Surah Fatir With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

 35. फातिर - فَاطِر

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे


  1. स्तुती त्या अल्लाहसाठीच आहे जो आकाशांचा व पृथ्वीचा बनविणारा आणि दूतांना ’संदेश पोहचविणारा’ नियुक्त करणारा आहे, (असे दूत) ज्यांचे दोन-दोन, तीन-तीन आणि चार-चार बाहू आहेत. तो आपल्या निर्मितीच्या रचनेत जसे इच्छितो वाढ करतो. निश्चितच अल्लाह प्रत्येक गोष्टीवर समर्थ आहे.
  2. अल्लाह ज्या कोणत्याही कृपेचे द्वार लोकांसाठी खुले करील त्याला कोणी रोखणारा नाही, आणि ज्याला तो बंद करील त्याला अल्लाहनंतर मग कोणीही उघडणारा नाही. तो जबरदस्त आणि बुद्धिमान आहे.
  3. लोकहो, तुम्हावर अल्लाहचे जे उपकार आहेत त्यांची आठवण ठेवा, काय अल्लाहशिवाय एखादा अन्य निर्माता आहे? जो तुम्हाला आकाश आणि पृथ्वीतून उपजीविका देत असेल? कोणी उपास्य त्याच्याखेरीज नाही. मग तुम्ही कोठे भरकटत आहात?
  4. आता जर (हे पैगंबर (स.)) हे लोक तुम्हाला खोटे ठरवतील. (तर ही काही नवीन गोष्ट नाही) तुमच्यापूर्वीदेखील बरेचसे प्रेषित खोटे लेखले गेले आहेत आणि सर्व प्रकरणे सरतेशेवटी अल्लाहकडेच रूजू होणार आहेत.
  5. लोकहो! अल्लाहचे वचन निश्चितपणे सत्य आहे, म्हणून ऐहिक जीवनाने तुमची आत्मवंचना होऊ नये. आणि त्या मोठ्या धोकेबाजानेदेखील तुम्हाला अल्लाहसंबंधी धोका देता कामा नये.
  6. वास्तविकपणे शैतान तुमचा शत्रू आहे म्हणून तुम्हीसुद्धा त्याला आपला शत्रूच माना. तो तर आपल्या अनुयायांना आपल्या मार्गावर यासाठी बोलवित आहे की ते नरकवासियांत समाविष्ट व्हावेत.
  7. जे लोक सत्याचा इन्कार करतील त्यांच्यासाठी कठोर यातना आहेत आणि जे श्रद्धा ठेवतील व सत्कृत्ये करतील त्यांच्यासाठी क्षमा व मोठा मोबदला आहे.
  8. (बरे काही ठाव आहे त्या माणसाच्या पथभ्रष्टतेचा) ज्याच्यासाठी त्याचे दुष्कर्म आकर्षक बनविले गेले आहे आणि तो त्याला चांगले समजत आहे? वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह ज्याला इच्छितो त्याला पथभ्रष्टतेत टाकतो आणि ज्याला इच्छितो त्याला सरळमार्ग दाखवितो, म्हणून (हे पैगंबर (स.)), तुमचा जीव या लोकांसाठी दुःखात व शोकात गमावू नका. जे काही हे करीत आहेत, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.
  9. तो अल्लाहच तर आहे जो वारे प्रवाहित करतो. मग ते ढगांना जोडतात. नंतर आम्ही त्याला एका ओसाड प्रदेशाकडे नेतो आणि त्याद्वारे आम्ही त्या धरतीला नवजीवन देतो जी मृत पडलेली होती, दिवंगत माणसाचे पुनरुत्थान सुद्धा त्याचप्रकारे असेल.
  10. ज्या कोणास प्रतिष्ठा हवी असेल त्याला हे कळावे की सन्मान पूर्णतः अल्लाहचा आहे, त्याच्या येथे जी गोष्ट वर चढते ती केवळ पवित्र वचन आहे आणि सत्कर्म त्याला वर चढविते. उरले ते लोक जे वाईट डावपेच लढवितात त्यांच्यासाठी भयंकर यातना आहे आणि त्यांची कुटिलता स्वतःच नष्ट होणार आहे.
  11. अल्लाहने तुम्हाला मातीपासून निर्माण केले, मग वीर्यापासून. मग तुमच्या जोड्या बनविल्या (म्हणजे पुरुष आणि स्त्री) अल्लाहच्या ज्ञानाबाहेर कोणतीही स्त्री गर्भवतीही होत नाही आणि बाळंतही होत नाही. कोणी आयुष्य प्राप्त करणारा आयुष्य प्राप्त करीत नाही आणि कोणाच्या आयुष्यातही काही घट होत नाही पण हे सर्वकाही एका ग्रंथात लिखित असते. अल्लाहसाठी हे अगदी सोपे काम आहे,
  12. आणि पाण्याचे दोन्ही साठे समान नाहीत, एक गोड आणि तहान भागविणारे, पिण्यास आल्हाददायक; आणि दुसरे भयंकर खारट की घसा सोलून टाकणारे. परंतु दोन्हीपासून तुम्ही ताजे-ताजे मासे प्राप्त करता, वापरण्यासाठी शृंगाराचे साहित्य काढता आणि त्याच पाण्यात तुम्ही पाहता की होड्या पाणी कापीत जात असतात की जेणेकरून तुम्ही अल्लाहचा कृपाप्रसाद शोधावा आणि त्याचे कृतज्ञ बनावे.
  13. तो दिवसामध्ये रात्र आणि रात्रीमध्ये दिवसाला ओवीत आणतो चंद्र आणि सूर्याला त्याने अधीन करून ठेवले आहे. हे सर्वकाही एका ठराविक वेळेपर्यंत चाललेले आहे. तोच अल्लाह (ज्याचे हे सर्व कार्य आहे) तुमचा पालनकर्ता आहे. राज्य त्याचेच आहे. त्याला सोडून ज्या इतरांचा तुम्ही धावा करीत आहात, ते एका कस्पटाचे देखील मालक नाहीत.
  14. त्यांचा धावा केला तर ते तुमची प्रार्थना ऐकू शकत नाहीत आणि ऐकली तरी तिचा तुम्हाला काही प्रतिसाद देऊ शकत नाहीत. आणि पुनरुत्थानाच्या दिवशी ते तुमच्या अनेकेश्वरवादाचा इन्कार करतील. वस्तुस्थितीची अशी अचूक माहिती एका माहितगाराशिवाय इतर कोणीही तुम्हाला देऊ शकत नाही.
  15. लोकहो! तुम्हीच अल्लाहचे गरजवंत आहात आणि अल्लाह तर निरपेक्ष आणि स्तुत्य आहे.
  16. त्याने इच्छिले तर तुम्हाला दूर सारून एखादी नवनिर्मिती तुमच्याऐवजी आणील.
  17. असे करणे अल्लाहला काहीच कठीण नाही.
  18. कोणी ओझे उचलणारा कुणा दुसर्‍याचे ओझे उचलणार नाही. आणि कोणी ओझे लादलेला जीव आपले ओझे उचलण्यासाठी हाक देईल तर त्याच्या ओझ्याचा क्षुल्लक भारदेखील उचलण्याकरिता कोणी येणार नाही मग तो अतिजवळचा नातेवाईक का असे ना. (हे पैगंबर (स.)!) तुम्ही केवळ त्याच लोकांना सावध करू शकता, जे न पाहता आपल्या पालनकर्ताच्या कोपचे भय बाळगतात, आणि नमाज कायम करतात. जो कोणी शुचितेचा अंगिकार करतो, तो स्वतःच्या भल्यासाठीच करतो आणि सर्वांनाच अल्लाहकडे रूजू व्हायचे आहे.
  19. नेत्रहीन व डोळस समान नाहीत
  20. अंधकार व प्रकाशही समान नाहीत,
  21. शीतल सावली व उन्हाची झळ एकसमान नाही.
  22. आणि जिवंत व मृत देखील समान नाहीत. अल्लाह ज्याला इच्छितो ऐकवितो. परंतु (हे पैगंबर (स.)) तुम्ही त्या लोकांना ऐकवू शकत नाही जे कबरीत दफन आहेत.
  23. तुम्ही तर केवळ सावध करणारे आहात.
  24. आम्ही तुम्हाला सत्यानिशी पाठविले आहे. शुभवार्ता देणारा व सावधान करणारा बनवून. आणि कोणताही लोकसमुदाय असा होऊन गेला नाही ज्यात कोणी सावध करणारा आला नाही.
  25. आता जर हे लोक तुम्हाला खोटे ठरवीत असतील, तर यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीदेखील खोटे लेखले आहे. त्यांच्यापाशी त्यांचे पैगंबर, स्पष्ट प्रमाण, संदेश आणि उज्ज्वल आदेश करणारा ग्रंथ घेऊन आले होते.
  26. मग ज्या लोकांनी मान्य केले नाही त्यांना मी पकडले. आणि पाहून घ्या माझी शिक्षा किती कठोर होती.
  27. काय तुम्ही पाहत नाही की अल्लाह आकाशांतून जलवर्षाव करतो. मग त्याद्वारे विविध रंगाची विविध प्रकारची फळे उगवितो. पर्वतामध्ये देखील धवल, तांबडे व गडद काळे भिन्न रंगी पट्टे आढळतात.
  28. याचप्रकारे मनुष्य, जनावरे व प्राणीमात्रांचे रंगसुद्धा भिन्न भिन्न आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहच्या दासांपैकी केवळ ज्ञान राखणारे लोकच त्याचे भय बाळगतात निःसंशय अल्लाह जबरदस्त आणि क्षमाशील आहे.
  29. जे लोक अल्लाहच्या ग्रंथाचे पठन करतात आणि नमाज कायम करतात, आणि जी काही उपजीविका आम्ही त्यांना दिली आहे. त्यातून उघड आणि गुप्तपणे खर्च करतात, निश्चितपणे त्यांना एका अशा व्यापाराची आशा आहे ज्यांत कदापि तोटा होणार नाही.
  30. (या व्यापारात त्यांनी आपले सर्वस्व अशासाठी खर्चिले आहे) जेणेकरून अल्लाहने त्याचा मोबदला पुरेपूर त्यांना द्यावा. आणि आपल्या कृपेने त्यांना अधिक प्रदान करावे. निःसंशय अल्लाह क्षमाशील व गुणग्राहक आहे.
  31. (हे पैगंबर (स.)!) जो ग्रंथ आम्ही तुमच्याकडे दिव्यबोधाद्वारे पाठविला आहे तोच सत्य आहे, सत्यता प्रमाणित करीत आला आहे त्या ग्रंथांची जे त्याच्यापूर्वी आले होते. निःसंशय अल्लाह आपल्या दासांच्या स्थितीची माहिती राखणारा आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणारा आहे.
  32. आम्ही आपल्या दासांपैकी ज्यांना निवडले अशांनाच या ग्रंथाचे उत्तराधिकारी केले. त्यापैकी कोणी स्वतःवर अत्याचार करणारा आहे, आणि कोणी मध्यमार्गी आहे, आणि कोणी अल्लाहच्या परवानगीने सत्कार्यात पुढाकार घेणारा आहे. हाच महान कृपाप्रसाद आहे.
  33. सदैव राहणारे स्वर्ग आहेत ज्यात हे लोक प्रवेश करतील. तेथे यांना सोन्याच्या कंकणांनी व मोत्यांनी शृंगारित केले जाईल. तेथे त्यांचा पोशाख रेशमी असेल,
  34. आणि ते म्हणतील, ’’धन्यवाद त्या अल्लाहला ज्याने आम्हापासून दुःख दूर केले, निःसंशय आमचा पालनकर्ता क्षमाशील व कदर करणारा आहे.
  35. ज्याने आम्हाला आपल्या कृपेने चिरंतन वास्तव्यांच्या ठिकाणी वसविले. आता येथे आम्हाला कुठलाही त्रास सोसावा लागत नाही आणि कसला थकवादेखील येत नाही.
  36. आणि ज्या लोकांनी द्रोह केला त्यांच्याकरिता नरकाचा अग्नी आहे. त्यांना निकालातही काढले जाणार नाही आणि त्यांच्या नरकाच्या शिक्षेतदेखील कोणती कपात केली जाणार नाही. अशाप्रकारे आम्ही मोबदला देत असतो प्रत्येक इसमाला जो सत्याचा इन्कार करणारा आहे.
  37. ते तेथे एकदाच ओरडून म्हणतील, ’’हे आमच्या पालनकर्त्या! येथून आम्हाला बाहेर काढ जेणेकरून आम्ही सत्कृत्ये करू. त्या कृत्यापासून भिन्न जे पूर्वी करीत होतो.’’ (त्यांना उत्तर दिले जाईल) ’’काय आम्ही तुम्हाला इतके आयुष्य दिले नव्हते ज्यात एखाद्याला बोध घ्यायचा असता तर त्याने घेतला असता? आणि तुमच्यापाशी सावध करणारादेखील आला होता. आता चव चाखा, अत्याचार्‍यांचा येथे कोणीही सहायक नाही.’’
  38. निःसंशय अल्लाह आकाश आणि पृथ्वीतील प्रत्येक अदृष्य वस्तूपासून परिचित आहे. तो तर अंतःकरणातील गुप्त रहस्यदेखील जाणतो.
  39. तोच तर आहे ज्याने तुम्हाला पृथ्वीतलावर खलीफा (उत्तराधिकारी) बनविले आहे. आता जो कोणी द्रोह करतो, त्याच्या द्रोहाचे अरिष्ट त्याच्यावरच आहे. आणि अश्रद्धावंतांना त्यांचा द्रोह याव्यतिरिक्त कसलीही वाढ देणार नाही की त्यांच्या पालनकर्त्याचा प्रकोप त्यांच्यावर जास्तीत जास्त भडकत जाईल अश्रद्धावंतांसाठी हानीत वाढीशिवाय कोणतीही वृद्धी नाही.
  40. (हे पैगंबर (स.)) यांना सांगा, ’’कधी तुम्ही पाहिले तरी आहे का आपल्या त्या भागीदारांना ज्यांचा तुम्ही अल्लाहला सोडून धावा करता? मला दाखवा त्यांनी जमिनीत काय निर्माण केले आहे? अथवा आकाशात त्यांची कोणती भागीदारी आहे?’’ (जर हे दाखवू शकत नसतील तर यांना विचारा) ’’आम्ही यांना काही मजकूर लिहून दिला आहे? की ज्याच्या आधारे हे (आपल्या या अनेकेश्वरवादासाठी) एखादे स्पष्ट प्रमाण बाळगत असतील?’’ नाही, किंबहुना हे अत्याचारी एकमेकांना केवळ हुलकावण्या देत आहेत.
  41. वस्तुस्थिती अशी आहे की तो अल्लाहच आहे ज्याने आकाशांना व पृथ्वीला ढळण्यापासून सावरले आहे. आणि जर ते ढळले तर अल्लाहनंतर दुसरा कोणी त्यांना सावरू शकणार नाही. निःसंशय अल्लाह मोठा सहिष्णू आणि क्षमाशील आहे.
  42. हे लोक कठोर शपथा घेऊन घेऊन सांगत असतात की जर एखादा सावध करणारा त्यांच्याकडे आला असता तर हे जगातील इतर प्रत्येक जनसमूहापेक्षा अधिक सरळमार्गी बनले असते. परंतु जेव्हा सावध करणारा यांच्याकडे आला तेव्हा त्याच्या आगमनाने यांच्यात सत्यापासून पळ काढण्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीत वाढ केली नाही.
  43. हे पृथ्वीवर आणखीन जास्तच दुर्वर्तन करू लागले आणि दुष्ट कारस्थाने करू लागले, वास्तविकतः दुष्ट कारस्थाने, ते करणार्‍यांच्याच अंगलट येत असतात. आता काय हे लोक याची प्रतीक्षा करीत आहेत की पूर्वीच्या जनसमूहांशी अल्लाहची जी रीत राहिली आहे तीच यांच्यासाठीसुद्धा अवलंबिली जावी? असेच असेल तर तुम्हाला अल्लाहच्या रीतीत कोणताही बदल आढळणार नाही आणि तुम्ही कधीही पाहणार नाही की अल्लाहच्या शिरस्त्याला त्याच्या ठरलेल्या मार्गापासून एखादी शक्ती वळवू शकेल.
  44. काय या लोकांनी कधी पृथ्वीवर संचार केलेला नाही की जेणेकरून यांना त्या लोकांचा शेवट दिसला असता जे यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत आणि यांच्यापेक्षा फार शक्तीमान होते? पृथ्वी व आकाशांत त्याला कोणतीही गोष्ट नमवू शकत नाही. तो सर्वज्ञ आहे. आणि प्रत्येक गोष्टीवर सामर्थ्य बाळगतो
  45. जर का त्याने लोकांना त्यांच्या केलेल्या कृत्यांवर पकडले असते तर पृथ्वीवर कोणत्याही सजीवाला जिवंत सोडले नसते परंतु तो त्यांना एका निश्चित वेळेपर्यंत अवधी देत आहे, मग जेव्हा त्यांची घटका भरेल तेव्हा अल्लाह आपल्या दासांना बघून घेईल.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post