Surah Al-Mumtahanah With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

  60. अल् मुमतहीना - ٱلْمُمْتَحَنَة


अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

  1. हे लोकहो, ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, जर तुम्ही माझ्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा (जिहाद) करण्यासाठी आणि माझी प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी (देश व घरेदारे सोडून) निघाला आहात तर माझ्या आणि स्वतःच्या शत्रूंना मित्र बनवू नका. तुम्ही त्यांच्याशी मैत्रीचा पायंडा पाडता, वस्तुतः जे सत्य तुमच्यापाशी आले आहे त्याला स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आहे आणि त्यांची रीत अशी आहे की पैगंबराला आणि खुद्द तुम्हाला केवळ या अपराधापायी देशबाह्य करतात की तुम्ही आपला पालनकर्ता अल्लाहवर श्रद्धा ठेवली आहे. तुम्ही गुप्तरीत्या त्यांना मैत्रीचा संदेश पाठवता, वस्तुतः जे काही तुम्ही गुप्तपणे करता आणि जे उघडपणे करता, प्रत्येक गोष्ट मी चांगल्या प्रकारे जाणतो. जो मनुष्य तुमच्यापैकी असे करील तो खचितच सरळमार्गापासून भरकटला आहे.
  2. त्यांचे वर्तन तर असे आहे की जर तुमच्यावर नियंत्रण मिळविले तर तुमच्याशी शत्रुत्व करील आणि हातानी आणि जिभेने तुम्हाला यातना देईल. ते तर हेच इच्छितात की तुम्ही कसेही करून अश्रद्धावंत व्हावे.
  3. पुनरुत्थानाच्या दिवशी न तुमचे नातेसंबंध काही उपयोगी पडतील न तुमची संतान. त्या दिवशी अल्लाह तुमच्या दरम्यान ताटातूट निर्माण करील, आणि तोचतुमची कृत्ये पाहणारा आहे.
  4. तुम्हा लोकांसाठी इब्राहीम (अ.) आणि त्याच्या साथीदारांत एक उत्कृष्ट आदर्श आहे की त्यांनी आपल्या राष्ट्राला स्पष्ट सांगून टाकले, ’’आम्ही तुम्हाला आणि तुमच्या त्या उपास्यांना ज्यांची तुम्ही अल्लाहला सोडून पूजा करता अगदी विटलो आहोत, आम्ही तुमच्याशी द्रोह केला आणि आमच्या व तुमच्यात कायमस्वरूपी शत्रुत्व आले व वैर झाले जोपर्यंत तुम्ही एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवीत नाही.’’ पण इब्राहीम (अ.) चे आपल्या वडिलांना हे सांगणे (याला अपवाद आहे) की, ’’मी आपणासाठी क्षमेची याचना जरूर करेन, आणि अल्लाहपासून आपणासाठी काही प्राप्त करून घेणे माझ्या अखत्यारीत नाही.’’ आणि इब्राहीम व त्यांच्या साथीदारांची प्रार्थना अशी होती की,) ’’हे आमच्या पालनकर्त्या तुझ्यावरच आम्ही भिस्त ठेवली आणि तुझ्याकडेच आम्ही वळलो व तुझ्याच हुजुरांत आम्हाला परतावयाचे आहे.
  5. हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला अश्रद्धावंतांसाठी उपद्रव बनवू नकोस. आणि हे आमच्या पालनकर्त्या, आमच्या अपराधांची क्षमा कर, निःसंशय तूच जबरदस्त आणि बुद्धिमान आहेस.’’
  6. त्याच लोकांच्या कार्यपद्धतीत तुमच्यासाठी आणि त्या प्रत्येक माणसासाठी उत्कृष्ट आदर्श आहे, जो अल्लाह आणि अंतिम दिनाचा उमेदवार असेल. यापासून कोणी पराङमुख झाला तर अल्लाह निरपेक्ष व आपल्याठायी स्वयं प्रशंसनीय आहे.
  7. दूर नाही की अल्लाह केव्हा तरी तुमच्या आणि त्या लोकांच्या दरम्यान प्रेम निर्माण करील, ज्यांच्याशी आज तुम्ही शत्रुत्व पत्करले आहे. अल्लाह मोठे सामर्थ्य बाळगतो आणि तो क्षमाशील व दयावान आहे.
  8. अल्लाह तुम्हाला या गोष्टीची मनाई करीत नाही की तुम्ही त्या लोकांशी सद्व्यवहार आणि न्यायाचे वर्तन करावे, ज्यांनी धर्माच्या बाबतीत तुमच्याशी युद्ध केले नाही आणि तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढले नाही. अल्लाह न्याय करणार्‍यांना पसंत करतो.
  9. तो तुम्हाला ज्या गोष्टीची मनाई करतो ती तर ही आहे की तुम्ही त्या लोकांशी मैत्री करावी ज्यांनी तुमच्याशी धर्माच्या बाबतीत युद्ध केले आहे आणि तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढले आहे आणि तुम्हाला बाहेर घालविण्यात एक दुसर्‍यास मदत केली आहे. त्यांच्याशी जे लोक मैत्री करतील तेच अत्याचारी आहेत.
  10. हे लोकहो! ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, जेव्हा श्रद्धावंत स्त्रिया स्थलांतर करून तुमच्यापाशी येतील तेव्हा (त्यांच्या श्रद्धावंत असण्याची) शहानिशा करून घ्या, आणि त्यांच्या श्रद्धेची वास्तवता तर अल्लाहच चांगल्या प्रकारे जाणतो. मग जेव्हा तुम्हाला माहीत होईल की त्या श्रद्धावंत आहेत तर त्यांना अश्रद्धावंतांकडे परत पाठवू नका. न त्या अश्रद्धावंतांसाठी वैध आहेत, आणि न अश्रद्धावंत त्यांच्यासाठी वैध. त्यांच्या अश्रद्धावंत पतींनी जे महर त्यांना दिले होते ते त्यांना परत करा आणि त्यांच्याशी विवाह करण्यात तुमचा काही अपराध नाही जेव्हा की तुम्ही त्यांचे महर त्यांना चुकते कराल. आणि तुम्ही स्वतःदेखील अश्रद्धावंत स्त्रियांना आपल्या विवाहात अडकवून ठेवू नका. जे महर तुम्ही आपल्या अश्रद्धावंत पत्नींना दिले होते ते तुम्ही परत मागून घ्या आणि जे महर अश्रद्धावंतांनी आपल्या मुसलमान पत्नींना दिले होते ते त्यांनी परत मागावे. ही अल्लाहची आज्ञा आहे. तो तुमच्या दरम्यान निर्णय देतो आणि तो सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे.
  11. आणि जर तुमच्या अश्रद्धावंत पत्नींची महरांमधून तुम्हाला अश्रद्धावंतांकडून काही परत मिळाले नाही आणि मग तुमची पाळी आली तर ज्या लोकांच्या पत्नीं तिकडे राहिल्या आहेत त्यांना तितकी रक्कम चुकती करा जी त्यांना दिलेल्या महरांच्या प्रमाणात असेल. आणि त्या अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगत रहा ज्यावर तुम्ही श्रद्धा ठेवली आहे.
  12. हे नबी (स.)! जेव्हा तुमच्याजवळ श्रद्धावंत स्त्रिया बैअत (प्रतिज्ञा) करण्याकरिता येतील आणि या गोष्टीची प्रतिज्ञा करतील की त्या अल्लाहच्या बरोबर कोणत्याही वस्तूला सामील करणार नाहीत चोरी करणार नाहीत, व्यभिचार करणार नाहीत, आपल्या संततीची हत्या करणार नाहीत, आपल्या हातापायांपुढे कोणतेही कुभांड रचून आणणार नाहीत, आणि कोणत्याही चांगल्या कामात तुमची अवज्ञा करणार नाहीत, तर त्यांच्याकडून ’बैअत’ (प्रतिज्ञा) घ्या, आणि त्यांच्या बाबतीत अल्लाहपाशी क्षमेची प्रार्थना करा, निःसंशय अल्लाह क्षमा करणारा आणि दया करणारा आहे.
  13. हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, त्या लोकांना मित्र बनवू नका ज्यांच्यावर अल्लाहचा क्रोध झाला आहे, जे परलोकाबद्दल त्याचप्रकारे निराश आहेत ज्याप्रकारे कबरीत पडलेले अश्रद्धावंत निराश आहेत.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post