59. अल् हश्र - ٱلْحَشْر
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- अल्लाहचेच पावित्र्यगान केले आहे त्या प्रत्येक वस्तूने जी आकाशांत व पृथ्वीत आहे, आणि तोच प्रभुत्वसंपन्न आणि बुद्धिमान आहे.
- तोच आहे ज्याने ग्रंथधारी अश्रद्धावंतांना पहिल्याच हल्ल्यात त्यांच्या घरांतून काढून घालवून लावले. तुम्हाला याची कल्पनादेखील नव्हती की ते निघून जातील आणि तेही असे समजून बसले होते की त्यांच्या गढ्या त्यांना अल्लाहपासून वाचवतील परंतु अल्लाह अशा रोखाने त्यांच्यावर आला जिकडे त्यांचे लक्षसुद्धा गेले नव्हते. त्याने त्यांच्या हृदयांत वचक बसविला. परिणाम असा झाला की ते स्वतःदेखील आपल्या हाताने आपल्या घरांना उद्ध्वस्त करीत होते आणि श्रद्धावंतांच्या हातूनसुद्धा उद्ध्वस्त करवीत होते. म्हणून बोध घ्या हे डोळसपणा बाळगणार्यांनो!
- जर अल्लाहने त्यांच्या वाट्यात देशांतर लिहिले नसते तर जगातच त्याने त्यांच्यावर प्रकोप केला असता. आणि मरणोत्तर जीवनामध्ये तर त्यांच्यासाठी नरकाग्नीचा प्रकोप आहेच.
- हे सर्वकाही अशासाठी घडले की त्यांनी अल्लाह आणि त्यांच्या पैगंबराचा मुकाबला केला आणि जो कोणी अल्लाहचा मुकाबला करील; अल्लाह त्याला शिक्षा करण्यात अत्यंत कठोर आहे.
- तुम्ही लोकांनी खजुरीची जी झाडे कापली अथवा ज्यांना आपल्या मुळावर उभे राहू दिले हे सर्व अल्लाहच्या आज्ञेनेच होते. आणि (अल्लाहने ही आज्ञा अशासाठी दिली) जेणेकरून अवज्ञाकारींना अपमानित करावे.
- आणि जे माल अल्लाहने त्यांच्या कब्जातून काढून आपल्या पैगंबराकडे वळविले ते असले माल नव्हेत ज्यांच्यावर तुम्ही आपले घोडे व आपले उंट दौडविले असावे, तर अल्लाह आपल्या प्रेषितांना ज्यावर इच्छितो ताबा बहाल करतो, आणि अल्लाहला प्रत्येक वस्तूवर सामर्थ्य प्राप्त आहे.
- जे काही अल्लाह वस्तींच्या लोकाकडून आपल्या पैगंबराकडे वळवील ते अल्लाह आणि पैगंबर व नातेवाईक आणि अनाथ व गोरगरीब आणि प्रवाशांसाठी आहे जेणेकरून ते तुमच्या श्रीमंतांच्या दरम्यानच भ्रमण करीत राहू नये. जे काही पैगंबर तुम्हाला देईल ते घ्या आणि ज्या गोष्टीची तो तुम्हाला मनाई करील त्यापासून अलिप्त रहा. अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा, अल्लाह कठोर शिक्षा देणारा आहे.
- (तसेच तो माल) त्या गरीब स्थलांतर केलेल्यांसाठी आहे जे आपल्या घरातून व मालमत्तेतून काढून बाहेर केले गेले आहेत. हे लोक अल्लाहचा कृपाप्रसाद आणि त्याची प्रसन्नता इच्छितात व अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या सहाय्यासाठी सज्ज असतात. हेच सत्यनिष्ठ लोक होत.
- आणि (ते त्या लोकांसाठीसुद्धा आहे) जे या स्थलांतर करून आलेल्या लोकांच्या आगमनापूर्वी श्रद्धा ठेवून स्थानांतरीत जागी राहात असत. हे त्या लोकांशी प्रेम करतात जे स्थानांतर करून यांच्याजवळ आले आहेत आणि जे काही यांना दिले जाईल त्याची काही अपेक्षासुद्धा ते आपल्या मनात धरीत नाहीत, आणि आपल्या स्वतःवर इतरांना प्राधान्य देतात, मग ते स्वतः गरजवंत का असेनात. वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक मनाच्या संकुचितपणापासून वाचविले गेले तेच साफल्य प्राप्त करणारे आहेत
- (आणि ते त्या लोकांसाठीसुद्धा आहे) जे या पहिल्यांच्या नंतर आले आहेत, जे म्हणतात की, ’’हे आमच्या पालनकर्त्या आम्हाला आणि आमच्या त्या सर्व बांधवांना क्षमा प्रदान कर ज्यांनी आमच्यापूर्वी श्रद्धा ठेवलेली आहे. आणि आमच्या मनामध्ये श्रद्धावंतांविषयी कोणताही द्वेष ठेवू नकोस, हे आमच्या पालनकर्त्या, तू मोठा मेहरबान आणि दयावान आहेस.’’
- तुम्ही पाहिले नाही त्या लोकांना ज्यांनी दांभिकतेचे वर्तन अवलंबिले आहे? ते आपल्या अश्रद्धावंत ग्रंथधारक बंधुंना म्हणतात, ’’जर तुम्हाला काढले गेले तर आम्ही तुमच्याबरोबर निघू, आणि तुमच्याबाबतीत आम्ही कोणाचेही म्हणणे कदापि ऐकणार नाही, आणि जर तुमच्याशी युद्ध केले गेले तर आम्ही तुम्हाला मदत करू.’’ परंतु अल्लाह साक्षी आहे की हे लोक पूर्णपणे खोटे आहेत.
- जर ते काढले गेले तर हे त्यांच्याबरोबर कदापि निघणार नाहीत आणि जर त्यांच्याशी युद्ध केले गेले तर हे त्यांना कदापि मदत करणार नाहीत, आणि जर त्यांनी मदत केलीसुद्धा तर हे पाठ फिरवतील आणि मग त्यांना कोठून काही मदत मिळणार नाही.
- यांच्या मनात अल्लाहपेक्षा जास्त तुमची भीती आहे या कारणास्तव की हे असले लोक आहेत जे समजउमज बाळगत नाहीत.
- हे कधी एकत्रित होऊन (खुल्या मैदानात) तुमचा मुकाबला करणार नाहीत. लढतीलही तर कडेकोट वस्तीत बसून अथवा भिंतीच्या आड लपून. हे आपापसातील विरोधात अत्यंत कठोर आहेत, तुम्ही यांना एकत्रित समजता परंतु यांची मने एक दुसर्यापासून फाटलेली आहेत. यांची ही स्थिती अशासाठी आहे की हे निर्बुद्ध लोक आहेत.
- हे त्याच लोकांप्रमाणे आहेत ज्यांनी यांच्या थोड्याच काळापूर्वी आपल्या कृतीची फळे चाखली आहेत आणि यांच्यासाठी यातनादायक प्रकोप आहे.
- यांचे उदाहरण शैतानासारखे आहे की प्रथम तो मनुष्याला सांगतो की द्रोह कर, आणि जेव्हा मनुष्य द्रोह करून चुकतो तेव्हा तो म्हणतो की मी तुझ्या जबाबदारीतून मुक्त आहे, मला तर सकल जगांचा पालनकर्ता अल्लाहचे भय वाटते.
- मग दोघांचा शेवट असा होणार आहे की कायमचे नरकाग्नीत जातील, आणि अत्याचार्यांचा हाच बदला आहे.
- हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा आणि प्रत्येक इसमाने हे पाहावे की त्याने उद्यासाठी काय सरंजाम केला आहे. अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगत रहा. अल्लाह खचितच तुमच्या त्या सर्व कृत्यांची खबर राखणारा आहे जी तुम्ही करता.
- त्या लोकांप्रमाणे बनू नका जे अल्लाहला विसरून गेले तर अल्लाहने त्यांना स्वतःचा विसर पाडला. हेच लोक अवज्ञाकारी आहेत.
- नरकात जाणारे आणि स्वर्गामध्ये जाणारे कदापि एकसमान असू शकत नाहीत. स्वर्गामध्ये जाणारेच वास्तविकपणे यशस्वी होत.
- जर आम्ही हा कुरआन एखाद्या पर्वतावर अवतरला असता तर तुम्ही पाहिले असते की ते ईशभयाने खचले आहेत आणि ईश्वरी प्रकोपाच्या भयाने दुभंगले असते ही उदाहरणे आम्ही लोकांसमोर अशासाठी सांगत असतो की त्यांनी (आपल्या परिस्थितीचा) विचार करावा.
- तो अल्लाहच आहे ज्याच्या व्यतिरिक्त कोणी उपास्य नाही. अदृश्य आणि दृश्य सर्व गोष्टींना जाणणारा तोच मेहरबान व दयावान आहे.
- तो अल्लाहच आहे ज्याच्या व्यतिरिक्त कोणी उपास्य नाही, तो बादशाह आहे अत्यंत पवित्र, सर्वस्वी शांती अभयदान करणारा, निगाहबान, सर्वांवर प्रभावी आपली आज्ञा बळाने लागू करणारा आणि मोठाच बनून राहणारा, पवित्र आहे अल्लाह त्या अनेकेश्वरवादापासून जे हे लोक करीत आहेत.
- तो अल्लाहच आहे जो निर्मितीची योजना आखणारा आणि ती अमलात आणणारा व त्यानुसार रंगरूप देणारा आहे. त्याच्यासाठी सर्वोत्तम नावे आहेत. प्रत्येक वस्तू जी आकाशात व पृथ्वीत आहे त्याचे पावित्र्यगान करीत आहे, आणि तो जबरदस्त व बुद्धिमान आहे.