49. अल् हुजुरात - ٱلْحُجُرَات
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- हे लोकहो, ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या पुढे पाऊल टाकू नका आणि अल्लाहच्या कोपचे भय बाळगा, अल्लाह सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.
- हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, आपला आवाज नबी (स.) च्या आवाजापेक्षा उंच करू नका, आणि नबी (स.) बरोबर उंच आवाजाने बोलूसुद्धा नका ज्याप्रमाणे तुम्ही आपापसांत एकमेकांशी बोलता, एखादे वेळी असे होऊ नये की तुम्ही केले सवरलेले सर्व वाया जावे आणि तुम्हाला कळूसुद्धा नये.
- हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, आपला आवाज नबी (स.) च्या आवाजापेक्षा उंच करू नका, आणि नबी (स.) बरोबर उंच आवाजाने बोलूसुद्धा नका ज्याप्रमाणे तुम्ही आपापसांत एकमेकांशी बोलता, एखादे वेळी असे होऊ नये की तुम्ही केले सवरलेले सर्व वाया जावे आणि तुम्हाला कळूसुद्धा नये.
- हे पैगंबर (स.), जे लोक तुम्हाला घराच्या बाहेरून हाका मारतात; त्यापैकी बहुतेक जण निर्बुद्ध आहेत.
- जर त्यांनी तुमच्या बाहेर येण्यापर्यंत धीर धरला असता तर त्यांच्यासाठी उत्तम होते, अल्लाह क्षमा करणारा व परमदयाळू आहे.
- हे लोकहो, ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे जर कुणी अवज्ञाकारी तुमच्यापाशी एखादी बातमी घेऊन आला तर चौकशी करून घेत चला. एखाद्या वेळी असे घडू नये की तुम्ही एखाद्या समूहाला न कळत हानी पोहचवावी आणि मग आपल्या कृतीवर पश्चात्ताप करावा.
- चांगले जाणून असा की तुमच्या दरम्यान अल्लाहचा पैगंबर हजर आहे जर बर्याचशा मामल्यात तो तुमचे म्हणणे ऐकत राहिला तर तुम्ही स्वतःच अडचणीत सापडाल, परंतु अल्लाहने तुम्हाला श्रद्धेचे प्रेम दिले आणि त्याला तुमच्यासाठी मनपसंत बनविले, आणि द्रोह व मर्यादाउल्लंघन आणि अवज्ञेचा तुम्हाला तिटकारा आणला आहे.
- असलेच लोक अल्लाहच्या कृपेने व उपकाराने सन्मार्गी आहेत, आणि अल्लाह सर्वज्ञ व बुद्धिमान आहे.
- आणि जर श्रद्धावंतांपैकी दोन गट परस्परांशी लढलेच तर त्यांच्या दरम्यान समेट घडवून आणा, मग जर त्यांच्यापैकी एका गटाने दुसर्या गटाची आगळिकी केली तर आगळिकी करणार्याशी लढा येथपावेतो की तो अल्लाहच्या आदेशाकडे परत येईल, मग जर तो परत आला तर त्यांच्या दरम्यान न्यायाने समेट करा आणि न्याय करा, अल्लाह न्याय करणार्यांना पसंत करतो.
- श्रद्धावंत तर एक दुसर्याचे भाऊ आहेत, म्हणून आपल्या भावांच्या दरम्यान संबंध सुरळीत करा आणि अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा, आशा आहे की तुमच्यावर दया केली जाईल.
- हे लोकहो, ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, पुरुषांनी दुसर्या पुरुषांची टिंगल उडवू नये, शक्य आहे की ते त्यांच्यापेक्षा उत्तम असतील, आणि स्त्रियांनीसुद्धा दुसर्या स्त्रियांची टिंगल उडवू नये, शक्य आहे की त्या त्यांच्यापेक्षा उत्तम असतील. आपापसांत एकमेकांना टोमणे मारू नका आणि एकमेकांचा उल्लेख वाईट नावानेही करू नका. श्रद्धा ठेवल्यानंतर दुराचारांत नाव मिळविणे फार वाईट गोष्ट आहे. जे लोक या वर्तनापासून परावृत्त होत नसतील ते अत्याचारी होत.
- हे लोकहो, ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अधिक शंका घेण्यापासून दूर रहा कारण काही बाबतीत कुतर्क करणे हे पाप आहे. हेरगिरी करू नका. आणि तुमच्यापैकी कुणीही कुणाची चहाडी करू नये. काय तुमच्यापैकी एखादा असा आहे की जो आपल्या मृत भावाचे मांस खाणे पसंत करील? पहा, तुम्हा स्वतःला याची घृणा वाटेल अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा, अल्लाह मोठा पश्चात्ताप स्वीकारणारा आणि परम कृपाळू आहे.
- लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.
- हे बदावी (ग्रामीण अरब) म्हणतात, ’’आम्ही श्रद्धा ठेवली.’’ यांना सांगा, तुम्ही श्रद्धा ठेवली नाही, तर असे म्हणा, ’’आम्ही समर्पित झालो.’’ श्रद्धा अद्याप तुमच्या हृदयात दाखल झालेली नाही जर तुम्ही अल्लाहआणि त्याचे पैगंबर (स.) यांची आज्ञाधारकता स्वीकारली तर तो तुमच्या कर्म मोबदल्यात कोणतीही कमतरता करणार नाही. खचितच अल्लाह मोठा क्षमाशील आणि परमकृपाळू आहे.
- खरोखर श्रद्धावंत तर ते आहेत ज्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर श्रद्धा ठेवली, मग त्यांनी कोणतीही शंका ठेवली नाही आणि आपले प्राण व धनसंपत्तीनिशी अल्लाहच्या मार्गात पराकाष्ठा (जिहाद) केली तेच खरे लोक होत.
- हे पैगंबर (स.), यांना (श्रद्धेच्या दावेदारांना) सांगा, काय तुम्ही अल्लाहला आपल्या धर्माची खबर देत आहात? वस्तुतः अल्लाह पृथ्वी आणि आकाशांच्या प्रत्येक वस्तूला जाणतो आणि त्याला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आहे.
- हे लोक तुमच्यावर उपकार दर्शवितात की त्यांनी इस्लामचा स्वीकार केला. यांना सांगा, आपल्या इस्लामचे उपकार माझ्यावर लादू नका, तर अल्लाह तुमच्यावर आपले उपकार ठेवतो की त्याने तुम्हाला श्रद्धेची सुबुद्धी दिली, जर खरोखर तुम्ही आपल्या श्रद्धेच्या दाव्यांत खरे असाल.
- अल्लाहला पृथ्वी व आकाशातील प्रत्येक गुप्त गोष्टीचे ज्ञान आहे आणि जे काही तुम्ही करीत असता ते सर्वकाही त्याच्या दृष्टीत आहे.