26. अश् शुरा - ٱلشُّعَرَاء
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.
1.
ताऽसीऽऽम् – मीऽम्.
2.
या स्पष्ट ग्रंथाच्या आयती आहेत.
3.
हे पैगंबर (स.), कदाचित तुम्ही या दुःखाने आपले प्राण गमावून बसाल की हे लोक श्रद्धा ठेवत नाहीत.
4.
आम्ही इच्छिले तर आकाशातून अशी निशाणी उतरवू शकतो की यांच्या माना त्यापुढे नमतील.
5.
या लोकांपाशी कृपावंताकडून जो कोणता नवीन उपदेश येतो हे त्याच्याशी विमुख होतात.
6.
आता ज्याअर्थी यांनी खोटे ठरविले आहे, लवकरच यांना त्या गोष्टीची (विविध मार्गाने) वास्तविकता माहीत होईल ज्याची हे टिंगल करीत आले आहेत.
7.
आणि काय यांनी पृथ्वीतलावर कधी दृष्टिक्षेप टाकला नाही की आम्ही किती विपूल प्रमाणात सर्व प्रकारची उत्कृष्ट वनस्पती त्यावर निर्माण केली आहे?
8.
निश्चितच यात एक संकेत आहे, परंतु यापैकी बहुतेकजण मानणारे नाहीत.
9.
आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा पालनकर्ता सामर्थ्य-संपन्नही आहे आणि दयावानदेखील.
10. यांना त्या वेळची गोष्ट ऐकवा, जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने मूसा (अ.) ला पुकारिले, ’’अत्याचारी जनसमुदायाकडे जा –
11. फिरऔनच्या लोकसमुहाकडे – काय ते भीत नाहीत?’’
12. त्याने विनविले, ’’हे माझ्या पालनकर्त्या मला भय आहे की ते मला खोटे ठरवतील.
13. माझे मन दबले जाते व माझी जीभ चालत नाही. आपण हारूनकडे प्रेषितत्व पाठवावे,
14. आणि माझ्यावर त्यांच्या येथे एका अपराधाचे आरोपदेखील आहे, म्हणून भीती वाटते की ते मला ठार मारतील.’’
15. फर्माविले, ’’मुळीच नाही, तुम्ही दोघे जा आमचे संकेत घेऊन, आम्ही तुम्हाबरोबर सर्वकाही ऐकत राहू.
16. फिरऔनपाशी जा आणि त्याला सांगा, आम्हाला सर्व जगांच्या पालनकर्त्याने यासाठी पाठविले आहे
17. की तू बनीइस्राईलना आमच्याबरोबर जाऊ द्यावेस.’’
18. फिरऔनने सांगितले, ’’काय आम्ही तुझे आपल्या येथे मुलाप्रमाणे पालनपोषण केले नव्हते? तू आपल्या आयुष्याची अनेक वर्षे आमच्या दरम्यान घालविलीस,
19. आणि त्यानंतर तू करून गेलास जे काही करून गेला. तू फार कृतघ्न मनुष्य आहेस.’’
20. मूसा (अ.) ने उत्तर दिले, ’’त्यावेळी ते काम मी अजाणपणे केले होते.
21. मग मी तुमच्या भीतीने पळून गेलो. त्यानंतर माझ्या पालनकर्त्याने मला हुकुम प्रदान केला आणि मला पैगंबरांत समाविष्ट केले.
22. उरले तुझे उपकार ज्यांचा ठपका तू माझ्यावर ठेवला आहेस, तर त्याची वस्तुस्थिती अशी आहे की तू बनीइस्राईलना गुलाम बनविले होते.’’
23. फिरऔनने सांगितले, ’’आणि जगतांचा पालनकर्ता काय असतो?’’
24. मूसा (अ.) ने उत्तर दिले, ’’आकाशांचा आणि पृथ्वीचा पालनकर्ता आणि त्या सर्व वस्तूंचा पालनकर्ता ज्या आकाश व पृथ्वीच्या दरम्यान आहेत, जर तुम्ही विश्वास बाळगणारे असाल.’’
25. फिरऔनने आपल्या सभोवतीच्या लोकांना सांगितले, ’’ऐकलेत ना?’’
26. मूसा (अ.) ने सांगितले, ’’तुमचाही पालनकर्ता आणि तुमच्या त्या वाडवडिलांचा पालनकर्तादेखील जे पूर्वी होऊन गेले आहेत.’’
27. फिरऔनने (उपस्थितांना) सांगितले, ’’तुमचे हे पैगंबर साहेब जे तुमच्याकडे पाठविले गेले आहेत, अगदीच वेडे दिसतात.’’
28. मूसा (अ.) ने सांगितले, ’’पूर्व व पश्चिम आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे सर्वांचा पालनकर्ता, जर आपण काही बुद्धी बाळगत असाल.’’
29. फिरऔनने सांगितले, ’’जर तू माझ्याशिवाय इतर कोणास उपास्य मानले तर तुलाही त्या लोकांत सामील करीन जे तुरुंगात खितपत पडले आहेत.’’
30. मूसा (अ.) ने सांगितले, ’’मी तुझ्यासमोर एक स्पष्ट गोष्ट आणली तरी?’’
31. फिरऔनने सांगितले, ’’बरे तर घेऊन ये जर तू खरा असशील.’’
32. (त्याच्या तोंडातून ही गोष्ट पडताक्षणीच) मूसा (अ.) ने आपली काठी फेकली आणि अकस्मात ती – एक अजगर बनली.
33. मग त्याने आपला हात (बगलेतून) काढला आणि तो सर्व पाहणार्यांसमोर चकाकत होता.
34. फिरऔन आपल्या सभोवतीच्या सरदारांना म्हणाला, ’’हा माणूस निश्चितच एक निष्णात जादूगार आहे.
35. इच्छितो की आपल्या जादूच्या जोरावर तुम्हाला तुमच्या देशातून हाकलून द्यावे. आता सांगा, तुम्ही काय आज्ञा देता?’’
36. त्यांनी सांगितले, ’’याला आणि याच्या भावाला थांबवून ठेवा आणि शहरात दवंडी देणारे पाठवा
37. की प्रत्येक शहाण्या जादूगारास त्यांनी आपल्याकडे घेऊन यावे.’’
38. त्याप्रमाणे एके दिवशी ठरलेल्या वेळी जादूगारांना एकत्र करण्यात आले
39. आणि लोकांना सांगितले गेले, ’’तुम्ही मेळाव्यात याल ना?
40. कदाचित आम्ही जादूगारांच्याच धर्मावर राहू जर ते वरचढ ठरले.’’
41. जेव्हा जादूगार मैदानात आले तेव्हा ते फिरऔनला म्हणाले, ’’आम्हाला बक्षीस तर मिळेल ना जर आम्ही वरचढ ठरलो?’’
42. तो म्हणाला, ’’होय, आणि तुम्ही तर त्यावेळी निकटवर्तीय लोकांत सामील व्हाल.’’
43. मूसा (अ.) ने सांगितले, ’’टाका, जे काही तुम्हाला टाकावयाचे आहे.’’
44. त्यांनी लगेच आपल्या दोर्या व काठ्या टाकल्या व म्हणाले, ’’फिरऔनच्या प्रतापाने आम्हीच वरचढ ठरू.’’
45. मग मूसा (अ.) ने आपली काठी फेकली, तर अकस्मात ती त्यांच्या खोट्या चमत्कारांना गिळंकृत करीत चालली होती.
46. यावर सर्व जादूगार स्वतःहून उत्स्फूर्तपणे नतमस्तक झाले
47. आणि बोलते झाले की, ’’मानले आम्ही सर्व जगाच्या पालनकर्त्याला,
48. मूसा (अ.) आणि हारून (अ.) यांच्या पालनकर्त्याला.’’
49. फिरऔनने सांगितले, ``तुम्ही मूसा (अ.) चे म्हणणे मान्य केले यापूर्वी की मी तुम्हाला तशी परवानगी द्यावी! श्चितच हा तुमचा ज्येष्ठ आहे ज्याने तुम्हाला जादू शिकविली आहे, बरे, इतक्यातच तुम्हाला कळेल. मी तुमचे हातपाय विरूद्ध बाजूने कापणार आणि तुम्हा सर्वांना सुळावर चढविणार.’’
50. त्यांनी उत्तर दिले, ’’काही पर्वा नाही, आम्ही आमच्या पालनकर्त्याच्या ठायी पोहचू
51. आणि आम्हाला अपेक्षा आहे की आमचा पालनकर्ता आमचे अपराध माफ करील कारण सर्वप्रथम आम्ही श्रद्धा ठेवली आहे.’’
52. आम्ही मूसा (अ.) ला दिव्यबोध (वह्य) पाठविला की, ’’रात्रीच्या रात्रीच माझ्या दासांना घेऊन निघून जा, तुमचा पाठलाग केला जाईल.’’
53. यावर फिरऔनने (सैन्य गोळा करण्याकरिता) शहरात दवंडी देणारे पाठविले.
54. ’’हे काही मूठभर लोक आहेत,
55. आणि यांनी आम्हाला खूप नाराज केले आहे
56. आणि आम्ही एक असा समुदाय आहोत ज्यांचा बाणा नेहमी सावध राहणे होय.’’
57. अशाप्रकारे आम्ही त्यांना त्यांच्या बागांतून व त्यांच्या झर्यांतून,
58. आणि खजिने व त्यांच्या उत्तम निवासस्थानांतून काढून आणले.
59. हे तर घडले त्यांच्याशी (आणि दुसरीकडे) बनीइस्राईलना आम्ही या सर्व वस्तूंचे वारस बनविले.
60. सकाळ होताच हे लोक त्यांच्या पाठलागासाठी निघाले,
61. जेव्हा दोन्ही जमातीचा आमना सामना झाला तेव्हा मूसा (अ.) चे सोबती ओरडले, ’’आम्ही तर धरले गेलो.’’
62. मूसा (अ.) ने सांगितले, ’’कदापि नाही, माझ्याबरोबर माझा पालनकर्ता आहे. तो निश्चितच मला मार्गदर्शन करील.’’
63. आम्ही मूसा (अ.) ला दिव्य बोधाद्वारे आज्ञा दिली, ’’मार आपली काठी समुद्रावर.’’ अकस्मात समुद्र दुभंगला आणि त्याचा प्रत्येक भाग एक भव्य पर्वताप्रमाणे झाला.
64. त्याच जागी आम्ही दुसर्या जमातीलादेखील जवळ घेऊन आलो.
65. मूसा (अ.) आणि त्या सर्व लोकांना जे बरोबर होते, आम्ही वाचविले,
66. आणि दुसर्यांना बुडविले.
67. या घटनेत एक संकेत आहे परंतु या लोकांपैकी बहुतेकजण मानणारे नाहीत
68. आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा पालनकर्ता जबरदस्तही आहे आणि दयाळूदेखील.
69. आणि यांना इब्राहीम (अ.) चा किस्सा ऐकवा
70. जेव्हा त्याने आपले वडील व आपल्या लोकसमूहाला विचारले होते की, ’’या काय वस्तू आहेत ज्यांची तुम्ही पूजा करता?’’
71. त्यांनी उत्तर दिले, ’’काही मूर्ती आहेत ज्यांची आम्ही पूजा करतो आणि त्यांच्याच सेवेत आम्ही लागलेलो असतो.’’
72. त्याने विचारले, ’’हे तुमचे ऐकतात का जेव्हा तुम्ही यांचा धावा करता?
73. अथवा हे तुमचा काही फायदा किंवा नुकसान करतात का?’’
74. त्यांनी उत्तर दिले, ’’नाही, किंबहुना आम्हाला आमचे वाडवडील असेच करताना आढळले आहेत.’’
75. यावर इब्राहीम (अ.) ने सांगितले, ’’कधी तुम्ही (डोळे उघडून) त्या वस्तूंना पाहिले तरी काय ज्यांची उपासना
76. तुम्ही आणि तुमच्या पूर्वीचे वाडवडील करीत राहिले आहेत?
77. माझे तर हे सर्व शत्रू आहेत, सर्व जगांच्या एका पालनकर्त्याव्यतिरिक्त,
78. ज्याने मला निर्माण केले मग तोच मला मार्गदर्शन करतो.
79. जो मला खाऊ व पिऊ घालतो.
80. आणि जेव्हा आजारी पडतो तेव्हा तोच मला बरे करतो.
81. तो मला मृत्यू देईल आणि मग पुन्हा मला जीवन प्रदान करील.
82. आणि ज्याच्यापासून मी आशा बाळगतो की तो मोबदल्याच्या दिवशी माझी चूक माफ करील.’’
83. (यानंतर इब्राहीम (अ.) ने प्रार्थना केली) ’’हे माझ्या पालनकर्त्या, मला हुकूम प्रदान कर आणि मला सदाचारी लोकांशी मिळव
84.
आणि नंतरच्या येणार्यांत मला खरे नावलौकिक प्रदान कर
85.
आणि मला ऐश्वर्यसंपन्न स्वर्गाच्या वारसदारांमध्ये सामील कर
86.
आणि माझ्या बापास क्षमा कर की निःसंशय तो मार्गभ्रष्ट लोकांपैकी
आहे.
87.
आणि मला त्या दिवशी खजील होऊ देऊ नकोस जेव्हा सर्व लोक जिवंत
करून उठविले जातील,
88.
जेव्हा मालमत्ताही काही फायदा पोहचवू शकणार नाही व संततीदेखील
नाही,
89.
याशिवाय की एखादी व्यक्ती शुद्ध मनाने अल्लाहच्या ठायी हजर होईल.’’
90.
(त्यादिवशी)
स्वर्ग, पापभीरूंजवळ आणला जाईल
91.
आणि नरक भटकलेल्या लोकांसमोर उघडला जाईल
92.
आणि त्यांना विचारले जाईल की, ’’आता
कोठे आहेत ते,
93.
ज्यांची तुम्ही ईश्वराला सोडून उपासना करीत होता, ते
तुम्हाला काही सहाय्य करीत आहेत का? अथवा स्वतःचा बचाव करू शकतात काय?’’
94.
मग ते उपास्य व हे बहकलेले लोक
95.
आणि शैतानाची सेना सर्वच्या सर्व तिच्यात खोलवर ढकलले
जातील.
96.
तेथे हे सर्व आपापसांत भांडतील आणि बहकलेले लोक सांगतील,
97.
’’ईश्वराची
शपथ, आम्ही तर उघडपणे मार्गभ्रष्टतेत गुरफटलेलो होतो,
98.
जेव्हा तुम्हाला सर्व जगांच्या पालनकर्त्याच्या बरोबरीचा
दर्जा देत होतो.
99.
आणि ते अपराधी लोकच होते ज्यांनी आम्हाला या मार्गभ्रष्टतेत
टाकले.
100.
आता कोणी आमचा शिफारशीही नाही
101.
आणि कोणी जिवलग मित्रही नाही.
102.
जर आम्हाला एकदा परतण्याची संधी मिळाली तर आम्ही श्रद्धावंत
बनू.’’
103.
निश्चितच याच्यात एक मोठा संकेत आहे परंतु यापैकी बहुतेकजण
श्रद्धा ठेवणारे नाहीत.
104.
आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा पालनकर्ता जबरदस्तही आहे
आणि परम कृपाळूसुद्धा.
105.
नूह (अ.) च्या लोकसमूहाने प्रेषितांना खोटे ठरविले
106.
स्मरण करा जेव्हा त्यांचा भाऊ नूह (अ.) ने त्यांना सागितले
होते, ’’काय तुम्ही भीत नाही?
107.
मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय प्रेषित आहे,
108.
म्हणून तुम्ही अल्लाहचे भय बाळगा आणि माझे आज्ञापालन करा.
109.
मी या कामासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक
नाही. माझा मोबदला तर सर्व जगांच्या पालनकर्त्याकडे आहे.
110.
म्हणून तुम्ही अल्लाहचे भय बाळगा आणि (निर्धास्तपणे) माझ्या
आज्ञेत राहा.’’
111.
त्यांनी उत्तर दिले, ’’आम्ही
तुला मानावे काय? वास्तविकतः तुझे अनुकरण क्षुद्रतम लोकांनी स्वीकारले आहे.’’
112.
नूह (अ.) ने सांगितले, ’’मला
काय माहीत की त्यांची कृत्ये कशी आहेत
113.
त्यांचा हिशेब तर माझ्या पालनकर्त्याकडे आहे. जर तुम्ही
विवेक बाळगला असता!
114.
माझे हे काम नव्हे की ज्यांनी श्रद्धा ठेवली त्यांना मी
झिडकारावे.
115.
मी तर केवळ एक स्पष्टपणे सावध करणारा मनुष्य आहे.’’
116.
त्यांनी सांगितले, ’’हे नूह (अ.) जर तू
परावृत्त झाला नाहीस तर झिडकारलेल्या लोकांत समाविष्ट होऊन राहशील.’’
117.
नूह (अ.) ने प्रार्थना केली, ’’हे
माझ्या पालनकर्त्या! माझ्या लोकांनी मला खोटे ठरविले.
118.
आता माझ्या आणि यांच्या दरम्यान निर्णायक फैसला कर आणि मला
व जे श्रद्धावंत माझ्यासमवेत आहेत, त्यांना वाचव.’’
119.
सरतेशेवटी आम्ही त्याला व त्याच्या सोबत्यांना एका भरलेल्या
नावेत वाचविले
120.
आणि यानंतर उरलेल्या लोकांना बुडवून टाकले.
121.
निश्चितच याच्यात एक संकेत आहे परंतु यांच्यापैकी बहुतेकजण
मानणारे नाहीत.
122.
आणि वस्तुस्थिती अशी आहे की, तुझा
पालनकर्ता जबरदस्तही आहे आणि परमकृपाळूदेखील.
123.
’आद’नी पैगंबरांना
खोटे लेखले.
124.
स्मरण करा जेव्हा त्यांचा भाऊ हूद (अ.) ने त्यांना सांगितले
होते, ’’तुम्ही भीत नाही काय?
125.
मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय प्रेषित आहे,
126.
म्हणून तुम्ही अल्लाहचे भय बाळगा आणि माझे आज्ञांकित होऊन
राहा,
127.
मी या कामासाठी तुमच्याकडून कसल्याही मोबदल्याचा इच्छुक
नाही. माझा मोबदला तर सर्व जगांच्या पालनकर्त्याकडे आहे.
128.
ही तुमची काय अवस्था आहे की प्रत्येक उंच स्थळी व्यर्थ एक
स्मारक इमारत बांधून टाकता,
129.
आणि मोठमोठाले महाल उभारता जणू तुम्ही सदैव राहणारे आहात.
130.
आणि जेव्हा एखाद्यावर हात टाकता तेव्हा कठोर बनून टाकता,
131.
म्हणून तुम्ही अल्लाहचे भय बाळगा आणि माझे आज्ञांकित राहा.
132.
भय बाळगा त्याचे ज्याने ते सर्वकाही तुम्हाला दिले आहे जे
तुम्ही जाणता,
133.
तुम्हाला जनावरे दिलीत, संतती
दिली,
134.
उद्याने दिलीत आणि झरे दिलेत.
135.
मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाची भीती आहे.’’
136.
त्यांनी उत्तर दिले, ’’तू
उपदेश कर अथवा करू नकोस, आमच्यासाठी सर्व एकसमान आहे.
137.
या गोष्टी तर अशाच चालत आलेल्या आहेत.
138.
आणि आम्ही प्रकोपात गुरफटणारे नाही.’’
139.
सरतेशेवटी त्यांनी त्याला खोटे ठरविले आणि आम्ही त्यांना
नष्ट करून टाकले. निश्चितच यात एक संकेत आहे परंतु यांच्यापैकी बहुतेकजण मानणारे
नाहीत.
140.
आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा पालनकर्ता जबरदस्तही आहे
आणि परमकृपाळूदेखील.
141.
समूदनी प्रेषितांना खोटे ठरविले.
142.
आठवा जेव्हा त्यांचा बंधू सॉलेह (अ.) ने त्यांना सांगितले, ’’तुम्ही
भीत नाही काय?
143.
मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय पैगंबर आहे.
144.
म्हणून तुम्ही अल्लाहचे भय बाळगा आणि माझी आज्ञा पाळीत
राहा.
145.
मी या कामासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक
नाही. माझा मोबदला तर सर्व जगांच्या पालनकर्त्याकडे आहे.
146.
तुम्हाला त्या सर्व वस्तूंमध्ये, ज्या
येथे आहेत,
147.
बस्स, अशाच प्रकारे समाधानाने राहू दिले जाईल काय?
148.
या बागा आणि झर्यांत? या
शेतात आणि खजूरींच्या बागांत की ज्यांचे घड रसाळ आहेत?
149.
तुम्ही डोंगर खणूनखणून आनंदाने त्यांच्यात इमारती उभारता,
150.
अल्लाहचे भय बाळगा आणि माझी आज्ञा पाळीत राहा.
151.
त्या मोकाट लोकांचे आज्ञापालन करू नका,
152.
जे पृथ्वीतलावर उपद्रव माजवितात आणि कोणतीही सुधारणा करीत
नाहीत.’’
153.
त्यांनी उत्तर दिले, ’’तू
केवळ एक जादूपीडित मनुष्य आहेस.
154.
तू आमच्यासारखाच एका माणसापेक्षा अन्य काय आहेस? आण
एखादा संकेत जर तू खरा असशील.’’
155.
सॉलेह (अ.) ने सांगितले, ही
उंटीण आहे, एक दिवस तिच्या पिण्यासाठी व एक दिवस तुम्ही सर्वांनी पाणी
घेण्यासाठी
156.
हिला कदापि त्रास देऊ नका, नाहीतर
एका भयंकर दिवसाचा प्रकोप येऊन तुम्हाला गाठील.’’
157.
परंतु त्यांनी तिच्या पायाच्या धोंडशिरा कापून टाकल्या. आणि
सरतेशेवटी पश्चात्ताप करीत राहिले.
158.
प्रकोपाने त्यांना येऊन गाठले. निश्चितच यांच्यात एक संकेत
आहे परंतु यांच्यापैकी बहुतेकजण मानणारे नाहीत.
159.
आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा पालनकर्ता जबरदस्तही आहे
आणि परमकृपाळूदेखील.
160.
लूत (अ.) च्या लोकांनी प्रेषितांना खोटे ठरविले.
161.
स्मरण करा जेव्हा त्यांचा भाऊ लूत (अ.) ने त्यांना सांगितले
होते, ’’काय तुम्ही भीत नाही?
162.
मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय पैगंबर आहे.
163.
म्हणून तुम्ही अल्लाहचे भय बाळगा आणि माझी आज्ञा पाळत राहा.
164.
मी या कामासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक
नाही. माझा मोबदला तर सर्व जगांच्या पालनकर्त्याकडे आहे.
165.
काय तुम्ही जगातील निर्मितीपैकी पुरुषाजवळ जाता?
166.
आणि तुमच्या पत्नींमध्ये तुमच्या पालनकर्त्याने तुमच्यासाठी
जे काही निर्माण केले आहे ते सोडून देता? किंबहुना तुम्ही लोक तर मर्यादा
ओलांडून गेला आहात.’’
167.
त्यांनी सांगितले, ’’हे लूत (अ.), जर
तू या गोष्टीपासून परावृत्त झाला नाहीस तर जे लोक आमच्या वस्तीतून काढले गेले आहेत, तू
सुद्धा त्यांच्यात सामील होऊन राहशील.’’
168.
त्याने सांगितले, ’’तुमच्या कृत्याने जे
लोक कुढत आहेत, त्यांच्यात मी सामील आहे.
169.
हे पालनकर्त्या, मला व माझ्या कुटुंबियांना
यांच्या अपकृत्यापासून मुक्ती दे.’’
170.
सरतेशेवटी आम्ही त्याला व त्याच्या सर्व कुटुंबियांना
वाचविले.
171.
एका म्हातारीला वगळून जी मागे राहणार्यांपैकी होती.
172.
मग उरलेल्या लोकांना आम्ही नष्ट करून टाकले
173.
आणि त्यांच्यावर एक अत्यंत वाईट वर्षाव केला, जो
त्या घाबरणार्यांवर कोसळला होता.
174.
निश्चितच यांच्यात एक संकेत आहे, परंतु
यांच्यापैकी बहुतेकजण मानणारे नाहीत
175.
आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा पालनकर्ता जबरदस्तही आहे
आणि परमकृपाळूदेखील.
176.
’ऐकावाल्यां’नी प्रेषितांना
खोटे ठरविले.
177.
स्मरण करा जेव्हा शुऐब (अ.) ने त्यांना सांगितले, ’’काय
तुम्ही भीत नाही?
178.
मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय प्रेषित आहे.
179.
म्हणून तुम्ही अल्लाहचे भय बाळगा आणि माझी आज्ञा पाळत राहा.
180.
मी या कामासाठी तुमच्याकडून कोणत्याच मोबदल्याचा इच्छुक
नाही. माझा मोबदला तर सर्व जगांच्या पालनकर्त्याकडे आहे.
181.
माप ठीक भरा आणि कोणालाही कमी देऊ नका. खर्या तराजूने वजन
करा
182.
आणि लोकांना त्यांच्या वस्तू कमी देऊ नका. पृथ्वीतलावर
उपद्रव पसरवीत फिरू नका
183.
आणि त्याच अस्तित्वाचे भय बाळगा ज्याने तुम्हाला आणि
पूर्वीच्या पिढ्यांना निर्मिले आहे.’’
184.
त्यांनी सांगितले, ’’तू केवळ एक जादूपीडित
मनुष्य आहेस,
185.
तू अन्य काही नाहीस केवळ एक मनुष्य आमच्यासारखा आणि आम्ही
तर तुला अगदी खोटा मानतो.
186.
जर तू खरा आहेस तर आमच्यावर आकाशाचा एखादा तुकडा पाड.’’
187.
शुऐब (अ.) ने सांगितले, ’’माझा
पालनकर्ता जाणतो जे काही तुम्ही करीत आहात.’’
188.
त्यांनी त्याला खोटे लेखले, सरतेशेवटी
छत्रीवाल्या दिवसाचा प्रकोप त्यांच्यावर कोसळला.
189.
आणि तो फारच भयावह दिवसाचा प्रकोप होता.
190.
निश्चितच यात एक निशाणी आहे परंतु यांच्यापैकी बहुतेक
मानणारे नाहीत.
191.
आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा पालनकर्ता जबरदस्तही आहे
आणि परमकृपाळूदेखील.
192.
ही सर्व जगांच्या पालनकर्त्याकडून अवतरलेली वस्तू आहे.
193.
ही घेऊन तुझ्या हृदयावर विश्वसनीय आत्मा उतरला आहे
194.
जेणेकरून तू त्या लोकांत सामील व्हावेस जे (ईश्वराकडून
त्याच्या निर्मितीस) सावध करणारे आहेत.
195.
अगदी स्पष्ट अरबी भाषेत
196.
आणि पूर्वीच्या लोकांच्या ग्रंथातसुद्धा हे आढळून येते.
197.
काय या (मक्कावासी) लोकांसाठी हा संकेत नाही की यास
बनीइस्राईल (यहूदी) चे विद्वान जाणतात?
198.
(परंतु यांच्या
हट्टाग्रहाची स्थिती तर अशी आहे की) जर याला आम्ही एखाद्या अरबेतर माणसावर जरी
अवतरला असता
199.
आणि ही (प्रासादिक अरबी वाणी) त्याने यांना पठण करून ऐकविली
असती तरीसुद्धा यांनी मान्य केले नसते.
200.
अशाच प्रकारे आम्ही या (स्मरणा) ला गुन्हेगारांच्या हृदयांत
घातले आहे.
201.
ते यावर श्रद्धा ठेवणार नाहीत जोपर्यंत यातनादायक प्रकोप
पाहात नाहीत
202.
मग जेव्हा तो यांच्यावर बेसावध असता कोसळेल,
203.
तेव्हा ते म्हणतील, ’’आता
आम्हाला थोडी सवड मिळू शकेल का?’’
204.
मग काय हे लोक आमच्या प्रकोपासाठी घाई करीत आहेत?
205.
तुम्ही कधी विचार केला, जर
आम्ही यांना वर्षानुवर्षे चैन करण्याची सवड जरी दिली
206.
आणि मग पुन्हा तीच गोष्ट यांच्यावर कोसळली जिचे यांना भय
दाखविले जात आहे
207.
तरी ती जीवन-सामग्री जी यांना मिळाली आहे यांच्या काय
उपयोगी पडणार?
208.
जोपर्यंत आम्ही कोणत्याही वस्तीमध्ये उपदेश करणारे पाठविले
नाहीत तोपर्यंत आम्ही कोणत्याही वस्तीला नष्ट केले नाही.
209.
आणि आम्ही अत्याचार करणारे नव्हतो.
210.
हा (उज्ज्वल ग्रंथ) घेऊन शैतान उतरलेले नाहीत,
211.
न ही कृती त्यांना साजेशी आहे. आणि ते असे करूही शकत नाहीत.
212.
ते तर याच्या श्रवणापासूनदेखील दूर ठेवले गेले आहेत.
213.
म्हणून हे पैगंबर (स.), अल्लाहबरोबर
अन्य कोणाही उपास्याचा धावा करू नका, अन्यथा तुम्हीसुद्धा शिक्षा
भोगणार्यांमध्ये सामील व्हाल.
214.
आपल्या निकटतम नातेवाईकांना भय दाखवा.
215.
आणि श्रद्धावंतांपैकी जे लोक तुमचे अनुकरण करतील, त्यांच्याशी
आदरभावाने वागा.
216.
परंतु जर त्यांनी तुमची अवज्ञा केली तर त्यांना सांगा की, जे
काही तुम्ही करीत आहात त्या जबाबदारीपासून मी मुक्त आहे.
217.
आणि त्या जबरदस्त आणि परमकृपाळूवर भिस्त ठेवा,
218.
जो तुम्हाला त्यावेळी पाहात असतो जेव्हा तुम्ही उठता.
219.
आणि नतमस्तक होणार्या लोकांत तुमच्या हालचालींवर दृष्टी
ठेवतो.
220.
तो सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.
221.
लोकहो, काय तुम्हाला मी सांगू की, शैतान
कोणावर उतरत असतात?
222.
ते प्रत्येक बनावटगिरी करणार्या दुराचार्यांवर उतरत
असतात.
223.
ऐकीव गोष्टी कानांत फुंकतात आणि त्यांच्यापैकी बहुतेक खोटे
असतात.
224.
उरले कवी, तर त्यांच्या पाठीमागे बहकलेले लोक चालत असतात..
225.
काय तुम्ही पाहात नाही की ते प्रत्येक खोर्यात भटकतात.
226.
आणि अशा गोष्टी सांगतात ज्या ते करीत नाहीत
227. त्या लोकांव्यतिरिक्त ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि ज्यांनी सत्कृत्ये केली व अल्लाहचे पुष्कळ स्मरण केले आणि जेव्हा त्यांच्यावर अत्याचार केला गेला तेव्हा केवळ बदला घेतला. आणि अत्याचार करणार्यांना लवकरच कळेल की त्यांना कोणत्या परिणामांस तोंड द्यावे लागेल.