12. युसूफ - يُوسُف
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- अलिफ, लाऽऽम, रा. ही त्या ग्रंथाची वचने आहेत जी आपला उद्देश अगदी स्पष्टपणे व्यक्त करतात.
- आम्ही याला अवतरले आहे कुरआन बनवून अरबी भाषेत जेणेकरून तुम्हा (अरबवासींना ते) चांगल्या प्रकारे समजू शकावे.
- हे पैगंबर (स.), आम्ही या कुरआनला तुमच्याकडे दिव्य प्रकटन करून उत्तम शैलीमध्ये घटना व हकीकती तुम्हास सांगत आहोत अन्यथा याच्यापूर्वी (या गोष्टीपासून) तुम्ही पूर्णपणे अनभिज्ञ होता.
- हे त्यावेळचे वर्णन आहे जेव्हा युसूफ (अ.) ने आपल्या वडिलांना सांगितले, ’’हे पिता, मी स्वप्न पाहिले आहे की अकरा तारे आहेत व सूर्य आणि चंद्र आहे आणि ते माझ्यापुढे नतमस्तक होत आहेत.’’
- उत्त्तरात त्याच्या पित्याने सांगितले, ’’बाळा, आपले हे स्वप्न आपल्या भावांना सांगू नकोस अन्यथा ते त्रास देत राहतील. वस्तुस्थिती अशी आहे की शैतान माणसाचा उघड शत्रू आहे.
- आणि असेच घडेल (जसे तू स्वप्नांत पाहिले आहेस की) तुझा पालनकर्ता तुझी (आपल्या कार्यासाठी) निवड करील आणि तुला गोष्टींच्या तळापर्यंत पोहोचण्याचे शिकवील. आणि तुझ्यावर व याकूब (अ.) च्या संततीवर आपली देणगी त्याचप्रकारे पूर्ण करील ज्याप्रकारे यापूर्वी त्याने तुझे वाडवडील इब्राहीम (अ.) व इसहाक (अ.) यांच्यावर केलेली आहे. निश्चितच तुझा पालनकर्ता सर्वज्ञ व बुद्धिमान आहे.’’
- वस्तुस्थिती अशी आहे की यूसुफ (अ.) आणि त्यांच्या भावांच्या या वृत्तांतामध्ये प्रश्न करणार्यांच्याकरिता मोठा संकेत आहे.
- हा वृत्तांत असा सुरू होतो की, त्याच्या बांधवांनी आपापसांत सांगितले की, ’’हा यूसुफ (अ.) आणि याचा भाऊ दोघे आमच्या वडिलांना आम्हा सर्वांपेक्षा अधिक प्रिय आहेत, वास्तविक पाहता आम्ही एक पूर्ण जथ्था आहोत, खरी गोष्ट अशी आहे की आमचे वडील पूर्णपणे बहकले आहेत.
- चला, यूसुफ (अ.) ला ठार करा अथवा त्याला कोठे तरी फेकून टाका जेणेकरून तुमच्या वडिलांचे लक्ष केवळ तुमच्याकडेच राहावे. हे काम उरकल्यावर पुन्हा सदाचारी बनून राहा.’’
- यावर त्यांच्यापैकी एकाने सांगितले, ’’यूसुफ (अ.) ला ठार करू नका, जर काही करावयाचेच असेल तर त्याला एखाद्या कोरड्या विहिरीमध्ये टाकून द्या, एखादा येणारा जाणारा काफिला त्याला काढून नेईल.’’
- असे ठरल्यावर त्यांनी जाऊन आपल्या वडिलांना सांगितले, ’’हे पिता, काय कारण आहे की आपण युसूफ (अ.) च्या बाबतीत आम्हावर विश्वास ठेवीत नाही, वास्तविक पाहता आम्ही त्याचे खरे हितचिंतक आहोत?
- उद्या त्याला आमच्याबरोबर पाठवून द्या. थोडे फळफळावळ खाईल व खेळून बागडून मनोरंजनही करून घेईल. आम्ही त्याच्या रक्षणासाठी आहोतच.’’
- वडिलांनी सांगितले, ’’तुमचे त्याला घेऊन जाणे मला जड जाते आणि मला भीती आहे की एखादे वेळी त्याला लांडग्याने फाडून खाऊ नये जेव्हा तुम्ही त्याच्याकडून गाफिल असाल.’’
- त्यांनी उत्तर दिले, ’’जर आम्ही असताना एखाद्या लांडग्याने खाल्ले जर आम्ही एक जथा आहोत त्याअर्थी आम्ही तर अगदीच निकामी ठरू.’’
- अशा प्रकारे आग्रह करून जेव्हा ते त्याला घेऊन गेले आणि त्यांनी ठरवून घेतले की त्याला एका कोरड्या विहिरीत सोडून द्यावे तेव्हा आम्ही युसूफ (अ.) ला दिव्य प्रकटन केले की, ’’एक वेळ येईल जेव्हा तू या लोकांना त्यांच्या या कृत्याची समज देशील, हे आपल्या कृत्याच्या परिणामापासून बेखबर आहेत.’’
- संध्याकाळी ते रडत रडत आपल्या वडिलांकडे आले
- आणि म्हणाले, ’’हे पिता, आम्ही धावण्याच्या स्पर्धेत लागलो होतो आणि यूसुफ (अ.) ला आम्ही आमच्या साहित्याजवळ सोडले होते, इतक्यात लांडग्याने येऊन त्याला खाऊन टाकले. आपण आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही जरी आम्ही खरे असलो.’’
- आणि त्यांनी यूसुफ (अ.) च्या सदर्यावर खोटेनाटे रक्त लावून आणले होते. हे ऐकून त्यांच्या वडिलांनी सांगितले, ’’किंबहुना तुमच्या वासनेने तुमच्याकरिता एक मोठे काम सोपे बनविले. बरे, संयम राखीन आणि चांगल्याच प्रकारे संयम बाळगीन, जी गोष्ट तुम्ही रचत आहात त्यावर अल्लाहकडूनच मदत मागितली जाऊ शकते.’’
- तिकडे एक काफिला आला आणि त्याने आपल्या पाणक्याला पाणी आणावयास पाठविले, पाणक्याने विहिरीत पोहरा घातला तर (यूसुफ (अ.) ला पाहून) पुकारून उठला, ’’शुभ असो, येथे तर एक मुलगा आहे.’’ त्या लोकांनी त्याला व्यापाराचा माल समजून लपवून ठेवले, खरे पाहता जे काही ते करीत होते, अल्लाह त्याचा जाणकार होता.
- सरतेशेवटी त्यांनी थोड्याशा किमतीवर काही दिरहमच्या मोबदल्यात त्याला विकून टाकले आणि ते त्याच्या मूल्याच्या बाबतीत काही अधिक पात्र नव्हते.
- मिस्रच्या ज्या व्यक्तीने त्याला खरेदी केले, त्याने आपल्या पत्नीला सांगितले, ’’याला चांगल्या प्रकारे ठेव, अशक्य नाही की हा आपल्याला लाभदायक ठरेल अथवा आम्ही त्याला आपला पुत्र बनवून घ्यावे.’’ अशा प्रकारे आम्ही यूसुफ (अ.) साठी त्या भूभागात पाय स्थिरावण्याचा मार्ग काढला, आणि त्याला व्यवहार आकलनाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली. अल्लाह आपले काम केल्याशिवाय राहात नाही, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत.
- आणि जेव्हा तो आपल्या भर तारुण्यात पोहचला तेव्हा आम्ही त्याला निर्णयशक्ती आणि ज्ञान प्रदान केले, अशा प्रकारे आम्ही सदाचारी लोकांना मोबदला देत असतो.
- ज्या स्त्रीच्या घरी तो होता ती त्याच्यावर मोहिनी घालू लागली आणि एके दिवशी दारे बंद करून म्हणाली, ’’ये’’, यूसुफ (अ.) ने सांगितले, ’’अल्लाहचा आश्रय, माझ्या पालनकर्त्याने तर मला चांगला दर्जा बहाल केला (आणि मी हे काम करावे!) असले अत्याचारी कधीही सफल होत नसतात.’’
- ती त्याच्याकडे सरसावली आणि यूसुफ (अ.) देखील तिच्याकडे सरसावला असता जर त्याने आपल्या पालनकर्त्याचे प्रमाण पाहिले नसते. असे घडले जेणेकरून आम्ही त्याच्यापासून दुष्टता व निर्लज्जता दूर करावी. खरे पाहता ...तो आमच्या निवडक दासांपैकी होता,
- सरतेशेवटी यूसुफ (अ.) पुढे आणि ती मागे असे दाराकडे धावले आणि तिने पाठीमागून यूसुफ (अ.) चा सदरा (ओढून) फाडून टाकला. दारावर त्या दोघांनी तिच्या पतीला उपस्थित पाहिले. त्याला पाहताच स्त्री म्हणून लागली, ’’कोणती शिक्षा आहे त्या माणसासाठी ज्याने तुझ्या पत्नीवर वाईट हेतू ठेवावा? याशिवाय अन्य कोणती शिक्षा असू शकते की तो कैद केला जावा अथवा त्याला कठोर यातना दिली जावी?’’
- यूसुफ (अ.) ने सांगितले, ’’हीच मला फूस लावण्याचा प्रयत्न करीत होती’’ त्या स्त्रीच्या स्वतःच्या कुटुंबियांपैकी एका व्यक्तीने (परिस्थितीजन्य पुराव्यावरून) साक्ष प्रस्तुत केली की, ’’जर यूसुफ (अ.) चा सदरा पुढून फाटला असेल तर स्त्री खरी आहे आणि हा खोटा
- आणि याचा सदरा पाठीमागून फाटला असेल तर स्त्री खोटी व हा खरा.’’
- जेव्हा पतीने पाहिले की यूसुफ (अ.) चा सदरा पाठीमागून फाटला आहे तेव्हा तो म्हणाला, ’’या तर तुम्हा स्त्रियांच्या ’खसलती’ आहेत. खरोखर मोठ्या भयंकर असतात तुमच्या चाली.
- यूसुफ (अ.)! या मामल्याकडे दुर्लक्ष कर. आणि हे महिले! तू आपल्या अपराधाची क्षमा माग तूच मुळात अपराधी होतीस.’’
- शहरातील स्त्रिया आपापसात चर्चा करू लागल्या की, ’’अजीजची पत्नी आपल्या युवक गुलामाच्या मागे लागली आहे. प्रेमाने तिला बेबंद करून सोडले आहे, आमच्या दृष्टीने तर ती उघड चूक करीत आहे.’’
- तिने जेव्हा त्यांच्या धूर्तपणाच्या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्यांना बोलावणे पाठविले आणि त्यांच्याकरिता तक्याची बैठक सजविली आणि मेजवानीत प्रत्येकीच्या पुढ्यात एक एक सुरी ठेवली, (मग ऐन त्यावेळी जेव्हा त्या फळे कापूनकापून खात होत्या) तिने यूसुफ (अ.) ला इशारा केला की त्यांच्यासमोर बाहेर ये. जेव्हा त्या स्त्रियांची दृष्टी त्याच्यावर पडली तेव्हा त्या अवाक झाल्या आणि आपले हात कापून घेतले आणि अनायासे उद्गारल्या, ’’हे अल्लाह, ही व्यक्ती मनुष्य नाही, हा तर कोणी प्रतिष्ठित दूत होय.’’
- अजीजच्या पत्नीने सांगितले, ’’पाहिलेत ना, हीच आहे ती व्यक्ती ज्याच्याबाबतीत माझ्यावर तुम्ही गोष्टी रचत होता, निःसंशय मी याला वश करण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा त्यातून वाचला. जर याने माझे म्हणणे ऐकले नाही तर कैद केला जाईल आणि अत्यंत अपमानित होईल.’’
- यूसुफ (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या पालनकर्त्या, तुरुंगवास मला मान्य आहे यापेक्षा की मी ते काम करावे जे हे लोक माझ्यापासून अपेक्षा करतात आणि जर माझ्यापासून तू यांच्या चालींना टाळले नाहीस तर मी त्यांच्या जाळ्यात अडकेन आणि अज्ञानी लोकांमध्ये सामील होऊन जाईन.’’
- त्याच्या पालनकर्त्याने त्याची प्रार्थना स्वीकारली आणि त्या स्त्रियांच्या चाली त्याच्यापासून टाळल्या, निःसंशय तोच आहे जो सर्वांचे ऐकतो आणि सर्वकाही जाणतो.’’
- मग त्या लोकांना कल्पना सुचली की एका कालावधीसाठी त्याला कैद करावे वस्तुतः त्यांनी (त्याच्या निष्कलंकतेचे व आपल्या स्त्रियांच्या स्वैरपणाचे) स्पष्ट संकेत पाहिले होते.
- तुरुंगात आणखी दोन गुलाम त्याच्याबरोबर दाखल झाले. एके दिवशी त्यांच्यापैकी एकाने सांगितले, ’’मी स्वप्न पाहिले आहे की मी दारू गाळीत आहे.’’ दुसर्याने सांगितले, ’’मी पाहिले की माझ्या डोक्यावर भाकरी ठेवल्या आहेत आणि पक्षी त्या खात आहेत.’’ दोघांनी सांगितले, ’’आम्हाला याचे भाकित सांगा, आम्ही पाहतो की आपण एक सदाचारी मनुष्य आहात.’’
- यूसुफ (अ.) ने सांगितले, ’’येथे जे जेवण तुम्हाला मिळते ते येण्यापूर्वी मी तुम्हाला या स्वप्नांचे भाकित सांगेन. हे त्या ज्ञानापैकी आहे जे माझ्या पालनकर्त्याने मला प्रदान केले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की मी त्या लोकांचा मार्ग सोडून जे अल्लाहवर श्रद्धा ठेवीत नाहीत व परलोकचा इन्कार करतात,
- आपले वडिलधारी इब्राहीम (अ.), इसहाक (अ.) आणि याकूब (अ.) यांचा मार्ग अनुसरला आहे. आमचे हे काम नव्हे की आम्ही अल्लाहबरोबर एखाद्याला भागीदार ठरवावे, खरे पाहता ही अल्लाहची कृपा आहे आमच्यावर व सर्व मानवांवर (की त्याने आपल्याखेरीज अन्य कोणाचाही दास आम्हाला बनविले नाही) परंतु बहुतेक लोक कृतज्ञ बनत नाहीत.
- हे कैदेतील साथीदारांनो, तुम्ही स्वतःच विचार करा की पुष्कळसे विभिन्न पालनकर्ते उत्तम आहेत अथवा तो एक अल्लाह जो सर्वांवर प्रभावी आहे?
- त्याला सोडून तुम्ही ज्याची भक्ती करीत आहात ते याशिवाय काहीच नाहीत की बस्स काही नावे आहेत जे तुम्ही व तुमच्या वाडवडिलांनी ठेवली आहेत. अल्लाहने त्यांच्यासाठी कोणतेही प्रमाण अवतरिले नाही. शासनाची सत्ता अल्लाहखेरीज इतर कोणासाठी नाही. त्याचा आदेश आहे की त्याच्या स्वतःशिवाय तुम्ही इतर कोणाचीही भक्ती करू नका. हीच थेट सरळ जीवनपद्धती आहे, पण बहुतेक लोक जाणत नाहीत.
- हे कैदेतील साथीदारांनो! तुमच्या स्वप्नांचा अर्थ हा आहे की तुम्हापैकी एक तर आपल्या पालनकर्त्या (मिस्राधिपती) ला दारू पाजील. उरला दुसरा तर त्याला सुळावर चढविले जाईल आणि त्याचे डोके पक्षी चोच मारून मारून खातील. निर्णय लागला त्या गोष्टीचा जे तुम्ही विचारीत होता.’’
- मग त्यांच्यापैकी ज्याच्याविषयी कल्पना होती की तो मुक्त होईल त्याला यूसुफ (अ.) ने सांगितले की, ’’आपल्या पालनकर्त्याकडे (मिस्राधिपतीकडे) माझा उल्लेख कर.’’ परंतु शैतानाने त्याला असा विसर पाडला की तो आपल्या पालनकर्त्यापाशी (मिस्राधिपतीपाशी) याचा उल्लेख करण्यास विसरला आणि यूसुफ (अ.) कित्येक वर्षे तुरुंगात पडून राहिला.
- एके दिवशी बादशाहने सांगितले, ’’मी स्वप्नांत पाहिले आहे की सात लठ्ठ गायी आहेत ज्यांना सात रोडक्या गायी खात आहेत आणि अन्नाची सात कणसे हिरवी आहेत व सात सुकलेली. हे दरबारी लोकहो, मला या स्वप्नाचे भाकित सांगा जर तुम्हाला स्वप्नफल कळत असेल.’’
- लोकांनी सांगितले, ’’या तर गोंधळयुक्त स्वप्नांच्या गोष्टी आहेत आणि अशाप्रकारच्या स्वप्नांचे भाकित आम्ही जाणत नाही.’’
- त्या दोन कैद्यांपैकी जो वाचला होता आणि ज्याला एका दीर्घकाळानंतर आता आठवण झाली, त्याने सांगितले, ’’मी आपल्याला याचा अर्थ सांगतो, मला जरा (तुरुंगात यूसुफ (अ.) कडे) पाठवून द्या.’’
- त्याने जाऊन सांगितले, ’’यूसुफ (अ.), हे मूर्तीमंत सत्य! मला या स्वप्नाचा अर्थ सांग की सात लठ्ठ गायी आहेत ज्यांना सात रोडक्या गायी खात आहेत आणि सात कणसे हिरवी आहेत आणि सात सुकलेली, कदाचित मी त्या लोकांपाशी परत जावे आणि कदाचित त्यांनी जाणावे.’’
- यूसुफ (अ.) यांनी सांगितले, ’’सात वर्षांपर्यंत तुम्ही निरंतर शेतीवाडी करीत राहाल. या दरम्यान जी पिके तुम्ही कापाल त्याच्यापासून फक्त थोडासा हिस्सा, जो तुमच्या अन्नासाठी उपयोगी पडेल, काढा आणि उरलेला त्याच्या कणसांतच राहू द्या.
- नंतर सात वर्षे अत्यंत बिकट येतील, त्या काळात ते सर्व धान्य खाल्ले जाईल जे तुम्ही त्या काळासाठी साठवाल. जर काही उरेल तर केवळ तेच जे तुम्ही सुरक्षित ठेवले असेल.
- त्यानंतर मग एक वर्ष असे येईल की ज्यांत पाऊसरूपी कृपेने लोकांची याचनापूर्ती केली जाईल आणि ते रस गाळतील.’’
- बादशाहने सांगितले, ’’त्याला माझ्याजवळ आणा, पण जेव्हा राजाचा दूत यूसुफ (अ.) जवळ पोहोचला तेव्हा तो म्हणाला, ’’आपल्या राजाकडे परत जा आणि त्याला विचार की त्या स्त्रियांचा काय मामला आहे ज्यांनी आपले हात कापून घेतले होते? माझा पालनकर्ता तर त्यांचा कुटीलपणा चांगल्याप्रकारे जाणून आहे.’’
- यावर बादशाहने त्या स्त्रियांकडे पृच्छा केली, ’’तुमचा काय अनुभव आहे त्या वेळचा जेव्हा तुम्ही यूसुफ (अ.) ला मोहित करण्याचा प्रयत्न केला होता?’’ सर्वानी एकमुखाने सांगितले, ’’अल्लाहचा आश्रय, आम्हाला तर त्याच्यात दुष्टाईचा लेशमात्र देखील आढळला नाही.’ अजीजची पत्नी उद्गारली, ’’आता सत्य उघड झाले आहे. ती मीच होते जिने त्याला फूस लावण्याचा प्रयत्न केला होता, निःसंशय तो अगदी खरा आहे.’’
- (यूसुफ (अ.) ने सांगितले,) ’’यापासून माझा हेतू असा होता की (अजीज) ला हे ज्ञात व्हावे की मी पडद्याआड त्याच्याशी विश्वासघात केला नव्हता आणि असे की जे विश्वासघात करतात त्यांच्या कारस्थानांना अल्लाह सफलतेच्या मार्गावर नेत नाही
- मी आपल्या मनोवासनेपासून मुक्त नाही, मनोवासना तर वाईटाकडे प्रवृत्त करीतच असते, याखेरीज की ज्याच्यावर माझ्या पालनकर्त्याची कृपा होते. निःसंशय माझा पालनकर्ता अत्यंत क्षमाशील व परम कृपाळू आहे.’’
- बादशाहने सांगितले, ’’त्यांना माझ्याजवळ आणा की जेणेकरून मी त्यांना माझ्या खास सेवेत ठेवीन’’ जेव्हा यूसुफ (अ.) ने त्याच्याशी बोलणी केली तेव्हा तो म्हणाला ’’आता आपण आमच्याशी मानमरातब राखता आणि आपल्या अमानतीवर पूर्ण विश्वास आहे.’’
- यूसुफ (अ.) ने सांगितले, ’’देशाचे खजिने माझ्या स्वाधीन करा. मी रक्षण करणाराही आहे आणि मला ज्ञानही आहे.’’
- अशा प्रकारे आम्ही त्या भूभागात यूसुफ (अ.) यांच्यासाठी अधिकाराचा मार्ग सुरळीत केला. तो मुखत्यार होता की त्यात हवे तेथे आपले स्थान बनवावे. आम्ही आपल्या कृपेने ज्याला इच्छितो त्याला उपकृत करतो सदाचारी लोकांचा मोबदला आमच्यापाशी वाया घालविला जात नाही,
- आणि मरणोत्तर जीवनाचा मोबदला त्या लोकांसाठी जास्त उत्तम होय ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि ईशपरायण होऊन कार्य करीत राहिले.
- यूसुफ (अ.) चे भाऊ मिस्रमध्ये आले आणि त्यांच्या येथे हजर झाले. त्याने त्यांना ओळखले पण ते त्याच्याशी अपरिचित होते.
- मग जेव्हा त्याने त्यांचा सरंजाम तयार करविला तेव्हा निघण्याच्या वेळी त्यांना सांगितले, ’’आपल्या सावत्र भावाला माझ्याकडे आणावे. पाहात नाही काय की मी कशा प्रकारे माप भरून देतो आणि किती चांगले आदरातिथ्य करणारा आहे.
- जर तुम्ही त्याला आणले नाही तर माझ्याजवळ तुमच्यासाठी अजिबात धान्य नाही इतकेच नव्हे तर तुम्ही माझ्या जवळपासदेखील फिरकू नका.’’
- त्यांनी सांगितले, ’’आम्ही प्रयत्न करू की वडील त्याला पाठविण्यास तयार व्हावेत, आणि आम्ही असे जरूर करू.’’
- यूसुफ (अ.) ने आपल्या गुलामांना इशारा केला की, ’’या लोकांनी धान्याच्या मोबदल्यात जो माल दिलेला आहे तो गुपचुप त्यांच्या सामानांतच ठेऊन द्या.’’ यूसुफ (अ.) ने असे या आशेने केले की घरी पोहचल्यावर आपला परत मिळालेला माल ते ओळखतील (अथवा या औदार्यावर कृतज्ञ होतील) आणि आश्चर्य नव्हे की पुन्हा ते परततील.
- जेव्हा ते आपल्या वडिलांजवळ गेले तेव्हा म्हणाले, ’’हे पिता, यापुढे आम्हाला धान्य देण्यास नकार देण्यात आला आहे म्हणून आपण आमच्या भावाला आमच्याबरोबर पाठवून द्यावे जेणेकरून आम्ही धान्य घेऊन येऊ. आणि त्याच्या रक्षणाचे आम्ही जबाबदार आहोत.’’
- वडिलांनी उत्तर दिले, ’’मी त्याच्याही मामल्यात तुमच्यावर तसाच विश्वास ठेवू काय जसा यापूर्वी त्याच्या भावासंबंधी ठेवला होता? अल्लाह उत्तम रक्षक आहे व तो सर्वांपेक्षा जास्त दया करणारा आहे.’’
- मग जेव्हा त्यांनी आपले सामान उघडले तेव्हा पाहिले की त्यांचा मालसुद्धा त्यांना परत केलेला आहे. हे पाहून ते पुकारून उठले, ’’हे पिता आम्हाला आणखी काय हवे, पहा, हा आमचा मालसुद्धा आम्हाला परत केला गेला आहे. परत आता आम्ही जाऊ आणि आमच्या मुलाबाळांसाठी रसद घेऊन येऊ. आपल्या भावाचे रक्षणही करू आणि एका उंटाचा भार आणखी जास्तही आणू. इतक्या धान्याची वाढ सहज होईल.’’
- त्यांच्या पित्याने सांगितले, ’’मी त्याला कदापि तुमच्याबरोबर पाठविणार नाही जोपर्यंत तुम्ही अल्लाहच्या नावाने मला पक्के वचन देत नाही की त्याला माझ्याजवळ जरूर परत आणाल याव्यतिरिक्त की तुम्ही वेढलेच जाल.’’ जेव्हा त्यांनी त्यांच्यासमोर आपापल्या प्रतिज्ञा घेतल्या तेव्हा तो म्हणाला, ’’पहा, आमच्या या वचनावर अल्लाह पहात आहे.’’
- मग त्याने सांगितले, ’’माझ्या मुलांनो मिस्रच्या राजधानीत एकाच दरवाजाने दाखल होऊ नका. तर वेगवेगळ्या दरवाजाने जा. परंतु मी अल्लाहच्या मनोरथाविरूद्ध तुम्हाला वाचवू शकत नाही. हुकूम त्याच्याशिवाय कोणाचाही चालत नाही, त्याच्यावरच मी भिस्त ठेवतो. आणि ज्या कोणाला भिस्त ठेवायची असेल त्याने त्याच्यावरच ठेवावी.’’
- आणि घडलेदेखील असेच की जेव्हा ते वडिलांच्या आदेशानुसार शहरात (वेगवेगळ्या दरवाजांनी) दाखल झाले तेव्हा त्यांचा हा सावधगिरीचा उपाय अल्लाहच्या मनोरथाविरूद्ध काहीच उपयोगी ठरू शकला नाही. परंतु केवळ याकूब (अ.) च्या मनात जी एक शंका होती ती दूर करण्याकरिता त्याने आपल्या परीने प्रयत्न केला. निःसंशय तो, आम्ही दिलेल्या शिकवणीमुळे ज्ञानी होता परंतु बहुतेक लोक मामल्याच्या वास्तवतेला जाणत नाहीत.
- हे लोक यूसुफ (अ.) च्या पाशी पोहचले तेव्हा त्याने आपल्या भावाला आपल्याजवळ वेगळे बोलावून घेतले आणि त्याला कळवले की, ’’मी तुझा तोच भाऊ आहे (जो हरविला गेलो होतो) आता तू त्या गोष्टीचे दुःख करू नकोस जे हे लोक करीत राहिले आहेत.’’
- जेव्हा यूसुफ (अ.) त्या भावांचे सामान लादवू लागला तेव्हा त्याने आपल्या भावाच्या सामानात एक पेला ठेवून दिला. मग एका पुकारणार्याने पुकारून सांगितले की, ’’हे जथ्थेवाल्यांनो, तुम्ही चोर लोक आहात.’’
- त्यांनी मागे फिरून विचारले, ’’तुमची कोणती वस्तू हरवली आहे?’’
- सरकारी कर्मचार्याने सांगितले, ’’बादशाहचे माप आम्हाला सापडत नाही.’’ (आणि त्यांच्या जमादाराने सांगितले,) ’’जो कोणी आणून देईल त्याच्याकरिता एक उंट वाहू शकेल इतके बक्षीस आहे याची मी हमी देतो.’’
- त्याच्या भावांनी सांगितले, ’’अल्लाहची शपथ, तुम्हाला चांगलेच माहीत आहे की आम्ही या देशात उपद्रव माजविण्यासाठी आलेलो नाही आणि आम्ही चोर्या करणारे लोक नाही.’’
- त्यांनी सांगितले, ’’बरे, तुमचे म्हणणे जर खोटे ठरले तर चोराला काय शिक्षा आहे?’’
- त्यांनी सांगितले, ’’त्याची शिक्षा? ज्याच्या सामानातून वस्तू निघेल त्याला स्वतःच आपल्या शिक्षेपायी ठेवले जाईल, आमच्या येथे तर अशा अत्याचार्यांना शिक्षा देण्याची हीच पद्धत आहे.’’
- तेव्हा यूसुफ (अ.) ने आपल्या भावाच्या अगोदर त्यांच्या थैल्यांची झडती घ्यावयास सुरूवात केली, मग आपल्या भावाच्या थैलीतून हरवलेली वस्तू बाहेर काढली - अशा प्रकारे आम्ही यूसुफ (अ.) चे समर्थन आमच्या युक्तीने केले. त्याचे हे काम नव्हते की बादशाहच्या धर्मात (मिस्रच्या शाही कायद्यात) आपल्या भावाला पकडावे, याशिवाय की अल्लाहनेच अशी इच्छा करावी. आम्ही ज्याचे इच्छितो त्याचे दर्जे उंचावतो, आणि एक ज्ञानी असा आहे जो प्रत्येक ज्ञानीपेक्षा उच्चतर आहे.’’
- त्या भावांनी सांगितले, ’’याने चोरी केली तर काही आश्चर्याची गोष्ट नव्हे, याच्यापूर्वी याच्या भावाने (यूसुफ (अ.) ने) सुद्धा चोरी केली आहे.’’ यूसुफ (अ.) ने त्यांचे हे म्हणणे ऐकून ते गिळले, सत्य त्यांच्यावर उघड केले नाही, बस्स (ओठांतल्या ओठांत) इतके सांगून थांबला की, ’’फारच वाईट लोक आहात तुम्ही, (माझ्या समक्षच माझ्यावर) जो आरोप तुम्ही करीत आहात त्यातील सत्य अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो.’’
- त्यांनी सांगितले, ’’हे सत्ताधीश सरदार (अजीज)! याचा पिता फार म्हातारा माणूस आहे, याच्याऐवजी आपण आमच्यापैकी कोणाला तरी ठेऊन घ्यावे, आम्हाला आपण फारच प्रामाणिक मनुष्य आढळता.
- यूसुफ (अ.) ने सांगितले, ’’अल्लाह रक्षण करो, दुसर्या एखाद्या व्यक्तीला आम्ही कसे ठेवून घेऊ शकतो? ज्याच्याजवळ आम्हाला आमचा माल सापडला आहे त्याला सोडून दुसर्याला ठेवून घेतले तर आम्ही अत्याचारी ठरू.’’
- जेव्हा ते यूसुफ (अ.) पासून निराश झाले तेव्हा एका कोपर्यात जाऊन आपसात सल्ला-मसलत करू लागले, त्यांच्यात जो थोरला होता, तो म्हणाला, ’’तुम्हाला माहीत नाही काय की तुमच्या वडिलांनी तुमच्याकडून अल्लाहच्या नावाने प्रतिज्ञा घेतली आहे? आणि याच्यापूर्वी यूसुफ (अ.) च्या बाबतीत जे काय तुम्ही केले आहे ते देखील तुम्हाला माहीत आहे. आता मी तर येथून मुळीच जाणार नाही जोपर्यंत माझे वडील मला परवानगी देत नाहीत, अथवा अल्लाहनेच माझ्यासंबंधी काही निर्णय द्यावा, तो सर्वात उत्तम न्याय करणारा आहे.
- तुम्ही जाऊन आपल्या वडिलांना सांगा की, ’’हे पिता आपल्या सुपुत्राने चोरी केली आहे. आम्ही त्याला चोरी करताना पाहिले नाही, जे काही आम्हाला माहीत झाले आहे केवळ तेच आम्ही सांगत आहोत आणि परोक्षावर तर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही.
- आपण त्या वस्तीतील लोकांना विचारून घ्यावे की जेथे आम्ही होतो, त्या काफिल्याला विचारा ज्यांच्यासमवेत आम्ही आलो आहोत. आम्ही आमच्या निवेदनात अगदी खरे आहोत.’’
- पित्याने ही कथा ऐकून सांगितले, ’’वस्तुतः तुमच्या वासनेने तुमच्यासाठी आणखी एका मोठ्या गोष्टीला सोपे बनविले. बरे, तर मी याच्यावरदेखील संयम ठेवीन आणि उत्तम प्रकारे ठेवीन. काय अशक्य आहे की अल्लाहने त्या सर्वांना आणून मला भेटवावे, तो सर्वकाही जाणतो आणि त्याची सर्व कामे विवेकावर आधारित आहेत.’’
- मग तो त्यांच्याकडून तोंड फिरवून बसला आणि सांगू लागला की, ’’हाय यूसुफ (अ.)!’’ मनातल्या मनात त्याला दाटून येत होते दुःखाने आणि त्याचे डोळे पांढरे झाले होते.
- मुलांनी सांगितले, ’’अल्लाहची शपथ, आपण तर केवळ यूसुफ (अ.) चीच आठवण करीत असता, आता पाळी अशी आली आहे की त्याच्या दुःखात आपण स्वतःला क्षीण करून टाकाल अथवा आपला प्राणच गमवाल.’’
- त्याने सांगितले, ’’मी आपल्या त्रासाची आणि दुःखाची फिर्याद अल्लाहशिवाय इतर कोणाकडेच करीत नाही, आणि अल्लाहशी जसा मी परिचित आहे तसे तुम्ही नाही.
- माझ्या मुलांनो, जाऊन यूसुफ (अ.) आणि त्याच्या भावाचा काही सुगावा घ्या, अल्लाहच्या कृपेपासून निराश होऊ नका, त्याच्या कृपेपासून तर केवळ अश्रद्धावंतच निराश होत असतात.’’
- जेव्हा हे लोक मिस्रला जाऊन यूसुफ (अ.) च्या समोर दाखल झाले तेव्हा त्यांनी विनंती केली की, ’’हे सत्ताधीश सरदारा, आम्ही आणि आमचे कुटुंबजन भयंकर संकटात आहोत, आणि आम्ही काही क्षुल्लक पुंजी घेऊन आलो आहोत, आपण आम्हालाभरपूर धान्य देण्याची मेहरबानी करावी. आणि आम्हाला दान द्यावे, अल्लाह दान देणार्याला मोबदला देतो.’’
- (हे ऐकून यूसुफ (अ.) ला राहवले नाही) त्याने सांगितले, ’’तुम्हाला हे तरी माहीत आहे का की तुम्ही यूसुफ (अ.) आणि त्याच्या भावाशी काय केले होते, जेव्हा तुम्ही नादान होता?’’
- ते चमकून म्हणाले, ’’काय, तुम्ही यूसुफ (अ.) आहात?’’ त्याने सांगितले, ’’होय, मी यूसुफ (अ.) आहे आणि हा माझा भाऊ आहे. अल्लाहने आमच्यावर उपकार केले. वस्तुस्थिती अशी आहे की जर एखाद्याने ईशपरायणता आणि संयमाने वागले तर अल्लाहजवळ असल्या सदाचारी लोकांचा मोबदला वाया घालविला जात नाही.’’
- त्यांनी सांगितले, ’’अल्लाह शपथ, की तुम्हाला अल्लाहने आमच्यावर श्रेष्ठत्व प्रदान केले आणि खरोखरच आम्ही अपराध करणारे होतो.’’
- त्याने उत्तर दिले, ’’आज तुमची कसलीच पकड नाही. अल्लाह तुम्हाला क्षमा करो, तो सर्वात जास्त दया करणारा आहे.
- जा, माझा हा सदरा घेऊन जा आणि माझ्या वडिलांच्या तोंडावर टाका, त्यांची दृष्टी परत येईल, आणि आपल्या सर्व मुलाबाळांना माझ्याजवळ घेऊन या.’’
- जेव्हा हा काफिला (इजिप्तहून) रवाना झाला तेव्हा त्यांच्या पित्याने (’कनआन’ या ठिकाणी) सांगितले, ’’मला यूसुफ (अ.) चा सुगंध जाणवत आहे, तुम्ही एखादे वेळी असे सांगू नये की मी वार्धक्याने साठळलो आहे.’’
- घरातील लोक म्हणाले, ’’अल्लाहची शपथ, आपण अद्याप आपल्या त्या जुन्या विक्षिप्तपणामध्ये पडलेले आहात.’’
- मग जेव्हा शुभवार्ता आणणारा आला तेव्हा त्याने यूसुफ (अ.) चा सदरा याकूब (अ.) च्या तोंडावर टाकला आणि अकस्मातपणे त्यांची दृष्टी परत आली. तेव्हा त्याने सांगितले, ’’मी तुम्हाला सांगत नव्हतो काय? मी अल्लाहकडून ते जाणतो जे तुम्ही जाणत नाही.’’
- सर्वजण उद्गारले, ’’हे पिता, आपण आमच्या अपराधांच्या क्षमेसाठी प्रार्थना करा. खरोखरच आम्ही अपराध करणारे होतो.’’
- त्याने सांगितले, ’’मी आपल्या पालनकर्त्याशी तुमच्यासाठी माफीची याचना करीन, तो मोठा माफ करणारा आणि दया दाखविणारा आहे.’’
- मग जेव्हा हे लोक यूसुफ (अ.) जवळ पोहचले तेव्हा त्याने आपल्या आईवडिलांना आपल्याबरोबर बसवून घेतले आणि (आपल्या सर्व कुटुंबियांना) सांगितले, ’’चला, आता शहरात चला, अल्लाहने इच्छिले तर सुखासमाधानाने राहाल.’’
- (शहरात प्रवेश केल्यानंतर) त्याने आपल्या मातापित्याला उठवून आपल्यापाशी सिंहासनावर बसविले आणि सर्वजण त्याच्यापुढे झुकले. यूसुफ (अ.) ने सांगितले, ’’हे पिता, हे फळ आहे माझ्या त्या स्वप्नाचे जे मी पूर्वी पाहिले होते, माझ्या पालनकर्त्याने ते स्वप्न साकार केले. त्याचे उपकार आहेत की त्याने मला तुरुंगातून बाहेर काढले, आणि तुम्हा लोकांना ओसाड भागातून आणून मला भेटविले, वस्तुतः शैतानाने माझ्या आणि माझ्या भावांच्या दरम्यान बिघाड निर्माण केले होते, वस्तुस्थिती अशी आहे की माझा पालनकर्ता नकळत उपाययोजनेद्वारे आपले मनोरथ साकार करतो, निःसंशय तो सर्वज्ञ व बुद्धिमान आहे.
- हे माझ्या पालनकर्त्या, तू मला राज्य प्रदान केले आणि मला गोष्टीच्या तळापर्यंत पोहचण्याचे शिकविले. पृथ्वी व आकाश बनविणारा तूच इहलोकात व परलोकात माझा वाली आहेस, माझा शेवट इस्लामवर कर आणि परिणामांती मला सदाचारी लोकांबरोबर मिळव.’’
- हे पैगंबर (स.), ही कथा परोक्षाच्या वार्तांपैकी आहे जी आम्ही तुमच्याकडे दिव्य प्रकटन म्हणून पाठवीत आहोत. एरव्ही तुम्ही त्यावेळी हजर नव्हता जेव्हा यूसुफ (अ.) च्या भावांनी आपापसांत संगनमत करून कट केला होता.
- परंतु तुम्ही मग कितीही इच्छा केलीत तरी, यांच्यातून बहुतेक लोक मान्य करून घेणारे नाहीत.
- वास्तविकपणे तुम्ही या सेवेबद्दल त्यांच्याकडून काही मोबदलाही मागत नाही. हा तर एक उपदेश आहे जो जगतवासियांकरिता आहे.
- पृथ्वी आणि आकाशात कित्येक संकेत आहेत ज्यावरून हे जात असतात आणि थोडेदेखील लक्ष देत नाहीत.
- यांच्यापैकी बहुतेक अल्लाहला मानतात परंतु अशा प्रकारे की त्याच्याबरोबर ते इतरांना भागीदार ठरवितात.
- हे समाधानी आहेत काय की अल्लाहच्या प्रकोपाचे एखादे संकट यांच्यावर झडप घालणार नाही? अथवा बेसावध असता पुनरुत्थानाची घटका अचानक यांच्यावर येणार नाही?
- तुम्ही यांना स्पष्ट सांगून टाका की, ’’माझा मार्ग तर हा आहे, मी अल्लाहकडे बोलावितो, मी स्वतःदेखील पूर्ण प्रकाशात आपला रस्ता पहात आहे आणि माझे सोबतीदेखील, आणि अल्लाह पवित्र आहे व अनेकेश्वरवाद्यांशी माझा काहीही संबंध नाही.’’
- हे पैगंबर (स.), तुमच्या अगोदर आम्ही जे प्रेषित पाठविले होते, ते सर्व देखील माणसेच होते, आणि जे याच वस्त्यांच्या निवासितांपैकी होते, आणि त्यांच्याकडे आम्ही दिव्य प्रकटन पाठवीत राहिलो होतो मग काय या लोकांनी जमिनीवर संचार केला नाही की त्या लोकांचा शेवट त्यांना दिसला नाही जे यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत? निश्चितच परलोकाचे घर त्या लोकांसाठी आणखी उत्तम आहे ज्यांनी (पैगंबरांचे म्हणणे मान्य करून) ईशपरायणतेचे वर्तन अंगिकारले. काय आतादेखील तुम्ही समजणार नाही?
- (पूर्वीच्या पैगंबरांशीसुद्धा हेच होत राहिले आहे की ते दीर्घकाळ उपदेश करीत राहिले आणि लोकांनी ऐकून घेतले नाही) इथपावेतो की जेव्हा पैगंबर लोकांपासून निराश झाले आणि लोकांनी देखील समजून घेतले की त्यांच्याशी खोटे बोलले गेले होते तेव्हा अकस्मात आमची मदत पैगंबरांना पोहचली. मग जेव्हा असला प्रसंग येतो तेव्हा आमचा कायदा असा आहे की ज्याला आम्ही इच्छितो वाचवितो आणि अपराध्यावरून तर आमचा प्रकोप टाळलाच जाऊ शकत नाही.
- पूर्वीच्या लोकांच्या या कथांमध्ये बुद्धी व विवेक बाळगणार्यांसाठी धडा आहे. हे जे काही कुरआनमध्ये वर्णिले जात आहे या काही बनावट गोष्टी नाहीत तर जे ग्रंथ याच्यापूर्वी आलेले आहेत, हे त्यांचेच प्रमाणित सत्य आहे, आणि प्रत्येक गोष्टीचा तपशील आणि श्रद्धा ठेवणार्यांकरिता मार्गदर्शन व कृपा आहे.