Surah An Naml With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

  27. अन् नमल - ٱلنَّمْل

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे


1.    ताऽ-सीऽऽन्. हे संकेत आहेत कुरआन आणि स्पष्ट ग्रंथाचे

2.    मार्गदर्शन आणि खुशखबर, त्या श्रद्धावंतांसाठी

3.    जे नमाज कायम करतात आणि जकात देतात, आणि शिवाय ते असे लोक आहेत जे मरणोत्तर जीवनावर पूर्ण विश्वास ठेवतात.

4.    वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक मरणोत्तर जीवन मानीत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या कृत्यांना आकर्षक बनविले आहे, म्हणून ते भटकत फिरत असतील.

5.    हे ते लोक आहेत ज्यांच्यासाठी वाईट शिक्षा आहे, आणि मरणोत्तर जीवनात हेच सर्वात जास्त तोट्यात राहणारे आहेत.

6.    आणि हे पैगंबर (.), निःसंशय तुम्ही हा कुरआन एका बुद्धिमान ज्ञानी अस्तित्वाकडून प्राप्त करीत आहात.

7.    (यांना त्यावेळची कथा ऐकवा) जेव्हा मूसा (.) ने आपल्या कुटुंबियांना सांगितले, ’’मला एक अग्नीसारखा दिसला आहे. मी आता तेथून एखादी बातमी आणतो अथवा एखादा निखारा वेचून आणतो, जेणेकरून तुम्ही ऊब घ्यावी.’’

8.    तेथे जेव्हा पोहचला तेव्हा हाक आली, ’’धन्य आहे तो जो या अग्नीत आहे आणि जो याच्या परिसरांत आहे. पवित्र आहे अल्लाह सर्व जगन्निवासींचा पालनकर्ता,

9.    हे मूसा (.), हा मी आहे अल्लाह जबरदस्त आणि बुद्धिमान.

10.                       आणि टाक तर जरा आपली लाठी.’’ ज्याक्षणी मूसा (.) ने पाहिले लाठी सर्पाप्रमाणे वळवळत आहे तेव्हा पाठ फिरवून तो पळाला आणि मागे वळूनसुद्धा पाहिले नाही. ’’हे मूसा (.) भिऊ नकोस, माझ्या पुढे पैगंबर भीत नसतात,

11.                       याव्यतिरिक्त की एखाद्याने चूक केली असेल. मग जर वाईटानंतर त्याने चांगुलपणाने (आपल्या कृत्यास) बदलून टाकले तर मी माफ करणारा मेहेरबान आहे.

12.                       आणि जरा आपला हात आपल्या छातीजवळ तर धर, चकाकत निघेल कोणत्याही अडचणींशिवाय हे (दोन संकेत) नऊ संकेतांपैकी आहेत, फिरऔन आणि त्याच्या लोकांकडे (घेऊन जाण्यासाठी), ते मोठे दुराचारी लोक आहेत.’’

13.                       परंतु जेव्हा आमची उघड उघड संकेतचिन्हे त्या लोकांसमोर आली तेव्हा त्यांनी सांगितले की, ही तर उघड जादू आहे.

14.                       त्यांनी सर्रास अत्याचार आणि घमेंडीच्या मार्गाने त्या संकेतचिन्हांचा इन्कार केला, वस्तुतः त्यांच्या मनाला ते पटले होते. आता पहा, त्या उपद्रवी लोकांचा शेवट कसा झाला.

15.                       (दुसरीकडे) आम्ही दाऊद (.) सुलैमान (.) यांना ज्ञान प्रदान केले, आणि त्यांनी सांगितले की, ’’कृतज्ञ आहोत त्या अल्लाहचे ज्याने आम्हाला पुष्कळशा आपल्या श्रद्धावंत दासांवर श्रेष्ठत्व प्रदान केले.’’

16.                       आणि दाऊद (.) चा वारस सुलैमान (.) झाला, आणि त्याने सांगितले, ’’लोकहो, आम्हाला पक्षांच्या भाषा शिकविल्या गेल्या आहेत आणि आम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू दिल्या गेल्या आहेत, निःसंशय ही (अल्लाहची) ढळढळीत कृपा आहे.’’

17.                       सुलैमान (.) साठी जिन्नांचे, माणसांचे आणि पक्षांचे लष्कर जमविले गेले होते आणि ते पूर्ण नियंत्रणाखाली ठेवले जात होते.

18.                       (एकदा तो त्यांच्यासमवेत कूच करीत होता) येथपावेतो की हे सर्व जेव्हा मुंग्यांच्या खोर्यात पोहचले, तेव्हा एका मुंगीने सांगितले, ’’हे मुंग्यानो, आपल्या बिळात शिरा, कदाचित असे होऊ नये की, सुलैमान (.) आणि त्याच्या लष्कराने तुम्हाला तुडवून टाकावे आणि त्यांना याची खबरसुद्धा नसावी.’’

19.                       सुलैमान (.) तिच्या बोलण्यावर स्मित करून हसला आणि म्हणाला, ’’हे माझ्या पालनकर्त्या, मला नियंत्रणात ठेव की मी तुझ्या त्या उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत राहीन जे तू माझ्यावर माझ्या मातापित्यावर केले आहेस, आणि असे सत्कृत्य करावे जे तुला आवडेल आणि आपल्या कृपेने मला आपल्या सदाचारी दासांमध्ये सामील कर.’’

20.                       (आणखी एका प्रसंगी) सुलैमान (.) ने पक्षांचे निरीक्षण केले आणि म्हणाला, ’’काय झाले आहे की अमुक सुतार पक्षी दिसत नाही? तो कुठे बेपत्ता झाला आहे काय?

21.                       मी त्याला कठोर शिक्षा देईन, अथवा त्याचा बळी देईन अन्यथा त्याला माझ्यासमोर योग्य कारण द्यावे लागेल.’’

22.                       काही जास्त वेळ गेला नाही की त्याने येऊन सांगितले, ’’मी ती माहिती मिळविली आहे जी आपल्याला ज्ञात नाही. मी सबाच्या संबंधी विश्वसनीय बातमी घेऊन आलो आहे.

23.                       मी तेथे एक स्त्री पाहिली जी त्या लोकांची शासक आहे. तिला सर्व प्रकारची साधनसामग्री प्रदान केली गेली आहे आणि तिचे सिंहासन फार वैभवशाली आहे.

24.                       मी पाहिले की ती तिचे लोक अल्लाहऐवजी सूर्यासमोर नतमस्तक होतात.’’ शैतानाने त्यांची कृत्ये त्यांच्यासाठी आकर्षक बनविलीत आणि त्यांना सरळमार्गापासून रोखले.

25.                       या कारणास्तव त्यांना हा सरळ मार्ग लाभत नाही की अल्लाहपुढे नतमस्तक व्हावे, जो आकाश आणि पृथ्वीतील दडलेल्या वस्तू काढतो, आणि ते सर्वकाही जाणतो जे तुम्ही लपविता आणि प्रकट करता,

26.                       अल्लाह ज्याच्याशिवाय कोणीही उपास्य नाही, जो महान राजसिंहासन (अर्श) चा मालक आहे.

27.                       सुलैमान (.) ने सांगितले, ’’आताच आम्ही पाहून घेतो की तू खरे म्हटले आहेस अथवा तू खोटे बोलणार्यांपैकी आहेस.

28.                       माझे हे पत्र घेऊन जा आणि याला त्या लोकांकडे टाकून दे आणि मग दूर राहून पहा की ते कोणती प्रतिक्रिया व्यक्त करतात.’’

29.                       राणी म्हणाली, ’’हे दरबारी लोकहो, माझ्याकडे एक फार महत्वाचे पत्र पाठविले गेले आहे

30.                       ते सुलैमान (.) कडून आहे आणि ते कृपावंत दयावंत अल्लाहच्या नावाने सुरू केले गेले आहे.

31.                       मजकूर असा आहे की, ’’माझ्या विरोधात दुर्वर्तन करू नका आणि आज्ञाधारक बनून माझ्यासमोर हजर व्हा.’’

32.                       (पत्र ऐकवून) राणी म्हणाली, ’’हे सरदारांनो, याबाबतीत मला सल्ला द्या, मी कोणत्याही मामल्याचा निर्णय तुमच्याशिवाय घेत नसते.’’

33.                       त्यांनी उत्तर दिले, ’’आम्ही शक्तिमान आणि लढवय्ये लोक आहोत. पुढील निर्णय घेणे आपल्या हाती आहे, आपण स्वतः पहा की आपणास कोणता आदेश द्यावयाचा आहे.’’

34.                       राणी म्हणाली, ’’राजे जेव्हा एखाद्या देशात घुसून येतात तेव्हा ते त्याचे वाटोळे करतात आणि त्यातील प्रतिष्ठितांना अपमानित करतात, असेच काही ते करीत असतात.

35.                       मी त्या लोकांकडे एक भेट पाठविते, मग पाहते की माझे दूत कोणते उत्तर घेऊन परत येतात.’’

36.                       जेव्हा तो (राणीचा दूत) सुलैमान (.) कडे आला तेव्हा तो म्हणाला, ’’तुम्ही लोक संपत्तीने माझी मदत करू इच्छिता काय? जे काही अल्लाहने मला देऊन ठेवले आहे त्याच्यापेक्षा फार जास्त आहे जे तुम्हाला दिले गेले आहे. तुमची भेट तुम्हालाच लखलाभ होवो.

37.                       (हे दूता!) परत जा आपल्या पाठविणार्याकडे! आम्ही त्यांच्यावर अशा सैन्यासह येऊ ज्यांचा मुकाबला ते करू शकणार नाहीत. आणि आम्ही त्यांना असे अपमानित करून तेथून काढू की ते लाचार बनून राहतील.’’

38.                       सुलैमान (.) ने सांगितले, ’’हे दरबारी लोकांनो! तुमच्यापैकी कोण तिचे सिंहासन माझ्यापाशी आणील त्या अगोदर की ते लोक आज्ञाधारक बनून माझ्यासमोर हजर होतील?’’

39.                       जिन्नांपैकी एका सशक्ताने सांगितले, ’’मी ते हजर करीन यापूर्वी की आपण आपल्या जागेवरून उठाल. मी याचे सामर्थ्य बाळगतो आणि विश्वस्त आहे.’’

40.                       ज्या व्यक्तीजवळ ग्रंथाचे एक ज्ञान होते, तो म्हणाला, ’’मी आपली पापणी लवण्यापूर्वी ते आणून देतो.’’ ज्याक्षणी सुलैमान (.) ने ते सिंहासन आपल्याजवळ ठेवलेले पाहिले, तो उद्गारला, ’’हा माझ्या पालनकर्त्याचा कृपाप्रसाद आहे जेणेकरून तो माझी परीक्षा घेत आहे की मी कृतज्ञ बनतो की कृतघ्नता दाखवितो आणि जो कुणी कृतज्ञ बनतो त्याची कृतज्ञता त्याच्यासाठीच लाभकारी आहे, अन्यथा एखाद्याने कृतघ्नता दर्शविली तर माझा पालनकर्ता निरपेक्ष आणि स्वयंसिद्ध प्रतिष्ठावान आहे.’’

41.                       सुलैमान (.) ने सांगितले, ’’अपरिचित रीतीने तिचे सिंहासन तिच्यासमोर ठेऊन द्या, पाहू या किती खर्या गोष्टीपर्यंत ती पोहचते अथवा त्या लोकांपैकी होते ज्यांना सरळमार्ग पावत नाही.’’

42.                       राणी जेव्हा हजर झाली तेव्हा तिला सांगण्यात आले तुझे सिंहासन असेच आहे का? ती म्हणू लागली, ’’हे तर जणू तेच आहे. आम्ही तर अगोदरच जाणून घेतले होते आणि आम्ही आज्ञेत मान तुकविली होती. (अथवा आम्ही मुसलमान बनलो होतो)’’

43.                       (तिला श्रद्धा ठेवण्यापासून) ज्या गोष्टीने रोखून ठेवले होते ती त्या उपास्यांची आराधना होती ज्यांची ती अल्लाहशिवाय पूजा करीत होती कारण ती एका अश्रद्धावंत लोकसमुदायापैकी होती.

44.                       तिला सांगितले गेले की, महालात प्रवेश कर. तिने जे पाहिले तर तिला वाटले की, पाण्याचा हौद आहे आणि उतरण्याकरिता तिने आपल्या विजारीचा खालचा भाग वर उचलला. सुलैमान (.) ने सांगितले, ’’ही काचेची गुळगुळीत फरसबंदी आहे.’’ यावर ती उद्गारली, ’’हे माझ्या पालनकर्त्या (आजपर्यंत) मी स्वतः आपल्यावर मोठा अन्याय करीत राहिले आणि आता मी सुलैमान (.) समवेत सर्व जगांच्या पालनकर्त्या अल्लाहची आज्ञाधारकता स्वीकारली.’’

45.                       आणि समूद लोकांकडे आम्ही त्यांचा भाऊ सॉलेह (.) ला (हा संदेश देऊन) पाठविले की, अल्लाहची भक्ती करा, तर एकाएकी ते परस्परविरोधी दोन पक्ष बनले.

46.                       सॉलेह (.) ने सांगितले, ’’हे माझ्या देशबांधवांनो, भल्याच्या अगोदर बुराईसाठी का घाई करता? का बरे अल्लाहची क्षमा मागत नाही? कदाचित तुमच्यावर दया केली जाईल.’’

47.                       त्यांनी सांगितले, ’’आम्हाला तर तुम्ही आणि तुमचे सोबती अपशकुनाचे प्रतीक आढळला आहात.’’ सॉलेह (.) ने उत्तर दिले, ’’तुमच्या शुभ अशुभ शकुनांचे सूत्र तर अल्लाहजवळ आहे. खरी गोष्ट अशी आहे की तुम्हा लोकांची परीक्षा होत आहे.’’

48.                       त्या शहरात नऊ जथेदार होते जे देशात उपद्रव माजवीत आणि कोणतेही सुधारणेचे काम करीत नसत.

49.                       त्यांनी आपापसांत सांगितले, ’’अल्लाहची शपथ घेऊन प्रतिज्ञा करा की आम्ही सॉलेह (.) आणि त्याच्या कुटुंबियांवर छापा मारू आणि मग त्यांच्या सरदाराला सांगू की आम्ही त्याच्या कुटुंबियांच्या हत्येच्या वेळी हजर नव्हतो, आम्ही अगदी खरे सांगतो. ’’

50.                       हा डाव तर ते खेळले आणि मग एक डाव आम्ही खेळलो ज्याची त्यांना माहिती नव्हती.

51.                       आता पहा की त्यांच्या डावाचा शेवट कसा झाला. आम्ही नष्ट करून टाकले त्यांना आणि त्यांच्या सर्व लोकांना.

52.                       त्यांची घरे ओस पडली आहेत त्या अत्याचारापायी जे ते करीत होते. यात एक बोधप्रद संकेत आहे त्या लोकांसाठी जे ज्ञान बाळगतात.

53.                       आणि वाचविले आम्ही त्या लोकांना ज्यांनी श्रद्धा ठेवली होती. आणि अवज्ञेपासून दूर राहात होते.

54.                       आणि लूत (.) ला आम्ही पाठविले. आठवा ती वेळ जेव्हा त्याने आपल्या समूहाला सांगितले, ’’तुम्ही डोळ्यांदेखत व्यभिचार करता काय?

55.                       काय तुमची हीच परंपरा आहे की स्त्रियांना सोडून पुरुषाजवळ संभोगासाठी जाता? वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही लोक घोर अज्ञानमूलक कृत्य करीत आहात.’’

56.                       परंतु त्यांच्या लोकसमूहाचे उत्तर याशिवाय काही नव्हते की त्यांनी सांगितले, ’’काढून टाका लूत (अ.) च्या कुटुंबियांना आपल्या वस्तीतून. हे मोठे पावित्र्यवान बनतात.’’

57.                       सरतेशेवटी आम्ही वाचविले त्याला व त्याच्या कुटुंबियांना, त्याच्या पत्नीखेरीज जिचे पाठीमागे राहणे आम्ही निश्चित केलेले होते,

58.                       आणि वर्षविली त्यांच्यावर एक वृष्टी, अत्यंत वाईट वृष्टी होती ती त्यांच्यासाठी ज्यांना ताकीद दिली गेली होती.

59.                       (हे पैगंबर (.)!) सांगा, स्तुती आहे अल्लाहसाठी आणि सलाम आहे त्याच्या त्या दासांवर ज्यांना त्याने निवडले. (यांना विचारा) अल्लाह उत्तम आहे की ते उपास्य ज्यांना हे लोक त्याचा भागीदार बनवीत आहेत?

60.                       तो कोण आहे ज्याने आकाशांना पृथ्वीला निर्माण केले आणि तुमच्यासाठी आकाशातून पाण्याचा वर्षाव केला, मग त्याच्याद्वारे त्या प्रियदर्शनी बागा उगविल्या ज्यांच्या झाडांना उगविणे तुमच्या आवाक्यात नव्हते? अल्लाहबरोबर कोणी दुसरा उपास्यदेखील (या कामांमध्ये सामील) आहे काय? (नाही) किंबहुना हेच लोक सरळ मार्गापासून दूर होऊन भरकटत चालले आहेत.

61.                       आणि तो कोण आहे ज्याने पृथ्वीला निवासस्थान बनविले आणि त्यात नद्या प्रवाहित केल्या त्यात (पर्वतांच्या) खुंट्या रोवल्या आणि पाण्याच्या दोन साठ्यांच्या दरम्यान अडसर उभारले? काय अल्लाहसमवेत एखादा अन्य उपास्य सुद्धा (या कामात सहभागी) आहे? नाही, तर यांच्यापैकी बहुतेक लोक नादान आहेत.

62.                       कोण आहे जो अस्वस्थ झालेल्याची प्रार्थना ऐकतो जेव्हा तो त्याचा धावा करतो आणि कोण त्याचा त्रास दूर करतो? आणि (कोण आहे जो) तुम्हाला पृथ्वीचा नायब बनवितो? काय अल्लाहसमवेत कोणी अन्य उपास्य सुद्धा (हे कार्य करणारा) आहे? तुम्ही लोक कमीच विचार करता.

63.                       आणि तो कोण आहे जो खुष्की समुद्राच्या अंधकारात तुम्हाला मार्ग दाखवितो आणि कोण आपल्या कृपेपुढे वार्यांना सुवार्ता घेऊन पाठवितो? काय अल्लाहसमवेत कोणी दुसरा उपास्य सुद्धा (हे कार्य करीत) आहे? फार उच्च श्रेष्ठतर आहे अल्लाह त्या शिर्क (अनेकेश्वरवादा) पासून जे हे करीत आहेत.

64.                       आणि तो कोण आहे जो निर्मितीस प्रारंभ करतो आणि मग तिची पुनरावृत्ती करतो? आणि कोण तुम्हाला आकाश पृथ्वीपासून उपजीविका देतो? काय अल्लाहसमवेत कोणी अन्य उपास्य सुद्धा (या कामात भागीदार) आहे? सांगा की आणा आपले प्रमाण जर तुम्ही खरे असाल.

65.                       यांना सांगा, अल्लाहशिवाय आकाशांमध्ये पृथ्वीत कोणी परोक्षाचे ज्ञान बाळगत नाही ते (तुमचे उपास्य तर हेसुद्धा) जाणत नाहीत की केव्हा ते उठविले जातील.

66.                       किंबहुना मरणोत्तर जीवनाचे तर ज्ञानच या लोकांकडून हरवले आहे, किंबहुना त्यासंबंधी साशंक आहेत, किंबहुना हे त्या बाबतीत आंधळे आहेत.

67.                       हे इन्कार करणारे म्हणतात, ’’काय जेव्हा आम्ही आमचे वाडवडील माती बनलेली असू, तेव्हा खरोखर आम्हाला थडग्यांमधून काढले जाईल?

68.                       या बातम्या आम्हालासुद्धा खूप दिल्या गेल्या आहेत आणि पूर्वी आमच्या वाडवडिलांनासुद्धा दिल्या जात राहिल्या आहेत, परंतु या तर बस्स कथाच आहेत ज्या पूर्व काळापासून ऐकत आलेलो आहोत.’’

69.                       सांगा, थोडे पृथ्वीवर फेरफटका मारून पहा की गुन्हेगारांचा कसा शेवट झालेला आहे.

70.                       हे पैगंबर (.), यांच्या दशेवर दुःख करू नका आणि यांच्या डावपेचावर कष्टीही होऊ नका.

71.                       ते म्हणतात की, हे वचन केव्हा साकार होईल जर तुम्ही खरे असाल.’’

72.                       सांगा, यात काय नवल की ज्या प्रकोपासाठी तुम्ही घाई करीत आहात त्याचा एक भाग तुमच्याजवळ येऊन ठेपला आहे.

73.                       वस्तुस्थिती अशी आहे की तुझा पालनकर्ता तर लोकांवर फार मेहेरबानी करणारा आहे परंतु बहुतेक लोक कृतज्ञता दर्शवीत नाहीत.

74.                       निःसंशय तुझा पालनकर्ता चांगल्याच प्रकारे जाणतो जे काही त्यांच्या मनांमध्ये दडलेले आहे आणि जे काही ते व्यक्त करतात.

75.                       आकाश पृथ्वीची कोणतीही गुप्त गोष्ट अशी नाही, जी एका स्पष्ट ग्रंथात नमूद असलेली नाही.

76.                       ही वस्तुस्थिती आहे की हा कुरआन बनीइस्राईलना बहुतांशी त्या गोष्टीची वास्तविकता दर्शवितो ज्यात ते मतभेद बाळगतात,

77.                       आणि हा मार्गदर्शन कृपा आहे श्रद्धावंतांसाठी.

78.                       निश्चितच (अशाप्रकारे) तुझा पालनकर्ता या लोकांच्या दरम्यानसुद्धा आपल्या आदेशाने निवाडा करील आणि तो जबरदस्त आणि सर्वकाही जाणणारा आहे.

79.                       तर हे पैगंबर (.), अल्लाहवर भरोसा ठेवा, खचितच तुम्ही उघड सत्यावर आहात,

80.                       तुम्ही मृतांना ऐकवू शकत नाही, त्या बहिर्यांपर्यंतही आपलीहाक पोहचवू शकत नाही जे पाठ फिरवून पळत सुटले आहेत,

81.                       आणि आंधळ्यांनाही मार्ग दाखवून भटकण्यापासून वाचवू शकत नाही. तुम्ही तर आपले म्हणणे त्यांनाच ऐकवू शकता जे आमच्या वचनांवर श्रद्धा ठेवतात आणि मग आज्ञाधारक बनतात.

82.                       आणि जेव्हा आमचे वचन पूर्ण होण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपेल तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी एक जीव जमिनीतून काढू जो त्यांच्याशी संभाषण करील की लोक आमच्या वचनांवर विश्वास ठेवीत नव्हते.

83.                       आणि जरा कल्पना करा त्या दिवसाची जेव्हा आम्ही प्रत्येक लोकसमुदायातून एक फौजची फौज त्या लोकांची घेरून आणू जे आमच्या संकेतांना खोटे ठरवीत होते, मग त्यांची (त्यांच्या प्रकारानुसार यथाश्रेणी) वर्गवारी केली जाईल

84.                       येथपावेतो की जेव्हा सर्वजण येतील तेव्हा (त्यांचा पालनकर्ता त्यांना) विचारील की, ’’तुम्ही माझ्या संकेतांना खोटे ठरविले, वास्तविक तुम्ही त्यांना ज्ञानकक्षेत आणले नव्हते? जर असे नाही तर दुसरे तुम्ही काय करीत होता?’’

85.                       आणि त्याच्या अत्याचारामुळे प्रकोपाचे वचन त्यांच्यावर पूर्ण होईल तेव्हा ते काहीही बोलू शकणार नाहीत.

86.                       त्यांना उमगत नव्हते का की आम्ही रात्र त्यांना विश्रांती घेण्यासाठी बनविली होती आणि दिवसाला प्रकाशमान केले होते? यात बरेच संकेत होते त्या लोकांसाठी जे श्रद्धा ठेवीत आहेत.

87.                       आणि काय घडेल त्या दिवशी जेव्हा शिंग फुंकले जाईल आणि धसका घेतील ते सर्व जे आकाशांत आणि पृथ्वीत आहेत, त्या लोकांखेरीज ज्यांना अल्लाह त्या धास्तीपासून वाचवू इच्छिल आणि सर्व निमूटपणे त्याच्या हुजुरात हजर होतील.

88.                       आज तू पर्वतांना पाहतोस आणि समजतोस की खूप दृढ आहेत पण त्यावेळी हे ढगांप्रमाणे उडत असतील, हा अल्लाहच्या सामर्थ्याचा चमत्कार असेल, ज्याने प्रत्येक वस्तूला परिपूर्ण घडविले आहे. तो भल्याप्रकारे जाणतो की तुम्ही लोक काय करता,

89.                       जो मनुष्य भलेपणा घेऊन येईल त्याला त्याच्यापेक्षा अधिक चांगला मोबदला मिळेल आणि असले लोक त्या दिवसाच्या धास्तीपासून सुरक्षित राहतील,

90.                       आणि जो वाईटपणा घेऊन येईल असले सर्व लोक पालथ्या तोंडी अग्नीत फेकले जातील. काय तुम्ही याव्यतिरिक्त अन्य एखादा मोबदला प्राप्त करू शकता की, जसे तुम्ही कराल तसेच तुम्हाला लाभेल.

91.                       (हे पैगंबर (.) यांना सांगा,) ’’मला तर हीच आज्ञा दिली गेली आहे की या (मक्का) शहराच्या पालनकर्त्याची भक्ती करावी ज्याने याला (आदरणीय) बनविले आहे आणि जो प्रत्येक गोष्टीचा स्वामी आहे. मला आज्ञा दिली गेली आहे की मी मुस्लिम-आज्ञाधारक बनून राहावे

92.                       आणि हा कुरआन पठण करून ऐकवावे.’’ आता जो मार्गदर्शन स्वीकारील तो आपल्याच भल्यासाठी मार्गदर्शन स्वीकारील आणि जो मार्गभ्रष्ट असेल त्याला सांगा की, ’’मी तर केवळ सावध करणारा आहे.’’

93. यांना सांगा, स्तुती अल्लाहसाठीच आहे लवकरच तो तुम्हाला आपले संकेत दाखवून देईल आणि तुम्ही त्यांना ओळखाल, आणि तुझा पालनकर्ता अनभिज्ञ नाही त्या कृत्यांपासून जी तुम्ही लोक करीत आहात.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post