55. अर् रहमान - ٱلرَّحْمَٰن
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- अत्यंत मेहरबान
- (ईश्वरा) ने कुरआनचे शिक्षण दिले आहे.
- त्यानेच मानवाला निर्माण केले,
- आणि त्याला बोलणे शिकविले.
- सूर्य आणि चंद्र एका हिशेबाने बांधलेले आहेत.
- आणि तारे व वृक्ष सर्व नतमस्तक आहेत.
- आकाशाला त्याने उंच केले आणि संतुलन प्रस्थापित केले.
- याची निकड अशी आहे की तुम्ही संतुलन बिघडऊ नका.
- न्यायपूर्ण रीतीने ठीकठीक वजन करा आणि तराजूने तोलताना वजन कमी करू नका.
- पृथ्वीला त्याने संपूर्ण प्राणिमात्रासाठी बनविले
- त्यात हरतर्हेची विपुल चवदार फळे आहेत. खजुरीचे वृक्ष आहेत ज्याची फळे वेष्टनात गुंडाळलेली आहेत.
- वेगवेगळी धान्ये आहेत ज्यात भुसाही असतो आणि दाणेसुद्धा.
- तर हे जिन्न व मानव तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या देणग्यांचा इन्कार कराल?
- मानवाला त्याने चिखलमातीपासून बनविले
- आणि जिन्नला अग्नीच्या ज्वालापासून निर्माण केले.
- मग हे जिन्न व मानव, तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या सामर्थ्य-आश्चर्यांना खोटे ठरवाल?
- दोन्ही पूर्व आणि दोन्ही पश्चिम, सर्वांचा स्वामी व पालनकर्ता तोच आहे.
- मग हे जिन्न आणि मानव, तुम्ही आपल्या पालनकर्त्याची कोणकोणती सामर्थ्ये खोटी ठरवाल?
- दोन समुद्रांना त्याने सोडले की ते परस्परात मिळावे
- तरीपण त्यांच्या दरम्यान एक पडदा आड आहे ज्याचे उल्लंघन ते करीत नाहीत,
- मग हे जिन्न आणि मानव, तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या सामर्थ्याच्या कोणकोणत्या चमत्कारांना खोटे ठरवाल?
- या समुद्रातून मोती आणि प्रवाळ निघतात.
- तर हे जिन्न आणि मानव, तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या सामर्थ्यांच्या कोणकोणत्या वैशिष्ट्यांना खोटे ठरवाल?
- आणि ही जहाजे त्याचीच आहेत, जी समुद्रात पर्वतासमान उंच गेलेली आहेत,
- म्हणून हे जिन्न व मानव, तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना नाकाराल?
- प्रत्येक वस्तू जी या पृथ्वीवर आहे लोप पावणारी आहे
- आणि तुझ्या पालनकर्त्याचे प्रतापी आणि उदार रूपच तेवढे बाकी राहणार आहे.
- मग हे जिन्न व मानव, तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या खुबींना खोटे ठरवाल?
- पृथ्वी व आकाशात जे जे कोणी आहेत सर्वजण आपल्या गरजा त्याच्याकडेच मागत आहेत. प्रत्येक क्षणी त्याचे वैभव नवनवीनच.
- मग हे जिन्न व मानव, तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या स्तुत्य गुणांना खोटे ठरवाल?
- हे धरणीच्या भारांनो, लवकरच आम्ही तुमची विचारणा करण्यासाठी मोकळे होत आहोत,
- (मग पाहून घेऊ की) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरविता.
- हे जिन्न व मानव समूहांनो, जर तुम्ही पृथ्वी व आकाशांच्या सरहद्दीतून निघू शकत असाल तर निघून पहा. नाही जाऊ शकत. त्याच्याकरिता मोठे बळ हवे आहे.
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या सामर्थ्यांना तुम्ही खोटे ठरवाल?
- (पळ काढण्याचा प्रयत्न केला तर) तुमच्यावर अग्नीज्वाळा व धूर सोडले जातील ज्याचा मुकाबला तुम्ही करू शकणार नाही.
- हे जिन्न व मानव, तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या सामर्थ्यांचा इन्कार कराल?
- मग (काय बेतेल त्यावेळी) जेव्हा आकाश फाटेल आणि लाल कातड्याप्रमाणे तांबडा होईल?
- हे जिन्न व मानव (त्यावेळी) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या सामर्थ्यांना खोटे ठरवाल?
- त्या दिवशी कोणत्याही मानव आणि जिन्नला त्याचा गुन्हा विचारण्याची गरज भासणार नाही.
- मग (पाहून घेतले जाईल की) तुम्ही दोन्ही समूह आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना नाकारता?
- गुन्हेगार तेथे आपल्या चेहर्यावरून ओळखून घेतले जातील आणि त्यांना कपाळाचे केस आणि पाय धरधरून फरफटले जाईल.
- (त्यावेळी) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या सामर्थ्यांना खोटे लेखाल?
- (त्यावेळी सांगितले जाईल) हा तोच नरक आहे ज्यास गुन्हेगार खोटे ठरवीत असत
- त्याच नरक व उकळत्या पाण्यादरम्यान ते भ्रमण करीत राहतील.
- मग आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या सामर्थ्यांना तुम्ही खोटे ठरवाल?
- आणि त्या प्रत्येक इसमासाठी जो आपल्या पालनकर्त्याच्या पुढे पेश होण्याची भीती बाळगत असेल. दोन उद्याने आहेत.
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल?
- हिरव्यागार शाखांनी भरपूर.
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल?
- दोन्ही उद्यानांत दोन झरे प्रवाहित.
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल?
- दोन्ही उद्यानांत प्रत्येक फळाचे दोन प्रकार.
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल?
- जन्नती लोक अशा बिछाईतीवर लोड लावून बसतील ज्यांचे अस्तर दाट रेशमाचे असेल आणि उद्यानाच्या (झाडांच्या) शाखा फळांनी वाकल्या जात असतील,
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल.
- या ऐश्वर्यादरम्यान लाजाळू नजरवाल्या असतील, ज्यांना या स्वर्गस्थ लोकांच्या अगोदर कधी कोणा मानवाने अथवा जिन्नाने स्पर्श केलेला नसेल,
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल?
- अशा सुंदर जणू हिरे आणि मोती,
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना खोटे ठरवाल?
- सदाचाराचा बदला सदाचाराव्यतिरिक्त काय बरे असू शकतो?
- तर हे जिन्न व मानव, आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या प्रशंसनीय गुणांचा तुम्ही इन्कार कराल?
- आणि त्या दोन उद्यानांशिवाय दोन उद्याने आणखीन असतील.
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल?
- टवटवीत हिरवी गडद उद्याने.
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल?
- दोन्ही उद्यानांत दोन झरे कारंजाप्रमाणे उसळत असलेले.
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल?
- त्यांत विपुल फळे आणि खजुरी व डाळिंबे.
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल?
- या ऐश्वर्यांच्या दरम्यान सुचरित्र आणि सुस्वरूप पत्नीं.
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल?
- तंबूत ठेवल्या गेलेल्या अप्सरा.
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल?
- या स्वर्गस्थ लोकांपूर्वी कधी कोणा मानवाने अथवा जिन्नने त्यांना स्पर्श केलेला नसेल.
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या देणग्यांना तुम्ही खोटे ठरवाल?
- ते स्वर्गस्थ लोक हिरवे गालीचे आणि सुंदर व दुर्मिळ बिछान्यांवर तक्के लावून बसतील.
- आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल?
- अत्यंत समृद्धशाली आहे तुझ्या प्रतापी व उदार पालनकर्त्याचे नाव.