29. अल् अनकबूत - ٱلْعَنْكَبُوت
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
1.
अलिफ लाऽऽम मीऽऽम.
2.
काय लोक असे समजून बसले आहेत की त्यांना केवळ इतके म्हटल्यावर
सोडून दिले जाईल की, ’’आम्ही श्रद्धा ठेवली.’’
आणि त्यांना अजमाविले जाणार नाही?
3.
वस्तुतः आम्ही त्या सर्व लोकांची परीक्षा घेतली आहे जे यांच्यापूर्वी
होऊन गेले आहेत. अल्लाहला तर हे अवश्य पाहावयाचे आहे की खरे कोण आहेत आणि खोटे कोण.
4.
आणि काय ते लोक जी वाईट कृत्ये करीत आहे हे समजून बसले आहेत,
की ते आम्हावर मात करतील? मोठे चुकीचे अनुमान आहे जो ते लावीत आहेत.
5.
जो कोणी अल्लाहशी भेट होण्याची अपेक्षा बाळगतो (त्याला माहीत
व्हावे की) अल्लाहने निश्चित केलेली वेळ येणारच आहे, आणि अल्लाह सर्वकाही ऐकतो व जाणतो.
6.
जो कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा करील, स्वतःच्याच कल्याणाकरिता करील. अल्लाह निश्चितच जगवासियांपासून
निरपेक्ष आहे.
7.
आणि जे लोक श्रद्धा ठेवतील आणि सत्कृत्ये करतील त्यांच्यातील
वाईट आम्ही दूर करू आणि त्यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट कृत्यांचा मोबदला देऊ.
8.
आम्ही मानवाला आदेश दिला की त्याने आपल्या आईवडिलांशी सद्व्यवहार
करावा. परंतु जर त्यांनी तुझ्यावर दबाव आणला की तू माझ्याबरोबर एखाद्या अशा (उपास्या)
ला भागीदार ठरवावे ज्याला तू (माझा भागीदार म्हणून) जाणत नाहीस तर त्यांची आज्ञा पाळू
नकोस. माझ्याकडेच तुम्हा सर्वांना परतून यावयाचे आहे. मग मी तुम्हाला दाखवीन की तुम्ही
काय करीत राहिला आहात.
9.
आणि ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली असेल व ज्यांनी सत्कृत्ये केली
असतील, त्यांना आम्ही जरूर सदाचारींमध्ये
समाविष्ट करू.
10.
लोकांपैकी कोणी असा आहे जो म्हणतो की आम्ही श्रद्धा ठेवली अल्लाहवर
परंतु जेव्हा तो अल्लाहच्या बाबतीत सताविला गेला तेव्हा लोकांनी घेतलेल्या परीक्षेला
त्याने अल्लाहच्या प्रकोपाप्रमाणे लेखले. आता जर तुझ्या पालनकर्त्याकडून विजय व सहाय्य
आले तर हाच मनुष्य सांगेल की, ’’आम्ही तर तुमच्याबरोबर
होतो.’’ काय जगवासियांची मनःस्थिती अल्लाहला चांगल्याप्रकारे माहीत नाही?
11.
आणि अल्लाहला तर हे अवश्य पाहावयाचे आहे की श्रद्धावंत कोण आहेत
आणि दांभिक कोण?
12.
हे अश्रद्धावंत लोक श्रद्धावंतांना म्हणतात की, तुम्ही आमच्या पद्धतीचे अवलंब करा आणि तुमचे अपराध
आम्ही आमच्यावर घेऊ. वस्तुतः त्यांच्या अपराधांपैकी ते काहीही आपल्यावर घेणार नाहीत.
ते अगदी खोटे बोलत आहेत.
13.
होय, अवश्य ते आपले ओझेही
उचलतील आणि आपल्या ओझ्याबरोबरच अन्य बरेचसे ओझेसुद्धा. आणि पुनरुत्थानाच्या दिवशी निश्चितच
त्या कुभांड रचण्याविषयी त्यांची विचारणा होईल, जे ते करीत राहिले आहेत.
14.
आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले आणि तो पन्नास
कमी एक हजार वर्षे त्यांच्यामध्ये राहिला सरतेशेवटी त्या लोकांना वादळाने येऊन घेरले
या स्थितीत की ते अत्याचारी होते.
15.
मग नूह (अ.) ला आणि गलबतवाल्यांना आम्ही वाचविले आणि त्याला
जगवासियांसाठी बोधप्रत संकेत बनवून ठेवले.
16.
आणि इब्राहीम (अ.) ला पाठविले जेव्हा त्याने आपल्या लोकसमूहाला
सांगितले, ’’अल्लाहची भक्ती करा व त्याचे
भय बाळगा. हे तुमच्यासाठी उत्तम आहे जर तुम्ही जाणले.
17.
तुम्ही अल्लाहला सोडून ज्यांची पूजा करीत आहात ते केवळ पुतळे
आहेत आणि तुम्ही एक असत्य घडवीत आहात, वास्तविकतः अल्लाहशिवाय ज्यांची तुम्ही उपासना करता ते तुम्हाला कोणतीही उपजीविका
देण्याची ऐपत बाळगत नाहीत. अल्लाहजवळ उपजीविका मागा आणि त्याचीच भक्ती करा आणि त्याच्याप्रती
कृतज्ञता दाखवा आणि त्याच्याकडेच तुम्ही परतविले जाणार आहात.
18.
आणि जर तुम्ही खोटे ठरवीत असाल तर तुमच्यापूर्वी अनेक लोकसमुदायांनी
खोटे ठरविले आहे. आणि पैगंबर (स.) वर स्पष्टपणे संदेश पोहचविण्याशिवाय अन्य कोणतीही
जबाबदारी नाही.
19.
काय या लोकांनी कधी पाहिलेच नाही की कशाप्रकारे अल्लाह सृष्टीचा
प्रारंभ करतो मग त्याची पुनरावृत्ती करतो? खचितच ही (पुनरावृत्ती तर) अल्लाहसाठी अधिक सुलभ आहे.
20.
यांना सांगा की भूतलावर हिंडा, फिरा आणि पहा की त्याने कशाप्रकारे सृष्टीचा प्रारंभ केला आहे.
मग अल्लाह दुसर्यांदादेखील जीवन प्रदान करील. निश्चितच अल्लाह प्रत्येक गोष्टीला समर्थ
आहे,
21.
वाटेल त्याला शिक्षा करील व वाटेल त्यावर कृपा करील. त्याच्याकडेच
तुम्ही वळविले जाणार आहात.
22.
तुम्ही भूतलावरही विवश करणारे नाही व आकाशांतसुद्धा नाही. आणि
अल्लाहपासून वाचविणारा कोणी रक्षक आणि सहायक तुमच्यासाठी नाही.
23.
ज्या लोकांनी अल्लाहच्या संकेतांचा आणि त्याच्या भेटीचा इन्कार
केला आहे ते माझ्या कृपेसंबंधी निराश झाले आहेत, आणि त्यांच्यासाठी यातनादायक शिक्षा आहे.
24.
मग इब्राहीम (अ.) च्या लोकांचे उत्तर याशिवाय अन्य काहीही नव्हते
की, ते म्हणाले, ’’ठार करा याला अथवा जाळून टाका याला’’ सरतेशेवटी
अल्लाहने त्याला अग्नीपासून वाचविले, निश्चितपणे यात संकेत आहेत त्या लोकांसाठी जे श्रद्धा ठेवणारे आहेत.
25.
आणि त्याने सांगितले, ’’तुम्ही ऐहिक जीवनात तर अल्लाहला सोडून मूर्तींना आपल्यादरम्यान
प्रेमाचे साधन बनविले आहे, पण पुनरुत्थानाच्या
दिवशी तुम्ही एकमेकाचा इन्कार आणि एक दुसर्याचा धिक्कार कराल, आणि अग्नी तुमचे ठिकाण असेल, आणि कोणी तुमचा सहायक नसेल.’’
26.
त्यावेळी लूत (अ.) ने त्याला मानले, आणि इब्राहीम (अ.) ने सांगितले, ’’मी माझ्या पालनकर्ताकडे देशांतर करतो. तो जबरदस्त आहे आणि बुद्धिमान
आहे.
27.
आणि आम्ही त्याला इसहाक (अ.) व याकूब (अ.) (सारखी संतती) प्रदान
केली आणि त्यांच्या वंशात प्रेषितत्व आणि ग्रंथ ठेवले व त्यांना जगात त्याचा मोबदला
दिला आणि मरणोत्तर जीवनामध्ये तो निश्चितपणे सदाचार्यांपैकी असेल.
28.
आणि आम्ही लूत (अ.) ला पाठविले. तो आपल्या लोकांना म्हणाला,
’’तुम्ही तर ते अश्लील कृत्य करता जे तुमच्यापूर्वी
जगातील लोकांपैकी कोणीच केलेले नाही.
29.
काय तुमची ही अवस्था आहे की पुरुषाजवळ जाता,
आणि वाटमारी करता व आपल्या सभेत वाईट कृत्ये करता?’’
मग कोणतेही उत्तर त्याच्या लोकांपाशी याशिवाय नव्हते
की त्यांनी सांगितले, ’’घेऊन ये अल्लाहचा
कोप जर तू खरा असशील.’’
30.
लूत (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या पालनकर्त्या, या उपद्रवी लोकांच्याविरूद्ध मला सहाय्य कर.’’
31.
आणि जेव्हा आमचे दूत इब्राहीम (अ.) जवळ सुवार्ता घेऊन पोहचले
तेव्हा त्यांनी त्याला सांगितले, ’’आम्ही या वस्तीच्या
लोकांना नष्ट करणार आहोत. या वस्तीचे लोक भयंकर अन्यायी बनलेले आहेत.’’
32.
इब्राहीम (अ.) ने सांगितले, ’’तेथे तर लूत उपस्थित आहे.’’ त्यांनी सांगितले, ’’आम्ही चांगले जाणतो की तेथे कोण कोण आहेत.’’ आम्ही
वाचविले त्याला व त्याच्या कुटुंबियांना त्याच्या पत्नीला वगळून, त्याची पत्नी मागे राहणार्यांपैकी होती.
33.
मग जेव्हा आमचे दूत, लूत (अ.) पाशी पोहचले तेव्हा तो त्यांच्या आगमनाने अत्यंत अस्वस्थ
व तंगहृदयी बनला, त्यांनी सांगितले,
’’भिऊ नका व दुःखदेखील करू नका. आम्ही तुम्हाला व
तुमच्या कुटुंबियांना वाचवू, तुमच्या पत्नीखेरीज
की जी मागे राहणार्यांपैकी आहे.
34.
आम्ही या वस्तीतील लोकांवर आकाशांतून प्रकोप कोसळविणार आहोत
त्या दुराचाराबद्दल जे हे करीत राहिले आहेत.’’
35.
आणि आम्ही त्यावस्तीची एक उघड खूण ठेवली आहे, त्या लोकांसाठी जे बुद्धीचा वापर करतात.
36.
आणि आम्ही मदयनकडे त्यांचे भाऊ शूऐब (अ.) ला पाठविले. त्याने
सांगितले, ’’हे माझ्या लोकांनो,
अल्लाहची भक्ती करा आणि अंतिम दिनाचे भय बाळगा आणि
पृथ्वीवर उपद्रवी बनून अतिरेक करीत फिरू नका.’’
37.
परंतु त्यांनी त्याला खोटे ठरविले. सरतेशेवटी एका भयंकर भूकंपाने
त्यांना गाठले आणि ते आपल्या घरांत पडले ते पडूनच राहिले.
38.
आणि आद व समूद लोकांना आम्ही नष्ट केले. तुम्ही ती स्थळे पाहिली
आहेत जेथे ते राहात होते. त्यांच्या कृत्यांना शैतानाने त्यांच्यासाठी शोभिवंत बनविले
आणि त्यांना सन्मार्गापासून दूर केले, वास्तविकतः ते सुज्ञ होते.
39.
आणि कारून, फिरऔन व हामान यांना
आम्ही नष्ट केले. मूसा (अ.) त्यांच्याजवळ उज्ज्वल संकेत घेऊन आला परंतु पृथ्वीवर त्यांनी
आपल्या मोठेपणाचा अहंकार केला, वास्तविकतः ते मात
करू शकणारे नव्हते.
40.
सरतेशेवटी आम्ही प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्यांत पकडले. मग
त्यांच्यापैकी कुणावर आम्ही दगडांचा वर्षाव करणारे झंझावात पाठविले आणि कुणाला भयंकर
स्फोटाने गाठले तर कुणाला आम्ही जमिनीत धसविले आणि कुणाला बुडवून टाकले. अल्लाह त्यांच्यावर
अत्याचार करणारा नव्हता पण ते स्वतःच आपल्यावर अत्याचार करीत होते.
41.
ज्या लोकांनी अल्लाहला सोडून इतरांना वाली बनविले आहे,
त्यांचे उदाहरण कोळ्यासारखे आहे, जो आपले एक घर बनवितो आणि सर्व घरांपेक्षा जास्त
दुर्बल कोळ्याचे घरच असते. यांना ज्ञान असते तर!
42.
हे लोक अल्लाहला सोडून ज्या कोणा वस्तूचा धावा करतात,
अल्लाह त्याला चांगलेच जाणतो आणि तोच जबरदस्त आणि
बुद्धिमान आहे.
43.
ही उदाहरणे आम्हीं लोकांच्या प्रबोधनासाठी देत असतो,
परंतु यांना तेच लोक समजतात जे ज्ञान बाळगणारे आहेत.
44.
अल्लाहने आकाशांना व पृथ्वीला सत्याधिष्ठित निर्माण केले आहे.
वस्तुतः यात एक संकेत आहे श्रद्धावंतांसाठी.
45.
हे पैगंबर (स.), पठन करा या ग्रंथाचे जो तुमच्याकडे दिव्यबोधद्वारे पाठविला गेला आहे आणि नमाज कायम
करा, निश्चितच नमाज, अश्लील व अपकृत्यांपासून रोखते आणि अल्लाहचे स्मरण
याहूनही मोठी गोष्ट आहे. अल्लाह जाणतो तुम्ही लोक जे काही करता.
46.
आणि ग्रंथधारकांशी वाद घालू नका परंतु उत्तम रीतीने,
त्या लोकांखेरीज जे त्यांच्यापैकी अन्यायी असतील
आणि त्यांना सांगा, ’’आम्ही श्रद्धा ठेवली
आहे त्या वस्तूवरही जी आमच्याकडे पाठविली गेली आहे आणि त्या वस्तुवरदेखील जी तुमच्याकडे
पाठविली गेली होती, आमचा ईश्वर तुमचा
ईश्वर एकच आहे आणि आम्ही त्याचेच (आज्ञाधारक) मुस्लिम आहोत.’’
47.
(हे पैगंबर (स.)) आम्ही याप्रमाणेच तुमच्याकडे ग्रंथ अवतरला आहे,
म्हणून ते लोक ज्यांना आम्ही पूर्वी ग्रंथ दिला
होता ते यावर श्रद्धा ठेवतात. आणि या लोकांपैकीदेखील बरेचसे यावर श्रद्धा ठेवीत आहेत
आणि आमच्या संकेतांचा इन्कार केवळ अश्रद्धावंतच करतात.
48.
हे पैगंबर (स.), तुम्ही यापूर्वी कोणतेही ग्रंथ वाचतही नव्हता आणि आपल्या हातांनी लिहीतही नव्हता.
जर असे असते तर असत्यवादी शंकेत पडू शकत होते.
49.
वस्तुतः हे उज्ज्वल संकेत आहेत त्या लोकांच्या अंतःकरणात ज्यांना
ज्ञान प्राप्त केले गेले आहे, आणि आमच्या संकेतांचा
इन्कार करीत नाहीत परंतु ते, जे अन्यायी आहेत.
50.
हे लोक म्हणतात, ’’का उतरविले गेले नाहीत या व्यक्तीवर संकेतचिन्हे याच्या पालनकर्त्याकडून?’’
सांगा, ’’संकेतचिन्हे तर अल्लाहपाशी आहेत आणि मी केवळ सावध करणारा आहे
उघडपणे.’’
51.
आणि काय या लोकांसाठी हे संकेतचिन्ह पुरेसे नाही की आम्ही तुमच्यावर
ग्रंथ अवतरला जो यांना वाचून दाखविला जातो? वास्तविक पाहता यात जे लोक श्रद्धा ठेवतात त्या लोकांकरिता कृपा
आणि उपदेश आहे.
52.
(हे पैगंबर (स.)) सांगा की, ’’माझ्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाह साक्षीकरिता पुरेसा आहे.
तो आकाशांतील व पृथ्वीवरील सर्वकाही जाणतो. जे लोक असत्याला मानतात आणि अल्लाहशी द्रोह
करतात तेच तोट्यात राहणारे आहेत.’’
53.
हे लोक तुमच्याकडे प्रकोप लवकर आणण्याची मागणी करतात. जर प्रकोपाची
एक वेळ निश्चित केली गेली नसती तर यांच्यावर प्रकोप आला असता. आणि निश्चितच (ठरल्या
वेळी) तो येणारच, अशा परिस्थितीत अकस्मातपणे
की यांना पत्ताही लागणार नाही
54.
हे लोक तुमच्यापाशी प्रकोप लवकर आणण्याची मागणी करतात,
वस्तुतः नरकाने या अश्रद्धावंतांना विळखा घातला
आहे.
55.
(आणि यांना कळून चुकेल) त्या दिवशी जेव्हा प्रकोपाने यांना वरूनही
आच्छादिले असेल आणि पायाखालूनदेखील, आणि सांगेल, की आता चाखा चव त्या
कृत्यांची जी तुम्ही करीत होता.
56.
हे माझ्या दासांनो, ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, माझी भूमी विशाल आहे,
म्हणून तुम्ही माझीच भक्ती करीत राहा.
57.
प्रत्येक सजीवाला मृत्यूचा आस्वाद घ्यावा लागणार आहे. मग तुम्ही
सर्व आमच्याकडेच परतवून आणले जाणार आहात
58.
ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आहे आणि ज्यांनी सत्कृत्ये केली
आहेत, त्यांना आम्ही स्वर्गाच्या
उच्च व बुलंद इमारतीत ठेवू ज्यांच्याखालून कालवे वाहात असतील. तेथे ते सदैव राहतील,
किती छान मोबदला आहे कर्म करणार्यांसाठी –
59.
त्या लोकांकरिता ज्यांनी संयम राखला आहे, आणि जे लोक आपल्या पालनकर्त्यावर विश्वास ठेवतात.
60.
कित्येक जनावरे आहेत जी आपले अन्न घेऊन फिरत नाहीत. अल्लाह त्यांना
अन्न देतो आणि तुमचादेखील अन्नदाता तोच आहे. तो सर्वकाही ऐकतो व जाणतो.
61.
जर तुम्ही या लोकांना विचारले की पृथ्वी आणि आकाशांना कोणी निर्माण
केले आहे, आणि चंद्र व सूर्याला कोणी
अधीन केले आहे तर अवश्य म्हणतील की अल्लाहने,मग कोठून हे फसगत करून घेत आहेत? अल्लाहच आहे
62.
जो आपल्या दासांपैकी ज्याची इच्छितो उपजीविका विपुल करतो व ज्याची
इच्छितो संकुचित करतो. निश्चितच अल्लाह प्रत्येक गोष्ट जाणणारा आहे.
63.
आणि जर तुम्ही यांना विचारले, कोणी आकाशांतून पाणी वर्षविले आणि त्याद्वारे मृत पडलेल्या जमिनीला
जिवंत केले तर ते अवश्य म्हणतील, अल्लाहने. सांगा,
स्तुती अल्लाहसाठीच आहे, परंतु यांच्यापैकी बहुतेकजण समजत नाहीत.
64.
आणि हे लौकिक जीवन काही नाही परंतु एक खेळ आणि मनोरंजन. वास्तविक
जीवनाचे घर तर पारलौकिक घर आहे, हाय, या लोकांनी जाणिले असते
65.
जेव्हा हे लोक नावेत स्वार होतात तेव्हा आपला धर्म अल्लाहकरिताच
निखालस ठेवून त्याची विनवणी करतात, मग जेव्हा तो यांना
वाचवून खुष्कीवर आणतो तेव्हा अकस्मात हे अनेकेश्वरवाद करू लागतात
66.
जेणेकरून अल्लाहने दिलेल्या सुटकेबद्दल त्याच्याशी कृतघ्नता
दाखवितात आणि (लौकिक जीवनाची) मौज लुटतात. लवकरच यांना कळून चुकेल.
67.
काय हे पाहात नाहीत की आम्ही एक शांतीपूर्ण ’हरम’ बनविले आहे.
वास्तविक पाहता यांच्या सभोवती लोक खेचून नेले जात आहेत. तरीसुद्धा हे लोक असत्याला
मानतात व अल्लाहच्या देणगीशी कृतघ्नता दाखवितात?
68.
त्या व्यक्तीपेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल जी अल्लाहशी खोटेनाटे
रचीत असेल अथवा सत्याला खोटे ठरवीत असेल जेव्हा ते त्याच्या समक्ष आले असेल?
अशा अश्रद्धावंतांचे ठिकाण नरकच नाही काय?
69.
जे लोक आमच्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील त्यांना आम्ही
आमचे मार्ग दाखवू आणि निश्चितच अल्लाह सत्कमर्च्यिच समवेत आहे.