44. अद् दुख्खान - ٱلدُّخَان
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- हामीऽऽम.
- शपथ आहे या उज्ज्वल ग्रंथाची
- की आम्ही याला एका अत्यंत कल्याणकारी व समृद्धशाली रात्री अवतरला आहे. कारण आम्ही लोकांना सावध करण्याचा इरादा बाळगत होतो.
- ही ती रात्र होती ज्यात प्रत्येक मामल्याचा विवेकपूर्ण निर्णय
- आमच्या आज्ञेने सादर केला जातो. आम्ही एक प्रेषित पाठविणार होतो,
- तुझ्या पालनकर्त्याची कृपा म्हणून, निश्चितपणे तोच सर्वकाही ऐकणारा आणि जाणणारा आहे,
- आकाशांचा व पृथ्वीचा पालनकर्ता आणि त्या प्रत्येक वस्तूचा पालनकर्ता जी आकाशांच्या व पृथ्वीच्या दरम्यान आहे, जर तुम्ही लोक खरोखर विश्वास बाळगणारे असाल.
- कोणीही त्याच्याव्यतिरिक्त उपास्य नाही, तोच जीवन प्रदान करतो आणि तोच मृत्यू देतो. तुमचा पालनकर्ता आणि तुमच्या त्या पूर्वजांचा पालनकर्ता जे पूर्वी होऊन गेले आहेत.
- (परंतु खरे पाहता या लोकांना विश्वास नाही) तर हे आपल्या शंकेत ग्रस्त, खेळत आहेत.
- ठीक, तर प्रतीक्षा करा त्या दिवसाची जेव्हा स्पष्ट धूरासमान असलेले आकाश येईल
- आणि ते लोकांवर पसरेल, ही आहे यातनादायक शिक्षा.
- (आता म्हणतात की), ’’हे पालनकर्त्या, आम्हावरून हा प्रकोप दूर कर, आम्ही श्रद्धा ठेवतो.’’
- यांची गफलत कुठली दूर होते? यांची स्थिती तर अशी आहे की यांच्याजवळ तेजस्वी प्रेषित आला,
- तरीसुद्धा हे त्याच्याकडे वळले नाहीत आणि म्हटले की, ’’हा तर शिकविलेला-पढविलेला वेडसर आहे.’’
- आम्ही जरा प्रकोप हटवितो, तुम्ही लोक पुन्हा तेच काही कराल जे पूर्वी करीत होता.
- ज्यादिवशी आम्ही मोठा आघात करू तो दिवस असेल जेव्हा आम्ही तुमच्यावर सूड उगवू.
- आम्ही यांच्यापूर्वी फिरऔनच्या लोकसमूहाला अशाच कसोटीत घातले आहे. त्याच्याजवळ एक अत्यंत सज्जन प्रेषित आला,
- आणि तो म्हणाला, ’’अल्लाहच्या दासांना माझ्या हवाली करा, मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय प्रेषित आहे.
- अल्लाहच्याविरूद्ध शिरजोरी करू नका. मी तुमच्यासमोर (आपल्या नियुक्तीची) स्पष्ट सनद प्रस्तुत करतो.
- आणि मी आपल्या पालनकर्त्याचे व तुमच्या पालनकर्त्याचे आश्रय घेतलेले आहे यापासून की तुम्ही माझ्यावर आक्रमक व्हावे.
- जर तुम्ही माझे म्हणणे ऐकत नसाल तर माझ्यावर हात टाकण्यापासून दूर रहा.’’
- सरतेशेवटी त्याने आपल्या पालनकर्त्याचा धावा केला की हे लोक अपराधी आहेत.
- (उत्तर दिले गेले), ’’ठीक, तर रातोरात माझ्या दासांना घेऊन निघून जा तुम्हा लोकांचा पाठलाग केला जाईल.
- समुद्राला त्याच्या स्थितीत मोकळे सोड. हे संपूर्ण लष्कर बुडणार आहे.’’
- कित्येक उद्याने व झरे आणि शेते व वैभवशाली राजवाडे होते जे ते सोडून गेले
- आणि शेते व वैभवशाली राजवाडे होते
- जे ते सोडून गेले व कितीतरी विलासाचा सरंजाम ज्यात ते विलास करीत असत, त्यांच्या पाठीमागे तसाच पडून राहिला.
- असा झाला त्यांचा शेवट आणि आम्ही दुसर्यांना या वस्तूंचे वारस बनविले
- मग ना आकाश त्यांच्यासाठी रडले व ना पृथ्वी, आणि थोडीशी सवडसुद्धा त्यांना दिली गेली नाही.
- अशा प्रकारे बनीइस्राईलना आम्ही अत्यंत अपमानास्पद यातना
- देणार्या फिरऔनपासून मुक्ती दिली, जो मर्यादेपलीकडे जाणार्यांपैकी खरोखरच मोठा उल्लंघनकारी मनुष्य होता.
- आणि त्यांची स्थिती जाणून त्यांना जगाच्या इतर लोकसमूहावर प्राधान्य दिले,
- आणि त्यांना असे संकेत दाखविले ज्यामध्ये उघड परीक्षा होती.
- हे लोक म्हणतात,
- ’’आमच्या पहिल्या मृत्यूशिवाय अन्य काहीच नाही, त्यानंतर दुसर्यांदा आम्ही उठविले जाणार नाही
- जर तुम्ही खरे असाल तर उठवून आणा आमच्या वाडवडीलांना.’’
- हे श्रेष्ठतर आहेत की तुब्बअचे राष्ट्र आणि त्याच्या पूर्वीचे लोक? आम्ही त्यांना याच कारणास्तव नष्ट केले की ते अपराधी बनले होते.
- हे आकाश व पृथ्वी आणि त्यांच्या दरम्यानातील वस्तू आम्ही काही खेळ म्हणून बनविल्या नाहीत.
- यांना आम्ही सत्याधिष्ठित निर्माण केले आहे परंतु यांच्यापैकी बहुतेकजण जाणत नाहीत.
- या सर्वांच्या उठविण्यासाठी ठरलेली वेळ निर्णयाचा दिवस आहे.
- तो दिवस जेव्हा एखादा निकट स्नेही आपल्या निकट स्नेहीच्या कोणत्याही उपयोगी पडणार नाही आणि कोठूनही व कसलीही मदत त्यांना पोहचणार नाही,
- याव्यतिरिक्त की अल्लाहनेच एखाद्यावर दया करावी, तो जबरदस्त आणि परमकृपाळू आहे.
- जक्कूमचे वृक्ष
- गुन्हेगारांचे खाद्य असेल,
- तेलाच्या उकळीप्रमाणे, पोटांत ते अशाप्रकारे उकळेल
- जसे उकळते पाणी उसळत असते,
- ’’धरा याला आणि फरफटत न्या याला नरकाच्या मधोमध.
- आणि ओता याच्या डोक्यावर उकळत्या पाण्याचा प्रकोप.
- चाख याची चव, मोठा जबरदस्त सन्माननीय मनुष्य आहेस तू.
- ही तीच गोष्ट आहे जिच्या येण्यात तुम्ही लोक शंका बाळगत होता.’’
- ईशभीरू लोक शांतीच्या स्थळी असतील.
- उद्यानात व झर्यांत,
- तलम रेशीम व जरतारी वस्त्रे परिधान करून समोरासमोर बसले असतील, असे असेल त्यांचे वैभव.
- आणि आम्ही गोर्यापान मृगनयनी स्त्रियाशी त्यांच्या जोड्या बनवू.
- तेथे ते समाधानपूर्वक हरतर्हेच्या चविष्ट वस्तू मागतील.
- तेथे मृत्यूची चव ते कधीही घेणार नाहीत. बस्स, जगात जो मृत्यू आला तोच आला. आणि अल्लाह आपल्या मेहेरबानीने त्यांना नरकाच्या प्रकोपापासून वाचवील.
- हेच मोठे यश होय.
- हे पैगंबर (स.), आम्ही या ग्रंथाला तुमच्या भाषेत सुलभ बनविले आहे जेणेकरून या लोकांनी उपदेश घ्यावा.
- आता तुम्हीही प्रतीक्षा करा आणि हेदेखील प्रतीक्षेत आहेत.