32. अस् सजदा - ٱلسَّجْدَة
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
1. अलिफ लाऽऽम
मीऽऽम.
2. या
ग्रंथाचे अवतरण निःसंशय सकल जगांच्या पालनकर्त्याकडून आहे.
3. काय हे लोक
म्हणतात की या व्यक्तीने हा स्वतः रचला आहे? नव्हे, तर हे सत्य आहे तुझ्या
पालनकर्त्याकडून जेणेकरून तू सावध करावे एका अशा जनसमूहाला ज्याच्याजवळ
तुझ्यापूर्वी कोणीही सावध करणारा आला नाही. कदाचित त्यांना मार्गदर्शन प्राप्त
होईल.
4. तो अल्लाहच
आहे ज्याने आकाशांना व पृथ्वीला आणि त्या सर्व वस्तूंना, ज्या त्याच्या दरम्यान आहेत, सहा दिवसांत निर्माण केले आणि
त्यानंतर अर्श (राजसिंहासना) वर विराजमान झाला. त्याच्याशिवाय तुमचा कोणी समर्थक व
सहायकही नाही आणि कोणी त्याच्यापुढे शिफारस करणारादेखील नाही, मग काय तुम्ही शुद्धीवर येणार
नाही?
5. तो
आकाशापासून पृथ्वीपर्यंत जगाच्या मामल्यांची तजवीज करतो आणि त्या तजविजीचा अहवाल
वर त्याच्या ठायी सादर होतो, एका अशा
दिवसात ज्याचे प्रमाण तुमच्या गणनेनुसार एक हजार वर्षे आहे.
6. तोच आहे
प्रत्येक गुप्त व प्रकट गोष्टीचा जाणणारा, जबरदस्त
आणि परमकृपाळू
7. जी जी
वस्तू त्याने निर्माण केली उत्तमच निर्माण केली. त्याने माणसाच्या निर्मितीचा
प्रारंभ चिखलमातीपासून केला,
8. मग त्याचा
वंश एका अशा सत्वाने चालविला जे क्षुद्र पाण्यासमान आहे.
9. मग त्याला
नखशिखांत व्यवस्थित केले आणि त्याच्यात आपला आत्मा फुंकला आणि तुम्हाला कान दिले, डोळे दिले व हृदय दिले.
तुम्ही लोक कमीच कृतज्ञ बनता.
10. आणि हे लोक म्हणतात, ’’जेव्हा आम्ही मातीत मिसळून गेलेले असू
तेव्हा काय आम्ही पुन्हा नव्यानेच निर्माण केले जाऊ?’’ खरी गोष्ट
अशी आहे की हे आपल्या पालनकर्त्याच्या भेटीचा इन्कार करणारे आहेत,
11. यांना सांगा, ’’मृत्यूचा तो दूत जो तुम्हावर नियुक्त केला
गेला आहे, तुम्हाला पुरेपूर आपल्या
ताब्यात घेईल आणि मग तुम्ही आपल्या पालनकर्त्याकडे परत आणले जाल.’’
12. तुम्ही ती घटका पहावी जेव्हा
हे अपराधी मान खाली घालून आपल्या पालनकर्त्याच्या पुढे उभे असतील (त्यावेळी हे
म्हणत असतील) ’’हे आमच्या पालनकर्त्या, आम्ही खूप
पाहिले आणि ऐकले, आता आम्हाला परत पाठवून दे
जेणेकरून आम्ही सत्कृत्ये करावीत, आम्हाला
आता खात्री पटली आहे.’’
13. (उत्तरात सांगितले जाईल) ’’जर
आम्ही इच्छिले असते तर आम्ही अगोदरच प्रत्येक जीवास त्याची सुबुद्धी दिली असती, परंतु माझे ते कथन पूर्ण झाले
जे मी केले होते की नरकाला जिन्न (अदृश्ययोनी) आणि माणसे या सर्वांनी भरून टाकीन
14. तर आता चाखा चव आपल्या या
कृत्याची की तुम्ही या दिवसाच्या भेटीला विसरून गेला. आम्हीही आता तुम्हाला विसरलो
आहोत. चाखा चिरकालीन प्रकोपाची चव आपल्या कृत्यापायी.’’
15. आमच्या वचनांवर तर ते लोक
श्रद्धा ठेवतात ज्यांना ही वचने ऐकवून जेव्हा उपदेश दिला जातो तेव्हा ते नतमस्तक
होतात आणि आपल्या पालनकर्त्याच्या प्रशंसेसह त्याचे पावित्र्यगान करतात व गर्व
करीत नाहीत.
16. त्यांच्या पाठी अंथरुणापासून
अलग राहतात, आपल्या पालनकर्त्याचे भय व
आशा बाळगून पुकारतात, आणि जी काही उपजीविका आम्ही त्यांना
दिली आहे, तिच्यातून खर्च करतात.
17. मग जशी नेत्रसुखाची सामग्री
त्यांच्या कृत्यांच्या मोबदल्यात त्यांच्यासाठी लपवून ठेवली आहे, तिची कोणत्याही व्यक्तीला खबर
नाही.
18. बरे असे कुठे होऊ शकते की जी
व्यक्ती श्रद्धावंत असेल ती त्या व्यक्तीसमान होईल जी मर्यादांचे उल्लंघन करणारी
असेल? या दोन्ही समान होऊ शकत
नाहीत.
19. ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली
आहे व ज्या लोकांनी सत्कृत्ये केली आहेत, त्यांच्यासाठी
तर स्वर्गाची निवासस्थाने आहेत, आदरातिथ्य
म्हणून त्यांच्या कृत्यांच्या मोबदल्यात.
20. आणि ज्यांनी मर्यादांचे
उल्लंघन अंगिकारले आहे, त्यांचे ठिकाण नरक आहे, जेव्हा कधी ते त्यातून बाहेर
पडू इच्छितील तिच्यातच ढकलून दिले जातील आणि त्यांना सांगितले जाईल की घ्या, आता त्याच अग्नी-प्रकोपाचा
आस्वाद ज्याला तुम्ही खोटे ठरवीत होता.
21.त्या मोठ्या प्रकोपापूर्वी आम्ही याच जगात
(कोणत्या ना कोणत्या लहान) प्रकोपाचा आस्वाद यांना देत राहू. कदाचित (आपल्या
विद्रोही प्रवृत्तीपासून) हे परावृत्त व्हावेत.
22. आणि त्याच्यापेक्षा मोठा
अत्याचारी कोण असेल ज्याला त्याच्या पालनकर्त्याच्या संकेताने उपदेश केला जाईल आणि
मग तो त्यापासून पराङमुख होईल. अशा अपराधींचा तर आम्ही सूड घेतल्याशिवाय राहणार
नाही.
23. यापूर्वी मूसा (अ.) ला आम्ही
ग्रंथ दिला आहे, म्हणून तीच वस्तू मिळण्यावर
तुम्हाला कसलीही शंका असू नये. त्या ग्रंथाला आम्ही बनीइस्राईलकरिता मार्गदर्शन
बनविले होते,
24. आणि जेव्हा त्यांनी संयम
पाळला आणि आमच्या संकेतवचनांवर विश्वास बाळगत राहिले, तेव्हा त्यांच्यामध्ये आम्ही
असे नेते निर्माण केले जे आमच्या आदेशाने मार्गदर्शन करीत होते.
25. निःसंशय तुझा पालनकर्ताच
पुनरुत्थानाच्या दिवशी त्या गोष्टीचा निवाडा करील ज्यांत (बनीइस्राईल) परस्पर
मतभेद करीत राहिले आहेत.
26. आणि काय या लोकांना (या
ऐतिहासिक घटनामध्ये) कोणतेही मार्गदर्शन लाभले नाही की यांच्यापूर्वी कित्येक
जनसमुदायांना आम्ही नष्ट केले आहे ज्यांच्या निवासस्थानात आज हे संचार करीत आहेत? यात मोठे संकेत आहेत, काय हे ऐकत नाहीत?
27. आणि काय या लोकांनी हे दृश्य
कधी पाहिले नाही की आम्ही एका ओसाड भूमीकडे पाणी वाहून आणतो, आणि मग त्याच जमिनीतून ते पीक
उगवितो ज्यापासून यांच्या गुरांनाही चारा मिळतो व हे स्वतःही खातात, तर काय यांना काहीच उमजत नाही?
28. हे लोक म्हणतात की, ’’हा निर्णय केव्हा लागेल जर तुम्ही खरे
असाल?’’
29. यांना सांगा, ’’निर्णयाच्या दिवशी श्रद्धा ठेवणे त्या
लोकांसाठी यत्किंचितही लाभदायी होणार नाही ज्यांनी सत्याचा इन्कार केला आहे आणि मग
त्यांना कोणतीही सवड मिळणार नाही.’’
30. बरे, यांना यांच्या स्थितीत सोडून
द्या आणि प्रतीक्षा करा, हेसुद्धा प्रतीक्षेत आहेत.