51. अज़् ज़ारियात - ٱلذَّارِيَات
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- शपथ आहे त्या वार्यांची जे धूळ उडविणारे आहेत,
- मग पाण्याने भरलेले मेघ उचलणारे आहेत,
- मग चपळतेने वाहणारे आहेत,
- मग एका मोठ्या कार्याचे (पावसाचे) वाटप करणारे आहेत,
- सत्य असे आहे की ज्या गोष्टीचे भय तुम्हाला दाखविले जात आहे ती खरी आहे.
- आणि कर्मफळनिष्पत्ती खचितच घडून येणार आहे.
- शपथ आहे भिन्नभिन्न रूपे असलेल्या आकाशाची,
- (मरणोत्तर जीवनासंबंधी) तुमचे म्हणणे एक दुसर्यापासून विभिन्न आहे.
- त्याच्यापासून तोच विमुख होतो जो सत्यापासून विमुख झाला आहे.
- विनाश पावले कयास
- आणि तर्काने हुकूम लावणारे जे अज्ञानांत गर्क आणि गफलतीत धुंद आहेत.
- विचारणा करतात की अखेर तो फलनिष्पत्तीचा दिवस येणार तरी केव्हा?
- तो त्या दिवशी येईल जेव्हा हे लोक अग्नीवर भाजले जातील.
- (यांना सांगितले जाईल) आता घ्या आस्वाद आपल्या उपद्रवाचा. ही तीच गोष्ट आहे ज्याची तुम्ही घाई करीत होता.
- मात्र ईशपरायण लोक त्या दिवशी उद्यानात आणि झर्यांच्या दरम्यान असतील,
- जे काही त्यांचा पालनकर्ता त्याना देईल ते आनंदाने घेत असतील ते त्या दिवसाच्या येण्यापूर्वी सत्कर्मी होते,
- रात्री कमीच झोपत असत,
- मग तेच रात्रीच्या शेवटच्या प्रहरी क्षमायाचना करीत असत,
- आणि त्यांच्या मालमत्तेत हक्क आहे याचकांचा आणि वंचितांचा.
- पृथ्वीवर बरेचसे संकेत आहेत विश्वास बाळगणार्यांसाठी,
- आणि खुद्द तुमच्या स्वतःच्या अस्तित्वात आहेत. तुम्हाला उमगत नाही काय?
- आकाशांतच आहे तुमची उपजीविकासुद्धा आणि ती गोष्टसुद्धा जिचे वचन तुम्हाला दिले जात आहे.
- तर शपथ आहे आकाश आणि पृथ्वीच्या स्वामीची, ही गोष्ट सत्य आहे, तशीच खात्रीलायक जशी तुम्ही बोलत आहात.
- हे पैगंबर (स.), इब्राहीम (अ.) च्या मान्यवर पाहुण्यांची कथाही तुम्हांपर्यंत पोहचली आहे.
- जेव्हा ते त्याच्या येथे आले तेव्हा त्यांनी सांगितले, आपल्याला सलाम. त्याने सांगितले, ’’आपणांससुद्धा सलाम - काही अनोळखी लोक आहेत.’’
- मग तो गुपचुप आपल्या कुटुंबियांकडे गेला, आणि एक (भाजलेले) जाडजूड वासरू
- आणून पाहुण्यांच्या पुढे ठेवले. तो म्हणाला, महाशय, आपण खात नाही?
- मग तो मनातल्या मनात त्यांना भ्याला. त्यांनी सांगितले, भिऊ नका, आणि त्याला एका ज्ञानी मुलाच्या जन्माची शुभवार्ता एकविली.
- हे ऐकून त्याची पत्नी ओरडत पुढे सरसावली आणि तिने आपले तोंड बडवून घेतले आणि म्हणू लागली, वृद्धा वांझोटी.
- ते म्हणाले, ’’हे असेच फर्माविले आहे तुझ्या पालनकर्त्याने तो बुद्धिमान आहे आणि सर्वकाही जाणतो.’’
- इब्राहीम (अ.) ने सांगितले, ’’हे ईश्वरी दूतांनो! कोणती मोहीम आपल्यासमोर आहे?’’
- त्यांनी सांगितले, ’’आम्हाला एका गुन्हेगार लोकसमूहाकडे पाठविण्यात आले आहे,
- जेणेकरून त्यावर खंगरांच्या दगडांचा वर्षाव करावा.
- तुझ्या पालनकर्त्याकडे त्या लोकांसाठी संकेतचिन्हे करण्यात आली आहेत जे मर्यादांचे उल्लंघन करीत आहेत.
- मग आम्ही त्या सर्व लोकांना काढून घेतले जे त्या वस्तीत श्रद्धावंत होते,
- आणि आम्हाला तेथे एका घराशिवाय ईमानधारकांचे कोणतेच घर आढळले नाही.
- यानंतर आम्ही तेथे केवळ एक निशाणी त्या लोकांसाठी सोडली जे यातनादायक प्रकोपाची भीती बाळगत होते.
- आणि (तुमच्यासाठी निशाणी आहे) मूसा (अ.) च्या कथेत. जेव्हा आम्ही त्याला स्पष्ट प्रमाणासहित फिरऔनपाशी पाठविले,
- तेव्हा तो आपल्या बळावर गर्विष्ठ बनला आणि म्हणाला, हा जादूगार आहे किंवा वेडा आहे.
- सरतेशेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या लष्करांना पकडले आणि सर्वांना समुद्रात फेकून दिले आणि तो निंदनीय बनून राहिला.
- आणि (तुमच्यासाठी निशाणी आहे) आद मध्ये, जेव्हा आम्ही त्यांच्यावर एक असा कल्याणरहित वारा पाठविला
- की ज्या ज्या वस्तूवरून तो वाहिला त्याला जर्जर करून टाकले.
- आणि (तुमच्यासाठी निशाणी आहे) समूदमध्ये, जेव्हा त्यांना सांगितले गेले होते की एका विशिष्ट वेळेपर्यंत मजा करून घ्या.
- परंतु या ताकीदीतसुद्धा त्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेची अवज्ञा केली. सरतेशेवटी त्यांना पाहता पाहताच एका अकस्मात कोसळणार्या प्रकोपाने त्यांना गाठले
- मग त्यांच्यात उठण्याचेही त्राण नव्हते की ते आपला बचावदेखील करू शकत नव्हते.
- आणि या सर्वांअगोदर आम्ही नूह (अ.) च्या राष्टाला नष्ट केले कारण ते अवज्ञाकारी लोक होते.
- आकाशाला आम्ही स्वबळाने बनविले आहे आणि आम्ही याचे सामर्थ्य बाळगतो.
- पृथ्वीला आम्ही अंथरले आहे आणि आम्ही फार चांगले समतोल करणारे आहोत
- आणि प्रत्येक वस्तूचे आम्ही युगल बनविले आहेत. कदाचित तुम्ही यावरून बोध घ्यावा.
- म्हणून धाव घ्या अल्लाहकडे, मी तुमच्यासाठी त्याच्याकडून उघडउघड खबरदार करणारा आहे.
- आणि बनवू नका अल्लाहच्या समवेत कोणी अन्य उपास्य, मी तुमच्यासाठी त्याच्याकडून उघडउघड खबरदार करणारा आहे.
- असेच घडत आले आहे, यांच्यापूर्वीच्या राष्ट्रांकडेदेखील कोणी असा प्रेषित आलेला नाही ज्याला त्यांनी असे म्हटले नाही की हा जादूगार आहे अथवा वेडा.
- या सर्वांनी आपापसात यासंबंधी काही समझोता केला आहे काय? नव्हे तर हे सर्व शिरजोर लोक आहेत.
- म्हणून हे पैगंबर (स.), यांच्याकडून तोंड फिरवा. तुम्हावर काही दोषारोपण नाही.
- तथापि उपदेश करीत रहा कारण उपदेश श्रद्धावंतांसाठी लाभदायी आहे.
- मी जिन्न आणि माणसांना याशिवाय कोणत्याही अन्य कामासाठी निर्माण केले नाही की त्यांनी माझी भक्ती करावी
- मी काही त्यांच्याकडून उपजीविका इच्छित नाही आणि असेही इच्छित नाही की त्यांनी मला जेवू घालावे.
- अल्लाह तर स्वतःच उपजीविका देणारा आहे, मोठा शक्तिमान आणि जबरदस्त
- तर ज्या लोकांनी जुलूम केला आहे त्यांच्या हिश्श्याचा सुद्धा तसाच प्रकोप तयार आहे जसा यांच्याचसारख्या लोकांना त्यांच्या वाट्याचा मिळाला आहे, यासाठी या लोकांनी घाई करू नये.
- सरतेशेवटी, विनाश आहे द्रोह करणार्यांसाठी त्या दिवशी ज्याचे भय यांना दाखविले जात आहे.