Surah Luqman With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

 31. लुक्मान - لُقْمَان

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत परम कृपावंत आहे

 

1.     अलिफ लाऽऽम मीऽऽम.

2.     हे बुद्धिमत्तापूर्ण ग्रंथाचे संकेत आहेत,

3.     मार्गदर्शन कृपा सदाचारी लोकांसाठी जे

4.     नमाज कायम करतात, जकात देतात, आणि मरणोत्तर जीवनावर विश्वास ठेवतात.

5.     हेच लोक आपल्या पालनकर्त्याकडून सरळमार्गावर आहेत आणि हेच सफल होणार आहेत.

6.     आणि माणसापैकी कोणी असाही आहे की मनमोहक कथा खरेदी करून आणतो, जेणेकरून लोकांना अल्लाहच्या मार्गापासून ज्ञानाविना भटकवावे आणि या मार्गाचे आवाहन चेष्टेत उडवावे. अशा लोकांसाठी भयंकर अपमानजनक शिक्षा आहे.

7.     त्याला जेव्हा आमचे संकेत ऐकविले जातात तेव्हा तो मोठ्या गर्वाने अशाप्रकारे आपले तोंड फिरवितो जणू त्याने त्या ऐकल्याच नाहीत, जणू त्याचे कान बधीर आहेत. शुभवार्ता ऐकवा त्याला एका यातनादायक शिक्षेची.

8.     तथापि जे लोक श्रद्धा ठेवतील सत्कृत्ये करतील त्यांच्यासाठी ऐश्वर्यसंपन्न स्वर्ग आहे,

9.     ज्यात ते संदैव राहतील, हे अल्लाहचे पक्के वचन आहे आणि तो जबरदस्त आणि बुद्धिमान आहे.

10. त्याने आकाशांना निर्माण केले खांबाविना जे तुम्हाला दिसते. त्याने पृथ्वीत पर्वतांना दृढ केले जेणेकरून तिने तुम्हाला घेऊन कलंडू नये. त्याने हरप्रकारचे प्राणी पृथ्वीवर पसरविले आणि आकाशातून पाणी वर्षविले आणि जमिनीतून भिन्नभिन्न प्रकारच्या उत्तम वस्तू उगविल्या.

11. ही तर आहे अल्लाहची निर्मिती, आता मला दाखवा पाहू इतरांनी काय निर्मिले आहे? - खरी गोष्ट अशी आहे की हे अत्याचारी लोक उघड पथभ्रष्टतेत पडलेले आहेत.

12. आम्ही लुकमानला बुद्धिमत्ता प्रदान केली होती की त्याने अल्लाहचे कृतज्ञ बनावे. जो कोणी कृतज्ञता दर्शवील त्याची कृतज्ञता त्याच्यासाठीच लाभप्रद आहे जो सत्याचा इन्कार करील तर वास्तविकतः अल्लाह निरपेक्ष आहे आणि तो स्वयंस्तवनीय आहे.

13. स्मरण करा जेव्हा लुकमान आपल्या पुत्राला उपदेश करीत होता तेव्हा त्याने सांगितले, ’’पुत्रा! अल्लाहसमवेत कोणालाही सहभागी ठरवू नकोस, सत्य असे आहे की शिर्क (धर्मात अल्लाहसोबत कोणालाही सहभागी ठरविणे) फार मोठा अन्याय आहे.’’ -

14. आणि ही वस्तुस्थिती आहे की आम्ही मानवाला आपल्या मातापित्यांचा हक्क ओळखण्याची स्वतः ताकीद केली आहे. त्याच्या आईने यातनामागून यातना सहन करून त्याला आपल्या उदरात ठेवले आणि दोन वर्षे तिचे दूध सोडविण्यास लागले. (म्हणूनच आम्ही त्याला उपदेश दिला की) माझ्याप्रती कृतज्ञता दाखव आणि आपल्या मातापित्यांशी कृतज्ञ रहा, माझ्याकडेच तुला परतावयाचे आहे.

15. परंतु जर त्यांनी तुझ्यावर दबाव आणला की माझ्यासमवेत तू अशा एखाद्याला भागीदार ठरवावेस की ज्याला तू जाणत नाही, तर त्यांचे म्हणणे अजिबात ऐकू नकोस. जगात त्यांच्याशी सद्व्यवहार करीत राहा परंतु अनुकरण त्या व्यक्तीच्या मार्गाचे कर जो माझ्याकडे रुजू झाला आहे. मग तुम्हा सर्वांना परतावयाचे माझ्याकडेच आहे, त्यावेळी मी तुम्हाला दाखवीन की तुम्ही कसली कृत्ये करीत होतात.

16. (आणि लुकमानने सांगितले होते की) ’’बेटा, कोणतीही वस्तू ती मोहरीच्या दाण्याबरोबर का असेना आणि कोणत्याही खडकात किंवा आकाशात अथवा पृथ्वीत कोठेही लपलेली का असेना, अल्लाह ती काढून आणील. तो सूक्ष्मदर्शी खबर राखणारा आहे.

17. बेटा, नमाज कायम कर, सत्कृत्यांचा आदेश दे, दुष्कृत्यांची मनाई कर, आणि जी काही आपत्ती येईल त्यावर संयम राख. या त्या गोष्टी आहेत ज्यांची ताकीद दिली गेली आहे,

18. आणि लोकांशी तोंड फिरवून बोलू नकोस, पृथ्वीवर ऐटीत चालूदेखील नकोस, अल्लाह कोणत्याही अहंकारी गर्व करणार्‍या व्यक्तीला पसंत करीत नाही.

19. आपल्या चालीत मध्यमपणा राख आणि आपला आवाज थोडा धिमा ठेव, सर्व आवाजांपेक्षा अधिक वाईट आवाज गाढवाचा असतो.’’

20. काय तुम्ही लोक पाहात नाही की अल्लाहने पृथ्वी आकाशांच्या सर्व वस्तू तुमच्यासाठी अधीन करून ठेवल्या आहेत आणि आपल्या प्रकट अप्रकट देणग्या तुम्हावर पूर्ण केल्या आहेत? याउपर स्थिती अशी आहे की माणसांपैकी काही लोक आहेत जे अल्लाहच्याबाबतीत भांडण करतात, कोणतेही ज्ञान अथवा मार्गदर्शन किंवा प्रकाश देणार्‍या ग्रंथाविना.

21. आणि जेव्हा त्यांना सांगण्यात येते की अनुकरण करा त्या गोष्टीचे, जी अल्लाहने अवतरली आहे, तर ते म्हणतात की आम्ही तर त्या गोष्टीचे अनुकरण करू ज्यावर आमचे पूर्वज आम्हाला आढळले आहेत. काय हे त्यांचेच अनुकरण करतील जरी शैतान त्यांना भडकत्या आगीकडेच बोलावीत राहिला असेल?

22. ज्या माणसाने, आपल्या स्वतःला अल्लाहच्या स्वाधीन केले आणि आचरणाने तो नेक असेल, त्याने वास्तविकतः एक विश्वसनीय आधार धरला, आणि सर्व मामल्यांचा अंतिम निर्णय अल्लाहच्याच हाती आहे.

23. आता जो सत्याचा इन्कार करतो त्याच्या द्रोहाने तुम्हाला दुःखात लोटू नये त्यांना परतून यावयाचे तर आमच्याकडेच आहे, मग आम्ही त्यांना दाखवून देऊ की ते काय काय करून आलेले आहेत. निश्चितच अल्लाह उरांत लपलेली गुपितेसुद्धा जाणतो.

24. आम्ही थोड्या मुदतीसाठी त्यांना दुनियेत मजा लुटण्याची संधी देत आहोत, मग त्यांना असहाय करून एका भयंकर यातनेकडे ओढून नेऊ.

25. जर तुम्ही यांना विचारले की, पृथ्वी आकाशांना कोणी निर्माण केले आहे तर हे जरूर म्हणतील की, अल्लाहने. म्हणा, सर्व स्तुती अल्लाहसाठीच आहे परंतु यांच्यापैकी बहुतेकजण जाणत नाहीत.

26. आकाशांत आणि पृथ्वीत जे काही आहे ते अल्लाहचे आहे, निःसंशय अल्लाह निरपेक्ष स्वयंस्तवनीय आहे.

27. पृथ्वीवर जितकी झाडे आहेत जर ती सर्वच्या सर्व लेखण्या बनली आणि समुद्र (दौत बनले) ज्याला आणखीन सात समुद्रांनी शाई पुरविली तरीसुद्धा अल्लाहच्या गोष्टी (लिहून) संपणार नाहीत, निःसंशय अल्लाह जबरदस्त आणि बुद्धिमान आहे.

28. तुम्हा सर्व माणसांना निर्माण करणे मग दुसर्‍यांदा जिवंत उभे करणे तर (त्याच्यासाठी) बस्स असे आहे जसे एका जिवाला (निर्माण करणे आणि दुसर्‍यांदा जिवंत उभे करणे) वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह सर्वकाही ऐकणारा पाहणारा आहे.

29. काय तुम्ही पाहात नाही की अल्लाह रात्रीला दिवसात ओवीत आणतो आणि दिवसाला रात्रीत? त्याने सूर्य आणि चंद्राला अधीन करून ठेवले आहे, सर्व एका ठराविक अवधीपर्यंत वाटचाल करीत आहेत आणि (तुम्ही जाणत नाही काय) की जे काही तुम्ही करता अल्लाह त्याची खबर राखणारा आहे?

30. हे सर्व काही यामुळे आहे की अल्लाहच सत्य आहे, आणि त्याला सोडून ज्या दुसर्‍यांचा हे लोक धावा करतात ते सर्व असत्ये आहेत, आणि (या कारणाने की) अल्लाहच महान उच्चतर आहे.

31. काय तुम्ही पाहात नाही की नौका समुद्रात अल्लाहच्या कृपेने चालते जेणेकरून त्याने तुम्हाला आपले काही संकेत दाखवावेत? वस्तुतः यात खूपशी संकेतचिन्हे आहेत, त्या प्रत्येक माणसासाठी जो संयम आणि कृतज्ञता दर्शविणारा आहे.

32. आणि जेव्हा (समुद्रात) या लोकांवर एक लाट छत्राप्रमाणे आच्छादित होते तेव्हा हे अल्लाहचा धावा करतात, आपल्या धर्माला अगदी त्याच्यासाठीच निर्भेळ करून, मग जेव्हा तो त्यांना वाचवून खुष्कीपर्यंत पोहचवितो, तेव्हा त्यांच्यापैकी कोणी मध्यममार्ग अवलंबितो, आणि आमच्या संकेतांचा इन्कार करतो तो प्रत्येक मनुष्य जो विद्रोही कृतघ्न आहे.

33. लोकहो! स्वतःला वाचवा, आपल्या पालनकर्त्याच्या कोपापासून आणि भीती बाळगा त्या दिवसाची जेव्हा कोणताही पिता आपल्या पुत्रातर्फे बदला देणार नाही आणि कोणताही पुत्रसुद्धा आपल्या पित्यातर्फे कोणताही बदला देणार नाही. खरोखरच अल्लाहचे वचन सत्य आहे, म्हणून या लौकिक जीवनाने तुम्हाला फसवू नये आणि धोकेबाजांनीसुद्धा तुम्हाला अल्लाहच्या बाबतीत फसवू नये.

34. त्या घटकेचे ज्ञान अल्लाहपाशीच आहे, तोच पर्जन्यवृष्टी करतो, तोच जाणतो की आईच्या उदरात काय वाढत आहे, कोणतीही व्यक्ती जाणत नाही की उद्या तो काय कमाई करणार आहे आणि कोणत्याही व्यक्तीला हे माहीत नाही की उद्या त्याला कोणत्या भूमीवर मृत्यू येणार आहे, अल्लाहच सर्वकाही जाणणारा माहितगार आहे.

 

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post