53. अन् नज्म - ٱلنَّجْم
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- शपथ आहे नक्षत्राची जेव्हा तो अस्तंगत झाला,
- तुमचा मित्र भटकलेला नाही की बहकलेलाही नाही.
- तो आपल्या इच्छेने बोलत नाही,
- हा तर एक दिव्यबोध आहे जो त्याच्यावर अवतरला जातो.
- त्याला जबरदस्त बलशालीने शिकविले आहे.
- जो मोठा विवेकशील आहे. तो समोर येऊन उभा राहिला
- जेव्हा तो वरील क्षितिजावर होता,
- मग जवळ आला आणि वर अधांतरी झाला,
- येथपावेतो की दोन धनुष्याइतके किंवा त्याहून काही कमी अंतर उरले.
- तेव्हा त्याने अल्लाहच्या दासाला दिव्यबोध पोचविले जे काही दिव्यबोध त्याला पोहोचवायचे होते.
- दृष्टिने जे काही पाहिले, मनाने त्यात असत्य मिसळले नाही.
- आता काय तुम्ही त्या गोष्टीवर त्याच्याशी भांडता ज्याला तो डोळ्यांनी पाहतो?
- आणि एकदा पुन्हा त्याने
- ’सिदरतुल मुन्तहा’ (चरम सीमेवरील बोरीचे झाड) जवळ त्याला उतरताना पाहिले
- जेथे जवळच निवासाचा स्वर्ग (जन्नतुल मावा) आहे.
- त्यावेळी बोरीला आच्छादित होते जे काही आच्छादित होते.
- दृष्टी न विचलित झाली न मर्यादेपलीकडे गेली,
- आणि त्याने आपल्या पालनकर्त्याचे मोठमोठे संकेत पाहिले.
- आता जरा सांगा की तुम्ही कधी या ’लात’ आणि या ’उज्जा’
- आणि तिसरी एक देवी ’मनात’च्या वस्तुस्थितीवर काही विचार तरी केला आहे?
- काय मुले तुमच्यासाठी आहेत आणि मुली त्याच्यासाठी?
- ही तर मग मोठ्या गोंधळाची वाटणी झाली!
- वास्तविकतः या काहीच नाहीत परंतु काही नावे जी तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी ठेवली आहेत, अल्लाहने यांच्या बाबतीत कोणतेही प्रमाण उतरविले नाही. वस्तुस्थिती अशी आहे की हे लोक केवळ भ्रामक कल्पनांचे अनुसरण करीत आहेत आणि मनोवासनाचे अंकित बनलेले आहेत. वस्तुतः त्यांच्या पालनकर्त्याकडून त्यांच्यापाशी मार्गदर्शन आलेले आहे.
- काय मनुष्य जे काही इच्छिल तेच त्याच्याकरिता सत्य आहे?
- इहलोक आणि परलोकाचा स्वामी तर अल्लाहच आहे.
- आकाशात कितीतरी दूत हजर आहेत, त्यांची शिफारस काहीच उपयोगी पडू शकत नाही जोपर्यंत की अल्लाह एखाद्या अशा इसमाच्या संबंधी तशी परवानगी देत नाही ज्याच्यासाठी तो एखादी विनंती ऐकू इच्छित असेल आणि ती पसंत करील.
- परंतु जे लोक परलोकावर विश्वास ठेवत नाहीत, ते दूतांना देवीच्या नावाने संबोधितात.
- वस्तुतः या बाबतीत कोणतेही ज्ञान त्यांना प्राप्त नाही. ते केवळ कल्पनांचे अनुसरण करीत आहेत, आणि कल्पना सत्याच्या स्थानी काहीच उपयोगी पडू शकत नाही.
- म्हणून हे पैगंबर (स.), जो माणूस आमच्या स्मरणापासून तोंड फिरवितो आणि ऐहिक जीवनाशिवाय काहीच इच्छित नाही, त्याला त्याच्या स्थितीत सोडा.
- या लोकांच्या ज्ञानाची मजल केवळ इतकीच आहे. ही गोष्ट तुझा पालनकर्ताच जास्त जाणतो की त्याच्या मार्गापासून कोण भटकला आहे आणि कोण सरळमार्गावर आहे,
- आणि पृथ्वी व आकाशांच्या प्रत्येक वस्तूचा स्वामी अल्लाहच आहे जेणेकरून अल्लाहने वाईट करणार्यांना त्यांच्या कृत्यांचा बदला द्यावा आणि त्या लोकांना चांगल्या मोबदल्याने उपकृत करावे, ज्यांनी सद्वर्तन अंगिकारले आहे,
- जे मोठमोठाले अपराध आणि उघड उघड घृणास्पद कृत्यापासून अलिप्त राहतात, याव्यतिरिक्त की काही चुका त्यांच्याकडून घडतात निःसंशय तुझ्या पालनकर्त्याचे क्षमा-छत्र फार विस्तृत आहे. तो तुम्हाला त्या वेळेपासून चांगल्या प्रकारे जाणतो जेव्हा त्याने जमिनीपासून तुम्हाला निर्माण केले आणि जेव्हा तुम्ही आपल्या आईच्या पोटात अद्याप गर्भावस्थेत होता, म्हणून आपल्या स्वतःच्या पावित्र्याचे दावे सांगू नका, तोच उत्तम जाणतो की खरोखर ईशपरायण कोण आहे.
- मग हे पैगंबर (स.), तुम्ही त्या इसमालाही पाहिले जो ईशमार्गापासून परावृत्त झाला
- आणि अल्पसे देऊन थांबला?
- काय त्याच्यापाशी परोक्षाचे ज्ञान आहे की तो वास्तवतेला पाहत आहे?
- काय त्याला त्या गोष्टीची काहीच खबर पोहचली नाही जी मूसा (अ.) च्या पुस्तिका
- आणि त्या इब्राहीम (अ.) च्या पुस्तिकात सांगितल्या आहेत ज्याने एकनिष्ठतेचे हक्क परिपूर्ण केले? ’’
- असे की कोणीही ओझे उचलणारा दुसर्याचे ओझे उचलणार नाही
- आणि असे की मानवासाठी काहीच नाही परंतु ते ज्यासाठी त्याने प्रयत्न केला आहे,
- आणि असे की त्याचा प्रयत्न लवकरच पाहिला जाईल
- मग त्याचा पूर्ण बदला त्याला दिला जाईल,
- आणि असे की सरतेशेवटी पोहचावयाचे तर तुझ्या पालनकर्त्यापाशीच आहे,
- मग असे की त्यानेच हसविले आणि त्यानेच रडविले.
- आणि असे की त्यानेच मृत्यू दिला आणि त्यानेच जीवन प्रदान केले,
- आणि असे की त्यानेच नर व मादीचे युगल निर्माण केले,
- एका थेंबाने जेव्हा ते टपकाविले जाते.
- आणि असे की दुसरे जीवन प्रदान करणेसुद्धा त्याच्यावरच आहे,
- आणि असे की त्यानेच धनवान बनविले आणि संपत्ती प्रदान केली,
- आणि असे की तोच ’शिअरा’चा पालनकर्ता आहे
- आणि असे की त्यानेच पहिल्या ’आद’ला नष्ट केले
- आणि समूदला असे नष्ट केले की त्यांच्यापैकी कोणास शिल्लक ठेवले नाही,
- आणि त्यांच्यापूर्वी नूह (अ.) च्या राष्ट्राला नष्ट केले कारण ते होतेच अत्यंत अत्याचारी आणि दुर्वर्तनी लोक,
- आणि पालथ्या पडणार्या वस्त्यांना उचलून फेकले.
- मग आच्छादित केले त्यांच्यावर ते काही जे (तुम्हाला माहीतच आहे की) काय आच्छादिले.
- म्हणून हे मानवा, आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या देणग्यांत तू शंका घेशील?’’
- ही एक ताकीद आहे पूर्वी आलेल्या ताकीदींपैकी.
- येणारी घटका जवळ येऊन ठेपली आहे,
- अल्लाहच्या शिवाय कोणीही तिला हटविणार नाही.
- आता काय याच त्या गोष्टी होत ज्यावर तुम्ही आश्चर्य व्यक्त करता?
- हसता आणि रडत नाही?
- आणि गाऊन-वाजवून त्यांना टाळता?
- नतमस्तक व्हा अल्लाहच्या समोर आणि त्याचीच भक्ती करा.