशाप्रकारे अधीन करून ठेवले आहे की प्रत्येक एका निश्चित वेळेपर्यंत भ्रमण करीत आहे. लक्षात ठेवा, तो महान आणि क्षमाशील आहे.
- त्यानेच तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले, मग तोच आहे ज्याने त्या जीवापासून त्याची जोडी बनविली. आणि त्यानेच तुमच्यासाठी जनावरांपैकी आठ नर व माद्या निर्माण केल्या. तो तुमच्या मातांच्या पोटांत तीन-तीन अंधकारयुक्त पडद्यात तुम्हाला एकानंतर एक आकार देत जातो. हाच अल्लाह (ज्याची ही कामे आहेत) तुमचा पालनकर्ता आहे. बादशाही त्याची आहे, कोणीही उपास्य त्याच्याखेरीज नाही, मग तुम्हाला कोण विमुख करत आहे?
- जर तुम्ही सत्याचा इन्कार केला तर अल्लाह तुमच्याकडून निरपेक्ष आहे, परंतु तो आपल्या दासांसाठी द्रोह पसंत करीत नाही, आणि जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर तो तुमच्यासाठी ते पसंत करतो कोणी भारवाहक दुसर्याचा भार उचलणार नाही. शेवटी तुम्हा सर्वांना आपल्या पालनकर्त्यांकडे रुजू व्हायचे आहे. मग तो तुम्हाला दाखविल तुम्ही काय करत होता. तो तर अंतर्यामी आहे.
- माणसावर जेव्हा एखादी आपत्ती येते तेव्हा तो आपल्या पालनकर्त्याकडे रुजू होऊन त्याचा धावा करतो. मग जेव्हा त्याचा पालनकर्ता त्याला आपल्या देणगीने उपकृत करतो तेव्हा तो ती आपत्ती विसरून जातो ज्यासाठी पूर्वी तो धावा करीत होता, आणि दुसर्यांना अल्लाहचा तुल्यबळ ठरवितो जेणेकरून त्यांना त्याच्या मार्गापासून मार्गभ्रष्ट करावे. (हे पैगंबर (स.)) त्याला सांगा की काही दिवस आपल्या द्रोहाची मौज घे. निश्चितच तू नरकाग्नीत जाणार आहेस.
- (या माणसाची वागणूक अधिक चांगली आहे का त्या माणसाची) जो आज्ञांकित आहे, रात्रीच्या प्रहरी उभा असतो आणि नतमस्तक होतो. परलोकाची भीती बाळगतो आणि आपल्या पालनकर्त्याच्या कृपेसंबंधी आशावादी असतो. यांना विचारा, जाणणारे आणि न जाणणारे दोघे कधी एकसमान होऊ शकतात काय? उपदेश तर बुद्धी असलेलेच ग्रहण करीत असतात.
- (हे पैगंबर (स.)) सांगा की हे माझ्या दासांनो, ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा. ज्या लोकांनी या जगात सद्वर्तन अंगिकारले आहे, त्यांच्यासाठी कल्याण आहे आणि अल्लाहची पृथ्वी विशाल आहे, संयम बाळगणार्यांना तर त्यांचा मोबदला बेहिशोबी देण्यात येईल.
- (हे पैगंबर (स.)) यांना सांगा, मला आज्ञा दिली गेली आहे की धर्माला अल्लाहसाठी विशुद्ध राखून मी त्याची भक्ती करावी,
- आणि मला आज्ञा दिली गेली आहे की सर्वांत प्रथम मी स्वतः मुस्लिम (आज्ञाधारक) बनावे.
- सांगा, जर मी आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली तर मला एका मोठ्या दिवसाच्या प्रकोपाचे भय आहे.
- सांगा मी तर आपल्या धर्माला अल्लाहसाठी विशुद्ध करून त्याचीच भक्ती करीन.
- तुम्ही त्याच्याशिवाय ज्याची ज्याची भक्ती करू इच्छित असाल करीत रहा. सांगा, खरे दिवाळखोर तर तेच होत ज्यांनी पुनरुत्थानाच्या दिवशी स्वतःला व आपल्या कुटुंबियांना नुकसानीत टाकले. चांगले ऐकून घ्या, हीच उघड दिवाळखोरी होय.
- त्यांच्यावर वरून खालून अग्नीछत आच्छादलेले असेल. हा तो शेवट आहे ज्याची अल्लाह आपल्या दासांना भीती दाखवितो, म्हणून हे माझ्या दासांनो, माझ्या कोपापासून दूर रहा.
- याविरूद्ध जे लोक ’तागूत’ (मर्यादेचे उल्लंघन करणारा) च्या भक्तीपासून अलिप्त राहिले आणि अल्लाहकडे रुजू झाले त्यांच्यासाठी खुशखबर आहे. म्हणून (हे पैगंबर (स.)) खुशखबर द्या माझ्या त्या दासांना
- जे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतात आणि त्यातील उत्तम पैलूंचे अनुसरण करतात. हे ते लोक होत ज्यांना अल्लाहने मार्गदर्शन प्रदान केले आहे आणि हेच बुद्धिमान आहेत.
- (हे पैगंबर (स.)) त्या माणसाला कोण वाचवू शकतो ज्याच्यावर प्रकोपाचा निर्णय लागू झाला असेल? काय तुम्ही त्याला वाचवू शकता जो आगीत पडला आहे?
- तथापि जे लोक आपल्या पालनकर्त्याशी भिऊन राहिले त्यांच्यासाठी उत्तुंग इमारती आहेत, मजल्यावर मजले चढविलेल्या, ज्यांच्या खाली कालवे वहात असतील, हे अल्लाहचे वचन आहे, अल्लाह कधीही आपल्या वचनाविरूद्ध जात नसतो.
- काय तुम्ही पहात नाही की अल्लाहने आकाशातून पाणी वर्षविले, मग त्याला स्रोत, झरे आणि नद्यांच्या रूपात पृथ्वीच्या आत मार्गस्थ केले, मग त्या पाण्याद्वारे तो तर्हेतर्हेची शेते उगवितो ज्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत, मग ती शेते पिकून वाळून जातात, मग तुम्ही पाहता की ती पिवळी पडतील, मग सरतेशेवटी अल्लाह त्यांचा भुसा करून टाकतो. वास्तविकतः यात एक बोध आहे बुद्धिवंतांसाठी.
- आता काय तो इसम ज्याचे हृदय अल्लाहने इस्लामसाठी उघडे केले आणि तो आपल्या पालनकर्त्याकडून एका प्रकाशावर चालत आहे (त्या व्यक्तीसमान असू शकेल ज्याने या गोष्टीपासून कोणताही बोध घेतला नाही?) सर्वनाश आहे त्या लोकांसाठी ज्यांची हृदये अल्लाहच्या उपदेशाने आणखी जास्त कठोर झाली. ते उघड पथभ्रष्टतेत पडले आहेत.
- अल्लाहने उत्तम वाणी अवतरली आहे, एक असा ग्रंथ ज्याचे सर्व भाग त्या सारखेच आहेत आणि ज्यात वरचेवर विषयांची पुनरावृत्ती केली गेली आहे. त्याच्या श्रवणाने त्या लोकांच्या अंगावर शहारे उभे राहतात जे आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगणारे आहेत आणि मग त्यांचे शरीर आणि त्यांची हृदये मृदू होऊन अल्लाहच्या स्मरणाकडे आकर्षित होतात. हे अल्लाहचे मार्गदर्शन आहे. तो ज्याला इच्छितो सन्मार्गावर आणतो आणि ज्याला अल्लाहनेच मार्गदर्शन केले नाही तर त्याच्यासाठी मग कोणीही मार्गदर्शक नाही.
- आता त्या इसमाच्या दुर्दशेची तुम्ही काय कल्पना करू शकता जो पुनरुत्थानाच्या दिवशी प्रकोपाचा भयंकर मार आपल्या तोंडावर घेईल? अशा अत्याचार्यांना तर सांगितले जाईल की आता घ्या आस्वाद त्या कमाईचा जे तुम्ही करीत राहिला होता.
- याच्यापूर्वीसुद्धा बर्याचशा लोकांनी अशाप्रकारे खोटे ठरविलेले आहे. सरतेशेवटी त्यांच्यावर प्रकोप अशा दिशेने आला जिकडे त्यांचे लक्षदेखील जाऊ शकत नव्हते.
- मग अल्लाहने त्यांना ऐहिक जीवनातच नामुष्कीची चव घ्यावयास लावली, आणि परलोकांतील प्रकोप तर याच्यापेक्षा तीप आहे, या लोकांना त्याची जाणीव असती तर?
- आम्ही या कुरआनात लोकांना वैविध्यपूर्ण उदाहरणे दिली आहेत की यांनी शुद्धीवर यावे.
- असा कुरआन जो अरबी भाषेत आहे, ज्यात कसलीही वक्रता नाही, जेणेकरून यांनी वाईट शेवटापासून बचाव करावा.
- अल्लाह एक उदाहरण देत आहे, एक व्यक्ती तर ती आहे जिचे धनी होण्यासाठी बरेचसे वाईट प्रवृत्तीचे मालक सामील आहेत जे तिला आपापल्याकडे ओढत असतात आणि दुसरी व्यक्ती पूर्णपणे एकाच स्वामीची दास आहे. काय या दोघांची स्थिती एकसमान असू शकते? स्तुती आहे अल्लाहसाठी, परंतु बहुतेक लोक अज्ञानात गुरफटलेले आहेत.
- (हे पैगंबर (स.)) तुम्हीही कालवश होणार आहात व हे लोकसुद्धा मरणार आहेत.
- सरतेशेवटी प्रलयाच्या दिवशी तुम्ही सर्वजण आपल्या पालनकर्त्यापाशी आपापला दावा मांडणार आहात
- मग त्या इसमापेक्षा मोठा अत्याचारी कोण असू शकेल ज्याने अल्लाहवर कुभांड रचले आणि जेव्हा सत्य त्याच्यासमोर आले तेव्हा त्याला खोटे लेखले. अशा लोकांसाठी नरकामध्ये एखादे ठिकाण नाही काय?
- आणि जो इसम सत्य घेऊन आला आणि ज्यांनी ते खरे मानले तेच प्रकोपापासून वाचणार आहेत.
- त्यांना आपल्या पालनकर्त्यापाशी ते सर्वकाही मिळेल ज्याची ते इच्छा करतील. हा आहे पुण्य कार्य करणार्यांचा मोबदला.
- जेणेकरून जी वाईट कृत्ये त्यांनी केली होती त्यांना अल्लाहने त्यांच्या हिशेबातून वगळावे आणि जी उत्तम कृत्ये ते करीत राहिले त्यानुसार त्यांना मोबदला प्रदान करावा.
- (हे पैगंबर (स.)) काय अल्लाह आपल्या दासांसाठी पुरेसा नाही? हे लोक त्याच्याशिवाय तुम्हाला दुसर्यांचे भय दाखवितात. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहने ज्याला पथभ्रष्ट केले त्याला कोणीही मार्ग दाखविणार नाही,
- आणि ज्याला त्याने मार्गदर्शन केले त्याला पथभ्रष्ट कोणीही करणार नाही. काय अल्लाह जबरदस्त आणि सूड उगविणारा नाही?
- या लोकांना जर तुम्ही विचारले की जमीन आणि आकाशांना कोणी निर्माण केले तर हे स्वतःच म्हणतील की अल्लाहने. यांना विचारा, जेव्हा सत्य असे आहे तर तुमची काय कल्पना आहे की अल्लाहने जर मला काही नुकसान पोहचविण्याचे इच्छिले तर काय तुमचे हे उपास्य ज्यांचा तुम्ही अल्लाहला सोडून धावा करता, मला त्याने पोहचविलेल्या नुकसानापासून वाचवतील? अथवा अल्लाहने जर माझ्यावर कृपा करण्याचे इच्छिले तर काय हे त्याच्या कृपेला रोखू शकतील? बरे यांना सांगून टाका की माझ्यासाठी अल्लाहच पुरेसा आहे. विश्वास करणारे त्याच्यावरच निष्ठा ठेवतात
- यांना स्पष्ट सांगा, ’’हे माझ्या बांधवांनो! तुम्ही आपल्या जागी आपले कार्य करीत रहा. मी आपले कार्य करीत राहीन, लवकरच तुम्हाला कळून चुकेल
- की कोणावर अपमानजनक प्रकोप येतो आणि कोणाला ती शिक्षा मिळते, जी कधीही टळणारी नाही.’’
- (हे पैगंबर (स.)) आम्ही सर्व माणसांसाठी हा सत्याधिष्ठित ग्रंथ तुम्हावर उतरविला आहे. आता जो सरळ मार्गाचा अवलंब करील तो आपल्यासाठीच करील आणि जो भटकेल त्याच्या भटकण्याचे अरिष्ट त्याच्यावरच येईल, तुम्ही त्यांचे जबाबदार नाही.
- तो अल्लाहच आहे जो मृत्यूसमयी आत्मे ताब्यात घेतो आणि जो आता मरण पावलेला नाही त्याचा आत्मा झोपेत ताब्यात घेतो, मग ज्याच्यासाठी तो मृत्यूचा निर्णय जारी करतो तो रोखून ठेवतो आणि इतरांचे आत्मे एका निश्चित वेळेसाठी परत पाठवतो. यांत मोठे संकेत आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरतेने विचार करतात.
- काय त्या अल्लाहला सोडून या लोकांनी दुसर्यांना शिफारसी बनवून ठेवले आहे? यांना सांगा, काय ते शिफारस करतील, ज्याच्या अख्त्यारीत मग काही असो वा नसो आणि ते समजतदेखील नसतील?
- सांगा, संपूर्ण शिफारस अल्लाहच्या अख्त्यारीत आहे. आकाशांच्या व पृथ्वीच्या साम्राज्याचा तोच स्वामी आहे, मग त्याच्याकडेच तुम्ही रुजू केले जाणार आहात.
- जेव्हा एकट्या अल्लाहचाच नामोल्लेख केला जातो तेव्हा मरणोत्तर जीवनावर श्रद्धा न ठेवणार्यांची हृदये व्याकुळ होतात, आणि जेव्हा त्याच्याशिवाय इतरांचा उल्लेख होतो तेव्हा ते अकस्मात प्रफुल्लित होतात.
- सांगा, हे अल्लाह! आकाशांना व पृथ्वीला निर्माण करणार्या, अपरोक्ष आणि परोक्षाचे ज्ञान राखणार्या, तूच आपल्या दासांच्या दरम्यान त्या गोष्टीचा निवाडा कर ज्यात ते मतभेद करीत राहिले आहेत,
- जरी या अत्याचार्यांच्या जवळ पृथ्वीची सारी संपत्ती असली आणि तितकीच आणखीनदेखील, तरी हे पुनरुत्थानाच्या दिवसाच्या वाईट प्रकोपापासून वाचण्यासाठी सर्वकाही खंडणी म्हणून देण्यास तयार होतील. तेथे अल्लाहकडून असे काही येईल ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नाही.
- तेथे आपल्या कमाईचे सर्व वाईट परिणाम त्यांच्यावर उघड होतील आणि तीच गोष्ट त्यांच्यावर उलटेल, जिची हे थट्टा करीत राहिले आहेत.
- हाच मनुष्य, जेव्हा याला जरादेखील संकट स्पर्श करते, तेव्हा तो आमचा धावा करतो, आणि जेव्हा आम्ही आमच्याकडून देणगी देऊन त्याला फुलवितो तेव्हा म्हणतो की हे तर माझ्या ज्ञानाबद्दल दिले गेले आहे! नव्हे, तर हीच परीक्षा होय, परंतु यांच्यापैकी बहुतेकजण जाणत नाहीत.
- हीच गोष्ट यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीदेखील सांगितली आहे, परंतु जे काही ते कमवीत होते ते त्यांच्या काहीही उपयोगी पडले नाही.
- मग आपल्या कमाईची कटू फळे त्यांनी चाखली आणि या लोकांपैकीसुद्धा जे अत्याचारी आहेत ते लवकरच आपल्या कमाईची कटू फळे चाखतील, हे आम्हाला जेरीस आणणारे नाहीत.
- आणि काय यांना माहीत नाही की अल्लाह इच्छितो त्याची उपजीविका विपुल करतो आणि इच्छितो त्याची तंग करतो? यात संकेत आहेत त्या लोकांसाठी जे श्रद्धा ठेवतात.
- (हे पैगंबर (स.)) सांगून टाका की हे माझ्या दासांनो, ज्यांनी आपल्या स्वतःशीच आगळीक केली आहे, अल्लाहच्या कृपेकडून निराश होऊ नका, निश्चितच अल्लाह सर्व गुन्हे माफ करून टाकतो, तो तर क्षमाशील परमकृपाळू आहे,
- परतून या आपल्या पालनकर्त्याकडे आणि आज्ञाधीन बनून जा त्याचे, यापूर्वी की तुमच्यावर प्रकोप येईल आणि मग कुठूनही तुम्हाला मदत मिळणार नाही.
- आणि अनुसरण अंगिकारा आपल्या पालनकर्त्याकडून पाठविल्या गेलेल्या ग्रंथाच्या उत्तम पैलूचे, यापूर्वी की तुमच्यावर अकस्मात प्रकोप येईल आणि तुम्हाला खबरसुद्धा नसेल.
- एखादे वेळी असे होऊ नये की एखाद्याने नंतर म्हणावे, ’’खेद आहे माझ्या त्या आगळिकीवर जी मी अल्लाहच्या हुजूरात करीत राहिलो, किंबहुना मी तर उलट टिंगल करणार्यांत सामील होतो.’’
- अथवा खेदाने म्हणावे, ’’अल्लाहने जर मला मार्गदर्शन प्रदान केले असते तर मीसुद्धा ईशभीरूपैकी असतो.’’
- अथवा प्रकोप पाहून म्हणावे, ’’किती छान होईल जर मला आणखीन एक संधी मिळेल आणि मीसुद्धा पुण्यकर्म करणार्यांत सामील होईन.’’
- (आणि त्यावेळी त्याला हे उत्तर मिळेल की) ’’कदापी नाही, माझी संकेतवचने तुझ्याजवळ आली होती, मग तू त्यांना खोटे ठरविले आणि गर्व केला आणि तू सत्य नाकारणार्यांपैकी होतास.
- आज ज्या लोकांनी अल्लाहवर कुभांड रचले आहे, पुनरुत्थानाच्या दिवशी तुम्ही पाहाल की त्यांची तोंडे काळी असतील. नरकामध्ये गर्विष्ठांसाठी पुरेशी जागा नाही काय?
- याउलट जे लोक येथे ईशपरायण आहेत त्यांच्या सफलता देणार्या कारणामुळे अल्लाह त्यांना मुक्ती देईल, त्यांना काही इजाही पोहचणार नाही आणि ते दुःखीही होणार नाहीत.
- अल्लाह प्रत्येक वस्तूचा निर्माता आहे आणि तोच प्रत्येक वस्तूवर देखरेख ठेवणारा आहे.
- पृथ्वी आणि आकाशांच्या खजिन्यांच्या किल्ल्या त्याच्याच जवळ आहेत. आणि जे लोक अल्लाहच्या संकेतांशी द्रोह करतात तेच तोट्यात राहणारे आहेत.
- (हे पैगंबर (स.)) यांना सांगा, ’’मग काय हे अज्ञानी लोकहो, तुम्ही अल्लाहशिवाय अन्य एखाद्याची भक्ती करण्यास मला सांगता?’’
- (ही गोष्ट तुम्ही यांना स्पष्टपणे सांगायला हवी कारण की) तुमच्याकडे आणि तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्व पैगंबरांकडे असा दिव्यबोध केला गेला आहे की जर तुम्ही अनेकेश्वरवाद स्वीकारला तर तुम्ही केले सवरलेले वाया जाईल आणि तुम्ही तोट्यात रहाल.
- म्हणून (हे पैगंबर (स.)) तुम्ही केवळ अल्लाहची भक्ती करा आणि कृतज्ञ दासांपैकी बना.
- या लोकांनी अल्लाहची कदरच केली नाही जशी त्याची कदर करण्याचा हक्क आहे. (त्याच्या परिपूर्ण सामर्थ्याची स्थिती तर अशी आहे की) पुनरुत्थानाच्या दिवशी संपूर्ण पृथ्वी त्याच्या मुठीत असेल आणि आकाश त्याच्या उजव्या हातात गुंडाळलेले असतील. पवित्र आणि उच्चतर आहे तो त्या अनेकेश्वरवादापासून जे हे लोक करतात.
- आणि त्या दिवशी नरसिंघ फुंकले जाईल आणि ते सर्व मरून पडतील जे आकाशात आणि पृथ्वीत आहेत; त्यांच्याखेरीज ज्यांना अल्लाह जिवंत राखू इच्छिल. मग आणखीन दुसरे नरसिंघ फुंकले जाईल आणि अकस्मात सर्वच्या सर्व उठून पाहू लागतील.
- पृथ्वी आपल्या पालनकर्त्याच्या तेजाने उजळून निघेल, कर्माची नोंदवही आणून ठेवली जाईल, सर्व नबी (प्रेषित) आणि सर्व साक्षीदार उपस्थित केले जातील. लोकांच्या दरम्यान ठीक ठीक सत्याधिष्ठित निर्णय दिला जाईल त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही,
- आणि प्रत्येकजणाला जी काही कर्मे त्याने केली होती त्यांचा पुरेपूर बदला दिला जाईल. लोक जे काही करतात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.
- (या निर्णयानंतर) ते लोक ज्यांनी द्रोह केला होता, नरकाकडे टोळ्याटोळ्यांनी हाकले जातील इथपावेतो की जेव्हा ते तेथे पोहचतील तेव्हा तिची दारे उघडली जातील आणि तिचे कर्मचारी त्यांना म्हणतील, ’’तुमच्याजवळ तुमच्यापैकी असे प्रेषित आले नव्हते काय ज्यांनी तुम्हाला तुमच्या पालनकर्त्याची वचने ऐकविली आणि तुम्हाला या गोष्टीचे भय दाखविले की एका वेळी तुम्हाला असा दिवसदेखील पहावा लागेल?’’ ते उत्तर देतील, ’’होय, आले होते, परंतु प्रकोपाचा निर्णय अश्रद्धावंतांना लागू झाला.’’
- सांगितले जाईल, दाखल व्हा नरकाच्या दरवाजात, येथे आता तुम्हाला सदैव राहावयाचे आहे, अत्यंत वाईट स्थान आहे हे गर्विष्ठांसाठी.
- आणि जे लोक आपल्या पालनकर्त्याच्या अवज्ञेपासून अलिप्त राहात होते ते जथ्याजथ्याने स्वर्गाकडे नेले जातील येथपावेतो की जेव्हा ते तेथे पोहचतील आणि त्याची दारे अगोदरच उघडली गेली असतील तेव्हा त्याचे व्यवस्थापक त्यांना म्हणतील की, ’’सलाम असो तुमच्यावर, फारच चांगले राहिला तुम्ही, दाखल व्हा यात नेहमीसाठी.’’
- आणि ते म्हणतील, ’’कृतज्ञ आहोत त्या अल्लाहचे ज्याने आमच्याशी केलेले वचन सत्य करून दाखविले आणि आम्हाला पृथ्वीचे वारस बनविले, आता आम्ही स्वर्गामध्ये हवे तेथे आमची जागा बनवू शकतो.’’ तर उत्तम मोबदला आहे कर्म करणार्यांसाठी.
- आणि तुम्ही पाहाल की दूत अर्श (ईशसिंहासना) भोवती वर्तुळ बनवून आपल्या पालनकर्त्याची स्तुती व पावित्र्यगान करीत असतील. आणि लोकांच्या दरम्यान ठीकठीक सत्याधिष्ठित निर्णय दिला जाईल. आणि घोषित केले जाईल की स्तुती आहे सकल विश्वाच्या पालनकर्त्या अल्लाहसाठीच.